Saturday 26 August 2017

Murraya paniculata(exotica) कुन्ती

या झाडाला हिंदीत 'कामिनी' म्हणतात. मराठीत 'कुंती' म्हणतात. इंग्रजीमध्ये Orange Jasmine, Chinese Box म्हणतात. 
शास्त्रीय नाव आहे : Murraya paniculata(exotica), इंग्रजीमध्ये त्याला 'मॉक ऑरेंज' किंवा 'ऑरेंज जास्मिन' म्हणतात.
हे तसं छोटंसं झुडूपवजा झाड आहे पण अनुकूल वातावरणात त्याचा छोटा वृक्षही होऊ शकतो.
या झाडाबद्धल मारुती चितमपल्लींनी 'चकवाचांदण' पुस्तकात लिहिलं आहे. 'ज्या जंगली झाडापासून मिळवलेल्या काठीला 'पांढरी'ची काठी म्हणतात. ती काठी वजनानं जड असते. पाण्यातही बुडते. पांढरीची काठी ज्याच्याजवळ असते त्या व्यक्तीला विषारी सापापासून भय नसतं. त्या काठीची उपयुक्तता पाहून मीही ती जंगलातून सारे सोपस्कार पाळून मिळवली. ती काठी मांत्रिकाकडून मिळवावी लागते. अमावास्येच्या दिवशी नदीत अंघोळ करून नग्नावस्थेत पांढरीची काठी तोडावी लागते. तशी मी एका ठाकर आदिवासी मांत्रिकाकडून मिळवली होती.' 

या पांढरीच्या काठीबद्दल त्यांनी जी. एंच्या पत्रात देखील लिहिले आहे. या वृक्षाचे लाकूड नाजूक कोरीव काम करण्यासाठी वापरतात. ब्रह्मदेशात त्याच्या सालीचा उपयोग सौन्दर्यप्रसाधनात केला जातो, असे डॉ. म. वि. आपटे यांच्या 'वनश्रीसृष्टी' ग्रंथात नोंदवले आहे.

या वृक्षाच्या सुंदर पांढऱ्या फुलांमुळे याला उद्यानवृक्ष म्हणून लावण्यात येते. भरपूर पाऊस होणाऱ्या भागात हा वृक्ष वन्य आहे. या वृक्षाच्या तीन पोटजाती आढळतात. क्षुपरूप जात महाराष्ट्रात, उत्तर भारतात उद्यानात आढळते. वृक्षरूप वन्य जात भारतात प्रामुख्याने कारवारच्या जंगलात आढळते, तर आणखी एक वृक्षरूप जात श्रीलंकेत आढळते. आशिया खंडात चीन, ब्रम्हदेश, कंबोडिया इत्यादी देशातही हा वृक्ष आढळतो. परंतु ऑस्ट्रेलियामध्ये या वृक्षाला 'invasive' म्हणून नोंदविण्यात आले आहे. त्याची मूळे पाणी शोधत अतिशय वेगाने पसरतात. हा वृक्ष फार वेगाने सर्वत्र पसरण्यामूळे पर्यावरणाचे असंतुलन करू शकतो.


No comments:

Post a Comment