Tuesday, 28 June 2016

पुराणवृक्ष बाओबाब

'बाओबाब'. हे नाव ऐकल्यानंतर मला नेहमीच एक भव्य, अवाढव्य पण विश्वासार्ह असे काहीतरी जाणवते. बाओबाब, म्हणजे कुणीतरी ज्ञानी, पोक्त असा पण स्वतःच्या ज्ञानाचा एखाद्या प्रकांडपंडितासारखा बाऊ न करणारा, दिखावा न करणारा, सर्वसामान्यातलाच एक वाटतो. तसाच हा बाओबाब वृक्ष. 
बाओबाब हे नाव खरं तर त्याला साजेसं आहे. त्याच्या विचित्र, विलक्षण रुपावरुनच हे नाव त्याला दिलं गेलं असावं. 'बाओबाब' या शब्दाचा उगम अरबी किंवा नेटिव्ह-आफ्रिकेतील भाषेतून झाला असावा. कारण हा वृक्षाची उत्पत्ती मूळची  तिथलीच. अरबीमध्ये अबू-हिबाब  म्हणजे 'अनेक बीजांचा जन्मदाता'.
'कॅमेरून'मधे एखाद्याला त्याच्या उत्तुंग कामगिरीसाठी 'बाओबाब' असे संबोधले जाते, तर साऊथ आफ्रिकेत टक्कल पडलेल्या, वृद्ध, कंगाल माणसाला बाओबाब म्हणतात. कुठून कसं कोण जाणे पण या बाओबाबने अनेक वर्षांपासून माझे लक्ष वेधून घेतले होते.

अलीकडेच मी मध्यप्रदेश मधील 'मांडू' येथे गेले होते. तिथे तेराव्या-पंधराव्या शतकांतील 'खिलजी' रियासतीच्या अनेक ऐतिहासिक वास्तू आहेत. तिथली काहीशी माहिती शोधत असताना वाचनात आलं की मांडूमध्ये 'बाओबाब' वृक्ष खूप मोठ्या प्रमाणावर आहेत, तेव्हा मला बाकीच्या ऐतिहासिक वास्तूंपेक्षा बाओबाबचं झाड बघण्याचीच जास्त उत्सुकता वाटली. पूर्वी अनेक ठिकाणी या झाडाबद्धल वाचलं होतं पण प्रत्यक्षात ते कधी पाहता आलं नव्हतं. मुंबईत राणीच्या बागेत, पुण्यात युनिव्हर्सिटी आणि आयुका मध्ये इ. ठिकाणी हे झाड आहे असंही वाचलं होतं, पण ही सर्व नाविण्य म्हणून मुद्दाम लावलेली झाडं.  मला सपशेल निसर्गातलं झाड बघायचं होतं. हा वृक्ष मूळ आफ्रिकेतला. भारतात काही मोजक्याच ठिकाणी आढळतो. त्यामुळे मांडू येथील बाओबाब, मिळतील तेवढे बघायचे असं मी ठरवलं. मांडू या गावात शिरल्याबरोबरच आपल्याला हे प्रचंड बाओबाब वृक्ष दिसायला लागतात. मला एका पडक्या दगडी पुराणवस्तूच्याच शेजारी उभे असलेले दोन बाओबाब दिसले. तिथे गाडी थांबवून उतरून बघतो तर आणखी अनेक वृक्ष त्या बाजूला आसपास पसरले होते. मोडक्या ऐतिहासिक वस्तूच्या बाजूला एखाद्या पुरातन स्मारकाप्रमाणे ते उभे होते. 

हो, खरंच बाओबाबचं झाड म्हणजे निसर्गाने उभारलेलं भव्य स्मारकच. सगळ्यात आधी आकर्षित करतो त्याचा आकार, झाडाचं प्रचंड घेराचं खोड वरती निमुळतं होत गेलेलं आणि त्यावर फांद्या, या फांद्यांना पोपटी रंगाची पानं. झाडाच्या मानाने पानांचा आकार बराच छोटा आणि पानं एकत्रित गुच्छासारखी.  भारतात आढळणारा हा 'बाओबाब' इथे रुजून इथल्या मातीत वाढलेला, परदेशी माणूस इथे अनेक वर्षे राहून, रुळून इथलाच झाल्यानंतर कसा वाटेल, त्याप्रमाणे वाटतो. त्याच्या मूळ आफ्रिकन भावाला बघितले तर याची लगेच प्रचीती येते. याचा आफ्रिकन भाऊ बराच उंच असून त्याच्या फक्त शेंड्याला थोड्या फांद्या आणि पाने असतात. याउलट इथला बाओबाब भारतात मुरलेला, (आफ्रिकन भावाच्या मानाने) थोडासा बुटका आणि भरपूर फांद्या डोक्यावर घेऊन उभा असतो. आफ्रिकेत पाण्याच्या असलेल्या दुर्भिक्षामुळे या झाडाच्या खोडात हजारो लिटर्स पाणी साठवण्याची क्षमता असते.  इथे भारतात त्याला पाण्याचे तेवढे दुर्भिक्ष्य नसल्याने आणि इथल्या वातावरणाशी जुळवून घेतल्याने त्याचे बदलेले रूप इथे पाहायला मिळते. तरीही आपले स्वत्व जपून हे झाड आपले वेगळेपण दाखवत इतर  झाडांत उठून दिसते, चटकन ओळखता येते. तसे हे झाड इतर झाडांशी फारसे मनमिळाऊ नाही, त्याच्या आसपास सहसा कुठलेही मोठे वृक्ष दिसणार नाहीत. असलीच तर छोटी झुडपं पायाशी. त्याच्या अवाढव्य बुंध्यामुळे त्याच्या आजूबाजूला मोठी झाडं वस्तीस नसतात. बरं फांद्या आणि पानेही घनदाट नाहीत, त्यामुळे पक्षी यांवर घरटी करतात की नाही शंकाच आहे. याच्याकडे पाखरांशी हितगुज करणारा लडिवाळपणा नाही, वाऱ्याच्या कलाने घेऊन सळसळणे नाही, कि त्याच्या तालावर डोलणे नाही. हा आपला शांत, एकटा, धीर गंभीर उभा असतो.

आफ्रिकन बाओबाब आणि त्याचा इंडियन भाऊ 'भाऊबाब'

मांडू येथील हा बाओबाब 

बाओबाब म्हणजे खरा वाळवंटातला कणखर योध्दाच, तो नेस्तनाबूत होणे किंवा त्याला सहजासहजी मारणे अशक्य. त्याचा बुंधा तासून जर त्याला  पाडण्याचा प्रयत्न केला तर नवीन बुंधा निर्माण करून पुन्हा वाढण्याची क्षमता त्याच्यात आहे. याला जाळलं तरी मूळांच्यावरून कोंभ उगवून तो तिथून वाढत जातो. याची मूळे इतकी खोल गेलेली असावीत की त्याचा पाठपुरावा करणं माणसाच्या आवाक्याबाहेरचं काम आहे. ह्या वृक्षाचा मृत्यू फक्त तेव्हाच होतो जेव्हा त्याची जगण्याची क्षमता संपून त्याचा बुंधा आतून सडत जातो आणि एके दिवशी तो बुंध्यातून तुटून खाली कोसळतो. स्थानिक लोक असेही मानतात की जेव्हा या वृक्षाची जगण्याची इच्छा संपते तेव्हाच  तो स्वतःच आतून पोखरत पोखरत शेवटी कोसळून पडतो. खरोखरच त्याचे जीवन म्हणजे तत्वज्ञानाचा एक वस्तूपाठच.  हजारो वर्षे जगणारा हा वृक्ष एक पुराणवृक्षच म्हटला पाहिजे. एखाद्या तपस्व्यासारखा वर्षानुवर्षे एका ठिकाणी उभा राहून चिंतन करणारा गतकाळाचा एक साक्षीदार. वनस्पतीशास्त्रज्ञ एम्. ऍडॅन्सन (आडांसाँ) यांनी एका बाओबाबचे वय ५००० वर्षांचे असल्याची नोंद केली आहे. मांडू येथेही असलेले वृक्ष ३००-४०० वर्षे जुने असण्याची शक्यता वाटते. काही काहींचा व्यास तर १०   ते १५  फुटांचा आहे. मांडू मधल्या ऐतिहासिक घडामोडी, युद्ध, उत्कर्ष आणि संहार हे त्याने उघड्या डोळ्यांनी निमूटपणे पाहिलं असेल. मेजवान्या घडल्या, नाच-गाणी,आनंद चहुबाजुंनी ओसंडला, प्रीती फुलल्या, अंगार कोसळले, तोफा झडल्या, राजे-महाराजे धारातीर्थी पडले, राजेशाही महाल नेस्तनाबूत झाले, हे सारं काही या वृक्षाने स्तितप्रज्ञासारखे बघितले असेल.हा वृक्ष जर बोलायला लागला तर इतिहास, उत्क्रांती, जीवशास्त्र, पुरातत्वशास्त्र, भौगोलिक रचना यांचे त्याचे संग्रहण एकामागून एक रहस्ये उलघडत जाईल. 

