Wednesday 19 October 2016

दोन अज्ञात

जपानी काबुकी डान्सर

जेव्हा नोकरी सोडून घरातील वास्तव्य वाढले तेव्हा खिडकीतून बाहेर दिसणाऱ्या mangrove (खारफुटी)कडे माझे लक्ष गेले. तिथे आणि त्याच्या बाजूलाच असणाऱ्या लहानशा टेकडीवर दाटीवाटीने वाढलेल्या झाडांत अनेक पक्ष्यांची हालचाल नेहमी दिसायची. लालबुड्या बुलबुल, मैना, खंड्या, हळद्या, राखी बगळा, पॉण्ड हेरॉन, कोतवाल, घार, ब्राह्मणी घार असे पक्षी अधून मधून दिसत. पण बाकीचे अनेक छोटे पक्षी जे या खारफुटीच्या झुडपात राहतात ते मात्र क्वचितच दिसत. त्यांचे आवाज मात्र ऐकायला येत. त्यातला एक अतिशय मोहक आणि लक्षात राहणारा आवाज होता 'टीट-टी-टी  SSSSSSS टीटी SSS टीटी SSS टीटी टी SSS'  
ही शीळ  बऱ्याचदा पूर्ण ऐकू येई, पण काही वेळेला अर्धी पण ऐकू येई. या शिळीचे अनेक प्रकारही ऐकू येत. हा असा सुरेल शिळा घालणारा आणि त्यातही व्हेरीअशन करू पाहणारा कोण हा बीथोवेनचा वारशी? म्हणून त्या अज्ञात पक्ष्याचे नाव मी 'बीथोवेन' ठेवले होते. पक्षी कधीच दिसला नाही. दहाव्या मजल्यावरून दिसणार तरी कसा म्हणा? पण मला नेहमी त्याचा आवाज ऐकला की तो कुठला पक्षी असेल हे शोधावेसे वाटे. पण शोधायचे कसे?  जेव्हा जेव्हा तो आवाज कानावर पडे तेव्हा मी मनात त्या पक्ष्यालाच उद्देशून म्हणत असे 'आज ना उद्या नक्कीच शोधून काढेन मी तू कोण आहेस ते.' माझे पक्ष्यांबद्धलचे फक्त कुतूहल जास्त आणि अज्ञान त्याहूनही जास्त, त्यामुळे शोधायचे कुठे आणि विचारायचे कुणाला आणि कसे? आवाज रेकॉर्ड करून कुणा पक्षी-निरीक्षकाला ऐकवता आला असता पण तेव्हा पक्षीनिरीक्षण आणि पक्षीनिरीक्षक या दोहोंबाबतीत ज्ञान अत्यल्पच होते. म्हणून हा आवाज हुडकणे बाजूलाच राहिले. दोन अडीज वर्षं तरी त्याचा काहीच पत्ता लागला नाही. जवळपास त्या आवाजाचा काहीही पाठपुरावा न करता, कुठचाही खटाटोप न करता मी गप्प बसून राहिले तो आवाज ऐकत. सकाळी बऱ्याचदा ऐकू येई, अधेमधे कधीही ऐकू येई आणि काही काही दिवस, महिने महिने त्याचा आवाज नसे. मी त्या आवाजाला अनुसरून त्या अज्ञात पक्ष्याचे एक चित्र मनात बांधले. माझ्या मनातल्या चित्रात तो पक्षी म्हणजे एक खूप छोटा, पिवळ्या निळ्या रंगाचा आणि कुणीतरी गायनाचा पंडित असावा त्याप्रमाणे डोक्यावर तुरा असणारा होता. जेव्हा काही काळ त्याचा आवाज ऐकू येत नसे तेव्हा मला वाटे कि बहुतेक आता ऐटीत फांदीवर बसून तो सुरांची छान रचना बनवत असेल. आणि त्या सुरावटी बांधण्यातच तो गर्क असेल. मग जेव्हा त्याची सुरावट बांधून होई तेव्हाच तो रियाज करत असेल. किंवा नवीन चीजा शिकण्यासाठी खारफुटीचे रान सोडून आपल्या गुरुकडे साधना करण्यासाठीदेखील गेला असेल. मोठा पंडितच गाण्यातला. त्याची नेहमीची 'टीट-टी-टी  SSSSSSS टीटी SSS टीटी SSS टीटी टी SSS' ही शीळ  तो वेगवेगळ्या व्हेरिएशनने ऐकवत असे.

शेवटी एकदाचा या सुरेल आवाजाचा गायक समोर आला. मी कोकणात गेले असताना, घराच्या देवखोलीतून समोरच्या आंब्याच्या झाडावर हालचाल दिसली म्हणून बघितलं तर एक सुमार दिसणारा चिमणीएवढा काळसर, पोटाकडे पांढरट, पण अतिशय सुरेख जपानी पंख्यासारखी शेपटी असलेला पक्षी या फांदीवरून त्या फांदीवर टणाटण उडया मारीत होता.  पायावर नक्षत्र पडल्यासारखा नुसता इथून तिथे नाचत, फुदकत होता, काही सेकंदातच तो नजरेआड झाला. त्या झाडावरून दुसऱ्या, तिसऱ्या झाडावर पसार झाला. हाच तो  'बीथोवेन' हे काही मला तेव्हा कळले नाही. पण दूर गेल्यानंतर तीच नेहमीची शीळ ऐकू आली. तेव्हा चटकन डोक्यात प्रकाश पडला की खारफुटीतला 'बीथोवेन' इथे पण आहे. मग मी कान देऊन परत ती शीळ ऐकू येते का ते बघत राहिले. अनेक दिवस त्या आवाजाच्या दिशेने धावू लागले. त्याला पकडणे आता शक्य होते कारण घर जमनीलगत, झाडांच्या आसपास असल्याने कुणी असलाच आवाज करत तर चटकन त्या आवाजाच्या दिशेने हुडकले की पक्षी दिसू शकणार होता. म्हणून आवाजावर नजर ठेऊन होते पण तो आवाज अजूनही हुलकावण्या देतच होता. पक्षी काही समोर आला नाही. 

