Thursday 31 August 2017

काप्रु (Begonia crenata)

काप्रु
कर्नाळा पक्षी अभयारण्यात कर्नाळा किल्ल्याच्या वाटेवर ही वनस्पती काही ठिकाणी फुलली होती. तिचे शास्त्रीय नाव आहे Begonia crenata. इंग्रजीत तिला 'कॉमन बेगोनिया' म्हणतात. मराठीत तिला 'काप्रु' , 'बेरकी', 'खडक आंबाडी' अशी नावं आहेत. या वनस्पतीची फुले अतिशय नाजूक आणि सुंदर असून त्यांचा रंग पांढरी, गुलाबी झाक असलेला, फिकट गुलाबी असतो. ही वनस्पती जमिनीलगत वाढणारी आहे, तिची पाने जमिनीला टेकून असतात. फुले मात्र जमिनीपासून वर वाढणाऱ्या उंच देठांना येतात. हे देठ लालसर रंगाचे असतात. ही वनस्पती दार वर्षी पावसाळ्यात उगवते. २५ सेमी पर्यंत उंच वाढू शकते. पश्चिम घाटामध्ये आणि सह्याद्री रंगांच्या जंगलात ही वनस्पती मोठ्या प्रमाणावर आढळते. पाने गोलाकार / हृदयाकृती आकाराची असतात. फुलांच्या मानाने बरीच मोठी असून जमिनीलगतची त्यांची ठेवण सुरेख दिसते.

काप्रुची फुले

जून ते सप्टेंबर या कालावधीत ही वनस्पती फुलते.
या वनस्पतीच्या पुरुष आणि स्त्री फुलात काही फरक आढळून येतात.

Begonia roxburghii हे तिचं भावंडं उत्तरेकडे हिमालयाचा पूर्व भाग, नेपाळ , मिझोरम या ठिकाणी सापडतं. Begonia च्या आणखी चार जाती कोकण आणि सह्याद्रीच्या भागात सापडतात. अशी माहिती थीओडोर कुक यांच्या ग्रंथात सापडते.  

या वनस्पतीची पुरुष (Male Flowers) आणि स्त्री फुले(Female Flowers) वेगेवेगळी असतात. Male Flowers गुलाबी रंगाची असतात आणि त्यांना २ petals आणि २ sepals असतात. Female flowers ना ५ असमान perianth segments असतात. त्यांचा रंग गुलाबी असतो की नाही हे मात्र सापडले नाही. मी पाहिलेली सर्व फुलं फिकट पांढऱ्या/गुलसर रंगाची होती पण ती गुलाबी रंगाची नक्कीच नव्हती. या बद्दल थोडी अधिक माहिती शोधणे गरजेचे आहे. 




 


Saturday 26 August 2017

मुरुडशेंग (Helicteris isora)

उन्हाळ्याच्या अखेरीस टर्झन हिलच्या जंगलात मी एक छोटे झुडुप पाहिले होते. माझ्या बरोबरच्या वृक्षतज्ज्ञाने त्याचे नाव 'मुरुडशेंग' असे सांगितले होते. खरोखरच त्याला काही शेंगा होत्या आणि त्या मुरडल्या गेल्यासारख्या आकाराच्या होत्या. शेंगा सुकलेल्या होत्या. त्या झाडाबद्दलची अधिक माहिती वाचली, फुले फार सुंदर आकर्षक रंगाची असतात हे कळले. त्या झुडुपाची फुले पावसाळ्यात फुलतात हे माहित झाल्यावर ती फुले दिसण्याची आशा मी सोडून दिली होती कारण ते झाड दाट झाडीझुडुपात होते. उन्हाळ्यात विरळ झालेल्या त्या भागात त्या झाडापर्यंत पोहोचणे थोडेफार तरी शक्य होते पण आता पावसात आजूबाजूला माजलेल्या गर्द रानात ते झाड सुद्धा दृष्टीस पडणे अशक्य होते. पण आज सकाळीच 'यामामोटो' या ओळखीच्या पण stray असलेल्या कुत्र्याला हुडकताना टर्झनहिलच्या रस्त्यालाच मला हे झाड अगदी सहज दृष्टीस पडले. ते ओळखू आले त्याच्या पानांच्या बगलेमध्ये दिसणाऱ्या छोट्या लालभडक फुलांमूळे. त्या सुंदर लाल फुलांमुळे हे झाड 'मुरुडशेंग' आहे हे चटकन ओळखता आले. 

मुरुडशेंगची रिकामी शेंग (फळ)

हे खरंतर छोटंसं झुडूप. फुले नसतील तर 'धामण' सारखंच वाटेल कारण याची पानं बरीचशी मोठी 'धामण' च्या पानांसारखीच असतात. अनुकूल परिस्थितीत या झुडुपाचा छोटा वृक्ष होऊ शकतो. फुलाच्या वैशिष्ट्यपूर्ण रचनेमुळेच याची फळे (शेंगा) पाच वेगवेगळ्या छोट्या भागांचा एकमेकाला पीळ बसून बनलेल्या असतात. या शेंगाच्या विशिष्ट आकारामुळे या झाडाला 'मुरुडशेंग' असे नाव पडले आहे. डॉ. म. वि. आपटे यांच्या 'वनस्पतीसृष्टी' या ग्रंथात या झाडाचे आणखी एक नाव 'मृगशृंग' असे दिले आहे. 'मृगशृंग' म्हणजे कुरंगहरिणांचा पुढारी नर. या नराची शिंगे अशा पीळ पडलेल्या आकाराची असतात. 

