Sunday 27 February 2022

निसर्ग आणि काकांनी सांगितलेली अमृतानुभवतील ओवी

दृश्यांचिया सृष्टी । आणि दुष्टीवरी दृष्टी । उपजताचि तळवटीं । चिन्मात्रचि ॥१२४॥ दर्शनसमृद्धी बहुत । निर्मिता चैतन्य रमत । न देखे शिळ्या आरशात । विषयरत्नाच्या ॥१२५॥ क्षणोक्षणी नित्य नवी । दृश्याची वस्त्रे बरवी । वेढवी दिठीकरवी । उदार जो ॥१२६॥ मागल्या क्षणीचि अंगे । पारोशी म्हणोनि वेगें । सोडूनि दृष्टि रिघे । नव्या रूपीं ॥१२७॥ तैशीच प्रतिक्षणींजाणिवेची लेणी


मन स्वच्छ असलं पाहिजे, कसलाही पूर्वग्रह असता कामा नये.

विपुलाच सृष्टी

This sea that  bears her bosom to the moon ,
the wind that will be howling at all hours
and are up-gathered now like sleeping flowers ,
for this, for everything we are out of tune
It moves us not
- Wordsworth


September 22 , 2018
अतिशय सुंदर फुलं पहायला मिळालीं तुझ्यामुळें.छायाचित्रणाचा
आधार घेऊन या दृश्याचं सौंदर्य तुला चित्रबद्ध करतां आलं.या
स्मृती त्यामुळे आपण जतन करूं शकतों.विश्वात पुरेपूर भरून
राहिलेल्या चैतन्याच्या प्रभावामुळे आपण कोणतेंहि दृश्य पाहूं
शकतों.आपल्या या पंचेन्द्रियांद्वारांदेखील आपण असेच विश्वाचं
दर्शन घेऊं शकतों-----याला कारण वर सांगितलेल्या वैश्विक
चैतन्याचा (Universal Consciousness)आपणहि एक
अंश आहोंत.तेव्हा हा जिवंत अनुभव घेताना आपल्या विविध
वृत्तींनीं त्या दृश्यावर केलेले आरोप --------चांगला/वाईट,सुंदर/कुरूप इ.
सर्वच अप्रस्तुत ठरतात.एक तत्त्वदर्शनातील वचन आहे :
        दृश्याः धीवृत्तयः साक्षी दृगेव न तु दृश्यते ॥
"आपण जीं दृश्यें पाहतों तीं सर्व आपल्या बुद्धीचेच वेगवेगळे
आविष्कार असतात.अविकृत दृक्शक्ति मात्र केवळ साक्षिरूपानें
सर्व कांहीं पाहत असते.ही शक्ति म्हणजे वर सांगितलेलं
वैश्विक चैतन्य.आपल्यामधील विकृतीमुळें आपल्याला मात्र तें
दिसत नाही."
वरील वचनाचा हा भावार्थ आहे.वैश्विक चैतन्याचा एकदा का
" साक्षात्कार "झाला कीं सगळे भेद गळून पडतात आणि
राहतो तो विशुद्ध " आनंद ".
तुझ्या अनुभव घेण्याच्या दृष्टीला हें सामर्थ्य प्राप्त होवो अशी
इच्छा आहे;मग तूं आणि सभोवतालचें विश्व यांच्यांत कोणताहि
प्रत्यवाय राहणार नाही.
आपण तत्त्वज्ञानाच्या गहन अरण्यात शिरतों आहोत असं तुला
वाटतं आहे का? एक लक्षात ठेवायला हवं कीं या अरण्यांतली
विलक्षण सृष्टी कितीहि पहिलं तरीही संपणार नाही.
       सगळ्या भेदाभेदांपलिकडे पोचलेल्या या वृत्तीलाच म्हणतातः
                           ब्र  ह्मा  नं  द 🙏🏽


या फुलाविषयी,आकलन, दृष्टी आणि सृष्टीविषयीही इतके छान विचार लिहून मला पाठवल्याबद्दल धन्यवाद काका!🙂

तत्त्वदर्शनातील : दृश्याः धीवृत्तयः साक्षी दृगेव न तु दृश्यते ॥ 
हे वचन कुठच्या ग्रंथात आहे?
मानवी आकलनाचे, मानवी स्थितीचे अचूक ज्ञान त्याकाळच्या तत्ववेत्त्यांना होते हेच यावरून दिसून येते. 

हो, खरं आहे, माणूस शेवटी मनुष्य'प्राणी'च आहे, त्यामुळे खऱ्या अरण्यातून जरी तो बाहेर पडला असला ज्ञानाच्या, तत्वज्ञानाच्या, विचारांच्या अरण्यांतून तो भटकतच असतो. 
जे महान विचारी, बुद्धिवंत या अरण्यांतून मुक्त विहार करून आले त्यांनी व्यक्त केलेले विचार म्हणूनच जाणून घ्यावेसे वाटतात. ही अरण्यं गहन आहेतच आणि अनंतही. पण त्यांच्या काठांवरुन तरी फिरण्याची इच्छा आहे.


इंद्रियांनीं आपण ज्ञानग्रहण करतों,त्यामागे हा विवेक असेल
तर खऱ्या अर्थाने तें ज्ञानग्रहण.भोक्ता हा भोग्यच आणि द्रष्टा
हा दृश्य होऊन बसतो.तिथं भेदाभेदांना वाव कुठला?
वरील वचन -----दृश्याः धीवृत्तयः------हें विद्यारण्य स्वामींचे
शिष्य गुरु भारती तीर्थ यांनी रचलेल्या एका लहानशा ग्रंथातील
आहे.ग्रंथाचें नांव ---------" दृग्दृश्यविवेक " (सुमारे १४व्या शतकाच्या
मध्यावर)
कुरूप गोष्टीतही सौंदर्य दृष्टीस दिसलं पाहिजे.


10/18/17, 12:09 दिवाळीच्या निमित्ताने ज्ञानदेवांची एक सुंदर , अर्थगर्भ ओवी आठवली
आजच्या 'लोकसत्ता' च्या अग्रलेखाचं  शीर्षक बघ.
                   सूर्यें  अधिष्ठिली प्राची ।जगा राणीव दे प्रकाशाची
                    तैसी वाचा श्रोतयां ज्ञानाची।दिवाळी करी ।।
पूर्वेला सूर्य उगवल्यावर सगळं जग प्रकाशानें उजळून निघतं;त्याप्रमाणे खऱ्या सद्गुरूंची
वाणी कानीं  पडतांच श्रोत्यांच्या मनांत ज्ञानरूपी दिवाळी उगवते
ज्ञानदेवांना अभिप्रेत  असलेला खरा सद्गुरु कोण हें तुला  सांगायला  नको !!
     दीपावलीच्या सप्रेम शुभेच्छा  !!!🌺🌺
 