एक दिवस समोरच्या जांभळीच्या झाडावर आलेली हरेवा या पक्ष्याची जोडी कॅमेराबंद करण्यासाठी घराच्या टेरेसवर दबा धरून बसले होते, तेव्हा त्यांच्या camouflage करणाऱ्या हिरव्या रंगामुळे त्यांना हुडकताच येत नव्हते म्हणून आणि उन्हाच्या माऱ्यामुळे बेजार झाले होते. तेव्हा अचानक तीच नेहमीची शीळ समोरच्या झाडावर ऐकू आली. ऊन अगदी समोरून डोळ्यावर पडत होतं आणि त्या उन्हाने आंब्याची फांदी देखील काळसर दिसत होती तेव्हा नाचत नाचत जपानी पंखा फुलवत तो पक्षी त्या फांदीवर अवतरला. हरेवा नाही तर नाही याला तरी कॅमेराबंद करूया म्हणून मी झटकन त्याला कॅमेऱ्याने टिपले. कॅमेऱ्यात त्याची silhouette च दिसत होती. तर तीच शीळ तो घालू लागला. मी खात्री करून घेण्यासाठी कॅमेऱ्यातून त्याच्याकडे बघतले, तोच होता शीळ घालत. 'अरे चोरा ! तूच काय तो बीथोवेन!' असे म्हणून मी कपाळाला हात लावला. तूच काय तो स्वरांची बांधणी करणारा, सुरेख आवाज काढणारा. कुठे तो पिवळा-निळा राजेशाही तुरा असलेला तानसेन मी योजला होता आणि तू एकदम त्याच्या विरुद्ध निघालास. पण दिसण्यास अगदीच काही सुमार नाहीस! छानच आहेस! किंबहुना जपानी किमोनो घालून जपानी पंखा फिरवीत नाचणारा काबुकी डान्सरच वाटतोस! 
 


माझ्याकडचा तुझा फोटो तेवढा छान नाही पण इतर तुझे फोटो बघितले तेव्हा समजले खरा कलाकार-गायक आणि नर्तक वाटतोस खरा. तुझ्या गाण्यापेक्षा तुझं नाचणंच वाखाणलं गेलंय पण! त्यावरूनच तुला नाचण, नाचरा, नर्तक म्हणतात. 
तर असा मला या अज्ञात 'बीथोवेन' चा शोध लागला. ज्याला मी बीथोवेन समजत होते तो होता नाचण्यात निपुण , त्याचं  नाव नाचरा किंवा व्हाईट स्पॉटटेड फॅनटेल (Rhipidura albogularis, ऱ्हिपिड्युरा आल्बोग्युलॅरीस). 


हवेत भिरभिरत जाणारं गवताचं पातं 

'पक्षी आपले सख्खे शेजारी' या किरण पुरंदरे यांच्या पुस्तकात एका पक्ष्याबाबत त्यांनी लिहिलंय 'त्या काळात (भरपूर पाऊस सुरु होऊन सगळीकडे हिरवंगार झालं असलं की ) मला लोकांचे लांबलचक हिरव्या रंगाची शेपूट असलेला पक्षी पाहिल्याचे फोन येत.' 

हे वाचल्यावर एकदम कसलीतरी लिंक लागली आणि आनंदाने चेहरा उजळला. मी अनेक दिवस शोधत होते तो हा! ' ठिपकेवाला मुनिया' 

हे हिरव्या रंगाचं लांब शेपूट मला आमच्या दहाव्या मजल्याच्या खिडकीतून वारंवार दिसलं  होतं. पुढे नुसता एक चॉकलेटी भुरभुरणारा कापसाचा गोंडा, आणि मागे लांब हिरवी केवढीतरी शेपटी. मी याला इतक्यांदा बघितले कि असा विचित्र पक्षी असूच शकत नाही असेच मला वाटले आणि तो पक्षी नसून कोणीतरी मोठ्ठा किडा आहे असेही मला वाटले. मुख्य म्हणजे सकाळच्या वेळी बाहेर पाहत असताना चटकन ते हिरवं लांबलचक पातं उडताना दिसे. तेव्हा काय असेल ही  विचित्र गोष्ट? कित्येकदा मी ते भिरभिरतं पातं दिसलं की इतरांना दाखवायला जाई पण तोपर्यंत सुसाट वेगाने भिरभिरत ते नाहीसं होई आणि ते काय आहे याच्या रहस्याचा उलघडा होत नसे. खरोखरच पाहणाऱ्याला ते असे काही दिसते की माहित नसेल तर क्षणभर तो अचंबित होऊन बघतच राहील कि हे आहे तरी काय? कसला किडा आहे का एवढा मोठा ज्याला पानाची शेपटी उगवलीय.  पण किडा एवढ्या झाडांच्या उंचीवरून उडेल का? हा कुठला राक्षसी किडा असेल? असाच विचार मनात येईल. 

शेवटी त्या भिरभिरणाऱ्या विचित्र गवताच्या पात्याचा शोध किरण पुरंदरे यांच्या पुस्तकात लागला. हाच तो ठिपकेवाला मुनिया. त्यांनी लिहिलं आहे 'जरा डोळ्यांपुढे आणण्याचा प्रयत्न करा. साधारण चिमणीचं पिल्लू वाटावं एवढ्या आकाराचा चॉकलेटी रंगाचा मुनिया आकाशात उडतोय आणि त्याने चोचीत धरलेलं हिरवं पातं वाऱ्यावर भुरभुरतंय!' तेव्हाच डोक्यात प्रकाश पडला की आपल्याला दिसणारी वाऱ्यावर भिरभिणारी हिरवी लांबलचक शेपटी आणि पुढे उडणारा चॉकलेटी गोंडा म्हणजे हाच 'ठिपकेवाला मुनिया'. ठिपकेवाला मुनिया गवताच्या पात्यांपासून आपलं घरटं बांधतो. आणि पावसाच्या दिवसात हिरवीगार गवताची पाती लांबलचक वाढली की हा त्यांना खुडून घरटं बांधण्यासाठी ये-जा करू लागतो. स्वतःच्या आकारापेक्षा मोठी पाती घेऊन उडण्यामुळेच तो असा मजेशीर दिसतो.  याचा एक भाऊबंद अशाच उचापती  करताना मी अगदी बघितला आहे. त्याचं नाव व्हाईट रम्पड मुनिया (पांढऱ्या पुठ्ठयाची मनोली). हा देखील असाच घर बांधण्याच्या उद्योगात हिरव्यागार गवताचे तुरे, विशेषतः ग्रे लव्हग्रास चे मोठे मोठे फुललेले तुरे खुडून घेऊन जात होता. त्याला अनेकदा जवळून पाहताना तो इतका मजेशीर दिसायचा की एकदा तर मला मोरासारखा पिसाऱ्याचा जुडगा असलेला कुणीतरी दुसराच पक्षी आहे असे वाटले. हा देखील गवतात सारखा ये-जा करत राहतो आणि ग्रे लव्हग्रास चे तुरे, काड्या खुडून स्वतःच्या आकारापेक्षा मोठा भर चोचीने उचलून झाडावरच्या घरट्यापर्यंत घेऊन जातो. पण याला मी बरंच जवळून पाहिलं त्यामुळे माझी ठिपकेवाल्याच्या बाबतीत झाली तशी फसगत झाली नाही. 

