Tuesday 31 May 2016

मरणओढ

'द तिबेटीयन बुक ऑफ लिविंग ऍण्ड डाइंग' वाचताना समांतर रेषेत माझ्या मनात विचार एकामागून एक येत चालले आहेत म्हणून तात्पुरते पुस्तक बंद करून मी फक्त येणारे विचारच इथे मांडत आहे. 'द तिबेटीयन बुक ऑफ लिविंग ऍण्ड डाइंग' हे सोग्याल रिंपोचे यांचे पुस्तक,  जे 'द तिबेटीन बुक ऑफ द डेड' वर आधारित आहे.  आणि सोग्याल रिंपोचे यांनी त्यात अनेक विचार, मुळ तिबेटी शिकवण, स्वानुभव आणि स्वतः केलेल्या अभ्यासातून मांडले आहेत. मृत्यू बद्धल विचार करणे म्हणजे बहुतांशी डिप्रेशनचे लक्षण मानले जाते (तसे ते अनेक अंशी खरेही आहे म्हणा, कुणीही सुखासुखी मृत्यूचा विचार केला नसेल, बहुतेक एकटा 'बुद्ध' सोडला तर ) पण सुखासुखी मृत्यूचा विचार करणे किंबहुना त्याहीपुढे जाऊन त्याची आस बाळगणे मूर्खपणाचे, डिप्रेशन चे, अतृप्तीचे लक्षण वाटले तरी असे ते नाही. कारण असा विचार करणे माणसाला जगण्याचा एक वेगळा दृष्टीकोनही देऊ शकते. प्रत्येकाला जगण्याची ओढ वाटते, अगदी व्याधीने जर्जर माणसालाही. ९० वर्षांचा म्हाताराही मरणाची प्रतीक्षा करतो आहे असे म्हणतो, दिवसोंदिवस कण्हत 'देव उचल रे' म्हणतो , पण ते खरे नाही. त्याला खरोखरीच तसे वाटते का? पुरे झाले आयुष्य असे अनेकदा जरी वाटले तरी काहीतरी खोल आतून सुप्तपणे जगण्याचाच मोह वाढवतच असते. 

मग असे म्हणायचे का कि सर्वसामान्य माणसाला जगण्याची ओढ वाटते. बहुतेक. पण याला अपवादही आहेत.  ते अश्यांचे जे आपले आयुष्य संपवतात. जगताना तरी माणूस किती खरा जगतो? रडत, भेकत, आपल्या वाट्याला आलेल्या जीवनाला दोष देतच बहुतेकदा तो जगतो. आणि शेवटी कुढत कुढत मरतो, जगण्याचा सोस बाळगतो, अशी सगळीच माणसं (त्यात मीही आले) हि माणसे 'जिवंतपणी' 'जगली' म्हणायची का?. कि जे जगतात- जोपर्यंत जगावेसे वाटते आणि एका क्षणी भिरकावून देतात जगणे ते खरे जिवंत?.. त्यांच्यात कुठली ओढ असते?
म्हणजे जशी जगण्याची सुप्त ओढ तशी मरणाची सुप्त ओढही मनुष्यप्राण्यात असली पाहिजे.

जन्मलेल्या प्रत्येक माणसाला मरणाची ओढ किमान एकदा तरी वाटलीच असेल. नाही का? प्रत्येक विचारी माणसाला हे स्वतःशी मान्य करावे लागेल.

'जे गोष्टींचा विचार करतात त्यात असा एक तरी उरला असेल का कि ज्याच्या मनात आत्महत्त्येचा विचार आला नसेल'.  हे वाक्य मी म्हणत नाहीये. कावाबाता नावाच्या अत्यंत ग्रेट जपानी लेखकाने हे आधीच म्हणून ठेवले आहे. (आणि दुर्दैवाची गोष्ट म्हणजे त्याने स्वतः उतार वयात ,ज्या वयात सहसा मूर्खपणा करण्याचे वय निघून गेलेले असते आणि भावनावश होऊन अविचाराने वागण्याची धगही विझलेली असते त्या वयात स्वतःचे आयुष्य संपवले.)

शरीर नेहमी biological survival instincts मुळे माणसाला जगण्यासाठी प्रवृत्त करते. शरीर असण्यासाठी झगडते तर मन नसण्यासाठी, सुटण्यासाठी आकांत करत असते. या द्वंद्वात(duel मध्ये) माणूस भरडून निघतो.

चिं. त्र्यं. खानोलकरांवर लिहिलेल्या माधवी वैद्य यांच्या पुस्तकात त्यांनी खानोलकरांच्या विलक्षण मरणओढीवर लिहिले आहे. खानोलकरांचे एक स्नेही प्र. श्री. नेरुंरकर यांनी त्यांना एकदा विचारले 'मरणाच्या गोष्टी इतक्यातच कशाला?', खानोलकरांनी उत्तर दिले, 'तुमच्या कवी शेलेला मरण्याचे गूढ उकळून काढणारी ओढ लागली होती तशीच मलापण भयंकर मरणओढ लागून राहते. वाटतं हे सगळं नश्वर आहे, फसवं आहे, कुणी कुणाचं वृथा जगात नाही.'

चिं. त्र्यं. खानोलकरांचं बरचसं लेखन वाचलं तर त्यातही असण्य़ाची-नसण्याची , जगण्याची फरफट आहे, ज्यात मृत्यू क्षणोक्षणी डोकावतो. मी हा कवी शेले पूर्वी कधीही वाचला नाही. म्हणून त्याच्याबद्धल आणि त्याच्या कवितांबद्धल वाचलं. वयाच्या २९ व्या वर्षी त्याचा (Gulf of Spezia मध्ये) बुडून मृत्यू झाला. आणि आजतागायत त्याच्या मृत्यूचे खरे कारण कळले नाही, पण त्याच्या कवितांमध्ये शिशिरातील पानझाड, निष्पर्णता, फॉल ( सडणे आणि झडणे ), मृत्यू, अद्भुत(ghosts, phantoms and supernaturals) हे मुख्य विषय आहेत. (त्याच्या सगळ्या कविता खरंतर वाचायला हव्यात). पण त्याच्याबद्धलच्या एकंदरीत माहितीवरून कळते कि तो सतत आपल्या अस्तित्वाकडे प्रश्नार्थक नजरेनेच बघत असे. तो सतत आपल्या असाधारण, प्रखर भावनातून काहीतरी शोधत होता. त्याचे म्हणणे होते कि फक्त मृत्यूनेच तो खऱ्या अर्थाने अमर होईल आणि खऱ्या अर्थाने कवी असणे म्हणजे काय  हे त्याला केवळ मृत्यूच समजावू शकतो. या त्याच्या कल्पनांनी त्याला एवढे झपाटून टाकले होते कि त्याला phantoms, supernatural यांचे भास होत. एकदा तर त्याने स्वतःलाच बघितल्याचे आपल्या पत्नीला सांगितले आहे. त्याने स्वतःचीच आकृती त्याला विचारताना बघितली , त्या आकृतीने त्याला विचारले 'How long do you mean to be content? '(या प्रकारे स्वतःची दुसरी प्रतिमा बघण्याला Doppelgänger असे म्हणतात.)

महेश एलकुंचवार यांच्या मौनराग मध्ये त्यांनी लिहिलेल्या 'जातस्य हि ध्रुवो मृत्युः ' या लेखात स्वतःच्या मरणओढीविषयी लिहिले आहे. त्यांच्या या अतिशय सुंदर लेखात ते लिहितात कि त्यांना या अखेरच्या घंटेची ओढ बालपणीच वाटू लागली होती. लहानपणीच्या अनुभवांनी त्यांच्या मनाची अवस्था 'आपण दुर्गुणांनी भरलेले पोते आहोत, आपण कोणाचे नाही, आपले कोणी नाही, आपण हट्टी, आळशी, ढ असे आपण कोणालाच नको तर आपण मरून जावे' अशी होती. त्यांना वाटणाऱ्या मरणओढीची साथ तिने जवळजवळ आयुष्यभर केली तरीही बदलत्या अनुभवांनी त्यांना अनेक प्रश्नांची उत्तरे शोधणे देखील निकडीचे वाटू लागले, तेव्हा मृत्यूला 'जरा थांब, हे जरा समजावून घेऊन दे' असे म्हणावेसे वाटू लागले. आणि मृत्यूला मित्र मानत मानत आज ते सत्तरीच्या घरात आहेत. आयुष्याचा आणि आयुष्यातूनच निर्माण झालेल्या त्या विलक्षण मरणओढीचा त्यांनी चालवलेला पाठपुरावा चालूच आहे.