 
10/29/17, 21:52 - Samantha Kaka: खरोखरच 'देवाक काळजी' अशी दृढ श्रद्धा असलेल्या माणसाला अश्या
गाढ झोपेचा अनुभव येऊं शकतो.ना गतायुष्याचं सुखदुःख ना उद्यांची
चिंता.झोपेत आपले रक्षण कोण करणार याची फिकिर नाही !!तुला हें
दृश्य आशादायी आहेअसं वाटलं तें कोणत्या अर्थाने हें मला नीटसं कळलं
नाही.हर्ष-शोक यांत बुडून गेलेल्याला सगळ्याच गोष्टींचं भय असतं
या प्रसंगी मला केशवसुतांची ही कविता आठवते
                            हर्षखेद ते मावळले
                                      हास्य निमालें
                                       अश्रु पळाले;
                             कंटकशल्यें बोथटलीं
                             मखमालीची लव वठली;
                              कांही न दिसे दृष्टीला,
                                          प्रकाश गेला,
                                          तिमिर हरपला;
                               काय म्हणावें या स्थितिला?
                                            झपूर्झा! गडे झपूर्झा !----------------
      गाढ निद्रेत अश्या कांहीं चेतना निर्माण होत असतील का?
        चेतन अवस्थेत अशी ' झपूर्झा ' स्थिति अनुभवणारे
       खरोखर महात्मे म्हटले पाहिजेत 
      तुझं चित्र पाहून  विचारांचे कसे कल्लोळ उठतात बघ !
               असो .सविस्तर कधीतरी बोलूं -------------
 
10/30/17, 09:55 - shiwalee: अतिशय सुंदर कविता आहे. अशी 'झपू्र्झा' स्थिती ज्यांना जागेपणी प्राप्त होते ते भाग्यवंतच! मला हे दृश्य आशादायी वाटलें तें अशा अर्थाने की हा माणूस खरोखरच या देवांच्या सानिध्यात अगदी शांतपणे, समाधानाने विश्रांती घेत असल्याचा प्रत्यय माझ्या मनाला आला. मुंबईसारख्या सतत धावत्या आणि कोलाहलाच्या शहरात टोकाच्या विषमता दाखवणारे प्रसंग रोज दिसतात. एकीकडे उत्तुंग इमारती, आलिशान घरे आणि दुसरीकडे माणसे रस्त्याच्या दुभाजकावर  झोपलेली हे तर कायमच पाहायला मिळते. जी तीन दृश्ये पाहून गौतम बुद्धाचे अंतःकरण जीवनातील अपार दुःखाने व्यापून गेले, तशी दृश्ये जागोजाग दिसतात. पण ही दृश्ये बघून दृष्टी बोथट झाली आहे, मन कोडगे झाले आहे त्यामुळे नक्की काय वाटते ते सांगणे अवघड आहे. बहुदा क्षणभर उदास वाटते, क्षणभर असहाय्य वाटते, पण क्षणभरच..अशा दृश्यांपासून दूर गेले की मनही हे सर्व विचार झटकून दुसऱ्या प्रदेशात भटकायला मोकळे होते. आपणाला एखादया ठिकाणी बसवून ठेऊन आपल्या डोळयांसमोर सतत चलतचित्र दाखवले जात आहे, जे दिसते ते बघायचे आहे, ते कसेही असो, कारण ते चलतचित्र थांबवण्याचे 'बटण' तुमच्या हातात दिलेले नाही. तुमच्यासमोर जीवनाचे अतिशय सुंदर रूप दाखवले जाईल आणि अत्यंत विदारक आणि भयंकर रूपही, पण ते थांबवण्याचा 'विकल्प' तुम्हाला दिलेला नाही. मग जे आहे त्याला 'सुंदर' ,'कुरूप' , 'सुखद', 'दुःखद' अशी विशेषणे लावत बघणे एवढेच आपले काम.. असे प्रत्येक दृश्य मनात काही ना काही भाव निर्माण करूनच येते, सुंदर, बीभत्स, सुखद, दुःखद..
पण कालच्या दृश्याने मनात कुठलाही असा भाव निर्माण केला नाही, निदान काही क्षणापूरता तरी. मला ते दृश्य ना विदारक वाटले ना सुखद वाटले, त्याला कुठलेही विशेषण मनाला लावता आले नाही. एक क्षणभर का होईना मन निर्विकार झाले. मला असेही वाटले की हा झोपलेला माणूस खरोखरच समाधानी असेल, नाही कशावरून? त्याची बाह्य परिस्थिती बिकट असेलही पण मन शांत असेल त्याचे. कारण मला त्या शांततेचा थोडा प्रत्यय आला. असे काहीतरी वाटले म्हणून मला हे दृश्य आशादायी वाटले.🙂
याबद्दल मी सविस्तर बोलेन तुमच्याशी नंतर कधीतरी.
10/30/17, 12:03 - Samantha Kaka: शिवाली,
   तूं मोकळेपणाने केलेलं शब्दरूप  " प्रकट चिंतन " वाचून खूपच समाधान वाटलं.
   मनांतील कोलाहल नेमकेपणाने व्यक्त केला आहेस!!
         याविषयी सविस्तर नक्की बोलूं ------------ 



3/12/18, 12:48 - shiwalee: काका, 
मला आलेल्या अनभवांबद्दल तुमच्याशी बोलून मलाही बरेच ज्ञान प्राप्त होते,(ज्ञान हा तसा खूपच मोठा शब्द इथे वापरण्याचे धाडस उगाचच म
ी करत आहे) ,  तुम्ही मला जे लिहिता, सांगता ते अतिशय चिंतनीय असते, त्यावर विचार करण्याचा माझा प्रयत्न चालू असतो, पण ते समजण्याची, 
आचरणात आणण्याची माझी तेवढी पात्रता नाही हे मी जाणून आहे. 

काही अनुभव इतके सूक्ष्म, तरल असतात की त्यांना जाणून घेण्यासाठी आपण अपुरे पडतो की काय असेच वाटते, निसर्गाबद्दल माझा अनुभव
काहीसा असाच आहे. इतके परिपूर्ण काही पाहिले की मनात कसली खंत/रितेपणाची भावना येते तेही कळत नाही. पण निस्सीम आनंद हा निसर्ग
देतो हेही खरे.

