कोकणातील, मालवण तालुक्यातील, कुसरवे या माझ्या मावशीच्या गावी घराच्या जवळच दोन जूनी आणि भव्य अशी वडाची झाडं आहेत. दोन्ही झाडे साधारण शंभर वर्षे तरी जूनी असावीत. मावशीच्या घरातल्या दोन पिढ्यांनी तरी ती झाडं बघितलेली आहेत. एका पावसाळी संध्याकाळी मी ही झाडं बघायला गेले होते. कोकणातला पाऊस म्हणजे मुसळधार आणि काळोखी. संध्याकाळच्या वेळी नुकताच पाऊस थांबला होता आणि सर्वत्र निथळून गेलेले, काळवंडलेले, धीरगंभीर वातावरण होते. घरापासून या झाडांकडे जाणाऱ्या पायवाटेला दोन फाटे फुटतात. एक जातो तळीच्या वडाकडे. आणि दुसरा फाटा एका पाणंदीतुन 'वडाची गाळी' इथल्या वडाकडे जातो.
|
तळीचा वड |
इतक्या वर्षात ही झाडं मी कधीच पहिली नव्हती, ना कुणी मला त्यांच्याविषयी सांगितले होते. पण कुठूनतरी विषय निघाला आणि त्यावेळी आईने मला या झाडांविषयी सांगितले , म्हणून यावेळी त्यांच्या घरी गेले असता ती झाडे बघायचीच असे ठरवले. पावसाच्या चिखलात जाऊन मला झाडं दाखवायला आई थोडीशी नाखुषच होती पण शेवटी ती तयार झाली. आणि कुणीही न बोलावता, तयार होता मावशीच्या घरचा 'टाग्या' कुत्रा. आम्ही त्या पायवाटेला लागतातच तो आमच्यापुढे धावू लागला. या कुत्र्याचे पाय एवढे लांब आहेत की 'टाग्या' ऐवजी त्याचे नाव 'टांग्या' च असायला हवे होते. पहिल्या फाट्याने आम्ही तळीच्या वडाकडे गेलो. इथे पूर्वी एक पाण्याचे मोठे डबके होते, तिलाच तळी म्हणत. आईच्या लहानपणापासून ही तळी आणि बाजूचा हा वड तिने पहिला आहे. माझी मावशी सर्वात मोठी, तिचे लग्न झाले तेव्हा आई आठ-दहा वर्षांची असेल, त्यामुळे ती इथे तिच्या लहानपणी येत असे. त्या काळी या तळीवरूनच पाणी भरून घरी न्यावे लागे. आता या तळीवर विहीर बांधलेली आहे. हि विहीर साधारण तीस-पस्तीस फूट व्यासाची असेल. आता पावसाच्या पाण्याने ती तुडुंब भरलेली होती. तिच्यावरच झाडाच्या फांद्या लोंबकळत होत्या. या तळीच्या बाजूला तेवढ्याच किंवा त्यापेक्षा थोड्या जास्त विस्ताराने हे वडाचे झाड पसरलेले आहे. वडाच्या झाडाचे वैशिष्ट्य म्हणजे त्याचा बुंधा मोठा नसला तरी पारंब्या पुन्हा जमिनीत घुसून त्यापासून झाडाचा विस्तार होतच राहतो. जर जागा मिळाली तर आसपासचा परिसर व्यापून ते कित्येक किलोमीटर विस्तारू शकते.
|
पूर्वीची 'तळी' आणि आताची 'विहीर' |
|
कलकत्ता येथील ग्रेट बनियान ट्री |
अशी अवाढव्य विस्ताराची वडाची झाडे भारतात अस्तित्वात आहेत. त्यापैकी एक आहे कलकत्त्याच्या जगदीशचंद्र बोस बोटॅनिकल गार्डन मधील वडाचे झाड, हे झाड अडीजशे वर्षांहून अधिक जुने आहे. हे झाड जगातील सर्वात मोठे (विस्तार असलेले) झाड आहे. याचा विस्तार एवढा मोठा आहे की पाच हजार माणसं त्याच्या छायेखाली विश्रांती घेऊ शकतात. एकदा एक ब्रिटिश लेखक Brian Aldiss फेरीबोटने हुगळी नदीतून बोटॅनिकल गार्डन बघायला गेले होते, तेव्हा हे प्रचंड विस्ताराचे झाड त्यांच्या दृष्टीस पडले. थॉमस हक्सले या ब्रिटिश बायोलॉजिस्टने या झाडाबद्धल एका लेखात लिहून ठेवले आहे की हे झाड जग व्यापू शकतं. Brian Aldiss यांनीही हा लेख वाचला होता. या वटवृक्षाने आणि त्याच्या जग व्यापून टाकण्याविषयीच्या कल्पनेने ते एवढे प्रेरित झाले की त्यातून त्यांनी Hothouse नावाची वैज्ञानिक कादंबरी लिहिली.