माझ्या पाहण्यात एका अत्यंत जवळच्या माणसाने सुद्धा भयंकर दारू पिऊन मृत्युची वाट पहिली पण मृत्यूला यायला उशीर झाला. आणि जेव्हा तो खरोखरच जवळ आला तेव्हा मात्र त्याला जगावेसे वाटले असावे. आणखी एका व्यक्तीला जेव्हा मृत्यूने घेरले तेव्हा जगावेसे वाटले. ती सतत दुख्खी, जगत मरणारी, आणि मरणाचीच जणू प्रतीक्षा करणारी. पण मृत्यूने दार ठोठावले आणि तिला जगण्याची इच्छा उत्पन्न झाली, नुसते जगणे नाही तर अगदी सगळे पूर्वग्रह, प्रत्येक गोष्टीला नाक मुरडणे सोडून देऊन बिनधास्त जगणे. (असे जगता येते का? हाही एक प्रश्नच आहे, कारण त्यासाठीही फार मोठी किंमत मोजावी लागते). कधी कुणाशी फारशी न बोलणारी, न भेटणारी ती व्यक्ती त्याक्षणी इतरांशी एकदम भेटायला, बोलायला आतुर होती. तिला मनसोक्त जगायचे होते. मी कधीही कटकट करणार नाही, जर मी यातून बाहेर पडले तर आयुष्य आनंदानेच जगेन असे तिने म्हटले होते. बरे वाटल्यावर ती असतील नसतील तेवढ्या सगळ्या लोकांना घरी बोलवणार होती. पण हा चान्स मृत्यूने तिला दिला नाही. मृत्यूच्या दाढेतून ती बाहेर पडू शकली नाही.

दस्तयेव्हस्कीच्या 'द इडियट' या कादंबरीत एक विलक्षण घटना वर्णन केली आहे. मरणावर. त्यात एका माणसाला मृत्यूदंडाची शिक्षा अमलात आणण्याच्या पूर्वीची त्या माणसाची पाच मिनिटं वर्णन केली आहेत.
त्याच्याकडे फक्त आयुष्याची पाचच मिनिटे उरली होती. आश्चर्य म्हणजे त्याचा मृत्यूदंड माफ झाला. त्याची सुटका झाली पण त्याच्या त्या मनाची जगण्यापासून सुटका झाली नाही. आपल्या त्या शेवटच्या विलक्षण पाच मिनिटांबद्धल तो म्हणाला कि ती पाच मिनिटं त्याच्यासाठी अनंत काळासारखी वाटली. an enormous wealth of time. (आपण सगळेच बहुतेक 'टाईम' ची तुलना 'वेल्थ' शी एकदाच करू शकतो, जेव्हा मरण येऊन ठेपलं असेल तेव्हा). त्या शेवटच्या मिनिटांमध्ये त्याला अनेक आयुष्य जगत असल्याचा भास झाला एवढा कि शेवटचा क्षण जवळ आला आहे याचा विचार करण्याची त्याला गरज भासली नाही. त्याने त्या वेळेचे अनेक भाग केले. एक भाग(२ मिनिटे) त्याने आपल्या सोबत्यांना निरोप देण्यासाठी ठेवला. २ मिनिटे स्वतःसाठी, स्वतःच्या कारकिर्दीसाठी, स्वतःच्या आयुष्याबद्धल विचार करण्यासाठी ठेवली. शेवटचे एक मिनिट शेवटची नजर आजूबाजूला फिरवण्यासाठी. ज्या दोन मिनिटात त्याने स्वतःबद्धल विचार केला तेव्हा त्याला वाटले कि तो आत्ता आहे. काय आहे तो? एक विचारी अस्तित्व असलेला माणूस(a living, thinking man) आणि येणाऱ्या ३ मिनिटांनंतर तो काय असेल? कुठे असेल? कुणीही नसेल का? कि कुणीतरी असेल आणि असेल तर कुठे असेल , कसा असेल? शेवटच्या तीन मिनिटात त्याने या प्रश्नावर विचार करायचे ठरवले. समोरच्या चर्चचा निमुळता मनोरा सूर्यकिरणांनी चमकत होता. त्याला त्या चमकणाऱ्या प्रकाशापासून आपली नजर हटवता आली नाही. त्याच्या मनाने अशी कल्पना केली कि हा प्रकाश म्हणजे माझे नवे स्वरूप असेल. जे त्वरित घडणार होते त्याबद्धलची किळस आणि अनिश्चितता सहन करणे त्याच्यासाठी भयंकर होते. पण सगळ्यात भयंकर होता हा विचार कि 'जर मी आत्ता मेलो नाही आणि जगायला मिळाले, तर काय? केवढा अनंत वेळ मला मिळेल आणि तो वेळ माझा फक्त!' त्या अनंत वाटणाऱ्या वेळाबद्धल विचार करणे त्याला एवढे असह्य झाले कि शिक्षा देणाऱ्यानी आपल्याला त्वरित गोळी घालावी असे त्याला वाटू लागले.

तरीही जेव्हा त्याला जीवनदान मिळाले. त्यानंतर त्याने त्यानंतरच्या जगण्यात 'वेळ' (टाईम) 'वेल्थ' समजून वापरला का? तर नाही. त्याने आपल्याला बहाल झालेल्या या अमुल्य वेळाची दाद ठेवली का? तर नाही. त्याने मान्य केले कि जसे त्याने ठरवले त्याप्रमाणे तो करू शकला नाही , त्याने बराच वेळ, अगदी बराच वेळ वाया घालवला. म्हणजेच जगतानाहि तो अनेक क्षण मेलेल्यासारखाच जगला तेही जीवन परत मिळून सुद्धा. त्यातल्या अमूल्य अश्या प्रत्येक क्षणाची किंमत कळून सुद्धा. हीच खरी माणसाच्या असण्याची शोकांतिका.
असे अनेक क्षण, वाया गेलेले क्षण, कधीही परत न येणारे, त्यात आपण मृतच असतो एका अर्थाने. ते क्षण आपण जगलेले नसतात. येणाऱ्या क्षणाच्या हावेने आपण जगत असलेले कित्येक क्षण पायदळी तुडवत असतो. मरणाच्या अनाकलनीय ओढीनेच आपण तसे करत असतो का?  एक एक क्षण तुडवत, आपण अश्या कुठल्या गोष्टीच्या दिशेने वाटचाल करतो? ती दिशा आपल्याला चुंबकासारखी फक्त खेचत असते. तीच ती सूक्ष्म, सुप्त मरणओढ.

जी. एं. नी देखील सुप्तपणे मरणओढ सांभाळली असावी असे मला वाटते. त्यांच्या लेखनातून त्यांचा जेवढा प्रत्यय येतो तेवढाच त्यांना जी पुस्तके, जे लेखक आवडायचे त्यांच्यावरुनही येतो. सिल्विया प्लाथ नावाची त्यांची अत्यंत आवडती कवयत्री, आणि तिच्या कवितांएवढेच तिचे जीवन त्यांना विलक्षण वाटत असे.
सिल्विया प्लाथने वयाच्या ३१व्या वर्षी आयुष्य संपवले. त्या आधी विसाव्या वर्षापासून, मरणओढीने तिने असे प्रयत्न पूर्वीही केल्याचा पुरावा आहे. तिने आपल्या पुस्तकात लिहून ठेवले आहे  'मृत्यू अतिशय सुंदर असला पाहिजे. मऊ, लाल-तपकिरी जमिनीच्या आत निशब्दता अनुभवत, माथ्यावर सळसळत असणाऱ्या  हिरव्या गवताची चाहूल ठेवत पडून राहणे. ना काल,  ना  उद्या. वेळेला माफी, जीवनाला माफी आणि फक्त शांती.'  

