Friday 7 October 2016

शांत, स्तब्ध, एकांतप्रिय व्याध


पावसाळी संध्याकाळ.  दूर एका पेंडराच्या झाडाच्या शिखरावरील पर्णहीन डेळक्यावर एक पक्षी बसून होता. इतक्या दूर असूनही तो बऱ्यापैकी मोठा दिसत होता. म्हणजे प्रत्यक्षात किती मोठा असेल याचा अंदाज बांधत मी घराच्या अंगणातून त्याला न्याहाळत होते. काही कामामुळे मी घरात गेले आणि पुन्हा येऊन बघते तर तो गायब झाला होता. त्यानंतरच्या अनेक संध्याकाळी मी त्या झाडाकडे पाहीले पण तो दिसला नाही. तो बहुदा गरुड असावा असे माझ्या अज्ञानी मनाला वाटले. 'गरुड'. कुणाला ठाऊक नसतो हा पक्षी? कुठचाही मोठा पक्षी दिसला की 'गरुड' च नाव मनात येते. हा पण गरुडच असावा का? पुन्हा दिसावा म्हणून मनोमन त्याची प्रतीक्षा केली. गणपतीचे दिवस होते. गावच्या आमच्या घरात त्या दिवसात खूप गजबज होती. एका दिवशी, सकाळचा जवळच्या झाडावर बसलेला तो, घराच्या पोर्चमधून मला दिसला. इतरांनाही दाखवला. केवढा मोठं आहे! एवढा मोठा कोण हा पक्षी? प्रत्येकाने म्हटले पण तो नक्की कोण असेल त्याबद्धल कुणालाच माहित नव्हते. पाऊस नव्हता, चांगले ऊन होते. बराच वेळ तो पक्षी झाडावरच बसून होता.

साधारण अकराच्या दरम्यान कुठूनसा एक पिसांचा लोट सळसळत उंच झाडांच्या वर आभाळात उडताना दादाला दिसला. तो चटकन हात दाखवत म्हणाला 'अरे मोर मोर!' त्या दिशेला तोंड वळवले तर एक मोर चक्क वरती आकाशात उडताना दिसला. त्याच्यामागे त्याचा पिसांचा लोटही हेलकावे खात होता. एवढ्या उंचीवर उडणारा मोर कधीच पहिला नव्हता. हा मोर जो उडाला तो काही मोठ्या पक्ष्यासारख्या भराऱ्या मारण्यासाठी नव्हे, तर एका झाडीतून शेताच्या बांधावरून लपत छपत तो दुसऱ्या झाडीकडे चालला होता. तिथे चटकन पोहोचण्यासाठी तो उडाला असावा. गरुड(त्याला तूर्तास गरुडच म्हणूया) तर आपल्या जाग्यावर बसूनच होता. त्याचे मोराकडे नक्कीच लक्ष असणार. मोर विजेसारखा एका सेकंदात झाडीत गायबही झाला. ज्या झाडीत तो घुसला ती गरुडाच्या झाडापासून तशी जवळच होती. 

त्या मोराला पाहण्यासाठी मी आणि दादा दोघे झाडीलगतच्या वाटेने लगबगीने गेलो. चालता चालता, ते गरुडाचे झाड अगदी समोर दिसत  होते पण रस्त्याला लागून नव्हते, अनेक झाडाच्या गर्दीत , वाटेपासून दूरच होते.पण त्यावर बसलेला गरुड नक्कीच आमची चाहूल घेऊन होता. कारण थोडा दूर असतानाच जेव्हा मी त्याचा एक फोटो काढला, तेव्हा त्याने थोडी हालचाल केली. त्या दोन्ही बाजूने असलेल्या झाडीच्या रस्त्याने आम्ही पुढे गेलो. मोर रस्त्याच्या एका बाजूच्या झाडीत घुसला होता (एवढेच आम्ही घराच्या अंगणातून पाहू शकलो होतो ) आणि गरुडाचे झाड रस्त्याच्या दुसऱ्या बाजूच्या झाडीत होते. त्या झाडाच्या आसपास पोचलो, मान वरती करून गरुडाकडे पहिले, आणि बघताक्षणी त्याने आपले अजस्त्र पंख उघडले आणि बळकट दिसणाऱ्या पायांची  झाडाच्या फांदीवरची पकड सुटली. क्षणार्धात गरुड उडून गेला. 


