उन्हाळ्याच्या अखेरीस टर्झन हिलच्या जंगलात मी एक छोटे झुडुप पाहिले होते. माझ्या बरोबरच्या वृक्षतज्ज्ञाने त्याचे नाव 'मुरुडशेंग' असे सांगितले होते. खरोखरच त्याला काही शेंगा होत्या आणि त्या मुरडल्या गेल्यासारख्या आकाराच्या होत्या. शेंगा सुकलेल्या होत्या. त्या झाडाबद्दलची अधिक माहिती वाचली, फुले फार सुंदर आकर्षक रंगाची असतात हे कळले. त्या झुडुपाची फुले पावसाळ्यात फुलतात हे माहित झाल्यावर ती फुले दिसण्याची आशा मी सोडून दिली होती कारण ते झाड दाट झाडीझुडुपात होते. उन्हाळ्यात विरळ झालेल्या त्या भागात त्या झाडापर्यंत पोहोचणे थोडेफार तरी शक्य होते पण आता पावसात आजूबाजूला माजलेल्या गर्द रानात ते झाड सुद्धा दृष्टीस पडणे अशक्य होते. पण आज सकाळीच 'यामामोटो' या ओळखीच्या पण stray असलेल्या कुत्र्याला हुडकताना टर्झनहिलच्या रस्त्यालाच मला हे झाड अगदी सहज दृष्टीस पडले. ते ओळखू आले त्याच्या पानांच्या बगलेमध्ये दिसणाऱ्या छोट्या लालभडक फुलांमूळे. त्या सुंदर लाल फुलांमुळे हे झाड 'मुरुडशेंग' आहे हे चटकन ओळखता आले.
मुरुडशेंगची रिकामी शेंग (फळ) |
हे खरंतर छोटंसं झुडूप. फुले नसतील तर 'धामण' सारखंच वाटेल कारण याची पानं बरीचशी मोठी 'धामण' च्या पानांसारखीच असतात. अनुकूल परिस्थितीत या झुडुपाचा छोटा वृक्ष होऊ शकतो. फुलाच्या वैशिष्ट्यपूर्ण रचनेमुळेच याची फळे (शेंगा) पाच वेगवेगळ्या छोट्या भागांचा एकमेकाला पीळ बसून बनलेल्या असतात. या शेंगाच्या विशिष्ट आकारामुळे या झाडाला 'मुरुडशेंग' असे नाव पडले आहे. डॉ. म. वि. आपटे यांच्या 'वनस्पतीसृष्टी' या ग्रंथात या झाडाचे आणखी एक नाव 'मृगशृंग' असे दिले आहे. 'मृगशृंग' म्हणजे कुरंगहरिणांचा पुढारी नर. या नराची शिंगे अशा पीळ पडलेल्या आकाराची असतात.
मुरूडशेंगेची फुले साधारण जुलै ते ऑगस्ट या काळात फुलतात. ऑक्टोबर ते नोव्हेंबर पर्यंत फळे परिपक्व होतात आणि त्यांच्या सुक्या शेंगा बराच काळ ती झाडावरच राहतात. म्हणूनच मला उन्हाळ्यात या झाडाच्या शेंगा पाहता आल्या होत्या. पानझडतीच्या काळात या झाडाला पालवी लवकर येते, त्यामुळे जंगलातील हरीण आणि इतर शाहाकारी प्राण्यांना या झाडापासून अन्न मिळण्यास मदत होते.
'मुरुडशेंग' या झाडाचे अनेक औषधी गुणधर्म या ग्रंथात सांगितले आहेत. प्रदीप क्रिशेन यांच्या 'जंगल ट्रीज ऑफ सेंट्रल इंडिया' या पुस्तकात मुरूडशेंगेच्या फळाचा आणि खोडाचा उपयोग ग्रामीण, आदिवासी भागात पोटदुखीवर केला जातो असे सांगितले आहे.
दक्षिण भारतात या झाडाच्या सालीपासून पोती बनवली जातात. ज्यूट सारखाच त्यांचा उपयोग केला जातो.
No comments:
Post a Comment