Wednesday, 28 September 2016

पेंडकुळ, नांगरखडी आणि पेवा

गणपतीनिमित्त  कोकणात गेले असताना अनेक वनस्पती वारंवार समोर येत राहिल्या म्हणून त्यांच्यासंबंधी लिहावेसे वाटले. कोकणामध्ये  पावसाळ्यात जिकडेतिकडे विपुल प्रमाणात दिसणाऱ्या वनस्पती म्हणजे  हरणं(पिवळ्या रंगाची नाजूक फुले असलेली वनस्पती), तेरडा, पेवा, नांगरखडी. त्याचबरोबर पेंडकुळ हे तर बारमाही फुलणारे कोकणातले झुडूप. 
त्यापैकी सर्वात आधी पेंडकुळ, नांगरखडी आणि पेवा यांच्याविषयी.

पेंडकुळ

कोकणात ज्याला पेंडकुळ म्हणतात ते आहे  Ixora coccinea. मराठी नाव आहे बकोरा, ही वनस्पती shrub (झुडूप) या प्रकारात मोडते.अगदी लहानखुरे. कोकणात रानावनात इतर झाडझाडोऱ्यात छोटे झुडूप बनून ते वाढते. लांबट गर्द हिरवी चमकदार पाने असतात. या छोट्याश्या  झाडाचे वैशिष्ट्य म्हणजे त्याची चांदणीसारखी नाजूक तांबडी फुले, आणि चमकदार लालभडक फळे. या लाल फुलांफळांमुळेच ते गच्च झाडीत देखील ते चटकन ओळखता येते. लालभडक रंगामुळेच याला इंग्रजीत 'फ्लेम ऑफ द वूड्स', 'जंगल फ्लेम' म्हणत असावेत. इंग्रजीत 'जंगल जिरॅनियम' असेही याचे नाव आहे. या झाडाची पाने पेरावर समोरासमोर दोन असून  त्यांना सामायिक उपपर्णे असतात. झाडाला बारमहा फुले येतात.
पेंडकुळाचे फुल अतिशय सुंदर. फांदीच्या टोकाशी फुलांचा गुच्छ असतो. लांबसडक दांडीला चार निमुळत्या टोकाच्या नाजूक पाकळ्या असतात. पेंडकुळाचे पाच पाकळ्यांचे फुल सुद्धा असते म्हणे पण ते अतिशय दुर्मिळ असते अशी  गावातल्या लोकांची समजूत आहे. असे फुल मिळणे अत्यंत भाग्याचे समजले जाते. बहुतेक या या फुलविषयीच्या मिथचा प्रकार आहे. लहानपणी, मे महिन्याच्या सुट्टीत गावी गेल्यावर आम्ही कधीकधी शेजारच्या गुरे चारणाऱ्या मुलांबरोबर फिरायला जाऊ तेव्हा ती मुले या फुलांचे गुच्छ दिसले की हमखास पाच पाकळ्यावाले फुल शोधत, आणि आम्हालाही शोधायला लावत.

पेंडकुळाचे फळ (फोटो सौजन्य :विकिपीडिया)
फळे देखील दिसायला अतिशय सुंदर. खायला करवंदांइतकी मजेदार, रसाळ नसली तरी  खाण्यालायक असतात. ही फळे कुठले वन्य प्राणी, पक्षी खातात त्याचे मात्र निरीक्षण करता आले नाही. 