                               ठिपकेवाला मुनिया (विकिपीडियाच्या सौजन्याने), पांढऱ्या पुठ्ठयाचा मुनिया                                                             

उडणारं शुष्क पान आणि पुष्प-योगिनी

संजय गांधी नॅशनल पार्कमधे एक छोटीशी वाट आहे. तिला 'शिलोंडा ट्रेल' म्हणतात. रानवाटच आहे ती पण आता माणसाच्या बरीचशी पायाखालून जाणारी. इथे पक्षी बघायला मिळतील म्हणून गेले होते, पण तसा थोडा उशीरच झाला होता, पक्षी फारसे दिसले नाहीत पण दोन गोष्टी दिसल्या ज्या खूपच चित्तवेधक होत्या. निसर्ग हा 'दी जिनिअस आर्टिस्ट', 'दी जिनिअस क्रिएटर' आहे याचा वारंवार प्रत्यय येतच असतो त्यातीलच आलेला हा आणखी एक प्रत्यय. 'दी जिनिअस आर्टिस्ट' यातला 'दी' महत्वाचा. त्याच्यासारखा दुसरा कुणीच नाही. पण निसर्ग इतका नम्र निर्माता आहे, की कधीही आपल्या निर्मितीचे प्रदर्शन तो करीत नाही. तुम्ही जर त्याला भेटायला गेलात, त्याच्याशी संवाद साधलात तरच तो आपल्या निर्मितीची रहस्य थोडीफार उलघडून दाखवतो. 

त्यातलेच एक म्हणजे 'ब्लु ओकलीफ बटरफ्लाय' हे फुलपाखरू. त्याचं  शास्त्रीय नाव 'Kallimaa horsfieldii'. हे खालच्या फोटोत आहे ते हे फुलपाखरू.
दिसलं का? नाही ना? नाहीच दिसणार. आता पुढच्या फोटोमधे दिसेल.

 
या फुलपाखराचे छान फोटो इथे बघायला मिळतील. याचे Kallima जातीतले इतर भाऊबंद भारतातल्या वेगवेगळ्या भागात आढळतात पण हे फुलपाखरू मात्र फक्त पश्चिमी घाटांत आढळून येतं. सर्वात कोड्यात टाकणारं त्याचं वैशिष्ट्य म्हणजेच त्याचं पंख मिटून camouflage करण्याचं टेक्निक.  हे फुलपाखरू पंख मिटून घेऊन स्वतःला 'सुकलेलं पान' बनवतं. म्हणजे पंख मिटले की ते सुकलेल्या पानासारखं दिसतं. त्यामुळे जर उडताना दिसलं  नसेल तर त्याला झाडावर शोधणं तसं कठीणच आहे. मग जेव्हा कधी ते पंख उघडेल आणि  त्याचा मध्यभागी निळसर आणि टोकाकडे शेंदरी होत जाणारा रंग, पंखांच्या वरच्या बाजूला दिसणारा पांढरा पट्टा आणि त्यावरची काळी महिरप हे सर्व दिसेल तेव्हाच  ते फुलपाखरू आहे हे कळेल. हे फुलपाखरू उडताना फार सुंदर दिसतं.
Mark Alexander Wynter-Blyth नावाच्या निसर्गसंशोधकाच्या 'बटरफ्लाईज ऑफ इंडियन रिजन' या पुस्तकात त्याने म्हटलं आहे की एका ब्लु ओकलीफच्या मिटलेल्या पंखांवरचा पॅटर्न दुसऱ्या ब्लु ओकलीफच्या मिटलेल्या पंखांच्या पॅटर्नशी कधीच जुळत नाही. म्हणजे प्रत्येक पंख मिटलेल्या ब्लु ओकलीफची ओळख वेगळी असते. हवे तेव्हा पंख मिटून, सुकलेल्या पानाचे रूप घेऊन निसर्गात मिसळून जाण्याची त्याची हातोटी खास आहे. 

अनेक वर्षांनी फुलणारी 'पुष्प-योगिनी' कारवी

एखादा संशोधक एखादा शोध लावण्यासाठी किंवा एखादा चित्रकार/शिल्पकार एखादी कलाकृती घडवण्यासाठी जशी वर्षानुवर्षे तपश्चर्या करतो तशी ही कारवी आपली फुलं निर्माण करण्यासाठी वर्षानुवर्षे (सात ते दहा वर्षे) कार्यरत असते. वनस्पती का फुलत असतील आणि कश्या फुलत असतील यामागची रहस्य शास्त्रीय कारणांत न शोधात त्या वनस्पतीच्या व्यक्तिमत्वात शोधली पाहिजेत. वनस्पतींचंदेखील एक मानसशास्त्र असलं पाहिजे. त्यानुसार अबोलीचं वेगळं व्यक्तिमत्व, सदाफुलीचं वेगळं, ओसंडून फुलणाऱ्या मोगरीचं वेगळं , तसंच कारवीचंही. वर्षांनुवर्षे आपल्या फुलांसाठी आराधना करणारी कारवी ही फुलणाऱ्या वनस्पतीतील पुष्प-योगिनी असली पाहिजे. सप्टेंबर मध्ये पाऊस सरण्याच्या जवळपास, ती सात ते दहा वर्षांनी एकदा फुलते. मला हि कारवी 'शिलोंडा ट्रेल' मध्ये फुललेली दिसली, फुलांचा बाहेर जवळपास ओसरून गेला होता पण अजूनही एक दोन फुलं होती.