या वृक्षाला नावंही अनेक आहेत. मराठीत याला गोरखचिंच म्हणतात. उत्तरेकडे 'पारिजात' असे म्हणतात(महाराष्ट्रातल्या पारिजातकाच्या झाडाशी त्याचा काहीही संबंध नाही), शास्त्रीय नाव देखील 'ऍडॅन्सोनिया डिजिटॅटा' असे फारच विशेषपूर्ण आहे जे एका प्रख्यात फ्रेंच वनस्पतीशास्त्रचे नाव 'एम्. ऍडॅन्सन' (आडांसाँ) आणि हातांच्या पाच बोटांसारखा पानांचा आकार ( शरीरशात्रानुसार त्याला 'डिजीट/डिजिटेट' म्हणतात) यावरून पडले आहे. आणखी बऱ्याच नावांनी म्हणजेच  पारापुलिया, पुरिमारम(तामिळ), गोरख-इमली(हिंदी), गोरख आमली,रुखडो (गुजराती) अश्या नावांनी हा वृक्ष परिचित आहे. मांडू परिसरात याला 'मांडू की इमली' असं स्थानिक नाव आहे. परदेशातही त्याला अनेक नावं आहेत, त्यापैकी माकडांना त्याची फळं खायला आवडतात म्हणून 'मंकी ब्रेड ट्री' , आणि विचित्र आकारावरून ' अपसाईड-डाऊन  ट्री' ही काही विशेष नावं आहेत.

या प्रचंड वृक्षाने पुरातन काळापासून लोकांना आश्चर्यचकित केले आहे. त्यामुळेच या वृक्षाबद्धल अनेक आख्यायिका आहेत. ऐतिहासिक पुराव्यानुसार अरब व्यापाऱ्यांनी हा वृक्ष १५०० वर्षांपूर्वी  भारतात आणला असावा. हा वृक्ष कुठेही पडलाय आणि वाढतोय असा नाही, तालेवारपणे तो एकटाच  उभा असतो, जवळपास त्याच्यासारखा दुसरा वृक्ष नसल्याने स्थानिक लोकांना त्याच्याबद्धल आकर्षण वाटत आलं असावं, त्याच्या विचित्र आकारामुळेच लोकांनी त्याच्याभोवती लोककथा आणि आख्यायिका रचल्या आहेत. झुसी, अलाहाबाद येथे असलेल्या बाओबाब बद्धल अशी आख्यायिका आहे की मुस्लिम संत मकदूम दहिब याने एका छोट्या हिरव्या काटकीने आपले दात घासले आणि ती जमिनीत रोवली, तेव्हा तिच्यापासून हा विलक्षण अवाढव्य वृक्ष तयार झाला.
'गोरख इमली' या नावावरून एक अशी गोष्ट सांगितली जाते की गोरखनाथ यांनी झुसी या प्रयागमधील पवित्र स्थानाला नष्ट होण्यापासून, हरबंग नावाच्या काल्पनिक राजापासून वाचवलं होतं. असंही सांगितलं जातं की गोरखनाथ या वृक्षाच्या छायेत बसून आपल्या शिष्यांना शिकवीत असत.

हरिवंश पुराणात 'पारिजात' या नावाचा कल्पवृक्ष आहे. किन्तुर, बाराबंकी येथे जो बाओबाब आहे त्याला स्थानिक  लोक 'पारिजात' म्हणतात. उत्तर भारतात बाओबाबला पारिजात असे संबोधण्यामागे त्याचा संबंध कल्पवृक्षाशी जोडणे हे कारण असावे. याला पौराणिक असे काहीही पुरावे नाहीत.  हा वृक्ष दुर्मिळ असल्याने लोकांना त्याबद्धल आश्चर्य वाटते, कधीही गावाबाहेर पाऊल न ठेवलेल्या लोकांना तर असेही वाटते की असा हा एकमेव वृक्ष जगात आहे, आणि  त्यामुळेच त्यांनी त्याच्याबद्धल अशा आख्यायिका निर्माण केल्या असाव्यात. अश्याच एका लोककथेत म्हटलं आहे की अर्जुनाने हा वृक्ष स्वर्गातून आणला, आणि कुंतीने त्याच्या फुलांचा वापर करून शंकराचा  मुकुट सजवला. आणखी एक आख्ययिकेत कृष्णाने सत्यभामेसाठी हा वृक्ष आणला असं सांगितलं आहे. या वृक्षाच्या छायेत येऊन मागितलेली इच्छा पूर्ण होते अशीही लोकांची श्रद्धा आहे.  अजमेर येथे दोन पुरातन बाओबाब आहेत, त्यांच्याबद्धलही लोकांची बरीच श्रद्धा आहे, त्याला श्रावणातल्या अमावास्येच्या दिवशी गंडादोरा बांधून त्याच्याकडे मागणं मागितलं जातं. राजस्थानमध्ये झालावाड जिल्यातल्या सोंधवार येथे बाओबाबला मानसपुरम(इच्छापूर्ती करणारा) म्हटलं जातं. मागणं मागण्यासाठी, धाग्याला एक छोटा दगड बांधून, झाडाला टांगला जातो, मागणं पूर्ण झाल्यावर तो धागा उतरवला जातो. गुजरातच्या कच्छ भागात, बाओबाबची फुलं शंकराला वाहिली जातात. मुलांच्या आजारनिवारणासाठी , आरोग्यासाठीही अनेक पालक या वृक्षाकडे मागणे मागतात. जुनागढच्या गिरनार भागात, पायांना दुखापत झाल्यावर तो लवकर  बरा  व्हावा म्हणून या वृक्षाला लाकडी पाय वाहिला जातो. तामिळनाडूमध्ये रामेश्वरम येथे आठ बाओबाब आहेत. या झाडांच्या सभोवती नागशिल्प असलेले दगड रचलेले आहेत. या झाडांची फळं बाजूच्या  मंदिरात वाहिली जातात. बाओबाब जरी परदेशी पाहुणा असला तरी भारतीय लोकसंस्कृतीने त्याला आपलं मानून आपल्या भाविक-धार्मिक वर्तुळात त्याला स्थान दिले आहे. 


अश्याप्रकारचे 'कल्ट'/श्रद्धा फक्त भारतातच नव्हे तर इतर देशातही आहेत आणि भारतातल्या आख्यायिकांपेक्षा त्या  जास्त गूढतेकडे झुकणाऱ्याही आहेत. आफ्रिकेत, बाओबाब झाडाला सुपीकतेचं, सृजनाचं प्रतीक मानतात. त्याचा सृजन-निर्माण, मातृत्व, जन्म, अपत्य आणि मृत्यूशीही घनिष्ट संबंध मानला जातो. या झाडाच्या आकारामुळे त्याच्याभोवती अनेक गूढं निर्माण झाली आहेत. अनेक ठिकाणी हे झाड मंतरलेले, झपाटलेले मानले जाते. ते जादूमय पद्धतीनेच पृथ्वीवर आले असावे, आणि आपल्या पूर्वजांचे वसतिस्थान असावे असेही स्थानिक मानतात. हे झाड रात्रीचे चालते आणि दिवसाचे स्थिर असते असाही विचित्र समज लोकांमध्ये आहे. मादागास्कर येथील मलागेसी बाओबाब हे प्रेतात्म्यांचे वसतिस्थान मानले जातात. तिथले लोक या प्रेतात्म्यांसाठी झाडाखाली गवत  वाहतात.

बाओबाबच्या परदेशातील रुपाला 'अपसाईड-डाउन ट्री' म्हणत असावेत कारण तिथे त्याच्या फांद्या बहुदा नसतातच, उंच खोडाला वरती फक्त शेंड्याला थोड्या फांद्या आणि पाने जवळजवळ नाहीत, त्यामुळे हे झाड उलटे (फांद्या जमिनीत आणि मूळे वर असे तर नाही ना, असा तर्क तिथल्या सुपीक डोक्यानी काढला असावा, आणि त्यावरूनच मग सुपीक डोक्यातून आख्यायिकांनी जन्म घेतला असावा. एका अरब मिथकात  त्याच्या  'अपसाईड-डाउन ट्री' (खाली डोके वर पाय) या नावामागची गोष्ट सांगितली आहे ती अशी की एकदा सैतानाने हे झाड उपटले आणि उलटे जमिनीत लावले. तेव्हापासून त्याचा हा असा विचित्र आकार तयार झाला. इतरही देशात आफ्रिकेतल्या 'बुर्किना फासो' देशातले मिथक सांगते की देवाने जेव्हा हे झाड निर्माण केले तेव्हा ते सतत चालत राही, त्यामुळे कंटाळून शेवटी देवाने त्याला स्थिर करण्यासाठी उलटे लावले. नायजेरियन मिथकात ओडेडे नावाच्या एका शिकाऱ्याने क्रोधावस्थेत ते झाड उपटून उलटे लावले असे सांगितले आहे. काँगो मधल्या मिथकाप्रमाणे वृक्षदेवाने प्रथम हे झाड काँगोनदीच्या तीरावर लावले, तर झाड तिथल्या ओलसरपणाला सारखे दोष देऊ लागले, त्यामुळे वृक्षदेवाने ते उपटून चंद्राच्या पर्वतावर लावले, तिथेही त्याची भुणभुण थांबली नाही म्हणून रागावून त्याने ते उपटून दूर फेकून दिले ते जाऊन आफ्रिकेच्या वाळवंटात, शुष्क भागात पडले. किलिमांजारो लोककथेत बाओबाबचा वृक्ष आपलं पाण्यातलं सुरकुत्या पडलेलं कुरूप आणि लठ्ठ बेढब प्रतिबिंब बघून वारंवार देवाला दोष देत असे, आजूबाजूच्या  सुंदर वृक्षांचा त्याला हेवा वाटत असे, त्याच्या या कटकटीला कंटाळून देवाने एक दिवशी क्रोधीत होऊन त्याला उपटून उलटे लावले. टांझानियातील लोककथेत बाओबाब रोज नुसते चालत राहत, शेवटी त्यांच्या या सततच्या उंडगेगिरीला कंटाळून देवाने त्यांना उलटे लावून दिले ज्यामुळे ते स्थिर झाले.  लोकंही काय अजब डोक्याची असतात नाही? बाओबाबच्या विचित्र आकारामूळे ते झाड पूर्वी चालत असावे असा तर्क करणारी डोकी अजबच म्हटली पाहिजेत.