कोकणात फक्त लाल रंगाच्या फुलांचे झाड आढळते. आणि विशेषतः रानझाड म्हणूनच ते ओळखले जाते, पण याच्या पानांच्या, फुलांच्या आणि फळाच्या सौन्दर्यामुळे ते शहराल्या उद्यानात, (आणि  परदेशातही) बागेत शोभेचे झाड म्हणून लावतात. या बागेतील जातींच्या फुलांचा रंग पिवळा, नारिंगी, गुलाबी देखील असतो. कोकणात मात्र ते रानातच उपेक्षितपणे वाढते. गावाकडे पेंडकुळाचे मूळ औषधात वापरतात. मला आठवते , लहान असताना आमच्या या गावातील घराशेजारी दाजी तोंडवळकर म्हणून एक वृद्ध गृहस्थ राहत होते, त्यांना वाडीतील सगळे 'डाक्टर' म्हणत. खरोखरीच त्यांना जंगलातील औषधी वनस्पतींचे सूक्ष्म ज्ञान होते. ते या पेंडकुळाची, सातविणीची, कुड्याची पाळंमूळं शोधून आणीत असत. माणसांच्या साध्या आजारांबरोबरच गाईगुरांच्या आजारावर देखील उपकारक ठरणाऱ्या वनस्पतींची त्यांना माहिती होती. त्यांच्याकडून ती माहिती कुणीच घेऊन जतन केली नाही याची आता खंत वाटते. आज ते असते तर या  पेंडकुळाच्या औषधी गुणांबद्धल त्यांनी नक्कीच सांगितले असते. 

पेंडकुळ बहुदा आशिया खंडात, भारत, श्रीलंका आणि प्रशांत महासागरातील Pohnpei, Kosrae या काही बेटांवर आढळते. इथल्या लोकांचे या वनस्पतीविषयी काही समज आहेत. Pohnpei मध्ये या वनस्पतीच्या काठ्या पारंपरिक  नृत्यात वापरल्या जातात. Kosrae मध्ये या वनस्पतीवर  एखादा  पक्षी बसला असेल तर त्याची शिकार करणे निषध्द मानतात. 
नांगरखडी
'नांगरखडी' ही पावसाळ्यामध्ये रानातील  झाडाझुडपांवर वाढणारी वेल.  पोपटी रंगाची पाने आणि  जर्द पिवळ्या,  नारिंगी आणि लाल रंगात विभागलेली फुले. फुलांच्या पाकळ्या झळाळत्या ज्वाळांच्या आकाराच्या. त्यामुळे ही फुले वैचित्र्यपूर्ण असूनही अतिशय आकर्षक दिसतात. हिच्या सौन्दर्यावर भाळून काही लोकांनी,विशेषतः परदेशात आपल्या बागबगिच्यात हिला स्थान दिले आहे. कोकणात हिला 'नांगरखडी' म्हणतात. का हे सांगणे  तसे कठीणच आहे. बहुदा नौकेच्या नांगरासारखी तिची फुले असल्याने तिला 'नांगरखडी' हे नाव पडले असावे. तिची इतर भारतीय नावं देखील मजेशीर आहेत. मराठीत तिला 'कळलावी' असे म्हणतात. यामागचे कारण तिच्यातला औषधी गुण हे आहे. हिच्या कांद्यात गर्भाशयास वेणा  आणणारे द्रव्य असते त्यामुळे तिला 'कळलावी' असे नाव मिळाले आहे. हिंदीमध्ये तिला 'करीहारी' म्हणतात. 
या वेलीचा कांदा भुईत शिल्लक राहतो. पावसाळ्यातच फक्त त्याला खोडे, पालवी , फुले येतात. नंतर हा विस्तार झडून जातो. पुन्हा पावसाळ्यात सगळा विस्तार उत्पन्न होतो. सहा पाकळ्यांचे फुल आपले तोंड खाली वळवून फुलते. या सुंदर फुलावरून आणि खाली तोंड करून राहण्यावरून या वेलीला 'विलोमकल्लारी' असेही नाव पडले आहे. 'कल्लार' म्हणजे तांबडे कमळ आणि 'विलोम' म्हणजे उलटे. फुलाची टोके तांबडी- नारिंगी, मध्ये पिवळी आणि तळाला हिरवी. असे झळाळते आकर्षक रंग या फुलाला लाभले आहेत. हि फुले चार दिवस टिकतात. 
परदेशात हिची लागवड बागेत करतात, हिला Gloriosa Lily, Fire lily, Flame lily अशी इंग्रजी नावे आहेत. हिच्यावर भारतात सत्तरच्या दशकात पोस्टाचे तिकीटही निघाले होते. 