Strobilanthes Callosus हे तिचे शास्त्रीय नाव आहे. ती acanthaceae या कुटुंबातील आहे. हि अडुळसा कुळातील दोन तीन मीटर वाढणारी वनस्पती आहे. हिची पानेही बरीचशी अडुळश्यासारखी असतात. कोकणात अडुळसा विपुल प्रमाणात आढळतो, तिकडे खोकला येणाऱ्या माणसाला सर्रासपणे, अडुळश्याच्या पानं,  तुळशीची पानं, मिरी, चहाची पात आणि कांदा घालून काढा करतात आणि त्यात गूळ मिसळून देतात. सर्दी खोकल्यावर अडुळसा उपकारक आहे, तसे कारवीचे काही औषधी उपयोग आहेत का म्हणून कोकणात वाढलेल्या माझ्या आईलाच विचारले तर 'कारवी म्हणजे काय तेच ठाऊक नाही' असे उत्तर तिने दिले. 'वनश्रीसृष्टी' या डॉ. वि. म. आपटे यांच्या पुस्तकात दिल्याप्रमाणे करावी  पश्चिम घाटात विपुल प्रमाणात उगवते. मावळ कोकण आणि उत्तर कारवार ही त्यांची माहेरघरे आहेत. म्हणजे कोकणातही  कारवी उगवत असावी.



'नीस' (Christian Gottifried Daniel Nees von Esenbeck) या जर्मन वनस्पतिशास्त्रज्ञाने या वनस्पतीचे  प्रथम शास्त्रोक्त वर्गीकरण केले. आदिवासी लोकांत कारवीच्या वाळलेल्या काठ्यांचा उपयोग कुडासाठी(कुंपण किंवा झोपडीच्या आधारासाठी) करतात. तसेच तिची पाने, फुलातला मध यांचाही वापर करतात. कारवीच्या फुलातला मध मधमाश्या गोळा करतात. या मधाला 'कारवीचा मध' म्हणतात. या मधालाही औषधी गुणधर्म आहेत. आदिवासी लोकांच्या औषधांमध्ये कारवीची पाने आणि मधाचा वापर होतो. पण या पानांना वापरण्याची विशिष्ट पद्धत आहे. पानाच्या मागील अंगावर असणाऱ्या शिरांवरची लव काढून टाकली नसेल तर अशी पानं खाऊन पोटात क्षोभ होऊ शकतो. आदिवासींना हे बरोबर ठाऊक असले पाहिजे. मध्यप्रदेशातही कारवी उगवत असून तिला 'मरुआदोना' असे म्हणतात.

या कारवीला इतक्या वर्षातून एकदाच फुलं का येत असावीत? तर यामागचं कारण तिची जडणघडण हे आहे. हि वनस्पती Plietesials या प्रकारच्या वनस्पतींमध्ये मोडणारी आहे. या वनस्पती अनेक वर्ष वाढत राहतात आणि मग एका विशिष्ट वर्षी सगळ्या एकदम ओसंडून फुलतात. फुलण्यानंतर फळ आणि बीजनिर्मितीदेखील एकाच वेळी होते.  त्यांच्या या प्रकारच्या बीजप्रक्रियेला masting (synchronous production of flowers and seeds)  म्हणतात. फळं मातीत पडून राहतात आणि पुढच्या पावसाळ्यात फुटून रुजतात. रानोमाळ जिथे कारवी फुललेली असेल तिथे पुढच्या पावसाळ्यात फळे फुटण्याचा एकत्रित आवाज होतो. या Plietesials वनस्पतींमधे अश्या काही प्रजाती आहेत ज्या monocarpic आहेत(reproduce once and die) आणि एकदा फुलल्या-फळल्यानंतर या वनस्पती एकत्रितपणे नष्ट होतात. अश्या विपुल फुलल्या-फळल्या नंतर नष्ट होऊन जाण्यामागे देखील काहीतरी genetic प्रेरणा असली पाहिजे.  म्हणजे उत्स्फूर्त निर्मिती नंतर आत्मनाश करून घेणारे निसर्गाचे हे छोटे छोटे सहाय्यक कलाकारच  आहेत असे म्हणायला पाहिजे.

निसर्गातील या दोन विलक्षण गोष्टी. मला या गोष्टी बघून आणखीही काही प्रश्न पडले, जसे 'ओकलीफ बटरफ्लाय' ला 'ओकलीफ' नाव का पडलं? 'ओक'च्या झाडाची पानं तर मुळीच या फुलपाखराच्या मिटलेल्या पंखांच्या आकारासारखी दिसत नाहीत. मग 'ओकलीफ' हे का? आणि कारवीचा आदीवासी लोकं आणखी कसा वापर करत असतील आणि कारवीवर त्यांच्या काही लोककथा, अनुभव आणि आख्यायिका असतील का?  

Friday 7 October 2016

शांत, स्तब्ध, एकांतप्रिय व्याध


पावसाळी संध्याकाळ.  दूर एका पेंडराच्या झाडाच्या शिखरावरील पर्णहीन डेळक्यावर एक पक्षी बसून होता. इतक्या दूर असूनही तो बऱ्यापैकी मोठा दिसत होता. म्हणजे प्रत्यक्षात किती मोठा असेल याचा अंदाज बांधत मी घराच्या अंगणातून त्याला न्याहाळत होते. काही कामामुळे मी घरात गेले आणि पुन्हा येऊन बघते तर तो गायब झाला होता. त्यानंतरच्या अनेक संध्याकाळी मी त्या झाडाकडे पाहीले पण तो दिसला नाही. तो बहुदा गरुड असावा असे माझ्या अज्ञानी मनाला वाटले. 'गरुड'. कुणाला ठाऊक नसतो हा पक्षी? कुठचाही मोठा पक्षी दिसला की 'गरुड' च नाव मनात येते. हा पण गरुडच असावा का? पुन्हा दिसावा म्हणून मनोमन त्याची प्रतीक्षा केली. गणपतीचे दिवस होते. गावच्या आमच्या घरात त्या दिवसात खूप गजबज होती. एका दिवशी, सकाळचा जवळच्या झाडावर बसलेला तो, घराच्या पोर्चमधून मला दिसला. इतरांनाही दाखवला. केवढा मोठं आहे! एवढा मोठा कोण हा पक्षी? प्रत्येकाने म्हटले पण तो नक्की कोण असेल त्याबद्धल कुणालाच माहित नव्हते. पाऊस नव्हता, चांगले ऊन होते. बराच वेळ तो पक्षी झाडावरच बसून होता.