मरणओढीने पछाडलेल्या अश्या व्यक्तिमत्वांबद्धल जी.एं. ना स्वतः ला सुप्त ओढ होती. त्यांच्या आयुष्य भिरकावून देण्याचे त्यांना एकप्रकारचे आकर्षण होते म्हणा ना.

वात झाल्यासारखा पिसाट अवस्थेत स्वतःचाच कान कापून देणारा आणि उन्हाने डोके जळत असलेल्या अवस्थेत नितांत सुंदर चित्रं काढणारा विन्संट वॅन गॉग़, बँकेतील नोकरी सोडून ताहितीला जाऊन चित्र रंगवणारा आणि शेवटी उपाशी मेलेला गोगँ, हेमिंग्वे, कावाबाता, कोसलर अशा आत्मनाश करणाऱ्या अनेक लोकांची बाजू घेऊन  त्यानी अश्या मरणओढीबद्धल (त्यांच्या एका पत्रात) म्हटले आहे 'हि माणसे दुबळी असतात असे मला वाटत नाही, इतकेच नाही तर तसे कुणी म्हटले कि मला संताप येतो. तसे पहिले तर आपण सारेच लहानमोठ्या ज्वालामुखीवर बसलेले आहोत. जीवाशी जपलेली मुल्ये एका सैतान क्षणी नष्ट होतात , आणि मग आपणाला उघड्यावर, वाऱ्यावर पडल्यासारखे वाटते. परंतु सगळीच माणसे इतकी जिवंत राहतात असे मात्र नाही. अनेकदा आपल्या वाढलेल्या बुढाखाली आपले किरकोळ ज्वालामुखी गुदमरून जातात किंवा आपल्या देहाची केव्हाच मढी होऊन बसली आहेत ही  गोष्ट आपणाला कधी जाणवतच नाही'            इति जी. ए. 

अश्या मरणओढीने त्रस्त झालेल्या माणसांबद्धल आकर्षण वाटणारे जी. ए. आपल्या आयुष्यात देखील कुणाला आपल्या जाण्याची चाहूलही न देताच निघून गेले. त्यांनाही अशी मरणओढ होती का?

मला तरी हि सर्व माणसे जिवंत, खरी वाटतात. जगण्याशी इमान राखणारी. ती मूर्ख, डिप्रेस्ड होती असे मला वाटत नाही. हि माणसं तर ग्रेट होती पण मला तर वर्तमानपत्रात २ ओळीच्या बातमीतील आत्महत्या करणारा 'नोबडी' देखील मूर्ख वाटत नाही. हि सर्वच माणसं काहीतरी शोधत मात्र होती जरूर. या शोधात त्यांच्या वाट्याला आलेल्या भीषणतेने खचून न जाता त्या वणव्यातून आरपार गेली ती.
हि सुप्त मरणओढ कशी प्रकट होईल ते सांगणे अवघड आहे. पण एवढे मात्र खरे , ज्यांना तिची चाहूल लागते, ज्यांना तिचा ध्यास लागतो ती माणसे एका वेगळ्या अर्थाने जिवंत होतात. तळाशी गेलेल्या पाणबुड्याप्रमाणे त्यांच्या हाती जीवनात कधीही प्राप्त न होणारा मोती लागतही असेल. कुणास ठाऊक?  

Monday 30 May 2016

न सुचलेलं

संपलेला ग्लास
                     रिकामी खुर्ची
धुवून पुसून खाली केलेली
                    जुनी ट्रंक माळ्यावरची


सुकलेली विहीर
                    (काटक्या-कुटक्यांचा) निष्पर्ण गुलमोहर
भुंडे शेताचे कोपरे
                    कुलूप लावलेले घर


सुकलेली लाळ
                    उजाड माळ
पेटलेला जाळ
                    तुटलेली नाळ


पडलेला वारा
                    दूर निखळता तारा
मणी ओघळलेल्या माळेचा दोरा
                    पसारा सारा, अंधःकारा                                           


रिकामे घरटे
                   कवच फुटलेली अंडी
गेलेल्या व्यक्तीची चप्पल (झरलेली)
                   मेलेल्या रोपट्याची कुंडी


खड्डा पडलेली उशी
                   प्रकाशहीन बुब्बुळ काळे
सुरकुत्या पडलेला बेड
                   वाट पाहणारे डोळे


तुटलेला कडा
                 पडलेला तडा
अकाळ, अनिर्बंध, अजर, अजगर
                घाली नग्न मना वेढा
                

आणि जाणवे फक्त
                 अदृष्य, अभाव, अभागी अपूर्णांक,
चोहोबाजूनी अवेळीची अशांतता
                व्यापून राही अभेदी, अमर्याद ,अशक्य, अतर्क्य

Friday 27 May 2016

१३८० दुर्गाई भवन

१.  पेरू 

अंगावरचं पांघरूण खस्सकन ओढल्याचा भास झाला. बेनोळींचा रेडीओ 'ट्रिंग ट्राँग' करून बातम्या देत होता. या बेनोळीकाकांना सगळ्याच घरांना सामुदायिक रेडीओ ऐकवायचा असतो. त्यातही आईच्या रेडीओचे किरपण सूर मध्ये ऐकू येताहेत असे वाटायला लागते तोच आईने त्याच्यावर हाताचा जोरदार फटका मारत 'मेलो चालणाहा नाय' असे म्हटले. आणि माझ्याकडे वळून जणू मीच तो दुरुस्त करणार आहे अश्या अविर्भावात माझ्याकडे पाहू लागली. मी डोळे चोळत उठून बसले तशी मला पेरुच्या झाडाची आठवण झाली आणि अंथरूण सारून मी धावत बाहेर आले. अजून छान रंग घेऊन फिकट पिवळा झालेला पेरूचा दोडा पानाच्या खालून माझ्याकडे बघत होता. हायसं वाटून मी परतले. काही दिवसांपासून त्या पेरूच्या दोड्यावर माझा डोळा होता. तसा डोळा लावून आणखी कुणीतरी बसलय याचीही मला खात्री होती.बाजूची, ओटवणेकरांची अंजी हि माझ्याच वयाची. तिच्या आईची माझ्याबरोबर तिची प्रत्येक बाबतीत स्पर्धा लावून देण्याची कसली हौस होती कळत नसे. मी जास्वंदीचं झाड लावलं कि हिने कोरांटीचं लावलंच.मी रतन आबोली लावली तर हि गुलाबाचं लावणारच. असं चालूच. दोघांच्याही घरापुढे हि वाढलेली झाडं. पण हे आवारातलं पेरुचं झाड कुणाचंच नव्ह्तं. म्हणजे ते अगदी माझ्या जन्माच्या आधीपासून तिथे असावं. त्यावरचे पेरू कुणीही काढे. खरंतर ते पेरू चांगले मोठे व्हायच्या आतच पळवले जात. आणि दोडा तर दोडा पण दुसऱ्याला लाभू द्यायचा नाही हीच आम्हा सगळ्यांची शर्यत असे. आताचा पेरू खूप दिवस झाडावर होता. मी जाऊन जाऊन बघे, पण अद्याप तो झाडावरच असे. त्यामुळे माझे धास्तावलेले मन जरा शांत होत असे. आता सुट्टीचे दिवस असल्याने मी सकाळपासून त्या झाडाकडे टकत बसले. हि दुपार वैऱ्याची आहे हे मी स्वानुभवावरून जाणले. पण अंजीच्या घरात सामसूम होती. त्यामुळे मी थोडा वेळ पेरूचा नाद सोडून दिला आणि बसून गोष्टीचे पुस्तक वाचू लागले.