|
तळीचा वड |
तळीजवळचे हे झाड सुद्धा आपल्या फांद्यांचा अमाप विस्तार घेऊन उभे आहे, बहुतेक जग व्यापण्याची इच्छा घेऊनच. संस्कृतमध्ये वडाच्या झाडाला 'बहुपदा' म्हणतात. वडाच्या झाडाला भ्रमंतीत रस असावा. म्हणूनच आपले पारंब्यांसारखे पाय पुढे पुढे रोवून ते पुढे सरकत असते. थॉमस हक्सले यांची त्याची जग व्यापण्याची कल्पना खरंच विलक्षण आहे. जर त्याला असेच अडथळ्याविना पुढे पुढे जायला दिले तर हे झाड जग फिरायला निघाल्याप्रमाणे पावले पुढे टाकीत चालेल बहुतेक. तळीजवळचे हे झाड वर्षनुवर्षे धीरगंभीरपणे याच प्रतिक्षेत असावे. माणसाने उभारलेली शिल्पं, मंदिरे आजवर अनेक बघितली, पण हे निसर्गाने उभारलेले अवाढव्य जिवंत शिल्पच. त्यापुढे आपण खुजे होऊन उभे राहतो. पावसाळ्याच्या पाण्याने अधिकच गडद झालेल्या काळ्या फांद्या. काळोख पडत असल्याने या झाडाजवळ अधिक थांबून त्याला निवांतपणे निरखता आले नाही. वड, पिंपळ ही भारतीय परंपरेतील धार्मिकतेशी जोडलेली झाडं. काहीशी गूढाने भारलेलीही. अश्या या भव्य झाडांची स्थानं लोकांच्या श्रद्धेची स्थानं आपोआप बनत जातात. हा तळीचा वडही त्याला अपवाद नाही.
|
'वडाची गाळी' इथला वड |
या झाडाचा निरोप घेऊन आम्ही दुसऱ्या 'वडाच्या गाळी' कडे निघालो. 'गाळी/गाळवी' किंवा 'गाळू' म्हणजे शेत, या वडाच्या समोर पुढे दूरवर पसरलेले शेत आहे. म्हणूनच या जागेला 'वडाची गाळी' म्हणतात. तिथे जाताना मध्ये एक छोटीशी पाणंद लागते. या पाणंदीच्या रस्त्याला झाडीझुडपात पेंडकुळ, नांगरखडी यांची तांबडीलाल फुलं डोकावत होती. मधेच काही जंगली सातभाई पक्षी झाडीत कलकलाट करत होते. शेवटी आम्ही वडाच्या झाडापाशी आलो. हे वडाचे झाड मात्र दोन्ही बाजूने बघता आले. तळीचा वड फक्त एकाच बाजूने बघता येतो. कारण दुसऱ्या बाजूला दाट शेत, आणि चिखल होता. त्यामानाने 'वडाच्या गाळी' चा वड आणि त्याच्या आसपासचा परिसर, दोन्ही बाजूने झाडी किंवा शेत नसल्याने चांगला नजरेखालून घालता येतो. पण माणसाचे धार्मिक आक्रमण या झाडालाही चुकलेले नाही. या वडाच्या एका बाजूला तुळशी वृंदावन बांधलेले आहे आणि दुसऱ्या बाजूला एक व्यवस्थित बांधून काढलेली छोटेशी पाण्याची डोणी आहे. या डोणीत गणपती विसर्जन करतात. पण एक खरंच चांगलं आहे की या झाडांना माणसांच्या धार्मिक भावभावनांत स्थान मिळाल्याने ही झाडे नष्ट होण्यापासून तरी वाचली आहेत.
|
'वडाची गाळी' येथील तुळशी वृंदावन |
संध्याकाळच्या वेळी, आणि पावसाच्या वातावरणाने या दोन्ही झाडाभोवतालचा अवकाश खूपच गहन वाटत होता. पारंब्यांचे जडजंजाळ घेऊन बसलेले आहेत म्हणून या वृक्षांना ध्यानस्थ बसलेले दाढीवाले ऋषी म्हणावे की त्यांच्या पारंब्या रोवून चाललेल्या फिरस्तीमुळे त्यांना भ्रमण करणारे संन्यासी म्हणावे कोण जाणे. त्यांच्या विस्तीर्ण पारंब्यामध्ये शांतता गोठून राहिल्यासारखी वाटत होती. दुर्दैवाने पावसामूळे एकही पक्षी मात्र मला या झाडांवर दिसला नाही. खरे तर वडाची भव्य झाडे म्हणजे पक्षांचे हक्काचे घर. पुन्हा केव्हातरी चकचकीत सकाळी, या झाडांचे काळोखी, शांत रूप पालटले दिसेल, तेव्हा अनेक पक्षी यांच्यावर बागडतही असतील.