निसर्गानुभव आणि त्याद्वारे प्राप्त होऊ शकेल अशी शांतता, विरक्ती आणि अतिशय सूक्ष्म असे आपल्यात कुठेतरी जाणवणारे निसर्गाचेच स्पंदन 
यांचा आवाका एवढा मोठा आहे, incomprehensible आहे की एवढे सर्व पाहून त्यांच्यापर्यंत पोहोचणे दुर्लभ वाटते.
असे न मळलेले, अम्लान आणि शुद्ध असे जे काही डोळ्याला दिसते ते पाहण्यासाठी डोळे,मन कमी पडतात असेही वाटते कधीकधी.
3/12/18, 12:50 - shiwalee: हे मी काहीतरीच लिहीत आहे, पण मला असे वाटते मात्र खरे अनेकदा🙂
3/12/18, 13:28 - Samantha Kaka: तूं 'कांहीतरीच' लिहीत आहेस असं तुला वाटण्याचं कारण काय ?
खरंतर मला वाटतं तुला ' कांहीतरी ' मौलिक सांगायचं आहे-----
शब्दांच्याहि पलिकडील--तुला उमजलेलं.आपल्याला वाटतं तें
नेहमीच शब्दांतून व्यक्त करीत राहावं;त्यांतूनच आपण " अमूर्ता "ला
स्पर्श करूं शकतों.ज्ञानेश्वरांनी शब्दाच्या मर्यादा ओळखून सुद्धा
एके ठिकाणी "शब्द अमूर्ताचा विशदु आरिसा " असं म्हटलं आहे.
यांत सर्व काही आलं !!!!
3/12/18, 17:45 - shiwalee: 'शब्द अमूर्तचा विशदु आरिसा' ही ओळ फार आवडली.
 
 
4/15/18, 11:45 - Samantha Kaka: लिंकनबद्दलचा किस्सा अप्रतिम !अन्यांच्या रागलोभात न गुंततां
निष्ठेने व प्रेमाने आपलं काम करीत राहणं हें खरं जीवनाचं
' श्रेय '.एकदा ' प्रेया ' च्या चक्रव्यूहात माणूस अडकला कीं
त्याची सुटका नाही.
   जॉन ओपाय या चित्रकाराच्या उत्कृष्ट रंगछटांनीं लुब्ध झालेल्या
एका प्रेक्षकाने त्याला विचारलं,"Sir,what do you mix your
paints with ? "
         त्यावर चित्रकाराने उत्तर दिलं ,
    "  I mix them with my brains,sir "
 
 
5/14/18, 13:22 - Samantha Kaka: एकापेक्षां एक सुंदर असे Passiflora foetida चे हे विभिन्न प्रकार
खूप चित्ताकर्षक वाटले.फुलाचा प्रत्येक अवयव कांही विशिष्ट
हेतूने निसर्गाने निर्माण केला असणार.काही असलं तरी सौंदर्यासक्त
मानवी वृत्ति व अश्या निसर्गरम्य गोष्टी आपले एकांतीचे क्षण
आनंदाने भारून टाकतात हें खरें !! Daffodils चा सुंदर ताटवा
बघून Wordsworth घरी येऊन एकाकी बसला असतां हा फुलांचा
सौंदर्यपट त्याच्या अंतर्मनाच्या गाभाऱ्यात उलगडतो---------
They flash upon my inward eye
Which is the bliss of solitude
           अशी त्याची मनःस्थिति होते.
टागोरांनी एका ठिकाणी म्हटले आहे.Truth and beauty are realized
through man and they are one with the Universal Being,
and they must essentially be  ' human '.
छायाचित्रे पाठविलींस त्याबद्दल पुन्हा एकदा आभार !!
5/14/18, 14:17 - shiwalee: They flash upon my inward eye 
Which is the bliss of solitude 

किती सुंदर ओळी! Wordsworth तर एक महान कवी! मी त्याच्यासमोर कोणीच नाही, तरीही मी म्हणेन की मला जे वाटते ते त्याने मोजक्या शब्दांत मांडले. 
मला असेच वाटते. मी कुठेतरी निसर्गात भ्रमंती करून आले की त्यानंतर तिथे डोळ्यांनी पाहिलेला निसर्ग निराळ्या रूपाने पुन्हा डोळ्यासमोर येतो. छायाप्रकाश, 
उन्हात उभी असलेली झाडे, त्यांच्या पानांची सळसळ, त्याने भारून गेलेला सगळा आसमंत डोळ्यासमोर उभा राहतो, स्थलकालाचे बंधन नसलेले मन त्या 
निसर्गाच्या रूपाने व्यापून जाते, पुन्हा भ्रमंती करू लागते. हा अनुभव कसा व्यक्त करावा? कोण जाणे!
झाडे , वेली पाहताना मला नेहमी असे वाटते की आपल्याला दहा हजार डोळे हवे होते,तरीही ते निसर्गाचा अनुभव घेण्यास अपुरेच पडले असते.
पण Wordsworth ला लाभलेला inward eye मलाही मिळावा असे आता मला वाटते.
 
6/9/18, 18:47 - Samantha Kaka: तूं पाठविलेला माहितीपट(documentary) खूप आवडला.वानससृष्टीचीं 
एकेक आश्चर्यें आयुष्यभर चिंतन/मनन करून या गृहस्थांनी अभ्यासलीं.देवरायांवरचं
तर त्यांचं केवळ अजोड म्हणतां येईल असं आहे.
 
6/17/18, 09:58 - Samantha Kaka: सुंदर,लुसलुशीत ,रंगबेरंगी पानांचे गुच्छ! वा!
कुठेतरी रमणीय दृश्य पाहिलं,सुंदर चित्र पाहिलं,
स्वर्गीय संगीताचे स्वर कानीं पडले,तर क्षणात
आपला पहिला प्रतिसाद आनंदोल्लासाचा असतो,
पण दुसऱ्याच क्षणीं या आनंदलहरींवर तरंगत
असताना,सर्वांशानीं सुखी असलेला आपला जीव,
एक प्रकारची अनामिक हुरहुर त्याला लागते.इथें
शाकुंतलातला एक श्लोक आठवतो :
          रम्याणि वीक्ष्य मधुरांश्च निशम्य शब्दान्।
               ----------------------
या श्लोकाबद्दल आपण भेटींत बोलूंच--------------
                                 मनापासून आभार !!🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿 

स्वतःला काय समजलं? तर काही नाही

एखाद्या गोष्टीचा पाठपुरावा करायचा तर खूप सखोल अभ्यास करावा लागतो. काही वेळेला patience कमी पडतात, काही वेळेला वेळ कमी आहे असे वाटते. फक्त एक आणि एकच गोष्ट घेऊन त्याबद्दल अभ्यास करावा. पण आजचा information overflow अगदी disturbing आहे. आपण कुठच्या कुठे भरकटत जातो. हाती काही लागत नाही. आता फक्त Entada rheedi या वनस्पती वर लक्ष केंद्रित करायचे ठरवले पण तिच्याबद्दल शोधताना इतर वनस्पती डोकावून गेल्या. आणि सकाळपासून दोन ओळीसुद्धा लिहिता आल्या नाहीत.
स्वतःला काय समजलं? तर काही नाही.
आपलं ज्ञान (ज्ञान-ज्ञान म्हणतो ते ज्ञान) किती वरवरचं आहे. त्याचा प्रत्यय अत्यंत असहनीय आहे.  खरं ज्ञान समजण्याची माझी उंची नाही कारण हा जन्म अतिशय छोटा आहे. फार फार तर तीस चाळीस वर्षे आपण निरीक्षण करून अभ्यास करू शकतो. हे फार minuscule आहे.
एका entada rheedi चे आयुष्य बहुतेक १००-२०० वर्षे असेल तर आपण त्याच्या १/३ वर्षे सुद्धा त्याचे ना निरीक्षण करू शकत ना त्याला जाणून घेऊ शकत.
मेंदू अफाट. आणि शरीर संक्षिप्त, तोकडे. यामुळे माणसाच्या चिंधड्या उडतात.
मला काकांनी एक वाक्य सांगितले. जे तुम्ही जे बघता, ज्याबद्दल लिहिता, एखादे फुल-पण


एकटे होते ते. पण आपल्याला काय माहित, ते सर्व एकटेच असतात का?