चांगली टळटळीत दुपार झाली असताना मात्र मला राहवेना. आई सुद्धा बुधवारचा बाजार म्हणून घर माझ्यावर आणि आजीवर सोपवून बाजारात गेली होती. हाच चांगला मौका आहे असे वाटून मी लागलीच काठी सरसावून अंगणात गेले. आजी पाठल्यादारी थंडाव्याला बसून तांदूळ वेचीत होती. तिला माझ्या कारनाम्यांचा काहीसुद्धा सुगावा लागला नव्हता. थोड्या उंचीवर असलेला तो पेरू मला हुलकावण्या देत पानांच्या मागे दडून बसला होता. काठीने थोडेसे झोडून पहिले पण तेवढ्या उंचीवर काठी पोचेना. मग थोडे दगड गोळा करून भिरकावले. पण काठीला दाद न देणारा तो दगडाला कसला ऐकतोय. पेरू ढिम्म हलायला तयार नव्हता. दोन चार सुक्या काटक्या आणि पाने मात्र पडली. मी उंच पाय करून मान ताणून काठीने पेरूच्या जवळची फांदी हलवणार तोच डोक्यात कल्पना आली. घरातले टेबल आणले तर, त्यावर चढून काहीतरी जमेल. हे आधी कसे सुचले नाही म्हणून स्वतःवर जळफळत मी मागे वळणार तोच हातातली काठीही सुटली. तिच्या वरच्या टोकाला असलेलले आकड्यासारखे पेर झाडाच्या फांदीत अडकून बसले होते. काठी तशीच लोंबकळत राहिली तर झालेच कल्याण. तितक्यात  पाणंदीतून दोन्ही हातात भरगच्च पिशव्या घेऊन आई येताना दिसली. बहुतेक मागून येताना दिसणारे दोन ठिपके अंजी आणि तिची आई असतील कि काय? आता मात्र माझे धाबे दणाणले. आता पेरू नाही तर नाही निदान काठी तरी पाडायची म्हणजे काही झालेच नाही असे तरी दाखवता येईल.
एक मोठा दगड काठीवर जीवाच्या आकांताने भिरकावला आणि दूर पळाले. काठी टणाटण आवाज करत खाली पडली आणि त्याबरोबर पेरूही. क्षणाचाही विलंब न करता विजेसारखी धावून ती काठी मी फुलझाडांच्या गर्दीत फेकली आणि तो पेरू मुठीत धरून मी घरात धूम ठोकली. पाचच मिनिटात आईने दार वाजवले. दमून, घामाने डबडबून दोन पिशव्या घेऊन आई दारात उभी. 'काय ग, इथेच होतीस तर पाणंदीपर्यंत येऊन पिशव्या घ्यायला यायचं तरी, आळशी मामी कुठची!'. आई करवादली. 'अगं मी मागच्या अंगणात होते, मला कसं कळणार तू आलीस ते' मी उसनं अवसान आणून काहीबाही ठोकून दिले. आजी आपल्या नादात तांदूळ वेचत असल्याने तिला विचारले तरी ती काही बोलणार नाही असे मला वाटत होते. त्या भरगच्च पिशव्यात आणलेल्या गोष्टी मात्र आता मला खुणावत होत्या. बुधवारचा बाजार म्हणजे त्या दिवशी माझा भाजीवाल्याचा खेळ ठरलेला असे. मी पेरू दप्तरात लपवून ठेवला होता. आई आत गेल्यावर मी दोन्ही पिशव्यातले सामान काढायला सुरवात केली. मला आवडणारा बुधवारचा सर्वात आवडता खेळ म्हणजे हाच. साग्रसंगीत सगळ्या पिशव्या रिकाम्या करून बाजार मांडणे. आईने थोड्या वेळाने तिचा आवडता रेडीओ सुरु केला. मी सगळ्या भाज्या नीट मांडून ठेवल्या. जेवल्यानंतर नीता आणि मनालीला बोलावून भाजीबाजार खेळण्याचे मी योजले आणि त्याबरोबरच आई,आजी झोपल्याचा अंदाज घेऊन सुरी आणि मीठ पळवून त्या दोघांना पेरूची मेजवानी द्यायचेही पक्के केले. त्याप्रमाणे दारातूनच नीता आणि मनालीला दुपारी खेळायला येण्याचे फर्मान सोडून मी खुषीचा निश्वास सोडला. दुपारी ठरल्याप्रमाणे नीता आणि मनाली आल्या. त्यांना मनसोक्त भाजी विकल्यानंतर पेरूची मेजवानी घडवून आणण्यासाठी मी पेरू दप्तरातून काढला , आईचा डोळा लागला आहे याची खात्री करून आत जाऊन सुरी आणि मीठही  घेऊन आले. आणि मधल्या दारातच बसून त्यांना माझा पराक्रम सांगतच होते तर मधेच त्या दोघी स्तब्ध, म्हणून त्यांच्याकडे पाहिले. त्या टकामका वर बघतायत. दोघींचे चेहरे भिजल्या मांजराचे. मागे वळून पहिले तर आई हाताच्या घड्या घालून उभी. आईचा धपाटा पाठीत पडायच्या आधीच 'आम्ही जातो ग' म्हणून दोघी पळाल्या सुद्धा. आईने काही धपाटा घातला नाही पण तिने पेरू उचलून दूर भिरकावून दिला. 'दुपार नाही तिपार नाही! आणि कशाला तो पेरू काढलास?  ते आपलं झाड नाही, लोकांच्या वस्तू कशाला घ्यायच्या?' तिच्या तोंडाचा पट्टा चालू झाला.
'अगं, कुणाचंच नाहीये न ते झाड? आणि तूच ओततेस ना भाजी धुतलेलं पाणी त्याच्या मूळाशी?'
'ते काही नाही. कशाला तो हिरवा दोडा काढलास? सर्दीबीर्दी भरली म्हणजे? मी बाजारातून आणलेला चांगला पिकलेला पेरू, तो नको खायला'
अश्याप्रकारे माझी पेरू खाण्याची दुपारची मेजवानी पेरू तोंडी न लागताच फस्त झाली. आई हुशार आहे, तिला येतानाच झाडाखाली काटक्या आणि पानं दिसली असणार, त्यावरून तिला माझा उपद्व्याप कळला असणार, पण काही झाले तरी पेरू अंजीच्या स्वाधीन झाला नाही याचे मला बरे वाटले.

दोन दिवस तसेच गेले. अंजी काही आली नाही. ती बुधवारच्या बाजाराला नाही तर आपल्या मामांकडे पडतेवाडीला गेली होती. हे नंतर कळले, कारण दोनच दिवसांनी सकाळी नेहमीप्रमाणे मी आवारात आले तेव्हा पेरूच्या झाडाखाली पेरूचे दोडेच दोडे पडले होते आणि पानांचा ढिग. बहुदा यापुढे मला एकही पेरू काढता येऊ नये  म्हणून  अंजीने दोडेसुद्धा पाडून ठेवले होते.