एक सेकंद दिग्मूढ होऊन आम्ही बघतच राहिलो. काही पक्षी, प्राणी असतातच असे. मंत्रमुग्ध होऊन त्यांना फक्त बघायचे. बहुदा डहाण्या वाघ दिसला तर असेच होईल. भान हरपेल. एका (बहुदा मारुतीचितमपल्ली यांच्या) पुस्तकात वाचले आहे की अश्या काही शिकारी प्राण्यांत मृत्यूचे संमोहन घालण्याची विद्या असते. तसंच काहीसं पक्ष्यांतही असेल का? कोण जाणे. पण ह्या अजस्त्र पक्ष्याला बघून मात्र संमोहन घातल्यासारखे झाले. 

मोर पाहण्यासाठी आलो होतो याचा क्षणभर विसर पडला. मोर काही दिसला नाही. तो केव्हाच झाडीच्या दाटीवाटीने पलीकडच्या शेतात पसारही झाला असावा. इकडे तिकडे बघितले. पण कुठेच काही हालचाल नव्हती. पुन्हा काही गणपतीच्या दिवसात गरुड दिसला नाही. गणपतीनंतर घरात सामसूम झाली. मी मात्र काही दिवस आईबरोबर मागे थांबले. गणपती गेला आणि दबा धरून बसल्यासारखा पावसाने कोसळायला सुरवात केली. दिवस दिवस काळवंडून टाकणाऱ्या वातावरणात पाऊस पडत राहिला. त्या दिवशी दुपार सरून संध्याकाळ व्हायला आली तरी पाऊस पडतच होता. पोर्चमध्ये खुर्ची टाकून मी पुस्तक वाचत होते. पावसाचा जोर वाढला तसे मी बाहेर बघितले. दूर धूसर झालेल्या पेंडाराच्या झाडावर पुन्हा गरुडाचा ठिपका दिसला. तसा ठिपका म्हणता येणार नाही कारण त्याचा उभट आकार. पंख जवळ घेऊन बसलेली उंचाडी काळसर आकृती दिसत होती. गरुड पावसात भिजत होता. झाडाच्या त्याच डेळक्यावर एकटाच बसून होता. मी अधून मधून त्या झाडाकडे बघत राहिले. आता सहा वाजून गेले होते. पावसामूळे काळोख लवकरच पसरत होता. पण गरुड अजून तिथेच होता. जवळपास एक-दीड तास तो तिथेच एका जागेवर, जराही हालचाल न करता, तेही भर पावसाचा का बसला असावा, तेही एकटाच? मीही तासदीडतास पोर्चमध्ये पुस्तक बाजूला ठेवून बसून राहिले,  त्याच्याकडे बघत. मात्र तो जराही हलला नाही. सगळा आसमंत चिडीचूप होता. माणसे नाहीत. पाखरे नाहीत, कुणी नाही. मला मात्र त्याच्या तशा भिजत बसण्याचे आश्चर्य वाटले. नंतर, म्हणजे एक-दीड तासांनंतर , केव्हातरी माझे लक्ष नसताना मात्र तो तिथून उडून गेला. 

आता रात्रीचा कुठे गेला असेल, बाजूच्या डोंगरात, तिथल्या छोट्या जंगलात? रात्रीचा हा काय करत असेल? त्याचे एकटे आयुष्य असेल तरी कसे? त्यानंतर बऱ्याचदा जवळच्या झाडावर तो मला दिसला. चार-दोन फोटोही काढले. हे जवळचे झाड नक्की कसले आहे माहित नाही. पण तिथे तो बऱ्याचदा येऊन बसायचा. आणि दुसरे झाड म्हणजे ते पेंडाराचे. ही दोन झाडे त्याची दिवसभराच्या कामकाजातील विश्रांतीची स्थाने बहुतेक. म्हणजे हा गरुड इथे जवळपासच राहणारा होता तर. त्याच्या फोटोंवरून त्याचे पक्के नावही शोधले 'व्याध गरुड' म्हणजेच Changable Hawk Eagle (Nisaetus cirrhatus). साधारण दोन फूट उंच. पट्ठ्या कमालीचा देखणा. डोक्यावर पिसांची शेंडी. काही फोटोमधे ही पिसांची शेंडी दिसत होती. याला Crested Hawk Eagle सुद्धा म्हणतात. माणसाला किंवा कुणालाही (म्हणजे सर्व सजीवांना) कुणाशीही मैत्री करता यायला हवी होती, पक्ष्यांशी बोलता यायला हवे होते. असे असते तर मी या गरुडाशी मैत्री केली असती. (त्याने मैत्री स्वीकारली असती की नाही कुणास ठाऊक). 