झाम्बिया, सेनेगल या ठिकाणी तर असे मानले जाते की बाओबाब ही मुळात एक वेल होती आणि इतर झाडांना आपल्या विळख्यात गुरफटवून मारून त्यांचे रूपांतर ती बाओबाबमध्ये करते. आफ्रिकेतल्या आदिवासींमध्येही  बाओबाबवर अनेक लोककथा आहेत. बंटू जमातीत अशी लोककथा आहे की एकदा देव अतिशय तहानलेल्या अवस्थेत बाओबाब झाडाकडे आला आणि त्याने त्याच्याकडे पाणी मागितले, बाओबाबकडून ते न मिळाल्याने रागाने त्याने बाओबाबला उचलून उलटे लावले. आणखी एका कथेत एकदा हत्तीने बाओबाबच्या आईला घाबरवल्याने तिच्यापासून अश्या अवाढव्य, विक्षिप्त झाडाचा जन्म झाला. हत्तीच्या भयानेच हे झाड उलटे रुजले आहे असाही समाज आफ्रिकेत आहे.

कलहारीच्या कुंग बुशमेनमध्ये अतिशय रंजक लोककथा आहे. ती अशी की देवादीदेव 'गौक्झा' याने जेव्हा ओअँग-ओअँग या पहिल्या मानवाला आणि इतर प्राण्यांना वृक्ष दान केले तेव्हा फक्त 'हाईना' (कारण तो दुष्ट प्रवृत्तीचा मानला जातो म्हणून) ला काहीच दिले नाही. हाईनाने त्याबाबतीत देवाला दोष द्यायला सुरवात केली, तेव्हा देवाने त्याला बाओबाबचे झाड दिले, ते हाईनाने मुद्दाम उलटे लावले. या कथेच्या एक वेगळ्या आवृत्तीमध्ये 'हाईना' त्याच्या मुर्खपणामुळे चुकून ते झाड उलटे लावतो असे आहे, आणि नंतर आपली चूक लक्षात आल्यावर तेव्हापासून तो हसत सुटला आहे अशी गोष्ट आहे. हाईनाच्या हसण्याचा संबंध बाओबाबशी लावून निसर्गातल्या विक्षिप्त गोष्टींना या लोकांनी एकत्र आणले आहे. यांच्या कप्ल्पनाशक्तीची दाद दिली पाहिजे, कलहारीच्या सन जमातीमध्ये प्रचलित लोककथेत 'हाईना'ला  उशिरा पोचल्याने देवाने शेवटी उरलेला बाओबाब दिला. तो शेवटचा आणि कुणालाही नको असलेला वृक्ष होता, त्यामुळे हाईना रागावला आणि त्याने बाओबाबला उलटे लावले. आफ्रिकन बुशमेन बाओबाबला देवाने स्वर्गातून फेकून दिलेले झाड मानतात. त्यांना असेही वाटते की हे झाड इथे कधीच लहानाचे मोठे होत नाही, ते पूर्णपणे वाढलेले झाड म्हणूनच थेट स्वर्गातून पृथ्वीवर येते. ग्रेटच आहेत ही सर्व लोकं. पण आपल्याला हेही दिसते की भारतातील असो व परदेशातील, बाओबाब विषयी कहाण्या गुंफवून त्याला श्रद्धेच्या आसनावर बसवण्यात आणि भीतीचा/श्रद्धेचा बागुलबुवा करून त्याला दूर ठेवण्यात सगळे एका माळेचे मणी म्हटले पाहिजेत.

अश्याप्रकारे बाओबाबला आपल्या परसात कुणी येऊ दिले नसले तरी त्याचा कामापुरता पुरेपूर उपयोग करून घेणे जाणले नाही तर तो माणूस कसला?  भारतात त्याचा मोजकाच वापर होत असला तरी आफ्रिकेतील बाओबाब तिथल्या जमातींसाठी खराखुरा कल्पवृक्ष म्हटला पाहिजे, त्याच्या प्रत्येक भागाचा ते वापर करतात. पाने, फुले , फळे जेवणात, बियांपासून तेल , तर खोड दोर वळण्यासाठी, जळणासाठी  इंधनच नव्हे तर काही ठिकाणी बाओबाबच्या बुंध्याचा शवपेटीसारखाही  उपयोग केला जातो. बाओबाबच्या फुलण्याच्या काळावरून पावसाचे आगमन ठरवण्याची स्थानिक लोकांची पद्धतही फार जुनी आहे. हा वृक्ष पावसाच्या आधीच बहरतो. भारतात हा वृक्ष इतर वृक्षांइतका उपयोगी नसला तरी त्याच्या फळांना आयुर्वेदात स्थान मिळाले आहे. बाओबाबचे फळ म्हणजे पाऊण फुटाचा लांबुडका दुधीभोपळाच. अतिशय टणक. फोडायला  काहीतरी साधन हवेच. आतला गीर चिंचेप्रमाणेच आंबट असतो.

'मांडू की इमली' विकणाऱ्या बायका  

मला मांडूच्या परिसरात जवळपास तीस-चाळीस वृक्ष दिसले असतील. त्यातले काही बऱ्याच मोठ्या घेराचे (१२ ते १५ फूट) होते, तर काही २-३ फूट घेराचेही होते. छोटे रोपटे मात्र एकही दिसले नाही. हा वृक्ष वेगाने वाढतो. मांडू मधली गरीब लोकं उदरनिर्वाहासाठी त्याची फळं काढून 'मांडू की इमली' म्हणून माझ्यासारख्या या झाडाशी अपरिचित नवख्या-गवश्याना विकतात. मीही एक साधारण ६ इंचाचे फळ चाळीस रुपयांना विकत घेतले. एक फूट आणि त्याहून जास्त लांब फळांची किंमत साठ-ऐंशी रुपये होती. त्याचबरोबर फळाच्या गीराची मेणबत्तीवर सील केलेली छोटी प्लास्टिकची पाकीटं देखील विकायला होती, त्यातलेही एक घेतले. फळ अजून फोडले नाही, फ़ोडावेसे वाटलेच नाही. तूर्तास पाकिटातील गीर खाल्ल्यानंतर त्यातले बीज मात्र मी जपून ठेवले आहे. माझ्या घराच्या अरुंद, छोट्या बाल्कनीत काही हा बाओबाब मावणार नाही. तो  कुणाच्या परसातला ओळख-पाळख ठेवून असणारा वृक्ष नाही. त्याचे विक्षिप्त रूप बघून त्याच्याशी कुणी हितगुज केले नसावे, त्यामुळेच तो धीर-गंबीर, विरक्त योग्यासारखा एकटाच वाढत राहिला असेल का? फक्त मिथकं, धार्मिक कार्य, आख्यायिका यामध्येच स्थान देऊन माणसाने त्याला दूर ठेवण्याचा प्रयत्न केला आहे तो त्याच्या विचित्र आकारामूळे ,त्याच्या असणाऱ्या वेगळेपणामुळे. अपरिचिताचे, असाधारणाचे, असंभाव्याचे माणसाला नेहमीच भय वाटते, मग त्यात सौंदर्य का असेना? जे नेहमीचे नाही त्याला लोक थोडं लांबच ठेवतात तसाच बाओबाब मांडूमध्ये मला लांबच वाटला, कुठेतरी दूर शेतात, रस्त्याला लागून, एखाद्या टेकडीवर असा एकटाच उभा, त्याला तसं बघून थोडं खिन्नही वाटलं. पण मांडू सोडताना मात्र एक ठिकाणी मला जो बाओबाब दिसला त्यामुळे या खिन्नतेला एक दिलासा मिळाला. महेश्वरला जाणाऱ्या दिशेने असलेल्या मांडूच्या त्या भागात मला एक बाओबाब एका मातीच्या घराच्या अगदी जवळ दिसला, इतका जवळ की त्या लोकांनी घरच त्याच्या आजूबाजूने बांधले होते. त्या बाओबाबने ते घरच आपल्या कडेवर घेतले होते. आणि घरातल्या लोकांनीही प्रेमाने त्याला आपलंसं केलं होतं. त्याच्या छायेत ते घरही होतं, एक गाय रवंथ करत होती, कुत्रा आरामात पहुडला होता आणि मुलेही आजूबाजूला बागडत होती. ते बघून मला खूप मजा वाटली. वाटलं बाओबाब काही अगदीच एकलकोंडा नाही, त्यालाही संवाद हवाच आहे. त्यासाठीच बहुतेक तो कुठून कुठे आला आफ्रिकेची वाळवंट तुडवत आणि इथे येऊन इथल्या मुलांमाणसांत एक झाला.
बाओबाब! माझी ओळख तुला एकदाच झाली असेल पण मी तुला कायम भेटतच राहणार आहे.