२. दुर्गाई भवन


आम्ही राहतो ते दुर्गाई भवन म्हणजे छोटंसं तीन बिऱ्हाडांचं कौलारू घर आहे. आम्ही मध्ये राहतो. आमच्या एका बाजूला बेनोळी आणि दुसऱ्या बाजूला अंजी आणि तिचं ओटवणेकर कुटुंब राहतं. बेनोळी बांधकाम विभागात काम करतात. त्यांच्याकडे जाडी, काळी म्हशीसारखी फटफटी(मोटरसायकल) आहे. ते एकटेच राहतात. त्यांचं पूर्ण कुटुंब कर्नाटकात असतं आणि हे मात्र कामानिमित्त इथे राहतात. पण मे महिन्यात त्यांचं कुटुंब इकडे येतं त्यामुळे एरव्ही त्यांच्या ओसरीबाहेर दिसणारा सिगारेटच्या थोटकांचा खच दिसायचा बंद होतो आणि त्यांच्या घरात पोरांचा धागडधिंगा सुरु होतो. पोरे किती तर फक्त तीन. पण दंगा एवढा कि अवघं दुर्गाई भवन दणाणून सोडतात. आत्ताही तसा चालू आहे. त्यात त्यांचा रेडीओ कि टेप जे काही आहे आहे ते सदैव आमच्या आईच्या रेडीओशी स्पर्धा करत असते. फक्त फरक एवढाच कि आमच्या आईचा रेडीओ हल्ली किरपण आवाजात बोलतोय आणि मधून मधून खोकला झाल्याप्रमाणे खर्र खर्र करत असतो.  आणि त्यांचा रेडीओ घसा बसलेल्या पण तरीही कन्नड आवाजात चाल करून येत असलेल्या  सैनिकाप्रमाणे गाणी म्हणत असतो. आम्हाला त्या कन्नड गाण्यातलं काही कळंत नसल्याने आम्ही त्याला 'यंडागुंडू' म्हणतो. आमच्या दादाने त्याला स्वतःची शब्दसामुग्री जोडून (तो माझ्यापेक्षा दोन यत्ता पुढे असल्याने) 'यंडा गुंडू ठंडा पानी बाजी पत्तडे' असे त्यांना नावही देऊन टाकले आहे. अर्थात हे सर्व आम्हा मुलांपर्यंतच. आईबाबा, आजी हे यापासून नामानिराळे आहेत. बेनोळीकाकांची मुलं पूर्ण दिवस घरात बसून काय करतात याचा सुगावा अद्याप आम्हाला लागलेला नाही. पण ती मुलं एकंदरीतच इथे नवीन त्यामुळे बुजतात, त्यातून त्यांना भाषाही येत नाही त्यामुळे ती तिघं तिघं घरातच खेळत असावीत असं आई म्हणते. पण मला पक्कं ठाऊक आहे कि त्यांच्या घरातला भाड्याने आणलेला तो टि.व्ही. हेच त्यामागचं कारण असावं. परवा मी मांजरेकर बाईंच्या घरी नीताला बोलवायला गेले होते तर त्यांच्याकडे टि.व्ही.वर 'मिकीमाऊस' चा कार्यक्रम लागलेला. तर ती टि.व्ही. समोरून हलता हलेना. मग मीही तिथेच बसले ती येण्याची आणि कार्यक्रम संपण्याची वाट बघत पण हळूहळू तो कार्यक्रम संपूच नये असं मला वाटायला लागलं. म्हणजे झालं असं कि काही वेळाने आईच तिथे आली आणि मला हे कळलेच नाही कि ती आलीय. बाई(म्हणजे नीताची आई, यांना आम्ही बाईच म्हणायचो कारण या आमच्या शाळेतल्या बाई होत्या)आईला घेऊन घरात आल्या. आणि दोघी बोलतायत तरी माझं लक्ष नाही. शेवटी बाईनी टि.व्ही. च बंद केला व नीताला हाताला धरून उठवलं तव्हा कुठे मला कळलं कि आईसुद्धा   तिथे आली आहे मला शोधायला. आणि संध्याकाळचे सात वाजलेत. तर मला तेव्हाच कळलं कि बेनोळी काकांच्या घरून अधून मधून येणारा आवाज रेडीओचाच नसून टि.व्ही. चाही आहे. आणि तो बघूनच ती मुलं घरातून बाहेर पडायचे नाव घेत नाहीत. घरातच ठाण मांडून आहेत. एकदाच त्यांचा एक मुलगा बॉल घेऊन मागच्या दारी खेळायला आला म्हणे, इति आजी. कारण आजीनेच ती गोष्ट आईला सांगितली. 'काय विचित्र पोरगो असा, मी काढीत होतंय दोरीयेवरचो सुकत घातललो पोलको , माझो हात पोचूक नाय तसा तेच्याकडे काठी उचलून, काठी हलवून म्हटलंय 'व्हैता जरा काढून दिशीत रे' तर तो बॉल टाकून पळान गेलो. घाबरलो काय माका कोण जाणा'. पण बेनोळीकाका आणि त्यांची बायकोमुलं आपापसातच गुंग असतात. आपण कर्नाटकातून महाराष्ट्रात आलोत याचाही त्यांना पत्ता नसतो. पण त्यांचा कुणाला त्रास नाही.

पण बाजूचे ओटवणेकर म्हणजे डोक्याला ताप आहेत असं आई अधूनमधून बाबांना म्हणत असते. त्यांच्या मागच्या दारातून जाणाऱ्या गटाराचे पाणी तुंबले कि ओटवणेकरबाईंच्या तोंडाचा पट्टा धीम्या आवाजात पण सातत्याने चालू राहतो.  हे तसे नेहमीच धूसफुसीचे कारण. त्यावर इथे घराचे मालक राहत नसल्याने आणि जेव्हा मालक येतात तेव्हा ओटवणेकरबाईच पुढेपुढे करत असते. त्यामुळेच कि काय ती स्वतःला इथली रखवालदार समजते. कोणी पेरू काढला, कोणी जांभळं काढली यावर तिची तिरपी नजर कायमच असते. आई तर म्हणते ओटवणेकरीण सदैव टिरीटिरी करत असते. मी शाळेत हुशार असल्याने आणि अंजी माझ्याच इयत्तेत असल्याने ती अधिकच टिरीटिरी करते असेही तिचे म्हणणे.
माझेतर अंजीशी कधीच पटले नाही. आम्ही जेव्हा नवीन या बिऱ्हाडात आलो तेव्हा अगदी सुरवातीला आई मला त्यांच्याकडे खेळायला पाठवत असे. तर एकदा नेलपॉलिश लावते म्हणून तिने माझ्या नखांना कसलातरी चिकट काळा पदार्थ लावलान. अंजी डोळे उघडझाप करणारी बाहुली घेऊन खेळत असे आणि मला खेळायला कागदाच्या चिटोऱ्यानी भरलेली काचेची बाटली देत असे. तेव्हा मी कधीतरी तिला म्हटले, मला पण बाहुली दे न खेळायला एकदा तर म्हणाली कि ती बाहुलीची आई आहे आणि मी जेवण बनवून तिला द्यायचं. आणि सारखं हे बनव, ते बनव. नेहमी तेच जेवण बनवायचं काम. नंतर मला कळले कि तिने मला गणपतीच्या पंगतीसाठी आमच्या वराडच्या घरी रांधणारी भीमाकाकूच करून टाकलं होतं.

तसं ओटवणेकर कुटुंब कुरबूरं असलं तरी आम्ही त्याचं फारसं काही वाटून घेत नाही. उन्हातान्हात आरडाओरडा करीत झाडांवर चढणे, आंब्यांच्या पेट्याच्या होड्या आणि बंबाची लाकडं व्हल्ली म्हणून वापरून समुद्रातील चाचेगिरी चा खेळ खेळणे, दिवाळीत फटाक्यांचा कचरा घालणे, पावसात अंगणभर कागदाच्या होड्या सोडणे हे सर्व आम्ही मनमुराद करतोच. आम्ही म्हणजे मी, दादा आणि विनू. आमच्या घराच्या आसपास पाणंदीपर्यंत एक दोन घरे आहेत. पाणंदीनंतर अनेक घरे आहेत त्यातच भाऊ वालावलकराचे घरही येते. या सर्व घरात आमची मित्रमंडळी म्हणजे किरण, कीर्ती, मंदी, ठुक्रूल, गोडदी, नीता, मनाली, परेश राहतात. अंजीची आई थोडी कुजकट असल्याने इतर बायकांशी तिचे फारसे पटत नाही आणि अंजी आईच्या वळणावर गेल्याने तिचे आमच्याशी पटत नाही.  तिला खेळत घेतलेच तर ती सदैव भांडणे करते आणि तिचे भांडण तीन-चार घरांचे भांडण होते. म्हणून ती आमच्यात खेळायला येत नाही. तशी तिची एक दातपडकी मैत्रीण अधून मधून तिच्या घरी येते. बहुदा हि तिची पडतेवाडीची मामेबहीण असावी.