त्याचे डोळे मला दुरून दिसले नाहीत. पण नंतर त्याच्या काही इन्टरनेटवर बघितलेल्या फोटोत त्याचे विलक्षण डोळे दिसले. गुढाने भारलेला हा पक्षी आहे. 'गरुडपुराण' म्हणून एक पुराण आहे, ते सहसा वाचले जात नाही, फक्त मृत्यूनंतरच घरात (किंवा क्रियाकर्म करण्याच्या जागी) ते वाचतात. या पुराणात मृत्यू, मृत्यूनंतरचे जीवन इत्यादींविषयी विष्णूने गरुडाशी केलेला संवाद आहे. गरुड हे विष्णूचे वाहन. अट्टल शिकारी. पक्षांचा राजाच. या समोर दिसणाऱ्या गरुडाविषयी मला कुतूहल वाटतच राहिलं. रात्री, कुठे दूर घनदाट जंगलात त्याचे एखादे रात्रनिवाऱ्याचे घरटे असेल का? कारण काळोख पडताना तो मला डोंगराच्या दिशेने उडताना अनेकदा दिसला. कि कि कि कि कि कि किवववववववववी(ट्वी ट्वी ट्वी ट्वी ट्वी ट्वी ट्युवववववववववी ) अशी किंकाळी फोडली त्याने डोंगराच्या दिशेने उडताना. ती कुणा सहचरासाठी होती का? तसा एकदा मला तो जवळच्या झाडावर दिसला आणि तसाच दिसणारा, दुसरा एक पक्षी त्याच झाडावर थोडासा खालच्या फांदीवर बसला होता. ही गरुड मादी असावी का? त्या दिवशीही पावसाने नुसता काळोख केला होता. फोटो तर सोडाच त्याला नुसतं बघणं सुद्धा त्या रपारप पावसात कठीण झालं. नंतर वाचल्यावर कळलं की या गरुडाच्या विणीचा हंगाम डिसेंबर ते एप्रिल असतो. आणि हा एकांतप्रिय पक्षी फक्त विणीच्या हंगामातच सहचराबरोबर राहतो. त्यामुळे बहुदा तो दुसरा पक्षी त्याचा सहचर नसावा.

एकाच झाडावर बसलेल्या दोन गरुडांविषयी अत्यंत सुंदर श्लोक मुंडकोपनिषदात आहे. एक गरुड खालच्या फांदीवर बसला आहे जो सतत काहीतरी खात आहे. जे चांगले लागले त्याबद्धल सुखी आणि जे वाईट लागले त्याविषयी दुःखी होत आहे. वर बसलेला गरुड मात्र शांत आहे. तो सुखदुःखाच्या पलीकडे गेला आहे. खाली बसलेल्या गरुडाचे जेव्हा वरच्या गरुडाकडे लक्ष जाते तेव्हा त्याला कळून चुकते की आपण मोहमायेच्या अधीन होऊन सुखदुःखं अनुभवत आहोत. जेव्हा तो हे जाणतो तेव्हा तो वरच्या गरुडाशी एकरूप होतो.  