निसर्गाच्या ओळखीत एक नवीन candidate सहभागी झाला. दगड. दगडांचा बनलेला पर्वत. सह्यपर्वत. सह्याद्री.
कधीही विसरू शकत नाही दगडाला मिठी मारून एखाद्या लहान मुलासारखे रांगणे. त्याच्यासमोर मी लहानच.
कुत्रा-मांजर-लहान मूल सगळे निसर्गाच्या अधिक जवळ. तसेच आपणही. दगडाला धरून त्याचा आधार वाटून त्याला दोन्ही हातानी धरून चालले कि वाटते आपण दगडाचाच एक भाग आहोत. मग ती हरिश्चंद्रगढच्या पठारावर पसरलेली जंगलं, त्यातले चित्रविचित्र आवाज काढणारे प्राणी, मोठाली झाडं, छोटी झुडुपे, गच्च वाढलेली कारवी, ओसंडून फुललेली पिवळी फुले, तेरडा, घुमणारा डोंगर-कवडा, निळासावळा ब्लू thrush कि मलबार thrush, अमऱ्या , आमची निरपेक्ष मनाने सोबत करणारा अनाम कुत्रा हे सर्व मीच आहे आणि मी म्हणजेच ते आहेत.
खरंच !

Sunday 13 February 2022

fragmented

तिथे पोचून परत इथे यायचं आहे . तिथेच राहता येणार नाही. कारण तिथे राहण्यासाठी जागा नाही. राहण्यासाठी जागा इथेच आहे. तिथे खायला अन्न सापडणार नाही. ज्याची आपल्याला गरज आहे. पाणी नाही तिथे, हवाही नाही, आपल्याला जगण्यासाठी या गोष्टींची गरज आहे आणि त्या तिथे नाहीत. म्हणून आपल्याला परत इथे यावे लागेलच.
आणि आपल्याला पुन्हा सगळ्याची ओळख करून घ्यावी लागेल, नुसती ओळखच नाही तर त्याचा स्वीकारही करावा लागेल. मन एवढं खुलं असलं पाहिजे, की त्यात काहीही येऊ शकतं, सगळ्या गोष्टी त्याला स्वीकारसम आहेत, स्वागतार्ह आहेत, कुठलीही गोष्ट वर्ज्य नाही, कुठल्याही गोष्टीला आडकाठी नाही. तिथे जाऊन परत आलो म्हणून आपण बदलत नाही. फक्त porus होतो. छिद्रांनी बनलेले. ज्या छिद्रांतून सगळं आत येऊ शकतं आणि सगळं बाहेर जाऊ शकतं.
 ओहारान पामुक, कोबो अबे हे का लिहितात? स्वतःसाठी लिहीत असतील तर त्यांना ते दुसऱ्यांना दाखवण्याची गरज काय? 'पूर्णत्व' हे त्याचे कारण आहे का? गोष्टींना तोपर्यंत महत्व येत नाही जोपर्यंत observer त्यांना बघत नाही. त्यांना तोपर्यंत अस्तिव नाही त्यांचं अस्तित्व तोपर्यंत सिद्ध होत नाही जोपर्यंत त्यांना बघणारा, अनुभवणारा मिळत नाही म्हणूनच लोकं लिहितात, चित्रं काढतात? observer ची गरज आपल्याला नाकारता येत नाही. जोपर्यंत observer नाही तोपर्यंत आपल्या अस्तित्वाला काहीच अर्थ नाही. हा इन्स्टिंक्ट आपण जेव्हा निर्माण होतो तेव्हाच आपल्या अस्तित्वाचा भाग बनून  निर्माण होतो काय? त्यामुळेच relate करणे हे आपल्या basic need चा भाग आहे का? ही fundamental गरज आहे का?
तो एक छोटा साधा कुत्रा आहे माझ्या बिल्डिंगच्या बाहेर. आजकाल थंडीमुळे तो एका वाळूच्या ढिगाऱ्यामधे एक खोलगट खड्डा करून त्यात बसतो आणि आपल्या पायांवर तोंड मुडपून गप्प डोळे मिटून राहण्याचा प्रयत्न करतो. मी त्याला बघितले, म्हणून तो आहे हे मला कळले, मी त्याला बघितलेच नसते तर तो आहे याचे ज्ञान मला कसे झाले असते? त्याचे तसे बसणे मला affect करते, त्याच्या त्या स्थितीला मी 'गरीब' असे लेबल लावले आहे. हे लेबल मला कुठून मिळाले, तो 'गरीब' आहे का? पण हे माझे त्याच्या स्थितीचे केलेले अवलोकन आहे. म्हणजे फक्त त्याचे अस्तित्व/असणे पुरेसे आहे. त्या अस्तित्वाचे खरे रूप/सत्य जाणण्याची मला गरज नाही.

सतत चांगलं वाटण्याची सक्ती. चांगलं वाटावं म्हणून आपण का प्रयत्न करतो. मूल जरा कुणी बाजूला गेले की का रडते? कुरकुरते? त्याला का पाहिजे कोणी? एकटं असणं त्याला का सहन होत नाही? अगदी जन्मापासून. ते जेव्हा सर्वप्रथम अस्तित्वात येते तेव्हा ते का रडते? त्याला कसले दुःख होते? दुःख म्हणजे काय आणि दुःख होते म्हणजे तरी काय?

भीती आहे. सगळ्यात बेसिक .. एक्सिस्टन्स च्या पायथ्याशी काय आहे?
मग वर भीती आहे? कसली

माणूस फक्त descisions घेत असतो. अथ पासून अंतापर्यंत


सतत चांगलं वाटण्याची सक्ती. चांगलं वाटावं म्हणून आपण का प्रयत्न करतो. मूल जरा कुणी बाजूला गेले की का रडते? कुरकुरते? त्याला का पाहिजे कोणी? एकटं असणं त्याला का सहन होत नाही? अगदी जन्मापासून. ते जेव्हा सर्वप्रथम अस्तित्वात येते तेव्हा ते का रडते? त्याला कसले दुःख होते? दुःख म्हणजे काय आणि दुःख होते म्हणजे तरी काय?

भीती आहे. सगळ्यात बेसिक .. एक्सिस्टन्स च्या पायथ्याशी काय आहे?
मग वर भीती आहे? कसली

माणूस फक्त descisions घेत असतो. अथ पासून अंतापर्यंत

काफ्काची डायरी

Am I reading because I want to get something or I enjoy reading?