दोन बाओबाब

Tuesday, 21 June 2016

सावित्री

कुठे निघालीस सावित्री?
असा तुला खडसावून
सवाल विचारला गेला, पण
तू थांबली नाहीस
आणि काट्याकुट्यात
फुले उमलवत गेलीस पण
आज तुझी गरुड़ भरारी पाहून
तुला म्हणवेसे वाटते, बाई ग
तू आणखी किती पुढे जाणारेस, पण
जेव्हा तुझ्या 'मरणास' आणि 'मारण्यासही'
तुझी तूच कारण होतेस
तेव्हा तुला जाब विचारावासा वाटतो
तू हे काय करते आहेस?
आणि एखाद्या राजाला वश करण्यासाठी
पदराआडून  हळूच प्यादं सरकवतेस
तेव्हा लाजिरवाणं व्हावं लागतं?
पुरुष जिंकण्याच्या हव्यासापायी
तूझं स्वत्व तू गमावू नकोस
दुर्बलतेच्या यमाला फक्त हद्दपार कर

चमेलीची वेल


चमेलीची वेल
सुरक्षित राहावी म्हणून,
काल तिच्याभोवती काट्यांचा फास लावला

जनावरांनी खाऊ नये,
तुडवू नये म्हणून,
जपण्याचा प्रयत्न केला

पण आज बघितले तर
काट्यांच्याच भाराने
चमेली वाकली

हे आजूबाजूचे
काट्यांचे वर्चस्व बघून
चमेलीची बाभूळ होऊ नये

तिची नजाकत,
तिचे बहरणे,
मुळातून जोपासायला हवे

काटेरी झाडांच्या
सानिध्यात तिचे
अस्तित्व नष्ट होऊ नये

म्हणून मी चमेली उचलली
स्वच्छ, काट्यांपासून दूर,
सूर्यकिरणांच्या झोतात नेऊन लावली

जेणे करून तिने
निर्मळ सुगंध द्यावा
हिच मातीच्या गुणधर्माची अपेक्षा

Monday, 20 June 2016

शशांक - रखालदास बॅनर्जी

रखालदास बॅनर्जी (रखालदास बंदोपाध्याय) यांच्या बद्धल मी सर्वप्रथम जी.एं. च्या एका पत्रात वाचलं होतं. जी.एं. ना त्यांची 'शशांक' ही कादंबरी आवडली होती. त्यांनी या कादंबरीचा (वि. सी. गुर्जर यांनी केलेला) मराठी अनुवाद वाचला होता. तेव्हापासून या पुस्तकाचा शोध मी करत होते. शेवटी मला ते पुस्तक वाचायला मिळाले.
राखालदास बॅनर्जी हे थोर इतिहासतज्ञ आणि पुराणवस्तूसंशोधक होते. बंगाली आणि इंग्रजी मध्ये लेखन करीत. त्यांचा अतिशय महत्वाचा शोध म्हणजे 'मोहेनजो-दारो'. त्यांनी इतिहासविषयक, पुराणवस्तूविषयक खूप लेखन केले पण त्यापलीकडे जाऊन कल्पना आणि इतिहास यांचा संयोग करून कथारुपात इतिहासाला मांडले. त्यांनी लिहिलेल्या कादंबऱ्यातून त्या काळच्या जीवनाला आणि इतिहासात फक्त नावाने उपस्थित असलेल्या व्यक्तींना त्यांनी जिवंत केले. त्यांच्या ४५ वर्षांच्या अल्प आयुष्यातही त्यांनी ३० पुस्तके आणि २५० पेक्षा अधिक लेख लिहिले. 
'शशांक' हि त्यांची बंगालीतून लिहिलेली कादंबरी म्हणजे गुप्त साम्राज्याच्या अधोगतीच्या काळातील घटनांचा इतिहास आणि त्या आवरणाखाली कल्पिलेली चित्रं आहे. मूळ कादंबरीचा हिंदी अनुवाद रामचंद्र शुक्ल यांनी केला आहे.

गुप्त साम्राज्य हे भारताच्या इतिहासातील सुवर्ण युग (Golden Age) मानले जाते. सर्व प्रकारच्या शास्त्र, कलांचा या काळात उत्कर्ष झाला. इसवी सनाच्या चौथ्या शतकपासून ते सातव्या शतकापर्यंत हे साम्राज्य प्रस्थापित होते. गुप्त साम्राज्य कामरूप ते गांधार , वाहाक आणि हिमालया पासून माळवा, कलिंग, सौराष्ट्र , दक्षिणकोसल पर्यंत पसरलं होतं. या राजवंशाचा मूळपुरुष 'गुप्त' होता.  त्याचा मुलगा 'घटोत्कच' ,त्याचा मुलगा 'चन्द्रगुप्त १'  याचा लिच्छवी ची राजकुमारी कुमारदेवीशी विवाह झाला होता, तो ३२१ A.D. मध्ये राजसिंहासनावर बसला. त्यानंतर समुद्रगुप्त, चंद्रगुप्त २ - विक्रमादित्य (४०१ ते  ४१३ A.D.) या थोर पराक्रमी राजांनी गुप्त सम्राज उत्तुंग शिखरावर नेलं. कुमारगुप्त १ (४१५ ते ४५५ A.D.) आणि स्कंदगुप्त (455–467 A.D. ) यांनीही गुप्त साम्राज्याच्या उत्कर्षासाठी हातभार लावला. पण स्कंदगुप्तच्या काळात 'हूणांच्या' उत्तर-पश्चिमी आक्रमणांमुळे गुप्त साम्राज्य खिळखीळं झालं. तिथूनच पुढे गुप्त साम्रज्य लयाला गेलं असं म्हटलं जातं. जेव्हा गुप्त साम्राज्याचा अधोगती होत होती त्या वेळेला श्रीकंठ (थानेश्वर/थानेस्वर ) च्या पुष्पभूति वंशाचा प्रभाव वाढत होता. या थानेश्वर/थानेस्वर (आजचे थानेसर) प्रांतापासूनच हर्षवर्धन राजाने आपले राज्य वाढवले होते. जरी गुप्त साम्रज्य लयाला गेलं तरीही कुठकुठे ते अस्तित्वात होतं त्याची प्रमाणं सापडतात. गुप्तांच्या वतीने त्यांचे सामंतस्वरूपातील सरदार अस्तित्वात होते.

आता या सर्वांमध्ये 'शशांक' कोण आणि कुठे येतो?
इतिहासानुसार शशांक हा एक स्वतंत्र राजा होता, त्याने 'गौड' नावाचा नवा प्रांत प्रस्थापित केला. त्याची कारकीर्द (590 AD ते 625 AD) होती आणि तो हर्षवर्धनाचा समकालीन होता. त्याची राजधानी होती 'कर्णसुवर्ण' (आजचे  मुर्शिदाबाद जिल्हा, रंगामाटी स्थान). या अतिशय शूर राजाने आपल्या साम्राज्याचा भरपूर विस्तार केला. ह्या राजाबद्धल इतिहासकार असा तर्क लावतात कि हा राजा गुप्त वंशाचाच होता. नष्ट झालेल्या गुप्त साम्राज्याचाच तो प्रतिनिधी होता. याला ऐतिहासिक दस्तावेजात काही पुरावे सापडतात.   

गुप्तवंशाच्या पतनानंतर आदित्यासेन नावाचा राजा माळवा , मगध प्रांतात राज्य करीत होता. म्हणजेच जरी मूळ गुप्त वंश नष्ट पावला तरी त्याच्या काही शाखांचे प्रतिनिधी अस्तित्व टिकवून होते. या राजाचा काळ ७ व्या शतकाचा होता. याचे पूर्वज अश्याप्रकारे आहेत : कृष्णगुप्त - हर्षगुप्त - जीवितगुप्त  - कुमारगुप्त - दमोदरगुप्त - महासेनगुप्त - माधवगुप्त  - आदित्यसेन. हे मूळ गुप्तवंशीय होते असा इतिहासकार अंदाज बांधतात. यासर्व वरच्या वंशावळीत काही नावे 'शशांक' या राजाच्या इतिहासासाठी (आणि कादंबरीतील कथेसाठी )महत्वाची आहेत. आणि हि नावं आहेत:  'माधवगुप्त' आणि  त्याचे पिता 'महासेनगुप्त'.