साधारण अकराच्या दरम्यान कुठूनसा एक पिसांचा लोट सळसळत उंच झाडांच्या वर आभाळात उडताना दादाला दिसला. तो चटकन हात दाखवत म्हणाला 'अरे मोर मोर!' त्या दिशेला तोंड वळवले तर एक मोर चक्क वरती आकाशात उडताना दिसला. त्याच्यामागे त्याचा पिसांचा लोटही हेलकावे खात होता. एवढ्या उंचीवर उडणारा मोर कधीच पहिला नव्हता. हा मोर जो उडाला तो काही मोठ्या पक्ष्यासारख्या भराऱ्या मारण्यासाठी नव्हे, तर एका झाडीतून शेताच्या बांधावरून लपत छपत तो दुसऱ्या झाडीकडे चालला होता. तिथे चटकन पोहोचण्यासाठी तो उडाला असावा. गरुड(त्याला तूर्तास गरुडच म्हणूया) तर आपल्या जाग्यावर बसूनच होता. त्याचे मोराकडे नक्कीच लक्ष असणार. मोर विजेसारखा एका सेकंदात झाडीत गायबही झाला. ज्या झाडीत तो घुसला ती गरुडाच्या झाडापासून तशी जवळच होती. 

त्या मोराला पाहण्यासाठी मी आणि दादा दोघे झाडीलगतच्या वाटेने लगबगीने गेलो. चालता चालता, ते गरुडाचे झाड अगदी समोर दिसत  होते पण रस्त्याला लागून नव्हते, अनेक झाडाच्या गर्दीत , वाटेपासून दूरच होते.पण त्यावर बसलेला गरुड नक्कीच आमची चाहूल घेऊन होता. कारण थोडा दूर असतानाच जेव्हा मी त्याचा एक फोटो काढला, तेव्हा त्याने थोडी हालचाल केली. त्या दोन्ही बाजूने असलेल्या झाडीच्या रस्त्याने आम्ही पुढे गेलो. मोर रस्त्याच्या एका बाजूच्या झाडीत घुसला होता (एवढेच आम्ही घराच्या अंगणातून पाहू शकलो होतो ) आणि गरुडाचे झाड रस्त्याच्या दुसऱ्या बाजूच्या झाडीत होते. त्या झाडाच्या आसपास पोचलो, मान वरती करून गरुडाकडे पहिले, आणि बघताक्षणी त्याने आपले अजस्त्र पंख उघडले आणि बळकट दिसणाऱ्या पायांची  झाडाच्या फांदीवरची पकड सुटली. क्षणार्धात गरुड उडून गेला. 


एक सेकंद दिग्मूढ होऊन आम्ही बघतच राहिलो. काही पक्षी, प्राणी असतातच असे. मंत्रमुग्ध होऊन त्यांना फक्त बघायचे. बहुदा डहाण्या वाघ दिसला तर असेच होईल. भान हरपेल. एका (बहुदा मारुतीचितमपल्ली यांच्या) पुस्तकात वाचले आहे की अश्या काही शिकारी प्राण्यांत मृत्यूचे संमोहन घालण्याची विद्या असते. तसंच काहीसं पक्ष्यांतही असेल का? कोण जाणे. पण ह्या अजस्त्र पक्ष्याला बघून मात्र संमोहन घातल्यासारखे झाले. 

मोर पाहण्यासाठी आलो होतो याचा क्षणभर विसर पडला. मोर काही दिसला नाही. तो केव्हाच झाडीच्या दाटीवाटीने पलीकडच्या शेतात पसारही झाला असावा. इकडे तिकडे बघितले. पण कुठेच काही हालचाल नव्हती. पुन्हा काही गणपतीच्या दिवसात गरुड दिसला नाही. गणपतीनंतर घरात सामसूम झाली. मी मात्र काही दिवस आईबरोबर मागे थांबले. गणपती गेला आणि दबा धरून बसल्यासारखा पावसाने कोसळायला सुरवात केली. दिवस दिवस काळवंडून टाकणाऱ्या वातावरणात पाऊस पडत राहिला. त्या दिवशी दुपार सरून संध्याकाळ व्हायला आली तरी पाऊस पडतच होता. पोर्चमध्ये खुर्ची टाकून मी पुस्तक वाचत होते. पावसाचा जोर वाढला तसे मी बाहेर बघितले. दूर धूसर झालेल्या पेंडाराच्या झाडावर पुन्हा गरुडाचा ठिपका दिसला. तसा ठिपका म्हणता येणार नाही कारण त्याचा उभट आकार. पंख जवळ घेऊन बसलेली उंचाडी काळसर आकृती दिसत होती. गरुड पावसात भिजत होता. झाडाच्या त्याच डेळक्यावर एकटाच बसून होता. मी अधून मधून त्या झाडाकडे बघत राहिले. आता सहा वाजून गेले होते. पावसामूळे काळोख लवकरच पसरत होता. पण गरुड अजून तिथेच होता. जवळपास एक-दीड तास तो तिथेच एका जागेवर, जराही हालचाल न करता, तेही भर पावसाचा का बसला असावा, तेही एकटाच? मीही तासदीडतास पोर्चमध्ये पुस्तक बाजूला ठेवून बसून राहिले,  त्याच्याकडे बघत. मात्र तो जराही हलला नाही. सगळा आसमंत चिडीचूप होता. माणसे नाहीत. पाखरे नाहीत, कुणी नाही. मला मात्र त्याच्या तशा भिजत बसण्याचे आश्चर्य वाटले. नंतर, म्हणजे एक-दीड तासांनंतर , केव्हातरी माझे लक्ष नसताना मात्र तो तिथून उडून गेला. 

आता रात्रीचा कुठे गेला असेल, बाजूच्या डोंगरात, तिथल्या छोट्या जंगलात? रात्रीचा हा काय करत असेल? त्याचे एकटे आयुष्य असेल तरी कसे? त्यानंतर बऱ्याचदा जवळच्या झाडावर तो मला दिसला. चार-दोन फोटोही काढले. हे जवळचे झाड नक्की कसले आहे माहित नाही. पण तिथे तो बऱ्याचदा येऊन बसायचा. आणि दुसरे झाड म्हणजे ते पेंडाराचे. ही दोन झाडे त्याची दिवसभराच्या कामकाजातील विश्रांतीची स्थाने बहुतेक. म्हणजे हा गरुड इथे जवळपासच राहणारा होता तर. त्याच्या फोटोंवरून त्याचे पक्के नावही शोधले 'व्याध गरुड' म्हणजेच Changable Hawk Eagle (Nisaetus cirrhatus). साधारण दोन फूट उंच. पट्ठ्या कमालीचा देखणा. डोक्यावर पिसांची शेंडी. काही फोटोमधे ही पिसांची शेंडी दिसत होती. याला Crested Hawk Eagle सुद्धा म्हणतात. माणसाला किंवा कुणालाही (म्हणजे सर्व सजीवांना) कुणाशीही मैत्री करता यायला हवी होती, पक्ष्यांशी बोलता यायला हवे होते. असे असते तर मी या गरुडाशी मैत्री केली असती. (त्याने मैत्री स्वीकारली असती की नाही कुणास ठाऊक). 