१३८० दुर्गाई भवन भाग २

१३८० दुर्गाई भवन भाग ३ 

Thursday 26 May 2016

कोपरा

माझ्या मनाचा एक कोपरा शोधून काढला आहे
मीच, स्वतःला दुखः देण्यासाठीच फक्त
दुखः स्वतःला द्यावे, स्वतःचे घ्यावे
इतरांना त्याची झळ बसू नये इतके सोपे का ते आहे?

भावना कुजत ठेवल्यात मनात
सडलेल्या प्रतिमा, गोठलेले अनुभव, गाढलेल्या आठवणी
का नाही रुजत त्यात चिमण्यांच्या पंखांचा
अलवार, किरमिजी अतिसुखद स्पर्श?

का नाही दिसत त्यात वाऱ्यावर, अलगद पाण्यावर
सरकणारे मंद मंद वेगातील ते जहाज ?
का नाही ऐकू येत त्यात सुरेल सूर
किलबिलाटांचे, बीथोवेन पक्ष्याचे ?

का नाही त्यात मखमली पाठीच्या गुब्ब डोळ्यांच्या
गब्दुल मांजराचे पायात घोटाळणे ?

कोपरा फक्त अंधाराचा
गडद काळ्या कोठडीचा
नाही तिथे प्रकाश कसलाच
ना कोवळ्या पालवीचा, ना चांदण्याचा

तो कोपरा झाकावा, मिटून जावा
पण तो कोपरा झाकणे म्हणजे झाकणे स्वतःचे अस्तित्व
जिवंतपणाचे काळेभोर कृष्णविवर त्यास गिळून बसले आहे स्थित
तरीही कोपरा अजून राहिला आहे शाबूत  

Wednesday 25 May 2016

मालवणी म्हणी

मालवणी भाषा हि कोकणच्या प्रत्येक गोष्टीचा चपखल प्रत्यय देणारी आहे. कोकणची माती तांबडी भडक, जमीन उंचसखल, समुद्राची खारी हवा, आंबट कच्ची करवंदं आणि त्यांच्या झाळी ,सुपाऱ्यांची, माडाची(नारळाची) उंचच उंच झाडं, कोकमाची विरळ झाडं आणि त्याला लागणारे आंबट रातांबे, आंब्यांची झाडं, काटेरी फणस, झिंग आणणारे काजूचे रंगीत बोंडू(काजूचे फळ), गुबगुबीत जांभळं , झणझणीत तीरफळं, आंबट आटकं, सुरुंगीचे, बकुळीचे धुंद करणारे गजरे, अबोलीचे गच्च वळेसर, अंधारातल्या पाणंदी, वेताळाची देवळं, देवींचे उत्सव, दशावतारी नाटकं , भुतंखेतं आणि त्यांनी झपाटलेली झाडं आणि माळरानं, भगभगीत ऊन, मुसळधार पाऊस……  अश्या तिथल्या अतिशय विसंगत परिस्थितीसारखाच विसंगत कोकणी माणूस आणि त्याची खणखणीत, खरखरीत आणि तरीही गोडसर वाटणारी मालवणी भाषा. मालवणी भाषा कोकणाशी इतकी एकरूप आहे कि कसलेही वर्णन करताना, उपमा देताना , तिथल्या अनेक गोष्टींना भाषेत वापरले जाते. मालवणी भाषेला एक प्रकारचा फटकळ, तिरकस, तिखट  बाज असला तरीही तिला एक प्रकारचा आंबट, तुरट आणि गोड मिश्रित मधूरपणाही आहे. कोकणातल्या उंच सखल जमिनीसारखे या भाषेत चढउतार असल्याने, हेल काढून बोललेली हि भाषा ऐकत राहाविशी वाटते. कोकणी माणूस हुशार, पण दरिद्री, त्यामुळे थोडासा बेरकी, तिरसट, डांबिस असेच त्याचे दर्शन होते. तिरकस बोलणारा, चेष्टा करणारा असा तो आणि तशीच त्याची भाषा.
बोलण्याची लकब साधारणपणे दुसऱ्याला अगदी तुच्छ लेखण्याची नसेल पण चेष्टेखोर जरूर. पण असे असले तरीहि हि चेष्टा जिव्हारी लागणारी नाही,  कुठेही बोलण्यात विखार नाही. त्यामुळे ते बोलणे मजेशीर, विनोदी वाटते. मालवणी भाषेत काहीतरी गहन दुखःद क्वचितच वर्णन करता येईल. किंबहुना कुठल्याही प्रसंगातील गहनता,विदारकता काढून त्याला हलकंफुलकं करण्याचं कसब या भाषेत आहे , म्हणूनच मालवणी भाषेत कुणी भांडत असेल तर तेही विनोदी वाटेल. मालवणी म्हणी तर इतक्या मजेशीर कि अश्या इरसाल म्हणी मालवणी माणसाला कुठून सुचल्या याचेच आश्चर्य वाटत राहते. मी अस्सल मालवणी माणसांकडून स्वतः ऐकलेल्या आणि बोलण्यात वापरताना पाहिलेल्या म्हणी खास इथे देत आहे. यापासून माझा मालवणी म्हणींचा आणि मालवणीतील विलक्षण गोष्टी आणि शब्द यांचा शोध सुरु होतो. तो शोध मी करतच राहणार आहे. दरवेळेला कोकणात गेल्यावर मला नवीन काहीना काही सापडतच राहिले आहे आणि त्याचा पाठपुरावा करून मी त्याचे संकलन 'काजूला' वर करत राहणार आहे.

तर आत्तासाठी या काही म्हणी:

घोडा काय भाडा आणि जीन कपळाक
अर्थ: प्रमाणापेक्षा कितीतरी जास्त आणि अनाठायी खर्च झाला आणि त्याचा उपयोग काहीच झाला नाही.

म्हणजे घोडं आणलं, त्याचं भाडंहि दिलं आणि आता त्या खर्चाने झळझळीत (कफल्लक) झाल्यावर काहीच नाही मिळालं, घोडं निघून गेलं (भाडयाने आणलेलंच ते )उरलं काय तर जीन(घोड्याचं) जे आता कपाळाला बांधून बसावं.

अगाच्या पगा आणि उतवाक ढेंगा
अर्थ:  काहीच्या काही बोलणे, उतावीळपणे असंबद्ध, अतिशयोक्त बोलणे.

आळश्याचा तीनठय (तीनथय)
अर्थ: आळशी माणूस कामचुकारपणा करण्यासाठी काहीतरी कारणं देत राहतो. आपण इथे तिथे काहीतरी कामात व्यस्त असल्याचा बहाणा करतो, त्यामुळे आळशी माणसाला  नेहमी एकाच वेळेला तीन ठिकाणी काहीतरी काम असणारच अश्या उपरोधिक अर्थाची हि म्हण आहे.


पादऱ्याक पावट्याचा निमित
अर्थ: काहीतरी शुल्लक निमित्त काढून नाराजी व्यक्त करणे.

 
मन सुवराती, डोळे पापी
अर्थ: म्हणजे नाटकी माणूस, जो काहीतरी खुसपट काढून वादंग करतो त्याला उद्देशून असे म्हटले जाते.   


रिकामो न्हावी, बायलेचे कुले ताशी
अर्थ: रिकामटेकड्या माणसाने केलेली कामे आणि त्याबद्धल असंतोष दाखवण्यासाठी असे म्हटले जाते.


आडजीभेन खाल्ल्यान पडजीभ बोंब मारुक लागली
अर्थ: जेवण किंवा कुठलाही पदार्थ अपुरा पडला कि त्याचे वर्णन करायला हि म्हण वापरतात.


बारा हात तवसा, तेरा हात बी
अर्थ: जे  वर्णन अतिशयोक्तीने केले जाते त्याची चेष्टा करण्यासाठी हि म्हण वापरली जाते.  

भूरकाटली भाबळीण देवळात मुतली
अर्थ:  उगीच उतावीळ होऊन खळबळ करणाऱ्या(कानात वारं भरल्यासारखं करणाऱ्या ) आणि त्यातून स्वतःचं हसं करून घेणाऱ्या व्यक्तीबद्धल हि म्हण वापरली जाते.