महासेनगुप्त हा ६ व्या शतकाच्या अंती आणि सातव्या शतकाच्या पूर्वार्धात मगध प्रांतात राज्य करणारा एक कमकुवत राजा होता. त्याला तीन मुलगे होते. १. देवगुप्त २. कुमारगुप्त ३. माधवगुप्त. 
यांचे पूर्वज माळव्यात राज्य करीत होते की मगधमधे हे सांगणे कठिण  आहे. बाणाच्या हर्षचरितात माळव्याचे दोन राजकुमार 'कुमारगुप्त' आणि 'माधवगुप्त' हे  थानेश्वरच्या 'राज्यवर्धन' आणि 'हर्षवर्धन' यांचे सहचर असल्याचे नोंदले आहे. हर्षचरितावरुन माधवगुप्ताचे पिता 'महासेनगुप्त' माळव्यात राज्य करत होते. तेव्हा असं असू शकतं कि 'महासेनगुप्त' माळव्यात राज्य करीत होते आणि मगध मध्ये त्यांचा कुठलातरी पुत्र 'सामंतवादी(Feudatory)' म्हणून राज्य करीत असेल. किंवा असंही  होऊ शकतं कि बुद्धगुप्त, भानुगुप्त हे मूळ गुप्त राजवंशाचे राजे जेव्हा मगधमध्ये राज्य करीत होते तेव्हा गुप्त वंशाची दुसरी शाखा (माधवगुप्तचे पूर्वज) माळव्यात राज्य करीत असावेत.  थानेस्वरच्या राज्यवर्धनची बहिण राजश्री हिचा मौखरी वंशाच्या ग्रहवर्माशी विवाह झाल्यानंतर महासेनगुप्त सत्तेसाठी मगध मध्ये राहिला असेल आणि देवगुप्ताला माळव्यात राज्य करायला दिले असेल. थानेस्वरच्या पुष्पभूति वंशाचे महासेनगुप्तशी जवळचे पारवारिक संबंध होते. 'महासेनगुप्त'ची बहिण 'महासेनगुप्ता' हि थानेस्वरच्या राजाची (प्रभाकरवर्धन) आई होती. परंतु नंतर राजनैतिक डावपेचांत यांचे संबध बिघडत गेले. अस्तंगत होणाऱ्या आपल्या सत्तेमुळे महासेनगुप्ताला प्रभाकरवर्धनादी थानेस्वर सदस्यांकडून अपमानस्पद वागणुकीला सामोरे जावे लागत असे. पुढे महासेनगुप्ताच्या मृत्युनंतर प्रभाकारवर्धनने मगधवर अधिकार प्राप्त करण्यासाठी प्रयत्न सुरु केले. देवगुप्त हा महासेनगुप्ताचा मोठा मुलगा प्रभाकरवर्धनचा मुलगा राज्यवर्धन आणि जावई मौखरीचा राजा ग्रह्वर्मा यांना मारण्यात सामील होता असे इतिहास सांगतो. आणि त्याचा बदला घेण्यासाठी हर्षवर्धनने मगधवर स्वारी केली होती हेही इतिहासात नोंदले गेले आहे. हर्षवर्धनाच्या एका ताम्रपत्रावरून राज्यवर्धनकडून  'देवगुप्त' ला परास्त करण्याचा उल्लेख आहे.

अनेक अनुमानावरून असे लक्षात येते कि राजश्रीचा पती ग्रहवर्मा याला देवगुप्ताने मारले. आणि त्यात राजा राजा 'शशांक'चा हात होता. देवगुप्त हा महासेनगुप्तचा मोठा पुत्र होता (कुमारगुप्त दुसरा आणि माधवगुप्त तिसरा ). हर्षचरीत मध्ये राज्यवर्धनला कपटाने मारणारा 'गौडादीप' आहे असे नोंदले आहे.  'गौडादीप' म्हणजेच गौड राजा शशांक हे अनुमान 'शंकर' नावाच्या एका पंडिताच्या बाराव्या शतकातील नामावळीतून, आणि हुआन सांगच्या भ्रमणगाथेतून मिळते.  
'शशांक' गुप्त वंशांचा होता असे ठरवण्यामागे पुरावा असा आहे कि ब्रुलर यांना मिळालेल्या 'हर्षचरित' च्या प्रतीमध्ये त्याचे नाव नरेंद्रगुप्त होते. मुर्शिदाबाद येथे मिळालेल्या अनेक गुप्तवंशीय शिक्क्यावर नरेन्द्रादित्य हे नाव 'शशांक'चे आहे असे निश्चित झाले आहे. 
त्यामुळे शशांक हा गुप्तवंशीय राजा होता असा कयास करावासा वाटतो. अर्थातच हा गुप्तवंशीयांशी असलेला संबंध वादग्रस्त असला तरी काही प्राप्त अनुमानावरून हे पूर्णपणे नाकारताही येत नाही. 
या कादंबरीत राखालदास बॅनर्जी यांनी 'शशांक' ला महासेनगुप्ताचा मोठा मुलगा म्हणून दाखवले आहे. (असे त्यांनी का केले हे एक गूढच आहे, देवगुप्तच शशांक होता असे त्यांचे मत होते का? आणि या मताला (अगदी मनापासून त्यांना वाटत असले तरी) पुष्टी देणारा पुरावा त्यांच्यापाशी नसल्याने त्यांनी या कादंबरीद्वारे काल्पनिक रित्या आपल्या मताला न्याय दिला असावा. 

या कादंबरीत त्या काळातील जीवनाचे प्रदर उलघडतात. 
कथा थोडक्यात अशी आहे. ती महासेनगुप्तापासून सुरु होते. 'महासेनगुप्त' मगधचे सम्राट असले तरी आता वृद्धत्वाकडे झुकलेले असतात. साम्राज्य अनेक आघात परतवून लावताना खिळखीळं झालेलं असतं. राजकोष झपाट्याने खाली होत असतो. त्यांच्या  साम्राज्याचा दिवसोंदिवस ऱ्हास होत असतो. या परिस्थितीत 'थानेस्वर' चा प्रभाकरवर्धन (हर्षवर्धनचा पिता) अत्यंत प्रभावी होत आपले साम्राज्य वाढवण्याच्या खटपटीत असतो. जोपर्यंत महासेनगुप्त यांची बहिण('महासेनगुप्ता' जी प्रभाकरवर्धनची आई आहे) जिवंत असते  तोपर्यंत प्रभाकरवर्धन गप्प असतो. महासेनगुप्त यांच्या खिळखीळ्या साम्राज्याचे पाठीराखे असतात त्याचे पुत्र 'शशांक' आणि 'माधवगुप्त'. परंतु दोघेही बाल्यावस्थेत असतात. त्या काळापासून शशांकची राजा म्हणून कशी वाटचाल होते. यात त्याला किती खाचखळगे, क्रूर नियतीच्या डावांचा कसा सामना करावा लागतो हीच ही कहाणी. 
प्रभाकरवर्धनचा मगध वर डोळा असल्याने तो 'माधवगुप्त' ला मोठ्या धुर्ततेने आपल्या बाजूला कसे करवून घेतो, नियतीच्या अनेक रचनांमध्ये शशांकचे जीवन आणि त्याच्या आजूबाजूच्या इतर सदस्यांचे जीवन  भरडत जाते आणि त्या काळात फोफावलेला महायानी बुद्धधर्माबद्धलचा वाढता द्वेष आणि त्याला कारणीभूत असलेले अत्याचारी, कारस्थानी संघप्रमुख, त्यांनी राज्येच्या-राज्ये सत्तेखाली आणण्यासाठी व नष्ट करण्यासाठी  रचलेली षडयंत्र हे सर्व या कथेत रचलेले आहे. यात एक अपूर्ण प्रेमकहाणी देखील साम्राज्यशाहीच्या, युद्धाच्या, राजनीती-षडयंत्राच्या पार्श्वभूमीवर अस्फुट स्पंदनं दाखवत शेवटी मिटून जाते.

राखालदास बॅनर्जी यांनी मूळ बंगाली कादंबरीत हर्षवर्धनच्या स्वारीनंतर 'शशांक' चा अंत दाखवून त्याला दुःखांतिकेची छटा दिली असली तरी हिंदी अनुवादक रामचंद्र शुक्ल यांनी राजा 'शशांक' ऐतिहासिक दृष्ट्या हर्षवर्धनच्या स्वारीनंतर अनेक वर्ष जिवंत होता आणि राज्यही करत होता या पुराव्यानुसार 'शशांक' चा अंत न दाखवता तो पुढेही राज्य करतो असे दाखवले आहे. 