मुरूडशेंगेची फुले साधारण जुलै ते ऑगस्ट या काळात फुलतात. ऑक्टोबर ते नोव्हेंबर पर्यंत फळे परिपक्व होतात आणि  त्यांच्या सुक्या शेंगा बराच काळ ती झाडावरच राहतात. म्हणूनच मला उन्हाळ्यात या झाडाच्या शेंगा पाहता आल्या होत्या. पानझडतीच्या काळात या झाडाला पालवी लवकर येते, त्यामुळे जंगलातील हरीण आणि इतर शाहाकारी प्राण्यांना या झाडापासून अन्न मिळण्यास मदत होते.

'मुरुडशेंग' या झाडाचे अनेक औषधी गुणधर्म या ग्रंथात सांगितले आहेत. प्रदीप क्रिशेन यांच्या 'जंगल ट्रीज ऑफ सेंट्रल इंडिया' या पुस्तकात मुरूडशेंगेच्या फळाचा आणि खोडाचा उपयोग ग्रामीण, आदिवासी भागात पोटदुखीवर केला जातो असे सांगितले आहे.  
दक्षिण भारतात या झाडाच्या सालीपासून पोती बनवली जातात. ज्यूट सारखाच त्यांचा उपयोग केला जातो. 
त्यामुळे हे झाड बहुगुणी आहे असे दिसून येते.

कर्नाळ्याच्या जंगलात ऑगस्टच्या अखेरीस मुरुडशेंग भरपूर फुलली होती. अतिशय पडणाऱ्या पावसामुळे फुलांचे फार चांगले फोटो  घेता आले नाहीत. तरीही ही सुंदर तांबडी फुले जवळून पाहता आली.



मुरुडशेंगेची फुले आणि कळ्या

Murraya paniculata(exotica) कुन्ती

या झाडाला हिंदीत 'कामिनी' म्हणतात. मराठीत 'कुंती' म्हणतात. इंग्रजीमध्ये Orange Jasmine, Chinese Box म्हणतात. 
शास्त्रीय नाव आहे : Murraya paniculata(exotica), इंग्रजीमध्ये त्याला 'मॉक ऑरेंज' किंवा 'ऑरेंज जास्मिन' म्हणतात.
हे तसं छोटंसं झुडूपवजा झाड आहे पण अनुकूल वातावरणात त्याचा छोटा वृक्षही होऊ शकतो.
या झाडाबद्धल मारुती चितमपल्लींनी 'चकवाचांदण' पुस्तकात लिहिलं आहे. 'ज्या जंगली झाडापासून मिळवलेल्या काठीला 'पांढरी'ची काठी म्हणतात. ती काठी वजनानं जड असते. पाण्यातही बुडते. पांढरीची काठी ज्याच्याजवळ असते त्या व्यक्तीला विषारी सापापासून भय नसतं. त्या काठीची उपयुक्तता पाहून मीही ती जंगलातून सारे सोपस्कार पाळून मिळवली. ती काठी मांत्रिकाकडून मिळवावी लागते. अमावास्येच्या दिवशी नदीत अंघोळ करून नग्नावस्थेत पांढरीची काठी तोडावी लागते. तशी मी एका ठाकर आदिवासी मांत्रिकाकडून मिळवली होती.' 

या पांढरीच्या काठीबद्दल त्यांनी जी. एंच्या पत्रात देखील लिहिले आहे. या वृक्षाचे लाकूड नाजूक कोरीव काम करण्यासाठी वापरतात. ब्रह्मदेशात त्याच्या सालीचा उपयोग सौन्दर्यप्रसाधनात केला जातो, असे डॉ. म. वि. आपटे यांच्या 'वनश्रीसृष्टी' ग्रंथात नोंदवले आहे.

या वृक्षाच्या सुंदर पांढऱ्या फुलांमुळे याला उद्यानवृक्ष म्हणून लावण्यात येते. भरपूर पाऊस होणाऱ्या भागात हा वृक्ष वन्य आहे. या वृक्षाच्या तीन पोटजाती आढळतात. क्षुपरूप जात महाराष्ट्रात, उत्तर भारतात उद्यानात आढळते. वृक्षरूप वन्य जात भारतात प्रामुख्याने कारवारच्या जंगलात आढळते, तर आणखी एक वृक्षरूप जात श्रीलंकेत आढळते. आशिया खंडात चीन, ब्रम्हदेश, कंबोडिया इत्यादी देशातही हा वृक्ष आढळतो. परंतु ऑस्ट्रेलियामध्ये या वृक्षाला 'invasive' म्हणून नोंदविण्यात आले आहे. त्याची मूळे पाणी शोधत अतिशय वेगाने पसरतात. हा वृक्ष फार वेगाने सर्वत्र पसरण्यामूळे पर्यावरणाचे असंतुलन करू शकतो.


Wednesday 23 August 2017

जुनं पुराण

या प्रवाहाजवळ मी बसले आहे
एका उपड्या होडीवर 
सोबतीला एक कुत्रा, एक पिंपळ, आणि अविरत सळसळ

या नदीला समुद्राची ओढ वाटते ?
की तिला त्याचे बंधन वाटते?
की स्वतः संपताना ती अशाच कुणाचा विचार करते?

समुद्राला,  (आणि या पिंपळालाही )
एका जागी राहून जेव्हा वैताग येतो 
तेव्हा त्याला कुठे जावेसे वाटते?

प्रवास करून होडी थकते, किनारी लागते, उपडी होते
उपड्या होडीत, फिरून आलेल्या सफरीतला
एकतरी थेंब शिल्लक असेल का?

कोलाहलात, संथ होता येते? 
मग ही  पानांची सळसळ,
आपल्यासहीत शांतता कशी घेऊन येते 

बाजूला पहुडलेला कुत्रा डोळे मिटून विचारमग्न आहे 
उपड्या होडीवर बसून
मी मात्र प्रवास करतच आहे

-'खूप जुनं काही'  ५-ऑगस्ट-२०१७