जानेवारी १९२२
evolution सोपं होतं. मी जेव्हापर्यंत आनंदी होतो, तेव्हा मला स्वतःला दुःखी बनवायचे होते, मला उपलब्ध असलेल्या माझ्या काळातील सगळ्या कल्पना,रीतिरिवाज वापरून मला स्वतःला दुःखी बनवायचे होते. तरीही ते करूनही मला तिथून परतही यायचे होते, आनंदाकडे. थोडक्यात काय? मी आनंदी असलो तरीही दुःखीच होतो. विचित्र गोष्ट अशी कि हे सगळं जर कुणी योजनाबद्ध रीतीने केलं , तर ते खरं वाटू शकतं. माझा spiritual decadence हा एक बालिश खेळ म्हणून जन्माला आला. मी त्याच्या बालिशपणाविषयी कितीही जाणून होतो तरीही. उदाहरणार्थ मी माझ्या चेहऱ्याचे स्नायू मुद्दाम आवळून घेत असे , किंवा मी graben कडून जात असताना माझे हात माझ्या डोक्याच्या मागे क्रॉस करून घेत असे. हे सगळे क्रुद्ध करणारे खेळ पण परिणामकारक  (हेच evolution माझ्या लेखनाबाबतीत घडलं, फक्त एवढंच की माझ्या लेखनाबाबतीतलं evolution थांबलं. जर दुःख (unhappiness ) असा forcefully induce करता आला असता, तर काहीही induce करता आलं असतं. subsequent development कितीही विरोधाभास दाखवत असली, कितीही माझ्या स्वभावाशी विसंगत असली तरी मी हे मानायला मुळीच तयार नाही आहे की माझ्या दुःखाचे कारण माझ्या आत आहे, माझी आंतरिक गरज आहे. बहुतेक त्या दुःखाच्या origin/मुळाला ला स्वतःच गरज असेल (necessity ऑफ their own) पण  आंतरिक नाही. एखाद्या माश्याप्रमाणे त्यांनी माझ्या अंतरंगात प्रवेश केला तसाच या माश्यांना मी घालवून देऊही शकतो.

माझ्यासारखी  inner state असणारी माणसं आहेत यावर माझा विश्वास नाही, पण मी अशा लोकांबद्दल कल्पना करू शकतो. पण त्यांच्याही डोक्याभोवती एक गूढ कावळा सतत फिरत असतो हे मात्र मी अजिबात कल्पनेत आणू शकत नाही.

नोव्हेंबर २, १९११.
This morning for the first time in a long time the joy again at the thought of a knife being turned in my heart. (Sentence in The Trial: while the other stuck the knife into his heart and turned it there twice.' knife in the heart is like an old acquaintance who has reappeared!)

१९२० मध्ये डायरीत लिहिलेले चार शब्द
'Meine Gefangniszelle - meine Festung.'  :  माझा  तुरुंग - माझा किल्ला (My prison cell - my fortress)

जून १९१३
माझ्या डोक्यात एक अफाट जग आहे. पण मी स्वतंत्र कसं होऊ आणि ते (जगही) ही कसं स्वतंत्र होईल without tearing? आणि खरंतर स्वतःकडे ठेवण्यापेक्षा, किंवा स्वतःत गाढून टाकण्यापेक्षा ते tear करून टाकणंच चांगलं होईल. ते मी इथे असण्याचं खरं कारण आहे आणि मला ते पूर्णपणे ज्ञात आहे.



एक जागा अशी आहे
जिथे आहे किनारा
आणि अथांग समुद्र

त्या किनाऱ्यावर
आहे वाळवंट
आणि वाळूचा एक पर्वत  


त्या पर्वताला 
आहे एक खोल दरी
आश्वासक आणि काळोखी

पर्वताच्या कड्यावरून
गोंघावतो वारा
 जाणवतो वाऱ्यातून स्पर्श

स्पर्शातून पालवी
पालवीतून अरण्य
घनदाट होईल

अरण्यातून प्रकाश
प्रकाशातून आकाश
दिसेल 

आणि एक आहे भुयार
आणि त्यातून वाहणारी गुप्त नदी  


पण तिला प्रकाश
दिसत नाही
नाद ऐकू येत नाही
श्वास कळत नाही


पण तरीही आहे तिथे
पर्वताच्या हृदयाचा नाद
अरण्याचा भास
आणि समुद्राचा श्वास

अशी ही जागा आहे

Monday 7 January 2019

भयानक तोंड

त्या भयानक तोंडाने आ वासला आणि मला गिळले.  मी सध्या त्या तोंडात बंद आहे. मला विरघळून टाकण्यासाठी त्यात पाचक रस सध्या पाझरत आहे. पण मी तसा विरघळणार नाही. हा माझा एक हात आणि दोन्ही पाय पाचक रसाने झडून बाजूला पडले आहेत. माझ्या शरीराला मोठी भगदाडे  पाचक रस पाडीत आहे. चेहरा विद्रुप झाला आहे पण मी तसा विरघळणार नाही. कारण माझ्या नजरेतील उष्णता अजून अबाधित आहे. तिने मी तो पाचक रस शोषत आहे. जितका मी शोषत आहे आहे तितक्या दुप्पट वेगाने तो निर्माण होत आहे. त्यामुळे इथून बाहेर पडताना फक्त डोके जरी शाबूत राहिले तरी मला त्याची तमा नाही.  फक्त दुसरा हात गमावला तर मात्र हे भयानक तोंड मला उघडता येणार नाही. आणि मरेपर्यंत मला या तोंडात बंदिस्त राहावे  लागेल. तसे  जर मला बंदिस्त राहावे  लागले  तर मी पुढचे  आयुष्य कसे घालावेन याबद्दल मी विचार करू इच्छित नाही. कारण तसे झालेच तर मला विचार करायला मरेपर्यंत वेळ आहे. वेळ कसा घालवायचा याचा विचार करतच आयुष्याचा बराच वेळ जाऊ शकतो. आणि जेव्हा वेळ कसा घालवायचा हे मला समजले तर त्या मार्गाचा अवलंब करून मी उर्वरित आयुष्य घालवू शकतो.

या तोंडात बसून मी फार सुखी नाही. कसा असेन? अत्यंत चिकट, उग्र, दुर्गंधी असलेलं हे तोंड आहे. याने आधी कितीजणांचा घास घेतला असेल. त्यातली काही माणसे नक्कीच अत्यंत कुजक्या अंतरंगाची असू शकतात. त्यांचीच दुर्गंधी या तोंडात पसरली असावी. मला दिसत असणाऱ्या काही पडलेल्या गोष्टींत या माणसांपैकीच काहींचे एक,दोन दात, हाडं असावीत. हि माणसे  खरोखरच महामूर्ख म्हटली पाहिजेत. या तोंडाला चावून, दात लावून, हाडांच्या शरीरी सामर्थ्याने नाही तर नजरेच्या उष्णतेनेच फक्त मारता येऊ शकते हे या मूढांना ठाऊक नाही. आयुष्यभर इतरांच्या जीवाचे लचके यांनी दातांनी तोडले, तर इथेही त्यांचा उपाय यशस्वी होईल असे या मूढांना वाटले असावे.