या कादंबरीत अनेक सूत्रे आहेत. विश्वास आणि विश्वासघात, प्रेम, सत्तेसाठीचा संघर्ष, नियती, या सर्वांमध्ये एक महत्वाचा धागा म्हणजे धर्माचे त्यावेळचे स्थान आणि त्याचे महत्व. बुद्धधर्म आणि त्याचा प्रसार त्या काळात उत्तर भारतात झपाट्याने झाला होता. पण या धर्मांतील काही मोजक्या स्वार्थी लोकांमुळे त्याचे स्वरूप कसे झाले होते यावर या कादंबरीतील घटनांमुळे प्रकाश पडतो. मला नेहमी प्रश्न पडे कि एवढा महान अहिंसेचे प्रतिक असेलेला 'बुद्धधर्म' ज्या देशात जन्मला त्या देशातून हद्दपार का झाला, इथले लोकच करंटे असले पाहिजेत ज्यांनी सहिष्णू, अहिंसक अश्या गुणी बुद्धधर्माला इथे थारा दिला नाही. पण या धर्माच्या भारतातून नामशेष होण्यामागचे काही धागेदोरे या कथेतून समोर येतात. बुद्धधर्माचे स्वरूप बदलुन स्वार्थी, सत्ता,सुखाच्या मागे लागणाऱ्या काही दुष्ट लोकांच्या हातात त्याची सूत्रं गेली. जुलूम, अत्याचार करून लहान मुलांना जबरदस्तीने भिक्खू करणारे, संपत्ती गोळा करून मोठे संघ प्रस्थापित करून हे भिक्खू काहीही काम न करता ऐतखाऊवृत्तीने राहत आणि त्यातल्या बहुतेकांना बुद्धाच्या मूळ मार्गाचा,शिकवणुकीचा लवलेशही नव्हता. अश्या संघाना ढोंगी रूप प्राप्त झाले होते. या आपमतलबी, भोगविलासी धर्माच्या पुढाऱ्यांच्या करतूतींची झळ सर्वसामान्य लोकांनाही बसत होती. त्यामुळे बौद्ध धर्म लोकांच्या नजरेतून उतरू लागला होता आणि हिंदू धर्म पुनर्प्रस्थापित होऊ लागला होता.

या कादंबरीत 'शशांक' चे रेखाटलेले व्यक्तिचित्र अतिशय विदारक आहे. इतिहासाने 'शशांक' राजाला 'कपट-कारस्थानी', 'विश्वासघातकी' मानले आहे. पण राखालदास बॅनर्जी यांचा 'शशांक' अतिशय तरल मनाचा, दयाबुद्धी असेलेला परंतु क्रूर नियतीच्या फेऱ्यात गरगरून त्रस्त झालेला शूर राजा आहे. त्याच्या बालपणापासून ते अंतापर्यंतचे चित्र त्यानी रेखाटले आहे. कधीही सुख न लाभणारा, ज्याचे जवळचेच त्याचा घात करण्यास टपले असतील आणि केवळ दूरच्या परदेशातील अनोळखी लोकांकडूनच त्याला सहाय्य होईल अशी त्याची नियती असते. आप्त-प्रियजनाकडून प्रतारणा आणि दुःख, घोर निराशा आणि गैरसमजातून झालेल्या आत्मक्लेशाच्या भोवऱ्यात तो फिरत राहतो. सर्व दुःखाचे मुळ आपण आहोत असे त्याचे मानणे असते. मृत्युच्या शोधतच शेवटी तो भटकत राहतो, जीवावर उदार होऊन तो राज्यवर्धनशी लढतो (त्याला लढायचे नसते तरी आणि फक्त राज्यवर्धनची लढण्याची इच्छा असते म्हणून) आणि त्यात एका विलक्षण रीतीने राज्यवर्धनचाच मृत्यू होतो. हाही नियतीचाच एक खेळ. (राज्यवर्धनला कपटाने मारल्याचा इतिहासातील उल्लेखाशी कथेतील हि घटना विसंगत आहे)
असा हा 'शशांक' आपल्याला त्याच्या अपूर्णतेच्या दुःखात ओढून घेऊन जातो. हिंदी अनुवादात जरी शेवटी  त्याची शोकांतिका  होत नसली तरी ती शोकांतिकाच आहे इतके त्याचे जीवन haunting आहे.
खरा शशांक कसा होता कुणास ठाऊक? पण इतिहासातील वस्तुस्थितीच्या पुढे जाऊन, इतिहासाशी फारकत घेऊन स्वतःला जाणवणाऱ्या अश्या 'खऱ्या शशांक'ची बाजू त्यांनी या कादंबरीत मांडली आहे.

Monday, 6 June 2016

झिनझिनाट


पांदनीत भेटलस, आंगाक खेटलस, काळोख किनाट
हातात हात घेतलस , अकस्मात झालो,  झिनझिनाट ….

पतेरो साळसाळ पायाबुडी,फुरसा मारीत होता मनात उडी
चलता चलता कुजबुजलस, हिच माझ्या घराच्या जवळची वाट

काय बोलत हुतव नि खय चलत हुतव, कोनाक म्हायती !
सगळ्या वाटेर निस्तो पिकल्या आंब्या-फनसांचो घमघमाट 

लांबसून बॅटरी येवक लागली जवळ, तू माका खास्कन वडलंस 
माझा काळीज धाडधाड… धाडधाड, तुझा मातर धाडस भनाट

तुझ्यामागसून कितीजना भेटली, आंगाक खेटली, पन नाय पटली
माज्या कानात  आजून, तुज्याच काकनांचो तो पैलोवैलो किनकिनाट

 - कवी महेश केळुसकर


महेश केळुसकर या कवींची हि कविता आणि त्यांचा 'झिनझिनाट' हा अतिशय अप्रतिम कवितांचा कवितासंग्रह. हि 'झिनझिनाट' कविता मी आर्टस्कूल मधल्या एका सहाध्यायीकडून प्रथम ऐकली. आणि ती माझ्या कानात कायमची 'झिनझिनाट' करत राहिली. 
एखाद्या कोकणातल्या माणसाने कोकणातून परत चाललेल्या पावण्याला दिलेल्या भेटीच्या पिशवीत काय काय असेल? एखादा घमघमीत गोड पिका फणस नाहीतर रसाळ आंबे, शीरशीरीत, खारवलेला, खवट,उग्र वासाचा गोलमा (सुकी कोलंबी, सुकी मासळी) , आंबट-ढाण आमसोलं, फक्कड ओले काजू, घश्याला खसखसणारे पिके बोंडू(काजूचे फळ), मती वेडावणारे आबोली, सुरंगी, ओवळा(बकुळी)चे वळेसर. पिशवीचे बंध  करकचून बांधून पिशवी नुसती  बाजूला ठेवली तरी तिच्यातून अविरत घमघमाट येतच राहील .
तसाच हा कवितासंग्रह आहे. नुसती पिशवी आहे, सगळा आंबट, खारट, गोड ऐवज भरलेली, धुंद करणाऱ्या घमघमणाऱ्या वासाची. पण पिशवी अस्सल कोकणी माणसाचे प्रतिनिधित्व करणारी, जुनी डाग पडलेली, तिला ठिगळही आहेत. 
हा कवितासंग्रह मूळ 'मॅजेस्टिक' ने छापलेला, आता out of print  झालाय. पण खटपट करून आणून वाचण्यासारखा. संपूर्णपणे मालवणी भाषेतील हा पहिलाच कविता संग्रह असावा. याला महेश केळुसकरांची प्रस्तावनाही मालवणी भाषेतून आहे.  

आता 'झिनझिनाट' कवितेविषयी. हि कविता नाही. हि आहे जादू.  भारलेल्या वातावरणातील दोन प्रेमी जीवांचा अनुभव कायमचा मनात बंधिस्त करणारी. तिच्यातला जिवंतपणा, ताजेपणा कालातीत आहे. 
कोकणातल्या आडजागा, तिथे चोरून भेटणारी प्रेमी युगुलं, त्यांचा तरल, एकांतात, आजूबाजूच्या अगम्य शक्तींनी भारलेल्या वातावरणात, निसर्गाच्या साक्षीने रंगलेला हळुवार तरीही ठसकेबाज प्रणय यांचा अस्सल प्रत्यय देणारी कविता आहे  'झिनझिनाट'. 

'मनात उडी मारणारा फुरसा' , 'लांबसून जवळ येवक लागलली बॅटरी' , 'पतेऱ्याची साळसाळ आणि कानातली कुजबुज' , 'पिकले आंबे-फनस' आणि धडधडणारा काळीज', किनाट काळोख'
यातल्या प्रतिमा आणि यातले संकेत केवळ अजोड. हे वातावरण मनावर अजब गारुड करतं.
हि कविता वाचताना स्वतःच तुम्ही ती काळ्याकुट्ट अंधारातली  पांदनी (पाणंद - झाडांनी, झाळीनी दोन्ही बाजूनी वेढलेली छोटीशी वाट म्हणजे पाणंद, त्याला मालवणीत पांदनीत किंवा पान्नी म्हणतात) अनुभवू लागता. शब्द न शब्द तिथल्या वातावरणाची अनुभूती देतो. पायाखालच्या सुकलेल्या पानांची(पतेरो) सळसळ, त्या सळसळीचे कारण एखादे फुरसे(एक छोटा पण विषारी साप) तर नसेल ना? त्या मंतरलेल्या काळोखाची भीती, आणि फुरसे मनात डोकावून अधिकच बळावणारी भीतीयुक्त उत्कंठा आणि तीच भीती जेव्हा नकळत त्याच्या मदतीला धावून येते (ज्यामुळेच तो प्रेयसीचे जवळ येणे, हात हातात घेणे, कुजबुजणे, अंगाला खेटणे अनुभवतो) मनातल्या त्या मिश्र भावनांचा सुंदर पट या कवितेत असा उमटला आहे कि त्याचे वर्णन करणे शब्दात केवळ अशक्य. हि कविता फक्त अनुभवायला हवी. जेव्हा कवितेबद्धल काय वाटतं ते शब्दात मांडता येत नाही फक्त जाणवत राहतं तेव्हा ती कुठेतरी खोल जावून भिडलेली असते. तेच खरे श्रेष्ठ काव्य. 