त्याचे डोळे मला दुरून दिसले नाहीत. पण नंतर त्याच्या काही इन्टरनेटवर बघितलेल्या फोटोत त्याचे विलक्षण डोळे दिसले. गुढाने भारलेला हा पक्षी आहे. 'गरुडपुराण' म्हणून एक पुराण आहे, ते सहसा वाचले जात नाही, फक्त मृत्यूनंतरच घरात (किंवा क्रियाकर्म करण्याच्या जागी) ते वाचतात. या पुराणात मृत्यू, मृत्यूनंतरचे जीवन इत्यादींविषयी विष्णूने गरुडाशी केलेला संवाद आहे. गरुड हे विष्णूचे वाहन. अट्टल शिकारी. पक्षांचा राजाच. या समोर दिसणाऱ्या गरुडाविषयी मला कुतूहल वाटतच राहिलं. रात्री, कुठे दूर घनदाट जंगलात त्याचे एखादे रात्रनिवाऱ्याचे घरटे असेल का? कारण काळोख पडताना तो मला डोंगराच्या दिशेने उडताना अनेकदा दिसला. कि कि कि कि कि कि किवववववववववी(ट्वी ट्वी ट्वी ट्वी ट्वी ट्वी ट्युवववववववववी ) अशी किंकाळी फोडली त्याने डोंगराच्या दिशेने उडताना. ती कुणा सहचरासाठी होती का? तसा एकदा मला तो जवळच्या झाडावर दिसला आणि तसाच दिसणारा, दुसरा एक पक्षी त्याच झाडावर थोडासा खालच्या फांदीवर बसला होता. ही गरुड मादी असावी का? त्या दिवशीही पावसाने नुसता काळोख केला होता. फोटो तर सोडाच त्याला नुसतं बघणं सुद्धा त्या रपारप पावसात कठीण झालं. नंतर वाचल्यावर कळलं की या गरुडाच्या विणीचा हंगाम डिसेंबर ते एप्रिल असतो. आणि हा एकांतप्रिय पक्षी फक्त विणीच्या हंगामातच सहचराबरोबर राहतो. त्यामुळे बहुदा तो दुसरा पक्षी त्याचा सहचर नसावा.

एकाच झाडावर बसलेल्या दोन गरुडांविषयी अत्यंत सुंदर श्लोक मुंडकोपनिषदात आहे. एक गरुड खालच्या फांदीवर बसला आहे जो सतत काहीतरी खात आहे. जे चांगले लागले त्याबद्धल सुखी आणि जे वाईट लागले त्याविषयी दुःखी होत आहे. वर बसलेला गरुड मात्र शांत आहे. तो सुखदुःखाच्या पलीकडे गेला आहे. खाली बसलेल्या गरुडाचे जेव्हा वरच्या गरुडाकडे लक्ष जाते तेव्हा त्याला कळून चुकते की आपण मोहमायेच्या अधीन होऊन सुखदुःखं अनुभवत आहोत. जेव्हा तो हे जाणतो तेव्हा तो वरच्या गरुडाशी एकरूप होतो.  


'आभाळवाटांचे प्रवासी' या किरण पुरंदरे यांच्या अतिशय सुंदर पुस्तकात त्यांनी निरनिराळ्या गरुडांबाबत आपल्या अत्यंत खुमासदार शैलीत लिहिले आहे, तिथेच मला या गरुडाचे मराठी नाव 'व्याध' (शिकारी) आहे असे कळले. त्यात ते म्हणतात 'हा सडपातळ, आणि अस्सल जंगली गरुड आहे. डोक्यावरच्या तुऱ्यात काही लांबसडक पिसे असतात, सर्वसाधारणपणे त्याचा  रंग पाठीकडून तपकिरी आणि पोटाकडून पांढरा असतो. घश्यावरून काळे ओघळ यावेत तशा काळ्या लांब रेघा, आणि छातीवर चॉकलेटी रंगाच्या जाड रेषा, व्याधाचे पाय पंजापर्यंत पिसांनी झाकलेले असतात. पायाला पुढे तीन आणि मागे एक बोट असतं, इतर बोटांच्या मानानं पाहिलं बोट आणि मागील बोट ताकदवान असतं. व्याध गरुडाची मादी आकाराने नरापेक्षा मोठी असते' असे त्यांनी लिहिले आहे. मला त्या दोन पक्षांतील लहान मोठा फरक करता आला नाही. त्यामुळे तो दुसरा पक्षी मादी होती का आणखी एक व्याध गरुडच ते काही कळलं नाही. त्यांनी या गरुडाच्या शिकारीचे काही चित्तथरारक प्रसंग या पुस्तकात दिले आहेत. पण मला आपला तो शांत, स्तब्ध, एकांतप्रिय बसलेला गरुडच जास्त बघायला आवडेल/आवडला. निसर्ग कितीही PRACTICAL आणि निर्विकार असला तरी मी नाहीये. त्यामुळे शिकार-बिकार माझ्याच्याने तरी बघवणार नाही. तरीपण त्यांनी केलेले वर्णन वाचनीय आहे. त्यांनी दिलेल्या माहितीत लिहिलं आहे 'व्याध शांत बसून राहतो, लक्ष ठेऊन असतो आणि भक्ष्य दिसताच भयंकर वेगानं अचानक हल्ला करतो, पंखानी फाडफाड मारून भक्षाला गोंधळात टाकतो. पंखांच्या, शेपटीच्या रचनेमुळे झाडाझुडांतून वेगाने उडू शकतो. गरज वाटेल तेव्हा झटकन दिशाही बदलू शकतो. सखोल शास्त्रीय अभ्यासातील काही निष्कर्षांवरून त्याच्या भक्ष्ययादीत पक्षी आहेत: लालबुड्या बुलबुल,बुरखा हळद्या, साळुंकी, कीर पोपट, मोर, रानकोंबडा, तित्तीर, लावरी, हरोळी, पाळीव कोंबडी , सरडे, घोरपड, कास्य सर्प, खार, ससा, पाळीव मांजर.  पण मला यातले बरेचसे पक्षी तो जवळच्या झाडावर असताना आसपास दिसले होते. त्याने कुणाला धरले नाही. बहुदा आजूबाजूला दोन-पाच घरे आणि माणसांची वस्ती असल्याने असे असेल का? पण मी त्याला जवळपास आठेक दिवस तरी पाहिलं, पण फक्त शांत बसलेलं. कदाचित जंगलात शिकार करून खाऊन-पिऊन आराम करायला तो इथे येत असेल. किंवा इथे माणसांच्या भीतीनेही तो शिकार करत नसावा. 