मी इथे बसून आहे, तेव्हा इतर कुणी इथे येऊ नये, कारण त्यांना माझ्याशी बोलण्याचा मोह होईल. पण बोलणे  म्हणजे शुद्रच. बोलून स्वतःचा वेळच फक्त काय तो जाऊ शकेल. हा पाचक द्रव अत्यंत चिकट असल्याने मला या माझ्या उरलेल्या हाताची हालचालही करता येत नाही आहे, त्यामुळे मी तो अगदी उंच उगारून हवेत ठेवला आहे. जेणेकरून त्याला पाचक द्रवाचा स्पर्श होऊ नये. तसे  आता माझ्या नजरेच्या उष्णतेपुढे पाचक द्रव थोडा मागे हटला आहे. माझ्यासाठी हे फार उत्साहाचे नाही. कारण जर मी असेच माझ्या डोळ्यांच्या प्रखर उष्णतेने पाचक रस शोषू लागलो आणि तो संपला नाही तर माझ्या नाकातून तो रक्त बनून स्त्रवू लागेल. रक्त फुकट जाणे आता माझ्यासाठी योग्य नाही. कारण इथून उठण्यासाठी लागणारी ऊर्जा मला रक्तच पुरवणार आहे.  अत्यंत परिश्रमाने मी स्वतःचे शरीर घडवले होते. त्या रक्तामासांच्या ऊर्जेचाच हे भयानक तोंड वापर करून आणि त्यामुळेच अधिक पाचक रस बनवून तो माझ्यावरच सोडत आहे. म्हणजे माझ्या मजबूत शरीरामुळेच अधिक पाचक रस बनायला मदतच होत आहे. म्हणजे मीच मला मारत आहे का? माझ्या सर्वनाशाला मीच कारणीभूत झालो आहे.

तोंड मी बंद ठेवले आहे पण विचार चालू आहेत. इथे आयुष्याच्या अंतापर्यंत मी बसू इच्छित नाही. कारण इथे काहीच नाही. काहीच नाही म्हणजे माझ्यासाठी काहीच नाही. पण म्हणजे माझ्यासाठी काय असायला हवे आहे असे माझे म्हणणे आहे तेही मला ठाऊक नाही. असे म्हणणे प्रत्यकाचे असतेच. तसे म्हटल्याप्रमाणे काही असतेच असेही नाही. तरीही इथून बाहेर पडायलाच मला आवडेल.

पण एक आहे. इथे माझा कुणाशी संबंध येत नसल्याने माझ्या अस्तित्वाला इतरांपासून धोका नाही. इथे मी कुणीच नसलो तरीही चालेल. उद्या या पाचक रसाशी झटता, झटता माझे शरीर नष्ट झाले तरीही चालेल. इथे मला कुणाची हाक ऐकू येत नाही. कुणाची शिवी ऐकू येत नाही. इथे बरे  आहे असेही  मला क्षणभर वाटून गेले होते. पण फक्त क्षणभरच. एकच क्षण आपल्याला एक वाटते. मग दुसऱ्या क्षणी जे वाटते ते पहिल्या गोष्टीसारखे नसतेच. त्यामुळे वाटते इथे काय वाईट आहे? पण हि दृष्टी जशी आता मला या पाचक रसाशी लढण्यास मदत करत आहे तशी ती माझी शत्रूही झाली आहे. तिच्यामुळेच माझी परिस्थिती किती वाईट झाली आहे हे मला दिसत आहे. दोन्ही पाय आणि एक हात नाही. शरीरावर विवरं बनली आहेत. हे सर्व पाहून भयभीत होण्याऐवजी मी सुटण्यासाठी धडपड करत आहे.

पण हि फक्त  मनाची धडपड आहे शरीराची नाही. शरीराची धडपड केव्हाच थांबली आहे. ते एका अर्थाने बरेच आहे. कारण या जागेची एक युक्ती मला माझ्या गुरूने सांगितली होती. त्याने सांगितले होते की शरीर जेवढे अचल तेवढी इथून सुटका चटकन होऊ शकते. इथे आल्यापासून शरीराची जराही हालचाल मी केलेली नाही. तशी हालचाल केली तर या तोंडाच्या जबड्यात जेवढी हालचाल होईल तेवढ्या भिंती निर्माण होतात. या निर्माण होणाऱ्या असंख्य छोट्या भिंतींनी मला अजून वेढा घातलेला नाही.  या शरीराने स्वतःपासून एक हात आणि दोन्ही पाय झडून टाकून मग मला एका प्रकारे साथच दिली आहे.फक्त आता काहीच काळ राहिला असेल.  आणि तो किती काळ आहे याचे   मोजमाप करण्याचे काहीच  साधन नसल्याने मी काळाबाबतीत निश्चिन्त आहे. पण मनातील विचारांनी मात्र त्रस्त आहे. मी एक मूर्तीकार आहे. चांगल्या मूर्ती घडवल्या. त्यामुळे सुंदर शरीराची मला चांगली जाण आहे. आजवर ज्या मूर्ती मी घडवल्या त्या सगळ्याच अपूर्ण होत्या असे मला वाटते. त्या पूर्ण वाटल्या तरी त्या अपूर्णच राहिल्या. मग काही मी मुद्दामच अपूर्ण सोडून देऊ लागलो. एवढ्या मुर्त्या घडवल्या पण मला त्यांना बोलते करता आले नाही. मी त्यांच्याशी खूप बोललो पण त्या माझ्याशी एकदाही बोलल्या नाहीत. त्यातल्या एकीशी मी लग्नही केले. सतत संवाद साधण्यासाठी तिची आराधनाही केली, पण तिने तोंड कधीही उघडले नाही.
आता मात्र हे तोंड ज्यात मी बंद आहे ते तोंड तिचे असेल का असा मला संशय येतो. आणि म्हणूनच मी संभ्रमात आहे. कारण मी या तोंडातून बाहेर गेलो तर या तोंडाचा नाश करूनच ते मला करावे लागेल. म्हणजे माझ्या मला प्रिय असलेल्या आणि अत्यंत जपलेल्या मूर्तिचाच नाश मी कसा होऊ देऊ?. तिचे अस्तित्व नष्ट होणे म्हणजे माझे अस्तित्व नष्ट होणेच नाही का? तसे या तोंडाचे एक तंत्र आहे, इथे तुम्हाला भ्रम होतात. तसा भ्रम मलाही झाला आहे की हे माझ्या प्रिय व्यक्तीचे तोंड आहे आणि तिनेच गिळून माझा सर्वनाश केला आहे. पण तरीही मी आता विचार करतो की नाहीतरी ती माझी प्रिय मूर्ती माझ्याशी कधीही बोललीच नाही. तिचे प्रदर्शन मी कधी मांडले नाही. भलेभले मूर्त्यांचे चाहते तिला विकत घेऊन फुटकळ पैसे मला देऊ करून तिला माझ्यापासून हिरावून घेऊ शकले असते, पण मी तसे होऊ दिले नाही. तर आता ती मूर्ती जी माझ्यापासूनच बनली आहे, जीचे  अस्तित्व कुणालाच ठाऊक नाही तिचे अस्तित्व मी नष्ट केले तर कुणाला त्याचे काय असेल? मी तशी मूर्ती पुन्हा घडवू शकेन किंवा घडवू शकणारही नाही. पण मी तरी जिवंत राहीन. आणि अशीही शक्यता आहे की हे कुणा दुसऱ्याचेच तोंड असेल. मग ती मूर्तीही अबाधित राहील आणि मीही जगेन. पण यात एक गूढ आहे. जर मला इथून बाहेर पडता आलं नाही तर माझ्या मूर्तीशास्त्राच्या अभ्यासाचा , त्या शक्तीचा शोध माझ्याबरोबरच संपून जाईल. आजवरचे माझे चिंतन माझ्या मृत शरीराबरोबरच मृत होऊन विरघळून जाईल. ते कुणाला देऊन मी  माझा शोध अनंत काळापर्यंत चालू ठेऊ शकेन, आणि त्यासाठीच मला कसंही करून इथून बाहेर पडलंच पाहिजे. 