महाराष्ट्र टाईम्स मधल्या लेखात महेश केळुसकर यांनी या कवितेच्या निर्मितीबद्धल लिहिले आहे ''झिनझिनाट' चा डायरीतला लेखन दिनांक आहे ३ मे १९८८. कणकवली तालुक्यातील 'सात्रल' या गावच्या कच्च्या रस्त्यावर त्या रात्री आमची आकाशवाणीची जीप (आमचे महाजन नावाचे इंजिनीयर सासूरवाडीवरून भेट देऊन कधी परत येतात त्याची वाट बघत) उभी असताना हि कविता मला सुचली. वाघधरे ड्रायव्हर, रस्त्याबाजूच्या रानातून वाघ झेप घेईल म्हणून सावधगिरीने जीपमधेच बसला होता. मी जीपबाहेर रस्त्यावर उतरलो होतो. जीपचे हेडलाईट्स मी त्याला बंद करायला लावले. त्यानं काचा वर सरकवल्या. वाघधरे जीपमध्ये आणि मी बाहेर वाघाची वाट बघत. घनघोर काळोख. आसमंतात चिटपाखरू नाही…. फक्त झणाणता वारा… आणि हळूहळू त्या सगळ्याची भूतबाधा मला चढू लागली.… नक्की काय होत होतं ते सांगता येणार नाही… पण असं काहीतरी विलक्षण, पाऱ्यासारखं शुभ्र चपळ कि हात लावायला जातोय आणि ते सूळ्ळकन निसटून चाललय. लाटेमागून लाट फुटत राहिली आणि झोतामागून झोत पडत राहिले आदिम अंधाराचे. कविता कवीच्या रंध्रा-रंध्रातून पाझरत राहिली. '
  
या कवितासंग्रहातल्या 'बायो माझा ऱ्हवला खय' , 'शीटी', 'बाळगो आणि मालग्या' , 'आबोलेचो वळेसार'  'सोबता आमची जोडी', मिर्गादिसा', 'देवबाग पानयात बुडला', 'व्हनीबाय जुन्यार दि गे' अश्या वेगवेगळ्या रसातल्या बऱ्याच कविता उत्तम आहेत, पण 'झिनझिनाट' चा 'झिनझिनाट' त्यांना नाही. 

'झिनझिनाट' ला परातत्व स्पर्श आहे. 

हि कविता वाचल्यावर मला या कवितेवर एकदम लिहावेसेच वाटले. पण तिने मला एवढं मंत्रमुग्ध केलय कि लिहायला शब्दच सापडत नाही आहेत. त्यामुळे तूर्तास एवढेच.

Friday, 3 June 2016

धयकालो: मालवणी दशावतारी नाटक

दशावतारी नाटकातील भटजी , दासी , गणपती आणि संकासूर , (courtesy & copyright Marathi Vishwakosh)

बाबल्या … पडान घे! …… पडान घे!

बाबलो धयकाल्यात काम करता. सातेरीदेवीचो सप्तो चालू झालोहा. आज रात्री नाटक आसा. बाबलो नाटकात संकासुराचा काम करता, पण तेका आज संकासुराचा काम करुचा नाय. नाटकाचे सूत्रधार आबा सगळ्यांका भूमिका वाटून देतत. नेहमीसारख्या बाबल्याक संकासुराची भूमिका मिळता. पण बाबल्याचो चेहरो पडलंलो. बाकीचे कलाकार ताँड रंगवूक बसतत. बाबलो आपलो थैसरच.
'ओ आबा, मिया काय म्हणतय…'
'काय्येक म्हणा नको. जावन तोंडाक रंग लाव जा, टायम होउक इलो हा'  आबा आराडले. 
''आबा, मी संकासूर व्होवचय नाय आज'
'काय? मग संकासुराचा काम कोण तुजो बापूस करतलो?'
…… 
……
नाटक सुरु होवन खूप टायम झाल्ललो हा. बघुक आया,बाया बापड्यांची ही गर्दी झाल्लली आसा. संकासुराचो वध करुक विष्णूचा काम करणारो सुनलो छाती पुढे काढीत, कऱ्हा करून इलो. आणि संकासुराच्या पाठसून नाचाक लागलो, धीनिन्नाव-तिग्गीन्नाव धीनिन्नाव-तिग्गीन्नाव अश्या पखवाजाच्या आवाजार दोघंय फेर धरान यकामेकाकडे रागान बघुक लागले. बराच वेळ असा चलला. तरी संकासूर विष्णूक गावाक तयार नाय. तो आपलो नाचताहा. शेवटी विष्णू झाल्लल्या सूनल्यान बाबल्याक हावभाव करून तेच्या मरण्याबाबतीत इचार्ल्यान. तरी बाबलो काय दाद देवक तयार नाय. मग विष्णून आव आणून म्हटल्यान  'अरे चांडाळा! खूप झाले तुझे खेळ! आता मारायला तयार हो!' आणि गदा बाबल्यार मारल्यान, पण बाबल्यान गदा लागल्याचो अभिनय केल्यान पण थैसरच उभो. विष्णून गदेर गदा हाणल्यान पण बाबलो आपलो थैसरच्या थैसरच. विष्णू झाल्लल्या सुनल्यान हळू आवाजात बाबल्याक म्हटल्यान 'बाबल्या, अरे तुझी पडाची ऍक्टिंग रवली मा रे ! मेल्या काय नवटाक घेवन ईलस काय रे? '
पण बाबलो काय पडाक तयार नाय. मग पेटी वाजवणाऱ्या आबांनी पेटीयेचो सूर भसाडो करून वाढवल्यानी आणि पखवाजवाल्याक इशारो केल्यार तोय धीनिन्नाव तिग्गीन्नाव जोरातच वाजवूक लागलो. आबा (हळू आवाजातच पण) आराडले 'मेल्या, बाबल्या अरे पडान घे! …… पडान घे!'
बाबल्यान आबांकडे बघुक नाय. विष्णूकडेच रागान बघित अभिनय करीत असल्यासारखो म्हणालो 'मी नाय पडान घेवचंय!' नाय पडान घेवचंय! माजी बायल इलीहा नाटक बघुक, सासऱ्याक घेवन. सासरो बघताहा थैसून , मी…  पडान…  घेवचंय…  नाय'
'अरे मेल्या दिसणहस नाय तू……  घे पडान '
शेवटी पखवाज वाजवणारो झीलगो इतक्या जोरान धीनिन्नाव तिग्गीन्नाव वाजवूक लागलो कि पखवाज फुटात कि काय असा वाटूक लागला. पेटयेचो सूर वेडोवाकडो जावक लागलो. आबांनी वरचो सूर लावल्यानी. विष्णून गधा सोडून हातांचो जोर लावून बाबल्याक खाली पाडल्यान आणि संकासूर एकदाचो मरान पडलो.
अशी हि मालवणी दशावतारी नाटकासंबधी घडलेली एक मजेशीर गोष्ट. 


दशावतारी नाटक असते तरी कसे?

मालवणी दशावतार नाटक म्हणजे एक अजब प्रकार आहे. लोककलेचा हा प्रकार तळकोकणात आजही टिकून आहे. शेकडो वर्षांपासून फक्त लोकाश्रयाने जगत आलेली हि कला  मालवणी माणसाला अद्याप भुरळ घालून आहे. टी.व्ही. इंटरनेट च्या आजच्या जमान्यातही गावात मात्र गर्दी करून गावातली माणसं रात्री जागून हमखास दशावतारी नाटकं बघतात. (या कलेला असेच उत्तरोत्तर प्रोत्साहन मिळावे, आणि हि कला अशीच टिकून राहावी अशी मनापासूनची इच्छा)

माझं बालपण कोकणात गेलं(वयाची १४ वर्ष) पण दशावतारी नाटकाची ओळख काही झाली नाही. इतकी सुंदर कला जवळून त्या काळात बघता आली नाही याचे आज वैषम्य वाटत राहते. अलीकडे मी कोकणात गेले असताना हे नाटक बघण्याचा योग आला. आणि इतक्या छान प्रकाराचा आस्वाद आपण आधी कधीच घेतला नाही म्हणून चूटपुट वाटली. तर हे दशावतारी नाटक असते तरी कसे?

