Tuesday, 4 October 2016

अंबरनाथचे शिवमंदिर

अंबरनाथचे शिवमंदिर

ठाणे जिल्ह्यातील, अंबरनाथ येथे दहाव्या शतकातील शिवमंदिर आहे. मंदिराच्या उत्तर द्वाराकडे असलेल्या शिलालेखावरील नोंदीप्रमाणे हे मंदिर १०६० मध्ये शिलाहार राजवटीतील एक मुख्य (अधिकारी) मम्मूनी किंवा ममवनी याने बांधले आहे. 'वालधुनी' नदीच्या किनाऱ्यालगत हे मंदिर बांधले आहे(पूर्वी ही मोठी नदी असावी). आता बघतले तर मंदिराच्या बाजूने एक मळकट पाण्याचा ओढा वाहताना दिसतो. या मंदिराच्या चहूबाजूना काही अंतरावर संरक्षक भिंत आणि प्रवेशद्वार-तोरणं(gateways) होती. पण आता ती अस्तित्वात नाहीत फक्त त्यांचे काही तुटके-फुटके अवशेष आजूबाजूला सापडतात.  

मंदिर पश्चिमाभिमुख आहे. त्याची रचना मंडप आणि गर्भगृह अशी आहे. मंडपाला तीन बाजूने प्रवेशद्वारं आहेत. प्रत्येक प्रवेशद्वाराला स्वतःचा पोर्च आहे. चार स्वतंत्रपणे उभे असलेले स्तंभ मंडपाचे छत डोक्यावरती घेऊन आहेत आणि तीन पोर्चांमधे असलेले एकूण सहा स्तंभ एवढेच मंदिराला आधार देत उभे आहेत. या स्तंभांवरही मूर्ती कोरलेल्या आहेत. अत्यंत प्राचीन असल्याने मंदिराची पडझडही बरीच झाली आहे आणि बहुदा अनेक विरोधक आक्रमणंही या मंदिराने सोसली असावीत. मंदिराची रचना आत्तापेक्षा बरीच वेगळी असण्याची शक्यता आहे आणि आक्रमणांमधील तोडफोडीमुळे नंतरच्या काळात मंदिरात अनेक बदलही झाले असावेत. नंतरच्या हिंदू राजवटींनी मंदिराची डागडुजी काही प्रमाणात केली असल्याचे त्याच्या रचनेवरून दिसते. 

या मंदिरच्या स्थापत्यशैलीला भूमिज शैली म्हणतात. 'भूमिज' मंदिरे पृथ्वीच्या कवचातून वर येऊन वाढलेली वाटतात. या मंदिरांचा चेहरामोहरा डोंगरांच्या रचनेच्या जवळ जाणारा असतो. ही शैली द्रविड आणि नागर शैलीचा सुवर्णमध्य म्हणता येईल. हिला 'दक्खनी शैली' असेही म्हणतात. छोटी छोटी शिखरं आणि त्यांना तोलून धरणारे ( वेगवेगळ्या शिल्पपट्टया आणि शिल्पांच्या चोकटी एकमेकांवर रचून बनलेले ) उभे स्तंभ. हे स्तंभ एकमेकाला जोडलेले. या अश्या एकमेकाला जोडलेल्या अनेक स्तंभांतूनच एक एक भिंतीसारखी रचना उभी राहते. ही अशी रचना हेच भूमिज शैलीचे वैशिष्ट्य. या बाह्य भागांवर अतिशय सुंदर शिल्पकाम आहे. 


मंदिराची रचना : उभे शिखरांपर्यंत जाणारे स्तंभ आणि आढव्या शिल्पपट्ट्या

जशी उभ्या स्तंभांची छोट्या  शिखरांपर्यंत गेलेली रचना तशीच आढवी शिल्पपट्ट्यांची रचना. असे हे उभ्या आढव्या पट्ट्यांचे 'मॅट्रिक्स'. शिल्पंपट्ट्या एकावर एक रचलेल्या. वेगवेगळ्या शिल्पांच्या. या मंदिराला, जमिनीलगतच्या भक्कम पाया रोवणाऱ्या दोन पट्ट्या आहेत. त्यांच्यावर शिल्पं नाहीत. त्यावरची पट्टी हि 'कीर्तिमुख' या राक्षसाच्या तोंडांची पट्टी आहे. त्यावरची पट्टी गजमुखांची आहे. त्यावरील पट्टी वेली-फुलांच्या अलंकारिक आकारांची बनलेली आहे. त्यावरील पट्टी हि मोठ्या आकाराची असून त्यात अनेक स्थानिक दृश्यं, नृत्य-वादनाचे प्रसंग, मैथुन शिल्पं कोरलेली आहेत. हि पट्टी अतिशय सौन्दर्यपूर्ण आहे, परंतु कालानुरूप तिची खूपच पडझड झाली आहे. याच्या वरही काही शिल्पविरहित पट्ट्या असून त्याच्यावर मुख्य अशा विशिष्ट देवतांच्या शिल्पांच्या चौकटी आहेत. या चौकटींच्या वर छपरांसारख्या वाटणाऱ्या पट्ट्या असून वर वर जाताना त्या निमुळत्या होत जाऊन शेवटी त्या शिखरांपर्यंत साथसंगत करतात. 