कुक्कुडश्याच्या बारश्याक
अर्थ:  दिलेल्या वेळेच्या कितीतरी आधीच येऊन टपकणारऱ्या माणसाला उद्देशून असे म्हटले जाते. 'कुक्कूडश्याच्या बारश्याक इलस काय?
कुक्कुडशा म्हणजे कुक्कुडकोंबा (रानकोंबडा किवा भारद्वाज असावा) जो सकाळी सकाळी आरवतो.  त्याच्या बारश्याला म्हणजे अगदी फाटफटीला(लवकर).


माका नाय तुका, घाल कुत्र्याक
अर्थ:  मला नाही मिळणार तर तुलाही मिळायचं नाही आणि या भांडणात शेवटी तिसऱ्यालाच ते मिळतं अश्या आशयाच्या प्रसंगी वापरली जाणारी म्हण. 
 
आगसली ती मागासली, मागसून इलली गुरवार रवली
अर्थ: 'कानामागून आली आणि तिखट झाली' या अर्थाची हि म्हण. म्हणजे पहिल्या बायकोला मुल नाही झालं आणि नंतर आलेली  गरोदर राहिली(गुरवार रवली) आणि तीच महत्वाची झाली.
 
आधी नाय मधी आणि शनवार कधी
अर्थ: एखाद्या गोष्टीच्या मध्ये तिसरेच काहीतरी घुसवून त्यालाच महत्व देणे(किंवा महत्व देण्यासाठी खटपट करणे).

करुक गेलय गणपती, झाला केडला
अर्थ: करायला गेलो गणपती आणि झाला मारुती या अर्थाची म्हण. म्हणजे करायला गेलो एक आणि झाले भलतेच. 'केडला' हा लाल तोंडाच्या लहान माकडासाठी वापरला जाणारा मालवणी शब्द आहे.


हाडाची काडा आणि बोच्याचा तूनतुना
अर्थ: अतिशय बारीक,प्रमाणापेक्षा ज्यास्त बारीक व्यक्तीला उद्देशून असे म्हटले जाते. 

आयत्यार कोयतो 
अर्थ: आयत्या गोष्टीला मिळवण्यासाठी चालणारी धडपड.

खेकट्याक मेकटा 
अर्थ: एकमेकाला पुरून उरणारी माणसं. जसा एक विशिष्ट स्वभावाचा माणूस तसं त्याला सरळ करणारा दुसराही तसाच माणूस म्हणजे खेकट्याक मेकटा.

गजालीन घोव खाल्लो 
अर्थ: एवढ्या गप्पा मारल्या कि वेळ निघून गेला आणि सगळी कामं राहून गेली.

माझो बाबा काय करी आसलला नाय करी
अर्थ: एखाद्या चांगल्या केलेल्या कामाचा बट्ट्याबोळ करणे. एखाद्या चांगल्या गोष्टीची नासदुस करणे.

भित्रो कोलो, कुल्यात शेपटी घातल्यान 
 अर्थ: अत्यंत भित्र्या माणसाला उद्देशून असे म्हटले जाते. 

बापाशीचो माल
अर्थ: हि खऱ्या अर्थाने म्हण नसली तरी म्हणीसारखीच वापरली जाते. एखाद्या गोष्टीवर कुणी अनाठायी अधिकार दाखवतं तेव्हा त्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी हि म्हण वापरली जाते.

डोळ्याआड मसणपाड
अर्थ: स्वतःच्या डोळ्याआड झालेल्या/केलेल्या गोष्टी मग त्या कितीही भयंकर का असेनात तरी चालू शकते.


तीरफळाचा ताँड उघडा 
अर्थ: सदानकदा बडबड करणाऱ्या व्यक्तीबद्धल ही म्हण वापरतात.  



दिव्याक वात तोंडात हात
अर्थ: संध्याकाळ झाली कि लगेच जेवण जेवून मोकळे होणे. (सतत जेवणासाठी उतावीळ असणाऱ्या व्यक्तीसाठी हि म्हण वापरली जाते)

Tuesday 3 May 2016

काफ्का आणि रियल लाइफ



काफ्का चं 'मेटामॉरफ़ॉसिस' दोन वर्षांपूर्वी वाचलं आणि सोडून दिलं. मेटामॉरफ़ॉसिस हि गोष्ट आहे एका  ग्रेगर साम्सा (झाम्झा) या तरुणाची. पूर्ण कुटुंबासाठी सेल्समन बनून राब राब राबणारा ग्रेगर साम्सा सततच्या फिरतीमुळे घरी सुद्धा फारसा असत नाही. तो पूर्ण कुटुंबासाठी पोटापाण्याचे साधन आहे. पण एके दिवशी मात्र दोन फिरत्यांच्या मध्ये  असलेल्या ब्रेक मध्ये तो घरी रात्री राहायला असतो. सकाळी जेव्हा त्याला जाग येते तेव्हा त्याला कळते की त्याचे एका कीटकात रुपांतर झालेले आहे. मग काय होते हे सांगणे अवघड आहे कारण ते इतके केवलाकार (abstract) आहे कि त्याचा अनुभव वाचक वेगवेगळ्या पद्धतीने घेऊ शकतो.
सांगायचा मुद्दा हा कि मी 'मेटामॉरफ़ॉसिस' वाचलं आणि सोडून दिलं पण त्याने मला सोडलं नव्हतं. याचा प्रत्यय मला दोन वर्षानंतर आला. त्यावेळी मी पाठदुखीने अत्यंत त्रस्त होते. इतकं कि रोजची कामं देखील मला करता येईनात. हा त्रास काहीच कारण नसताना सुरु झाला होता त्यामुळे अधिकच भीती वाटू लागली कि नेमके कश्यामुळे असे होत आहे. त्यातच दुसऱ्या शहरात राहणाऱ्या एका जवळच्या व्यक्तीचं आजारपण चालू होतं. त्यासंबंधी फोनवर चौकशी करत असे. एकदा चौकशी करताना पाठही अत्यंत दुखत होती. फोनवर कळले कि त्या व्यक्तीची सुधारणा फारशी होत नाहीये. असा सूर आला कि 'शेवटी नशीब असतं , त्याला काय करणार? जे नशिबात असतं ते होणार'.  अचानक खूप भीती वाटली. त्रास ! जीवघेणा त्रास, यातना! आपण मलूल, आपल्या आजूबाजूचे त्याहीपेक्षा मलूल. नशीब ! न चुकवता येणारं, बंधिस्तपण, 'No सुटका' ! असहाय असहाय…. आणि तरही जगणं, दररोज कणाकणाने झीजणं. असं काही आपलं झालं तर आता ? पाठीच्या कण्यात झीणझीण्या आल्या. आपल्या पाठीला लकवा मारून आपला कणाही जमीनदोस्त झाला  तर! कायमस्वरूपी बेडरिडन होवून वर गरगर फिरणाऱ्या पंख्याकडे डोळे करून पडावं लागलं तर? बाकीचे सहानुभूती दाखवतील, काळजीने झुरतील, त्यांचा जीव कळवळेल आणि त्यांना पाहून आपलाही. मग सवयीचं होऊन जाईल त्यांनाही. मग 'काय करणार? शेवटी ज्याचं त्याचं नशीब' म्हणून पूर्वव्रत आपापल्या कामाला लागतील. मग वाट पाहतील. आपणही वाट  पाहू. कश्याची कोण जाणे? त्याक्षणी ठार एकटं वाटू लागलं, आणि जीव खासावीस झाला. त्या आतल्या काळोखाने आपल्या नांग्या करकचून माझ्याभोवती आवळल्या, मन सुटके साठी धडपडू लागलं, तेव्हाच काफ्का धावत आला डोळ्यासमोर आपला तो ग्रेगर साम्सारुपी कीटक घेऊन. त्याने मला क्षणार्धात घेरून टाकलं.