पण आता मला एका व्यक्तीच्या येण्याची आशा आहे. मी वाट बघत आहे. वाट बघून बराच काळ झाला आहे. वाट बघणं मी इथे आलो तेव्हापासून सुरु केलं होतं आणि अजूनही वाट बघतच आहे. त्या व्यक्तीने मला सांगितलं होतं कि अशा एका वेळी जेव्हा तू संकटात असशील तेव्हा माझे स्मरण कर, तेव्हा मी तुला जी अट घातली होती ती जर तुला मान्य असेल तरच मी येईन. त्या व्यक्तीची अट अशी होती की जर तू तुझी मूर्तिविद्या सोडायला तयार असशील तरच मी तुला संकटातून सोडवीन. माझी मूर्तीविद्या पूर्णपणे नष्ट होईल. आता मूर्तिविद्या हेच माझे मानसिक अस्तित्व नव्हे का? मग ते नष्ट झाले तर हे शरीर घेऊन एखाद्या कस्पटासारखा वाऱ्याच्या दिशेने भरकटकत मी जगू तरी कसा? पण मीच राहिलो नाही तर ही विद्या तरी काय कामाची आहे? आता या वर्षांनुवर्षे खपून कमावलेल्या विद्येला गमावणे अत्यंत दुःखदायक असले तरी मी ती पुन्हा मिळवू शकेन. पण मी आयुष्याच्या अशा टप्प्यावर आहे की कुठचीही विद्या पुन्हा मुळापासून शिकून, तीत पारंगत होऊन, तिचे उपयुक्तेत रूपांतर करण्याएवढे आयुष्यच मला आता उरलेलेच नाही. तर मग मी ते उरलेले आयुष्य या शरीराबरोबर विद्याहीनतेत कसे काढू? हि विद्या मला कुणालातरी बहाल करता आली  असती तर आणि पूर्वीही मी याचा विचार येऊनही अवलंब केला नव्हता. कारण विद्या हि इतरांसाठी केवळ मान मिळवण्याचे साधन आहे, तो मान म्हणजेच विद्या असे इतरांचे म्हणणे आहे जे मला पसंत नाही. म्हणून माझे मूर्तिशास्त्र आणि माझी विद्या मी कुणासमोर मांडलीच नाही. मी एक स्वयंपाकी म्हणून काम करीत होतो. कुणाला संशयही येऊ नये इतकी खबरदारी घेतल्यावर ते सहज शक्य होते. पण आता माझी सर्व आयुधे नष्ट होताना बघून मनाच्या ठिकऱ्या होत आहेत. हि विद्या नष्ट होऊ नये यासाठीच मला आता इथून बाहेर पडले पाहिजे. 

माझ्या शरीराची जेवढी झीज होत आहे, तेवढीच नजरेतील प्रकाशाची उष्णता वाढत आहे. त्या वाढत्या उष्णतेबरोबर माझ्या आजूबाजूचा तो कंटाळवाणा पाचक द्रवही हळूहळू कमी होत आहे. पण त्याचा ओढा आता माझ्या हाताकडे लागला आहे. त्यामुळे नाईलाजाने मला माझा हात हलवून हालचाल करायला लागली. हाताला वाचवण्यासाठी तसे करणे भाग पडले. त्यामुळे माझ्यापुढे आता एक भिंत निर्माण होऊन उभी राहिली आहे. ती एकच असली तरी तिला ओलांडायचे म्हणजे आता हालचाल अधिक होईल आणि त्या जितक्या हालचाली तितक्या अधिक भिंती माझ्यापुढे निर्माण होतील.  एक करू शकतो असे माझ्या गुरूने सुचवले होते. हा मार्ग त्याने स्वतः एकदाच आणि फक्त एकदाच अवलंबला होता. तो म्हणजे उलट्या बाजूने तोंडाच्या आत, घसा, अन्ननलिका, जठर, आतडी आणि गुदद्वार असा प्रवास करायचा. तो प्रवास महाकर्मकठीण आहे आणि त्यासाठी माझ्याकडे आहे त्यापेक्षा अधिक तीक्ष्ण ऊर्जा डोळ्यांत पाहिजे. पण या मार्गाने सुटका मिळाली नाही तर अंत निश्चित आहे. किंबहुना अंतच ठरवतो की सुटका मिळाली की नाही. कारण अंत होणार की नाही ते आधी कळते आणि सुटका नंतर. हा प्रवास जेवढा लांब आहे तेवढा बिकटही कारण तुम्ही आता स्वीकार केला आहे की शरणागती give up केला आहे काहीही असो पण तुम्ही तोंडाच्या बाहेर जाण्याऐवजी त्याच्या आत आत घुसत आहात या नियमावरून पाचकरसाचे लोटच्या लोट आता तुम्हाला घशातून अन्ननलिकेत घेऊन जातात. आणि जठरात तर लाव्हारसारखा अग्निमय रस तुम्हाला स्वतःत बुडवून टाकायला उसळत असतो. त्यातून जर बाहेर पडलात तर आतड्याच्या नागासारख्या विळख्यांतून अंधाऱ्या वाटेने जाताना डोळ्यातला सारा प्रकाश, सारी ऊर्जा विझून जाईल. तुम्ही पूर्ण आंधळेही होऊ शकता. आणि जेव्हा गुदद्वारातून बाहेर पडण्याचा क्षण येईल तेव्हा तुमची जगण्याची इच्छा ठार मेलेली असेल. आणि तुम्ही पुन्हा त्याच मार्गाने आत जाण्यासाठी धडपडू लागाल. पण तो मार्गही बंद झालेला असेल. एखाद्या तपस्व्यालाही पार करायला अशक्यप्राय वाटावा असा हा मार्ग आहे.