किरण पुरंदरेंच्या लेखानुसार व्याध मनुष्यवस्तीजवळ घरटी करत नाही. पाच ते दहा मीटर उंचीवर घरटी  करतो, आणि  अशी जागा निवडतो जिथून बराच आसमंत नजरेखालून घालता येईल, मोठ्या काटक्यांचं हे घरटं असतं, आणि बरंच मोठं असतं, मादी एकच अंडे घालते. त्यांनी अशी अनेक घरटी बघितली आहेत. त्यांनी तर म्हटलं आहे की हा गरुड बघितल्यानंतर आता पक्षी बघावा तर गरुडच असं त्यांना वाटलं. ते खरंच आहे. इतका रुबाबदार हा व्याध गरुड. 

काहीतरी शोधत असताना, एका दोन वर्षांपूर्वीच्या(२६-१०-२०१४ तारखेच्या फोटोत) गावच्या फोटोत मला एक फोटो सापडला ज्यात दिसले पेंडराचे तेच झाड आणि त्यावर बसलेली धूसर, पण ओळखीची तीच उंचाडी, काळसर आकृती. म्हणजे हा व्याध गरुड तेव्हापासून तिथे होता तर. (तो किंवा त्याचा कुणी जातभाई) याचं आयुष्य किती असतं ते शोधण्याचा प्रयत्न केला पण सापडलं नाही. एका ठिकाणी वाचलं की दहा वर्षांपर्यंत जगतो, पण नक्की माहित नाही. हा गरुड तोच असला दोन वर्षांपूर्वीचा तर त्याची दृष्टी कालातीत आहे असेच म्हणावे लागेल. तेव्हापासून या गरुडाने आपल्या दृष्टीक्षेपात काळ बंद केला आहे आणि मलाही तो ओळखत असेल. म्हणजे हा जर तोच असला तर मी त्याला जरी आता ओळखले, तरी तो मला दोन वर्षांपासून ओळखून आहे!

हाच तो दोन वर्षांपूर्वीचा फोटो

Tuesday 4 October 2016

अंबरनाथचे शिवमंदिर

अंबरनाथचे शिवमंदिर

ठाणे जिल्ह्यातील, अंबरनाथ येथे दहाव्या शतकातील शिवमंदिर आहे. मंदिराच्या उत्तर द्वाराकडे असलेल्या शिलालेखावरील नोंदीप्रमाणे हे मंदिर १०६० मध्ये शिलाहार राजवटीतील एक मुख्य (अधिकारी) मम्मूनी किंवा ममवनी याने बांधले आहे. 'वालधुनी' नदीच्या किनाऱ्यालगत हे मंदिर बांधले आहे(पूर्वी ही मोठी नदी असावी). आता बघतले तर मंदिराच्या बाजूने एक मळकट पाण्याचा ओढा वाहताना दिसतो. या मंदिराच्या चहूबाजूना काही अंतरावर संरक्षक भिंत आणि प्रवेशद्वार-तोरणं(gateways) होती. पण आता ती अस्तित्वात नाहीत फक्त त्यांचे काही तुटके-फुटके अवशेष आजूबाजूला सापडतात.  

मंदिर पश्चिमाभिमुख आहे. त्याची रचना मंडप आणि गर्भगृह अशी आहे. मंडपाला तीन बाजूने प्रवेशद्वारं आहेत. प्रत्येक प्रवेशद्वाराला स्वतःचा पोर्च आहे. चार स्वतंत्रपणे उभे असलेले स्तंभ मंडपाचे छत डोक्यावरती घेऊन आहेत आणि तीन पोर्चांमधे असलेले एकूण सहा स्तंभ एवढेच मंदिराला आधार देत उभे आहेत. या स्तंभांवरही मूर्ती कोरलेल्या आहेत. अत्यंत प्राचीन असल्याने मंदिराची पडझडही बरीच झाली आहे आणि बहुदा अनेक विरोधक आक्रमणंही या मंदिराने सोसली असावीत. मंदिराची रचना आत्तापेक्षा बरीच वेगळी असण्याची शक्यता आहे आणि आक्रमणांमधील तोडफोडीमुळे नंतरच्या काळात मंदिरात अनेक बदलही झाले असावेत. नंतरच्या हिंदू राजवटींनी मंदिराची डागडुजी काही प्रमाणात केली असल्याचे त्याच्या रचनेवरून दिसते. 

या मंदिरच्या स्थापत्यशैलीला भूमिज शैली म्हणतात. 'भूमिज' मंदिरे पृथ्वीच्या कवचातून वर येऊन वाढलेली वाटतात. या मंदिरांचा चेहरामोहरा डोंगरांच्या रचनेच्या जवळ जाणारा असतो. ही शैली द्रविड आणि नागर शैलीचा सुवर्णमध्य म्हणता येईल. हिला 'दक्खनी शैली' असेही म्हणतात. छोटी छोटी शिखरं आणि त्यांना तोलून धरणारे ( वेगवेगळ्या शिल्पपट्टया आणि शिल्पांच्या चोकटी एकमेकांवर रचून बनलेले ) उभे स्तंभ. हे स्तंभ एकमेकाला जोडलेले. या अश्या एकमेकाला जोडलेल्या अनेक स्तंभांतूनच एक एक भिंतीसारखी रचना उभी राहते. ही अशी रचना हेच भूमिज शैलीचे वैशिष्ट्य. या बाह्य भागांवर अतिशय सुंदर शिल्पकाम आहे. 


