जपानी काबुकी डान्सर
जेव्हा नोकरी सोडून घरातील वास्तव्य वाढले तेव्हा खिडकीतून बाहेर दिसणाऱ्या mangrove (खारफुटी)कडे माझे लक्ष गेले. तिथे आणि त्याच्या बाजूलाच असणाऱ्या लहानशा टेकडीवर दाटीवाटीने वाढलेल्या झाडांत अनेक पक्ष्यांची हालचाल नेहमी दिसायची. लालबुड्या बुलबुल, मैना, खंड्या, हळद्या, राखी बगळा, पॉण्ड हेरॉन, कोतवाल, घार, ब्राह्मणी घार असे पक्षी अधून मधून दिसत. पण बाकीचे अनेक छोटे पक्षी जे या खारफुटीच्या झुडपात राहतात ते मात्र क्वचितच दिसत. त्यांचे आवाज मात्र ऐकायला येत. त्यातला एक अतिशय मोहक आणि लक्षात राहणारा आवाज होता 'टीट-टी-टी SSSSSSS टीटी SSS टीटी SSS टीटी टी SSS'
ही शीळ बऱ्याचदा पूर्ण ऐकू येई, पण काही वेळेला अर्धी पण ऐकू येई. या शिळीचे अनेक प्रकारही ऐकू येत. हा असा सुरेल शिळा घालणारा आणि त्यातही व्हेरीअशन करू पाहणारा कोण हा बीथोवेनचा वारशी? म्हणून त्या अज्ञात पक्ष्याचे नाव मी 'बीथोवेन' ठेवले होते. पक्षी कधीच दिसला नाही. दहाव्या मजल्यावरून दिसणार तरी कसा म्हणा? पण मला नेहमी त्याचा आवाज ऐकला की तो कुठला पक्षी असेल हे शोधावेसे वाटे. पण शोधायचे कसे? जेव्हा जेव्हा तो आवाज कानावर पडे तेव्हा मी मनात त्या पक्ष्यालाच उद्देशून म्हणत असे 'आज ना उद्या नक्कीच शोधून काढेन मी तू कोण आहेस ते.' माझे पक्ष्यांबद्धलचे फक्त कुतूहल जास्त आणि अज्ञान त्याहूनही जास्त, त्यामुळे शोधायचे कुठे आणि विचारायचे कुणाला आणि कसे? आवाज रेकॉर्ड करून कुणा पक्षी-निरीक्षकाला ऐकवता आला असता पण तेव्हा पक्षीनिरीक्षण आणि पक्षीनिरीक्षक या दोहोंबाबतीत ज्ञान अत्यल्पच होते. म्हणून हा आवाज हुडकणे बाजूलाच राहिले. दोन अडीज वर्षं तरी त्याचा काहीच पत्ता लागला नाही. जवळपास त्या आवाजाचा काहीही पाठपुरावा न करता, कुठचाही खटाटोप न करता मी गप्प बसून राहिले तो आवाज ऐकत. सकाळी बऱ्याचदा ऐकू येई, अधेमधे कधीही ऐकू येई आणि काही काही दिवस, महिने महिने त्याचा आवाज नसे. मी त्या आवाजाला अनुसरून त्या अज्ञात पक्ष्याचे एक चित्र मनात बांधले. माझ्या मनातल्या चित्रात तो पक्षी म्हणजे एक खूप छोटा, पिवळ्या निळ्या रंगाचा आणि कुणीतरी गायनाचा पंडित असावा त्याप्रमाणे डोक्यावर तुरा असणारा होता. जेव्हा काही काळ त्याचा आवाज ऐकू येत नसे तेव्हा मला वाटे कि बहुतेक आता ऐटीत फांदीवर बसून तो सुरांची छान रचना बनवत असेल. आणि त्या सुरावटी बांधण्यातच तो गर्क असेल. मग जेव्हा त्याची सुरावट बांधून होई तेव्हाच तो रियाज करत असेल. किंवा नवीन चीजा शिकण्यासाठी खारफुटीचे रान सोडून आपल्या गुरुकडे साधना करण्यासाठीदेखील गेला असेल. मोठा पंडितच गाण्यातला. त्याची नेहमीची 'टीट-टी-टी SSSSSSS टीटी SSS टीटी SSS टीटी टी SSS' ही शीळ तो वेगवेगळ्या व्हेरिएशनने ऐकवत असे.