म्हणजे तुम्ही खासावीस झालात आणि कुठच्याही न सुटणाऱ्या प्रश्नाने त्रस्त झालात. काळाशार काळोख दिसू लागला आणि जर काफ्का वाचला असेल तर काफ्का येणारच मानगूट पकडायला. तसा तो आला आणि सरळ माझी मानगूट पकडली. मला एवढं खासावीस व्हायला झालं की काफ्क्याला गळामिठीच मारावीशी वाटू लागली. ये बाबा ये! तूच रे बाबा ओळखल्यास माणसाच्या काळोख्या जागा आणि इतक्या खोलवर तुला मला याक्षणी काय वाटत आहे ते कळतंय, तुला कळतेय माझी मला अगम्य अशी वाटणारी भीती. तू कसं काय लिहिलस रे अगदी आत्ता मला जे  वाटत आहे ते? अगदी तेच. तुला कशी कळली माझ्या मनाची फाटकी, चिंध्या झालेली अवस्था. डोळ्यातून घळाघळा पाणी येऊ लागलं.  कसं लिहिलस हे? काय लिहिलस ते माहित नाही पण या क्षणाला अगदी हेच वाटतंय मला, जे तू 'मेटामॉरफ़ॉसिस' मधून सांगतोयस.

काफ्का एकदम बोलायलाच  लागला.
'तुला वाटतंय मी हेच सांगतोय. पण असं नाहीये. मी काही तुला वाटतंय ते नाहीये सांगत. मी शोधतोय खोल विहिरीत बुडालेलं माझंच स्वतःचं काहीतरी. आणि काय मिळेल ते बाहेर काढतोय त्या उद्योगात. पाणवेलींच्या तुटक्या फांद्या, दगडधोंडे,साचलेला गाळ, माती, शेवाळ, नाहीतर एखादा पाणसाप? त्यातलंच दिसलं तुला काहीतरी ओळखीचं एवढंच. पाणसाप दिसला का तुला? काय करू? माझ्या विहिरीत बरंच काही आहे, मीही काढतोय ते उपसून. पाणसाप मिळाला म्हणून घाबरू नकोस. माझ्या या विहिरीत कमळं नाहीत असं नाही (मलाच ती सापडली नाहीत)! पण खोलवर असावीत ती. तू शोध'

पण कसं काय लिहिलस रे हे माझ्या आत्ताच्या मनाच्या अवस्थेसारखं , मला तूच आठवलास एकदम तुझ्या त्या कीटकासहित.


'कसं ते सांगू नाही शकणार, ते कळायला तुला बरच चालावं लागेल अजून. पण का लिहिलं ते सांगू शकेन थोडं बहुत. आधी माणसाने लिहावेच का हाच तो प्रश्न. त्याचे उत्तर मी माझ्या परीने देणार आहे.
तर लिहावे का? कश्यासाठी? आणि कसं ? तर जेव्हा आपल्याला असह्य होईल तेव्हा ज्यामुळे असह्य वाटत आहे ते शोधावे, ते सापडणे तसे सोपे नाही. भल्याभल्यांना ते सापडत नाही, शोधत राहतात आयुष्यभर, कळलं?
मी काय उगाच लिहित होतो काय? जीव कासावीस झाला माझा, मेटामॉरफ़ॉसिस कशी लिहिली मी? पडलो होतो बेडरिडन होऊन आणि जीवाला कंटाळलो होतो त्यामूळे तळमळ होत होती. तेव्हा हे सुचलं आणि त्याने मला इतकं झपाटून टाकलं कि लिहिल्याशिवाय चैन पडेना.
संडासला कसं कडकडून लागतं तेव्हा धावता ना? तसं कडकडून लिहावंसं वाटलं तरच लिहावं. आणि लिहून फाडून टाकावं. जर फाडून टाकल्यावरही ते तुम्हाला लक्षात राहिलं असेल तरच परत लिहावं.'
बाकी आपली कहाणी तर काय कुणीही सांगू शकतो. अगदी गल्लीतल्या पाववाल्याची कहाणी देखील डोळ्यात आसवं आणेल. ते प्रत्येकाच्या आयुष्यात कमी अधिक प्रमाणात असतेच. वरवर प्रत्येकाचे आयुष्य वेगेळे वाटते पण जर खोलवर गेलात तर तळ सारखाच असतो. हा तळ  जेव्हा दिसतो ना तेव्हाच तुम्ही दुसऱ्याशी खरा संवाद साधू शकता. आत्मकथा वगैरे ठीक आहे, वरवरून सगळ्या वेगळ्या वाटतात पण आत्मरुदन म्हणजे काय त्याचा विचार केलाय का कधी?, जेव्हा आत्मरुदन व्यक्त होईल तेव्हाच ते कुणालाही भिडेल. जसं तुला आता भिडलं तसं'

'मेटामॉरफ़ॉसिस' बद्धल आणखी थोडं सांग मला.
'नाही. ते तू तुझं बघ. जे सांगायचं ते मी त्यात सांगितलय.'


आता काय करतोयस तू? कुठे असतोस?
'मी इथेच आहे. काहीही करत नाही सध्या. पण माझा शोध चालूच आहे. मी भटकत असतो. मुंजाच ना मी! काय करणार? असतो कुठच्यातरी लायब्ररीत आणि मग तुझ्यासारखा कुणीतरी 'वाचणारा यडा' गावला कि त्याची मानगूट पकडतो. पण जेव्हा कुणी भेटत नाही तेव्हा लायब्रऱ्या धुंडाळतो. अशीच तुमची मराठी लायब्ररी धुंडाळली. बरं लिहिता कि तुम्ही लोकं पण एक जाणवलं तेच तेच लिहिता. म्हणजे गलिच्छ वस्ती, स्त्रियांवर अत्याचार, शिव्या, मारझोड, तुंबलेली गटारं, संडासातल्या लेंड्या इ. लेखन ठीक आहे, पण तेच तेच काय, अरे? म्हणजे तुझं झालं रडून आता माझं ऐक, हे कश्यासाठी? बरं हे वाचून काय मिळतं तर ज्यांना कसलीच झळ बसली नाही त्यांच्या तोंडवाटे 'चक चक', 'अरेरे' आणि ज्याने असं काही भोगलय त्यांच्याकडून 'ह्या! यात काय मोठ्ठे आहे, आम्ही हे रोज बघतो,  आमच्या घरात हेच चालते कि!' यापेक्षा काय मिळतं?
मी काही फक्त माझी पुस्तकं वाचतात त्यांना भेटतो असं नाही. मध्यंतरी असाच एका आयुष्याविषयी जाण असलेल्या व्यक्तीला भेटलो, त्याला तर माझे एकही पुस्तक माहित नव्हते. तो मला सांगत होता कि हल्लीच त्याने एक नाटक बघितले 'आत्मकथा' आणि त्याला ते  एकदम फडतूस वाटले. तो म्हणाला कि याच्यापेक्षा चांगला ड्रामा आमच्या घरात घडतो. मला पटलं त्याचं.

माझं हेच सांगणं आहे कि जरा स्वतःच्या खोल विहिरीत डोकावून तरी बघा कि जरा!  शेवाळ बाजूला करा आणि बेडक्यांना उड्या मारू देत जरा. खोल उतरा तेव्हा कुठे एखादी मासोळी हाती लागेल. हा! अगदी बुडून जाण्याचीही पर्वा नसेल तर मात्र तळाशी डोळे मिटून बसलेलं कासवही गावेल कदाचित.'
 
पण तू कसं काय ओळखलस आणि लिहिलंस मला जे वाटलं ते? आणि तेही १०० वर्षांपूर्वी?
'मी तुला ओळखत नाही. मी मला ओळखण्याचा प्रयत्न केला आणि करत आहे. मी तुला एवढंच सांगतो कि माझ्या पुस्तकांतून मला शोधण्यापेक्षा त्यातून तू तुलाच शोध. तेव्हा कुठे माझ्यापर्यंत येऊन पोहोचशील. बघ जमतं का ते. मग मी पुन्हा येईन भेटायला आणि बोलायला.'