मंदिराची रचना : उभे शिखरांपर्यंत जाणारे स्तंभ आणि आढव्या शिल्पपट्ट्या

जशी उभ्या स्तंभांची छोट्या  शिखरांपर्यंत गेलेली रचना तशीच आढवी शिल्पपट्ट्यांची रचना. असे हे उभ्या आढव्या पट्ट्यांचे 'मॅट्रिक्स'. शिल्पंपट्ट्या एकावर एक रचलेल्या. वेगवेगळ्या शिल्पांच्या. या मंदिराला, जमिनीलगतच्या भक्कम पाया रोवणाऱ्या दोन पट्ट्या आहेत. त्यांच्यावर शिल्पं नाहीत. त्यावरची पट्टी हि 'कीर्तिमुख' या राक्षसाच्या तोंडांची पट्टी आहे. त्यावरची पट्टी गजमुखांची आहे. त्यावरील पट्टी वेली-फुलांच्या अलंकारिक आकारांची बनलेली आहे. त्यावरील पट्टी हि मोठ्या आकाराची असून त्यात अनेक स्थानिक दृश्यं, नृत्य-वादनाचे प्रसंग, मैथुन शिल्पं कोरलेली आहेत. हि पट्टी अतिशय सौन्दर्यपूर्ण आहे, परंतु कालानुरूप तिची खूपच पडझड झाली आहे. याच्या वरही काही शिल्पविरहित पट्ट्या असून त्याच्यावर मुख्य अशा विशिष्ट देवतांच्या शिल्पांच्या चौकटी आहेत. या चौकटींच्या वर छपरांसारख्या वाटणाऱ्या पट्ट्या असून वर वर जाताना त्या निमुळत्या होत जाऊन शेवटी त्या शिखरांपर्यंत साथसंगत करतात. 

बाह्य भागावरील अनेक शिल्पे उत्कृष्ट आहेत. त्यातली काही:
साधू/संन्यासी

सुरसुंदरी:   सुरसुंदरी म्हणजेच स्वर्गीय अप्सरांसदृश युवती. शिल्पशास्त्रांच्या प्राचीन ग्रंथातील नियमांनुसार मंदिरांवर सुरसुंदरीची शिल्पे असणे गरजेचे आहे. या सुरसुंदरी विपुलता, सौख्य, सुपीकता, सौन्दर्य, समृद्धी यांचे प्रतीक मानल्या गेल्या आहेत. त्यांच्याविना बांधलेले मंदिर ते मंदिर कसले अशा अर्थाचे संदर्भ या प्राचीन ग्रंथात नोंदलेले आहेत. त्यामुळेच अतिशय सौन्दर्याने, सौष्ठ्वाने परिपूर्ण सुरसुंदरींची शिल्पे प्राचीन मंदिरांवर आढळतात. खजुराहो मधेही सुरसुंदरींची विलोभनीय शिल्पे आहेत. अंबरनाथच्या मंदिरावर देखील काही अतिशय देखणी शिल्पं आहेत आणि पडझडीनेही त्यांचे सौन्दर्य जराही कमी झालेले नाही. या सुरसुंदरींची शिल्पे मुख्य चौकटींमध्ये नसून दोन स्तंभांच्या मधील कोपऱ्यात असतात, किंवा मुख्य देवतांच्या शिल्पांशेजारील भागांत असतात. सुशोभीकरण, आणि सौन्दर्यनिर्मिती हे या शिल्पांचे मुख्य उद्दिष्ट आहे.

सुरसुंदरी

देवता: शिव मंदिर असल्याने शिवाशी निगडित देवदेवतांची शिल्पे इथे कोरली आहेत. त्रिमूर्ती, ब्रह्मा, महाकाली, नटेश्वर , विष्णू , पार्वती, चामुंडा अशा देवदेवता आहेत.
१. बहुदा ब्रह्मा २. वराही ३. ? (बहुदा नटेश्वर )

१. बहुदा विष्णू  २. गणपती ३. बहुदा पार्वती
१. ? २. चामुंडा  किंवा महाकाली ३. चामुंडा
हि अतिशय सुंदर पण भग्न देवता कोण असावी? ती अनेक हातांची आहे. शिवाची असावी. पण नक्की ओळखता येत नाही. बहुदा शिव तांडव करणारा नटेश्वर असावा का?


नृत्य - वादन 

पश्चिमेकडील प्रवेशद्वारातील पोर्चमध्ये भव्य नंदीची मूर्ती आहे. आत गेल्यावर मंडप लागतो, जिथे फोटो काढण्यास मनाई आहे. तेथील स्तंभांवर आणि छताच्या तुळयांवर कोरीवकाम केलेलं आहे, पण अपुऱ्या प्रकाशामुळे ते फारसे दृष्टीस पडत नाही. मंडप आणि गर्भगृहाच्या मधे अंतराळ नसून सरळ गर्भगृहाचे प्रवेशद्वारच लागते. हे प्रवेशद्वार सुद्धा शिल्पांनी सुशोभित आहे, मात्र इथेही बराच अंधार असल्याने ते स्पष्ट दिसत नाही. त्यातून मी जेव्हा या मंदिराला भेट दिली तो सुट्टीचा दिवस होता आणि त्यातून श्रावण महिनाही होता त्यामुळे मंदिरात खूपच वर्दळ होती. पुन्हा एकदा निवांत निर्मनुष्य दिवशी जायला हवे. गर्भगृहाच्या प्रवेशदवारातून आत पायऱ्यांनी उतरावे लागते. त्यामुळे गर्भगृह खोल विहिरीसारखे वाटते. गर्भगृह अतिशय उंच भिंतींचे असून त्यात मध्यभागी शिवलिंग आहे. गर्भगृहाच्या वरील छप्पराला वर्तुळाकृती खुला भाग(open to sky) आहे. हा खुला भाग का असावा? मंदिरातील होमहवनाचा धूर जाण्यासाठी तो आहे असेच वाटते. पण हि रचना मी अजून कुठे बघितली नाही. खिद्रापूरच्या कोपेश्वर मंदिरालाही छताला असा मोठा खुला भाग आहे असे वाचले आहे. ते मंदिर अजून बघितले नाही.

मुख्य प्रवेशद्वाराजवळील नंदी
प्राचीन मंदिर म्हणून या मंदिराला खरोखरच महत्व आहे पण एकंदरीतच त्याच्या आजूबाजूला बऱ्यापैकी गलिच्छ वातावरण आढळले. हे मंदिर पूजेत आहे. आणि भाविकांच्या होणाऱ्या गर्दीमुळेदेखील मंदिराच्या परिसरावर परिणाम होता असावा. पुन्हा एकदा उन्हाळ्यात या मंदिराला जरूर भेट द्यायला हवी. तरीही अतिशय सुंदर शिल्पकामासाठी हे मंदिर पुन्हा पुन्हा बघावेसे नक्कीच आहे.