शेवटी एकदाचा या सुरेल आवाजाचा गायक समोर आला. मी कोकणात गेले असताना, घराच्या देवखोलीतून समोरच्या आंब्याच्या झाडावर हालचाल दिसली म्हणून बघितलं तर एक सुमार दिसणारा चिमणीएवढा काळसर, पोटाकडे पांढरट, पण अतिशय सुरेख जपानी पंख्यासारखी शेपटी असलेला पक्षी या फांदीवरून त्या फांदीवर टणाटण उडया मारीत होता. पायावर नक्षत्र पडल्यासारखा नुसता इथून तिथे नाचत, फुदकत होता, काही सेकंदातच तो नजरेआड झाला. त्या झाडावरून दुसऱ्या, तिसऱ्या झाडावर पसार झाला. हाच तो 'बीथोवेन' हे काही मला तेव्हा कळले नाही. पण दूर गेल्यानंतर तीच नेहमीची शीळ ऐकू आली. तेव्हा चटकन डोक्यात प्रकाश पडला की खारफुटीतला 'बीथोवेन' इथे पण आहे. मग मी कान देऊन परत ती शीळ ऐकू येते का ते बघत राहिले. अनेक दिवस त्या आवाजाच्या दिशेने धावू लागले. त्याला पकडणे आता शक्य होते कारण घर जमनीलगत, झाडांच्या आसपास असल्याने कुणी असलाच आवाज करत तर चटकन त्या आवाजाच्या दिशेने हुडकले की पक्षी दिसू शकणार होता. म्हणून आवाजावर नजर ठेऊन होते पण तो आवाज अजूनही हुलकावण्या देतच होता. पक्षी काही समोर आला नाही.
एक दिवस समोरच्या जांभळीच्या झाडावर आलेली हरेवा या पक्ष्याची जोडी कॅमेराबंद करण्यासाठी घराच्या टेरेसवर दबा धरून बसले होते, तेव्हा त्यांच्या camouflage करणाऱ्या हिरव्या रंगामुळे त्यांना हुडकताच येत नव्हते म्हणून आणि उन्हाच्या माऱ्यामुळे बेजार झाले होते. तेव्हा अचानक तीच नेहमीची शीळ समोरच्या झाडावर ऐकू आली. ऊन अगदी समोरून डोळ्यावर पडत होतं आणि त्या उन्हाने आंब्याची फांदी देखील काळसर दिसत होती तेव्हा नाचत नाचत जपानी पंखा फुलवत तो पक्षी त्या फांदीवर अवतरला. हरेवा नाही तर नाही याला तरी कॅमेराबंद करूया म्हणून मी झटकन त्याला कॅमेऱ्याने टिपले. कॅमेऱ्यात त्याची silhouette च दिसत होती. तर तीच शीळ तो घालू लागला. मी खात्री करून घेण्यासाठी कॅमेऱ्यातून त्याच्याकडे बघतले, तोच होता शीळ घालत. 'अरे चोरा ! तूच काय तो बीथोवेन!' असे म्हणून मी कपाळाला हात लावला. तूच काय तो स्वरांची बांधणी करणारा, सुरेख आवाज काढणारा. कुठे तो पिवळा-निळा राजेशाही तुरा असलेला तानसेन मी योजला होता आणि तू एकदम त्याच्या विरुद्ध निघालास. पण दिसण्यास अगदीच काही सुमार नाहीस! छानच आहेस! किंबहुना जपानी किमोनो घालून जपानी पंखा फिरवीत नाचणारा काबुकी डान्सरच वाटतोस!
माझ्याकडचा तुझा फोटो तेवढा छान नाही पण इतर तुझे फोटो बघितले तेव्हा समजले खरा कलाकार-गायक आणि नर्तक वाटतोस खरा. तुझ्या गाण्यापेक्षा तुझं नाचणंच वाखाणलं गेलंय पण! त्यावरूनच तुला नाचण, नाचरा, नर्तक म्हणतात.
तर असा मला या अज्ञात 'बीथोवेन' चा शोध लागला. ज्याला मी बीथोवेन समजत होते तो होता नाचण्यात निपुण , त्याचं नाव नाचरा किंवा व्हाईट स्पॉटटेड फॅनटेल (Rhipidura albogularis, ऱ्हिपिड्युरा आल्बोग्युलॅरीस).
हवेत भिरभिरत जाणारं गवताचं पातं
'पक्षी आपले सख्खे शेजारी' या किरण पुरंदरे यांच्या पुस्तकात एका पक्ष्याबाबत त्यांनी लिहिलंय 'त्या काळात (भरपूर पाऊस सुरु होऊन सगळीकडे हिरवंगार झालं असलं की ) मला लोकांचे लांबलचक हिरव्या रंगाची शेपूट असलेला पक्षी पाहिल्याचे फोन येत.'