'पेव' किंवा कोकणातला 'पेवा' हे आणखी एक पावसाळ्यात सर्वत्र भरघोस उगवणारे छोटेसे झाड. शास्त्रीय नाव 'Cheilocostus speciosus' आणि इंग्रजीत त्याला 'Crepe Ginger' असे म्हणतात. पण आल्याच्या झाडांपेक्षा याच्या पानांची रचना वेगळी असते.

पेवा
भारत आणि दक्षिण आशिया खंडातील  देशात हे झाड आढळते. कोकणात त्याच्या विपुलतेमूळे त्याचे सौन्दर्यदेखील बरेचसे दुर्लक्षिले गेले आहे. विशेषतः पावसाच्या पाण्याने निथळून गेल्यानंतर जेव्हा या झाडाच्या लांबलचक पानांवर सूर्यप्रकाश पडतो तेव्हा त्याचे चमकणारे सौन्दर्य विलोभनीय असते. पाने जाडसर आणि लांब असतात, एकेकट्याच फांद्या असतात आणि फांद्यांचा रंग लाल-तपकिरी असतो. फांद्याच्या टोकाला गडद-लाल-तपकिरी  अश्या एकमेकांना जोडलेल्या अनेक देठातून पांढऱ्या तलम रंगाची मोठी फुले येतात. ही फुलेही अतिशय सुंदर दिसतात. छोटा शिंजीर (Crimson Backed Sunbird) या फुलांच्या  देठातील मध खाण्यासाठी येतो. इतरही प्रकारचे सनबर्ड्स या झाडाच्या फुलांवर आपली हजेरी लावतात. आमच्या घरच्या पाठीमागेच भरपूर पेवा उगवल्याने मला खिडकीतूनच अनेक पक्ष्यांचे या फुलावर येणे बघता आले. हे सूर्यपक्षी फुलांच्या आत चोच खुपसताना दिसले नाहीत तर ते लाल-तपकिरी देठातच आपली सुईसारखी चोच खुपसून मध चाखतात. हे छोटेसे झाड देखील औषधी असून त्याचा ताप, पोटातील कृमी, अस्थमा, ब्रॉन्कायटिस इ. आजारांच्या औषधात प्राचीन आयुर्वेदात वापर केला गेला आहे. 

2 comments:

  1. "कळलावी’चं नांगरखडी हे नाव पहिल्यांदाच ऐकलं.याचं आणखी एक नाव आहे ’अग्निशिखा’ -किती सार्थ आहे नाही ? आणि english मध्ये तर ही species आहे superba - म्हणजे Gloriosa superba . खरोखरच SUUUUPERB !!!!!

    ReplyDelete
  2. पण एक गोष्ट अगदी खरी,काळाच्या ओघात सगळ्याच झाडांचे औषधी उपयोग आपण भारतीय विसरत चाललो आहोत.मग पाश्चात्य लोक जेव्हां हे उपयोग ओळखून त्याची patents घ्यायला लागतात तेव्हां मात्र आपण खडबडून जागे होतो.आपल्या भविष्यपुराणात एक श्लोक आहे
    अश्वत्थ्मेकं पिचुमंदमेकं न्यग्रोधमेकं दशचिंचिणीकम
    कपित्थ्बिल्वामलकत्रयं च पंचाम्रवापी नरकं न पश्येत
    "पिंपळ,कडूलिंब आणि वड यापैकी ( कोणताही) एक वृक्ष,किंवा चिंचेची दहा झाडं किंवा कवठ,बेल आणि आवळा यापैकी कोणत्याही जातीचे तीन वृक्ष,किंवा आंब्याची पाच झाडं जो लावेल तो नरकात जाणार नाही."
    म्हणजे बघ,आपल्या पूर्वजांना झाडांची महती किती प्राचीन काळापासून माहिती होती !

    ReplyDelete