मला असे वाटते की सुटका होण्याची आशा का बाळगावी. नाहीतरी मी या तोंडात विरघळून गेलो तर माझ्या  मृत्यूने एका अर्थाने मी या तोंडाचाच एक भाग बनणार आहे. त्याच्या पाचकरसात विरघळून त्याचाच एक अंश बनून माझे अस्तित्व माझे राहिल का? आणि असे माझे अस्तित्व तरी किती काळ अबाधित राहणार आहे. एकदिवस मृत्यू येईलच. मग मृत्यूने जसे आपले अस्तित्व हिरावून घेतले ते आपल्याला मंजूर आहे तसे या तोंडाने आपले अस्तित्व हिरावून घेतले तर काय झाले? मृत्यू आणि या भयानक तोंडात असा कोणता फरक आहे?

ती व्यक्ती जर आली तर तिला आपण हा प्रश्न विचारू शकू. पण विद्या गमावून त्या व्यक्तीला बोलावणं मला फार कष्टाचं झालं आहे. त्यापेक्षा स्वतःच प्रयत्न करून इथून निघून जाणे, मग ते कुठच्याही मार्गाने का होईना मला केलेच पाहिजे. 

आता पुन्हा मला या पाचकरसावर थोडा का होईना विजय मिळवता आला आहे. आणि अजूनतरी माझा हात शाबूत आहे. माझी नजर अधिक प्रखर आणि तीव्र झाली आहे. असे मला वाटते. पण तोही माझा एक भ्रम असावा कारण इथे भ्रम होणे क्रमप्राप्तच आहे. माझी विद्या मला इतकी प्रिय असण्यामागे एक कारण आहे ते म्हणजे हि विद्या आजवर मला आणि फक्त मलाच प्राप्त होऊ शकली आहे. हाही भ्रम असावा असे वाटण्याचे काही कारण नाही कारण ती अशी एकमेव शक्ती आहे जी फक्त अशा गोष्टीनेच प्राप्त होऊ शकते जी मी केली आहे. 

या इथे खूप थंड पोकळी आहे. पण या थंडीचा अर्थ असाही होऊ शकतो की आता पाचकरसाचे स्रवणे आता कमी होत आहे. असंही असेल की माझ्या नजरेतील उष्णता आता कमी झाली आहे त्यामुळे थंड वाटत आहे. असेही असेल की हा पाचकरस आता बंद होत असेल कारण त्याचे माझ्याशी असलेले काम संपले आहे आणि म्हणजेच दुसरं कुणी इथे येणार असावे. 

सध्याच्या या थंडीने मला कुडकुडा येत आहे आणि या थंडीत माझ्याही डोळ्याची उर्जा, प्रखरता शिथिल होत आहे. बहुतेक या जागेची ही आणखी एक युक्ती असावी. माझ्याकडे जोपर्यंत विचार करण्याची शक्ती आहे तोपर्यंत मी माझ्या डोळ्याची प्रखरता जराही कमी होऊ देणार नाही. कारण आता मला माझे डोके वाचवायचे आहे कारण हे हात आता मूर्ती घडवू शकणार नाहीत पण हे डोके विद्या नक्कीच कुणालातरी देऊ शकेल. ज्यामुळे ती विद्या जिवंत राहील आणि मग मला माझ्या जीवाची पर्वा राहणार नाही. पण तोपर्यंत मला इथून सुटण्याची माझी धडपड सुरूच ठेवली पाहिजे. अजून निराशा आलेली नाही. ती आली तर बरेच होईल. ठार निराशा कधी येत नाही कारण ठार निराशेचा क्षण म्हणजे सुटकेचा क्षण.

Saturday 15 December 2018

हत्ती आणि डास

एक होता हत्ती जो चाले अपनी चाल
आणि एका होता डास
जो फक्त आणि फक्त प्यायचा रक्त

हत्ती बुद्धीवादी, प्रथेनुसार शाळेत गेला
मास्तर म्हणाले, अरे गज्या SSS!!!
बुद्धी तुझे वज्र, सोंड नाही

पसार सोंड, घे केळं, दे मालकाला
तो नको म्हणालाच तर तू खा
पसर सोंड, घे रुपया, दे मालकाला
तो मालकालाच खाऊ दे, तुला नाही पचणार
वजन उचल, ठोक सलाम
राग आलाच तर, सोंडेने गार फवारा उडव
स्वतःच्या डोक्यावर आणि  शांती कर

डासाला शाळा नाही, शिक्षण नाही
जे काय शिकायचं ते आईच्या पोटातच शिकून बाहेर पडला,
अभिमन्यूसारखा. (मग करायचंय काय शिक्षण!)

अपनी चाल चालता चालता
सुशिक्षित हत्तीची प्रशिक्षित सोंड
सलाम, केळं, वजन, रुपया
आणि क्वचित पाण्याचा फवारा
असे नियम पाळून होती

डास अशिक्षित, सोंड अशिक्षित
तिला काय ठाऊक, मध निराळा, मद्य निराळे
ती घुसत होती फक्त आणि शोषित होती रक्त

पुढे काहीच कसे होत नाही?
अशी चिंता वाहणाऱ्या सज्जनांनी
हत्ती आणि डास यांची ठरवली कुस्ती
हेतू पवित्र, थोडीशी गंमत आणि
झालाच तर नफा

प्रसार माध्यमे प्रचाराला लागली
सट्टे लागले, मुलाखती रंगल्या
कुस्तीचा दिवस उजाडला

हत्तीकडे बुद्धी आणि शक्ती दोन्ही प्रचंड
वरून सट्टा तेजीत
डासाकडे फक्त सोंड, बाकी शून्य

डास शूद्र,  त्याला मारणे म्हणजे मरणं
त्याच्याकडून हरणे तर मरणाहून मरणं
मास्तरांकडे छडी
मालकाकडे अंकुश
आपल्याकडे काय? केळं !
हत्तीची सोंड गळून पडली

डास व्रतस्थ, त्याची सोंड म्हणजे
तपश्चर्या, संयम आणि संधी यांचे प्रतीक
जणू एक कोणी साधूच

बिनसोंडेचा हत्ती आणि डासाची सोंड रिंगणात
डास हत्तीच्या कानात घुसला
हत्तीने कान फडफडवला
तेवढाही मारा पुरेसा ठरला
डास खलास

झाला टाळ्यांचा गजर
हत्तीने ठोकला सलाम
मालकाने खाल्ला रुपया

पुढे हत्ती पण कणाकणाने मेला, रोज
कारण एक,
डास त्याच्या कानात
कसलेसे रक्तरंजित क्रांतीचे गीत (कसले गीत? कोणी लिहिले? कोणासाठी?)
गुणगुणला होता, का? कशासाठी?
त्याचा अर्थ काय? उपयोग काय?

कारण दोन,
डास चावला की काय
अशी भीती!

-विवेकानंद सामंत,
पूणे , २०१८