'आभाळवाटांचे प्रवासी' या किरण पुरंदरे यांच्या अतिशय सुंदर पुस्तकात त्यांनी निरनिराळ्या गरुडांबाबत आपल्या अत्यंत खुमासदार शैलीत लिहिले आहे, तिथेच मला या गरुडाचे मराठी नाव 'व्याध' (शिकारी) आहे असे कळले. त्यात ते म्हणतात 'हा सडपातळ, आणि अस्सल जंगली गरुड आहे. डोक्यावरच्या तुऱ्यात काही लांबसडक पिसे असतात, सर्वसाधारणपणे त्याचा  रंग पाठीकडून तपकिरी आणि पोटाकडून पांढरा असतो. घश्यावरून काळे ओघळ यावेत तशा काळ्या लांब रेघा, आणि छातीवर चॉकलेटी रंगाच्या जाड रेषा, व्याधाचे पाय पंजापर्यंत पिसांनी झाकलेले असतात. पायाला पुढे तीन आणि मागे एक बोट असतं, इतर बोटांच्या मानानं पाहिलं बोट आणि मागील बोट ताकदवान असतं. व्याध गरुडाची मादी आकाराने नरापेक्षा मोठी असते' असे त्यांनी लिहिले आहे. मला त्या दोन पक्षांतील लहान मोठा फरक करता आला नाही. त्यामुळे तो दुसरा पक्षी मादी होती का आणखी एक व्याध गरुडच ते काही कळलं नाही. त्यांनी या गरुडाच्या शिकारीचे काही चित्तथरारक प्रसंग या पुस्तकात दिले आहेत. पण मला आपला तो शांत, स्तब्ध, एकांतप्रिय बसलेला गरुडच जास्त बघायला आवडेल/आवडला. निसर्ग कितीही PRACTICAL आणि निर्विकार असला तरी मी नाहीये. त्यामुळे शिकार-बिकार माझ्याच्याने तरी बघवणार नाही. तरीपण त्यांनी केलेले वर्णन वाचनीय आहे. त्यांनी दिलेल्या माहितीत लिहिलं आहे 'व्याध शांत बसून राहतो, लक्ष ठेऊन असतो आणि भक्ष्य दिसताच भयंकर वेगानं अचानक हल्ला करतो, पंखानी फाडफाड मारून भक्षाला गोंधळात टाकतो. पंखांच्या, शेपटीच्या रचनेमुळे झाडाझुडांतून वेगाने उडू शकतो. गरज वाटेल तेव्हा झटकन दिशाही बदलू शकतो. सखोल शास्त्रीय अभ्यासातील काही निष्कर्षांवरून त्याच्या भक्ष्ययादीत पक्षी आहेत: लालबुड्या बुलबुल,बुरखा हळद्या, साळुंकी, कीर पोपट, मोर, रानकोंबडा, तित्तीर, लावरी, हरोळी, पाळीव कोंबडी , सरडे, घोरपड, कास्य सर्प, खार, ससा, पाळीव मांजर.  पण मला यातले बरेचसे पक्षी तो जवळच्या झाडावर असताना आसपास दिसले होते. त्याने कुणाला धरले नाही. बहुदा आजूबाजूला दोन-पाच घरे आणि माणसांची वस्ती असल्याने असे असेल का? पण मी त्याला जवळपास आठेक दिवस तरी पाहिलं, पण फक्त शांत बसलेलं. कदाचित जंगलात शिकार करून खाऊन-पिऊन आराम करायला तो इथे येत असेल. किंवा इथे माणसांच्या भीतीनेही तो शिकार करत नसावा. 

किरण पुरंदरेंच्या लेखानुसार व्याध मनुष्यवस्तीजवळ घरटी करत नाही. पाच ते दहा मीटर उंचीवर घरटी  करतो, आणि  अशी जागा निवडतो जिथून बराच आसमंत नजरेखालून घालता येईल, मोठ्या काटक्यांचं हे घरटं असतं, आणि बरंच मोठं असतं, मादी एकच अंडे घालते. त्यांनी अशी अनेक घरटी बघितली आहेत. त्यांनी तर म्हटलं आहे की हा गरुड बघितल्यानंतर आता पक्षी बघावा तर गरुडच असं त्यांना वाटलं. ते खरंच आहे. इतका रुबाबदार हा व्याध गरुड. 

काहीतरी शोधत असताना, एका दोन वर्षांपूर्वीच्या(२६-१०-२०१४ तारखेच्या फोटोत) गावच्या फोटोत मला एक फोटो सापडला ज्यात दिसले पेंडराचे तेच झाड आणि त्यावर बसलेली धूसर, पण ओळखीची तीच उंचाडी, काळसर आकृती. म्हणजे हा व्याध गरुड तेव्हापासून तिथे होता तर. (तो किंवा त्याचा कुणी जातभाई) याचं आयुष्य किती असतं ते शोधण्याचा प्रयत्न केला पण सापडलं नाही. एका ठिकाणी वाचलं की दहा वर्षांपर्यंत जगतो, पण नक्की माहित नाही. हा गरुड तोच असला दोन वर्षांपूर्वीचा तर त्याची दृष्टी कालातीत आहे असेच म्हणावे लागेल. तेव्हापासून या गरुडाने आपल्या दृष्टीक्षेपात काळ बंद केला आहे आणि मलाही तो ओळखत असेल. म्हणजे हा जर तोच असला तर मी त्याला जरी आता ओळखले, तरी तो मला दोन वर्षांपासून ओळखून आहे!

हाच तो दोन वर्षांपूर्वीचा फोटो

No comments:

Post a Comment