कलकत्त्याचा 'ग्रेट बनियान ट्री' अजून बघितला नाही. पण तूर्तास या भव्य, धीरगंभीर झाडातला सर्वव्यापी अवकाश मात्र अनुभवता आला. एव्हाना खूपच अंधार झाला होता. त्यामुळे 'टाग्या' च्या मागून आम्ही घरची वाट धरली.
अगदी डोळ्यासमोर उभा राहिला सगळा परिसर.कोकणातल्या लोकांचा खरंच खूप हेवा वाटतो असं काही वाचलं की.
ReplyDeleteकलकत्त्याचा वटवृक्ष सर्वात मोठा,त्यावरूनच तर त्याचं Botanical नाव Ficus benghalensis(बंगालमधला) आहे.आपल्या मुंबईच्या राणीच्या बागेत एक वेगळंच वडाचं झाड आहे.कृष्णवड -Ficus khishnae.तू पाहिलं आहेस का हे झाड.याच्या पानांचा आकार द्रोण किंवा पुरचुंडी सारखा असतो.म्हणजे बाळकृष्ण यात लोणी ठेऊन खायचा म्हणे ! किती गोड कल्पना आहे नाही या व्युत्पत्तीमागे :-)
ReplyDeleteराणीच्या बागेला या कृष्णवडाचे झाड बघण्यासाठी भेट द्यायलाच हवी. मारुती चितमपल्ली यांच्या निळावंती या पुस्तकात त्यांनी या कृष्णवडाबद्धल लिहिलं आहे. (पण ते याला 'कृष्णपिंपळ' असे संबोधतात) तसे वड, पिंपळ हे एकाच 'Ficus' कुळातील आहेत ना? कृष्णवडाबाबतची त्यांनी दिलेली लोककथा पण बाळकृष्णाचीच आहे. एकदा बाळकृष्ण लोणी कुठे साठवून ठेवायचं या विचाराने हिरमुसला होऊन एका पाखरांच्या झाडाखाली बसला होता. त्यावेळी झाडावर तांबट पक्षी पिकली उंबरं खात होते. एका हिरव्या तांबट पक्ष्याने 'टोंक टोंक' ऐवजी 'कुटूर कुटूर' असा स्वर काढीत बाळकृष्णाचं लक्ष आपल्याकडे वेधून घेतलं. बाळकृष्ण त्याला म्हणाला 'चूप बस, तू सारखा कर्णकठोर आवाज करतोस अन डोकं उठवतोस. जर तुला ओरडायचं असेल तर झाडावर उंच ठिकाणी जा' परंतु तांबट काही केल्या ऐकेना. तो बाळकृष्णाभोवती पंख फडफडवीत राहिला. त्याचा 'कुटूर कुटूर' आवाज काही थांबेना. त्याला बाळकृष्णाला काहीतरी सांगायचं होतं म्हणून तो त्याच्याभोवती घोटाळत होता. बाळकृष्ण म्हणाला 'मला माहित आहे झाडावर खूप उंबरं आहेत पण मला ती नकोत, मला लोणी साठवायची जागा हवी आहे' तांबट पक्षी उडत उडत जवळच्या जंगलात गेला अन लगेच बाळकृष्णाजवळ परतला. पुन्हा सारखा 'कुटूर-कुटूर' आवाज करून त्याला खुणावत राहिला. तेव्हा कृष्ण त्याच्या मागे गेला. तांबट पक्षी एका झाडावर बसला आणि एका पानावरुन दुसऱ्या पानावर फडफडत उडू लागला. बाळकृष्णाचं लक्ष त्या झाडाच्या पानांकडे गेलं. त्या झाडाचं प्रत्येक पान देठाजवळ दुमडलेलं होतं. ती जागा लोणी ठेवण्यासाठी योग्य वाटली, बाळकृष्णानं त्या पक्ष्याचे आभार मानले आणि त्याला म्हणाला 'खरंच की चतुर निघालास'. तेव्हापासून बाळकृष्ण खाऊन उरलेलं लोणी त्या झाडाच्या पानापानांत रोज साठवू लागला. खरंच छान आहे ही गोष्ट.
ReplyDeleteवा सुंदरच आहे ही कथा.
ReplyDeleteपण राणीच्या बागेतलं झाड अगदी मरतुकडं झालं आहे गं !
वा सुंदरच आहे ही कथा.
ReplyDeleteपण राणीच्या बागेतलं झाड अगदी मरतुकडं झालं आहे गं !