बाह्य भागावरील अनेक शिल्पे उत्कृष्ट आहेत. त्यातली काही:
साधू/संन्यासी

सुरसुंदरी:   सुरसुंदरी म्हणजेच स्वर्गीय अप्सरांसदृश युवती. शिल्पशास्त्रांच्या प्राचीन ग्रंथातील नियमांनुसार मंदिरांवर सुरसुंदरीची शिल्पे असणे गरजेचे आहे. या सुरसुंदरी विपुलता, सौख्य, सुपीकता, सौन्दर्य, समृद्धी यांचे प्रतीक मानल्या गेल्या आहेत. त्यांच्याविना बांधलेले मंदिर ते मंदिर कसले अशा अर्थाचे संदर्भ या प्राचीन ग्रंथात नोंदलेले आहेत. त्यामुळेच अतिशय सौन्दर्याने, सौष्ठ्वाने परिपूर्ण सुरसुंदरींची शिल्पे प्राचीन मंदिरांवर आढळतात. खजुराहो मधेही सुरसुंदरींची विलोभनीय शिल्पे आहेत. अंबरनाथच्या मंदिरावर देखील काही अतिशय देखणी शिल्पं आहेत आणि पडझडीनेही त्यांचे सौन्दर्य जराही कमी झालेले नाही. या सुरसुंदरींची शिल्पे मुख्य चौकटींमध्ये नसून दोन स्तंभांच्या मधील कोपऱ्यात असतात, किंवा मुख्य देवतांच्या शिल्पांशेजारील भागांत असतात. सुशोभीकरण, आणि सौन्दर्यनिर्मिती हे या शिल्पांचे मुख्य उद्दिष्ट आहे.

सुरसुंदरी

देवता: शिव मंदिर असल्याने शिवाशी निगडित देवदेवतांची शिल्पे इथे कोरली आहेत. त्रिमूर्ती, ब्रह्मा, महाकाली, नटेश्वर , विष्णू , पार्वती, चामुंडा अशा देवदेवता आहेत.
१. बहुदा ब्रह्मा २. वराही ३. ? (बहुदा नटेश्वर )

१. बहुदा विष्णू  २. गणपती ३. बहुदा पार्वती
१. ? २. चामुंडा  किंवा महाकाली ३. चामुंडा
हि अतिशय सुंदर पण भग्न देवता कोण असावी? ती अनेक हातांची आहे. शिवाची असावी. पण नक्की ओळखता येत नाही. बहुदा शिव तांडव करणारा नटेश्वर असावा का?


नृत्य - वादन 

पश्चिमेकडील प्रवेशद्वारातील पोर्चमध्ये भव्य नंदीची मूर्ती आहे. आत गेल्यावर मंडप लागतो, जिथे फोटो काढण्यास मनाई आहे. तेथील स्तंभांवर आणि छताच्या तुळयांवर कोरीवकाम केलेलं आहे, पण अपुऱ्या प्रकाशामुळे ते फारसे दृष्टीस पडत नाही. मंडप आणि गर्भगृहाच्या मधे अंतराळ नसून सरळ गर्भगृहाचे प्रवेशद्वारच लागते. हे प्रवेशद्वार सुद्धा शिल्पांनी सुशोभित आहे, मात्र इथेही बराच अंधार असल्याने ते स्पष्ट दिसत नाही. त्यातून मी जेव्हा या मंदिराला भेट दिली तो सुट्टीचा दिवस होता आणि त्यातून श्रावण महिनाही होता त्यामुळे मंदिरात खूपच वर्दळ होती. पुन्हा एकदा निवांत निर्मनुष्य दिवशी जायला हवे. गर्भगृहाच्या प्रवेशदवारातून आत पायऱ्यांनी उतरावे लागते. त्यामुळे गर्भगृह खोल विहिरीसारखे वाटते. गर्भगृह अतिशय उंच भिंतींचे असून त्यात मध्यभागी शिवलिंग आहे. गर्भगृहाच्या वरील छप्पराला वर्तुळाकृती खुला भाग(open to sky) आहे. हा खुला भाग का असावा? मंदिरातील होमहवनाचा धूर जाण्यासाठी तो आहे असेच वाटते. पण हि रचना मी अजून कुठे बघितली नाही. खिद्रापूरच्या कोपेश्वर मंदिरालाही छताला असा मोठा खुला भाग आहे असे वाचले आहे. ते मंदिर अजून बघितले नाही.

मुख्य प्रवेशद्वाराजवळील नंदी
प्राचीन मंदिर म्हणून या मंदिराला खरोखरच महत्व आहे पण एकंदरीतच त्याच्या आजूबाजूला बऱ्यापैकी गलिच्छ वातावरण आढळले. हे मंदिर पूजेत आहे. आणि भाविकांच्या होणाऱ्या गर्दीमुळेदेखील मंदिराच्या परिसरावर परिणाम होता असावा. पुन्हा एकदा उन्हाळ्यात या मंदिराला जरूर भेट द्यायला हवी. तरीही अतिशय सुंदर शिल्पकामासाठी हे मंदिर पुन्हा पुन्हा बघावेसे नक्कीच आहे.

No comments:

Post a Comment