हे वाचल्यावर एकदम कसलीतरी लिंक लागली आणि आनंदाने चेहरा उजळला. मी अनेक दिवस शोधत होते तो हा! ' ठिपकेवाला मुनिया'
हे हिरव्या रंगाचं लांब शेपूट मला आमच्या दहाव्या मजल्याच्या खिडकीतून वारंवार दिसलं होतं. पुढे नुसता एक चॉकलेटी भुरभुरणारा कापसाचा गोंडा, आणि मागे लांब हिरवी केवढीतरी शेपटी. मी याला इतक्यांदा बघितले कि असा विचित्र पक्षी असूच शकत नाही असेच मला वाटले आणि तो पक्षी नसून कोणीतरी मोठ्ठा किडा आहे असेही मला वाटले. मुख्य म्हणजे सकाळच्या वेळी बाहेर पाहत असताना चटकन ते हिरवं लांबलचक पातं उडताना दिसे. तेव्हा काय असेल ही विचित्र गोष्ट? कित्येकदा मी ते भिरभिरतं पातं दिसलं की इतरांना दाखवायला जाई पण तोपर्यंत सुसाट वेगाने भिरभिरत ते नाहीसं होई आणि ते काय आहे याच्या रहस्याचा उलघडा होत नसे. खरोखरच पाहणाऱ्याला ते असे काही दिसते की माहित नसेल तर क्षणभर तो अचंबित होऊन बघतच राहील कि हे आहे तरी काय? कसला किडा आहे का एवढा मोठा ज्याला पानाची शेपटी उगवलीय. पण किडा एवढ्या झाडांच्या उंचीवरून उडेल का? हा कुठला राक्षसी किडा असेल? असाच विचार मनात येईल.
शेवटी त्या भिरभिरणाऱ्या विचित्र गवताच्या पात्याचा शोध किरण पुरंदरे यांच्या पुस्तकात लागला. हाच तो ठिपकेवाला मुनिया. त्यांनी लिहिलं आहे 'जरा डोळ्यांपुढे आणण्याचा प्रयत्न करा. साधारण चिमणीचं पिल्लू वाटावं एवढ्या आकाराचा चॉकलेटी रंगाचा मुनिया आकाशात उडतोय आणि त्याने चोचीत धरलेलं हिरवं पातं वाऱ्यावर भुरभुरतंय!' तेव्हाच डोक्यात प्रकाश पडला की आपल्याला दिसणारी वाऱ्यावर भिरभिणारी हिरवी लांबलचक शेपटी आणि पुढे उडणारा चॉकलेटी गोंडा म्हणजे हाच 'ठिपकेवाला मुनिया'. ठिपकेवाला मुनिया गवताच्या पात्यांपासून आपलं घरटं बांधतो. आणि पावसाच्या दिवसात हिरवीगार गवताची पाती लांबलचक वाढली की हा त्यांना खुडून घरटं बांधण्यासाठी ये-जा करू लागतो. स्वतःच्या आकारापेक्षा मोठी पाती घेऊन उडण्यामुळेच तो असा मजेशीर दिसतो. याचा एक भाऊबंद अशाच उचापती करताना मी अगदी बघितला आहे. त्याचं नाव व्हाईट रम्पड मुनिया (पांढऱ्या पुठ्ठयाची मनोली). हा देखील असाच घर बांधण्याच्या उद्योगात हिरव्यागार गवताचे तुरे, विशेषतः ग्रे लव्हग्रास चे मोठे मोठे फुललेले तुरे खुडून घेऊन जात होता. त्याला अनेकदा जवळून पाहताना तो इतका मजेशीर दिसायचा की एकदा तर मला मोरासारखा पिसाऱ्याचा जुडगा असलेला कुणीतरी दुसराच पक्षी आहे असे वाटले. हा देखील गवतात सारखा ये-जा करत राहतो आणि ग्रे लव्हग्रास चे तुरे, काड्या खुडून स्वतःच्या आकारापेक्षा मोठा भर चोचीने उचलून झाडावरच्या घरट्यापर्यंत घेऊन जातो. पण याला मी बरंच जवळून पाहिलं त्यामुळे माझी ठिपकेवाल्याच्या बाबतीत झाली तशी फसगत झाली नाही.
ठिपकेवाला मुनिया (विकिपीडियाच्या सौजन्याने), पांढऱ्या पुठ्ठयाचा मुनिया |
No comments:
Post a Comment