दशावतार म्हणजे विष्णूचे दहा अवतार. त्या अवतारांच्या अनुषंगाने रचलेल्या काल्पनिक कथा नाट्यरुपात रंगवून केलेले त्याचे सादरीकरण म्हणजेच दशावतारी नाटक.

दशावतारी नाटक हे तळकोकणातील(सिंधुदुर्ग जिल्हा) गावातील  देव-देवता/ग्रामदेवतांच्या जत्रा/उत्सवाचा अविभाज्य घटक आहे.
तुळशीच्या लग्नानंतर साधारणपणे भातकापणीच्या हंगामात, दरवर्षी ठरविक तिथीला सिंधुदुर्गातील प्रत्येक गावात कोणत्या न कोणत्या देवाचा उत्सव चालू होतो. या उत्सवाला मालवणीत 'सप्तो' असे म्हणतात. 'सप्तो' म्हणजे सप्ताह(जो काही ठिकाणी सात दिवस चालतो). हे उत्सव त्या त्या देवस्थानांचे ठरलेले वार्षिक उत्सव असतात. या उत्सवामध्ये जत्राही भरते. देवीची पूजा. गाऱ्हाणी/नवस, पालखी आणि सर्वात शेवटी (म्हणजे रात्री उशीरा) दशावतारी नाटक. हे देवळाच्या आवारातच केले जाते. देवळाच्या सभामंडपामध्ये किंवा देवळाच्या बाहेर छोटासा प्लॅटफॉर्म असतो/उभारला जातो. त्याची दिशा देवाकडे असते. दशावतारी कलाकार या स्टेजवर उभे राहून देवाकडे तोंड करून नाटक सादर करतात. जणू काही ते नाटक बघणाऱ्या प्रेक्षकांमध्ये देवळातला देवही एक आहे.  
आता हे नाटक म्हणजे काय भन्नाट प्रकार आहे ते सांगते.
या नाटकाला नैपथ्य नाही. मध्ये एक लाकडी बाक ठेवतात. त्याच्यावरच जो कोणी (विष्णू/ यम / नारद / सामान्य भक्त कुणीही )येईल त्याने बसायचे. हा बाक म्हणजेच सिंहासन/दगड/खुर्ची/पलंग/ नदीकाठ/ज्याप्रमाणे प्रसंग असेल त्याप्रमाणे त्याचे स्वरूप बदललेले समजायचे. 

नाटकाला संहिता नाही. संवादही उत्स्फूर्त, तिथल्या तिथे म्हटलेले. दिग्दर्शक नाही. एक सूत्रधार असतो तो नाटकाच्या काही काळ आधी कुठच्या कथेवर नाटक करायचे ती कथा समजावून सांगतो. आणि कामं वाटून देतो. त्याप्रमाणे कलाकारांनी अभिनय, संवाद फेक स्वतःच ठरवून करायची आणि कथा उलघडत न्यायची. 
या कथा पौराणिक असतात. रामायण, महाभारत, आणि विष्णूपुराणातल्या. जी कथा सादर होते त्यात मूळ कथाबीज असते आणि बाकीचा कथेचा भाग काहीसा उत्फूर्तपणे कलाकारांकडूनच त्या भोवती गुंफला जातो. त्यामुळे नाटक कलाकारच पुढे नेतात. आणि असे हे नाटक रात्री १०-११ वाजता जे सुरु होते ते पहाटे तीन-चार वाजेपर्यंतही (कधी कधी त्या नंतरही) चालू शकते.  
मालवणी दशावतारी नाटकाला गावातील लोक 'धयकालो' असंही संबोधतात ते का तेही पुढे कळेलच. 

दशावतारी नाटकाचा इतिहास 

दशावतारी नाटकाचा उगम कसा आणि कुठून झाला हे सांगणे अवघड आहे. त्याचा इतिहास विखुरलेल्या स्वरूपात मिळतो. याबाबतीत बहुतेक मते वेगवेगळी असून, त्यांना फारसे पुरावे देखील नाहीत. 
मराठी विश्वकोशात नोंदल्याप्रमाणे १७व्या शतकातील रामदासांच्या दासबोध ग्रंथामध्ये  (‘देवशोधननाम’ या सहाव्या दशकातील आठव्या  समासामध्ये)   दशावतार नाटकाबद्धल  खालील उल्लेख आढळतो. 
खेळता नेटके दशावतारी
तेथे येती सुंदर नारी
नेत्र मोडिती कलाकुसरी
परी ते अवघे धटिंगण
त्यावरून १७ व्या शतकात दशावतारी नाटके होत असत असा निष्कर्ष जरी काढता आला तरी त्याला अन्य पुरावा नाही.  मात्र तेराव्या शतकाच्या आधीपासून अशा प्रकारचे खेळ प्रचलित आहेत असा उल्लेख ‘ज्ञानेश्वरी’त आहे. ('लोकगंगा' या पुस्तकात याचा उल्लेख आहे)

इ. स. १७२८ मध्ये शामजी नाईक काळे यांनी दशावताराचा पहिला प्रयोग राजापूर तालुक्यातील आडिवरे येथे महाकालीच्या मंदिरामध्ये केला होता. याची नोंद चिं. कृ. दीक्षित यांनी 'आडीवऱ्याची महाकाली' या आपल्या पुस्तकात केला आहे. त्यांनी कर्नाटकातून हा नाट्यप्रकार इथे आणला असे त्यांचे म्हणणे  आहे. तर पु. गो. काणेकर आपल्या 'नाट्यस्मृती' या पुस्तकात म्हणतात कि काळे यांनी दशावतारची कला कोकणातूनच आडीवऱ्याला नेली. वि . कृ. जोशी यांनी या दोन्ही मतांना धरून ती कला कोकणातून जन्मली तरीही कर्नाटकातील कलेच्या मार्गाने आली आहे असे म्हटले आहे. 
कनार्टकात जो नाट्यप्रकार आहे त्याला 'यक्षगान' म्हणतात. भागवतपुराणातल्या कथांवर हा नाट्यप्रकार आहे. दशावतारी नाटक, यक्षगान जवळजवळ भासत असले तरी त्यांत फारसे साम्य नाही.
दशावतारी नाटकात संशोधन करणारे डॉ . तुलसी बेहेरे यांनी यावर सखोल अभ्यास केला आहे. त्याच्या दाव्यानुसार दशावतार आणि यक्षगान मध्ये खुपच फरक आहे. यक्षगानात मुख्य भर नृत्य गायनावर असतो. तर दशावतारी नाटकात उत्स्फूर्त संवादफेक रांगडा अभिनय, यावरच भर आहे. यक्षगानामध्ये सगळ्या दहा अवताराचे presentation होत नाही. दशावतारी नाटकात ते होते/किंवा ते अवतार गाण्याच्या स्वरुपात सूत्रधार सांगतो. 
कोकणातील दशावतारी नाटकाचा सर्वात जुना उल्लेख सुमारे आठशे वर्षांपूर्वीचा मानतात. लोकगंगा या पुस्तकात लिहिले आहे कि सिंधुदुर्गात प्रथम दशावतारी नाटक केशव गोरे यांनी वालावल येथे (ता. कुडाळ, सिंधुदुर्ग) नारायणाच्या देवळात सादर केले. केशव भटजी कडून दशवताराचा पेटारा वालावलकर यांनी स्वीकारला. आज वालावलकरांची तेरावी पिढी दशावतार नाटक सादर करीत आहे. याचबरोबर  आजगावकर,कलिंगण, मोचेमाडकर, पार्सेकर, खानोलकर, चेंदवणकर अश्या अनेक नाटक कंपन्यानी दशावतार कला पिढ्यानपिढ्या जोपासली आहे. 
बाबी कलिंगण आणि बाबी नालंग हे दशावतार नाटकातील दोन नावाजलेले कलाकार.

दक्षिणेतल्या मंदिरांमध्ये देवदास, देवदासी प्रथा होत्या त्यातून अनेक लोककला आणि शास्त्रीय कलानी जन्म घेतला. कोकण परिसरात देवाला वाहिलेल्या भावीणी असत. त्यांच्यापासून जन्मलेला देवळी समाज, पुरातन काळी मुख्यत्वाने दशावतारी नाटक हा व्यवसाय करी. पुढे इतर समाजातील लोकांनीही त्यात  पुढाकार घेतला. 
हिस्टरी ऑफ इन्डीयन थेटर भाग २ या मनोहर वारपांडे यांच्या पुस्तकात त्यांनी दशावतार नाटकाच्या उगमाबद्धल वेगळी माहिती दिली आहे. 
कोकणचा भाग पूर्वी गोमंतक म्हणून ओळखला जाई. त्या गोमंतकाच्या early folk theatre मध्ये 'जागर' म्हणून एक कला होती, ज्यात कृष्ण कथा रंगवल्या जात. पूर्वरंगात स्त्री वेशातील कलाकार कृष्णाची प्रतिमा  घेऊन नाचत असे. उत्तररंगात मडू (madu ) आणि कैताभ (kaitabha ) तोंडावर भयंकर मुखवटे घालून येत आणि त्यांचा संहार मत्स्य रूपातील विष्णू/कृष्ण करे. भरताच्या नाट्यशास्त्रात युध्द/ संहारा समयी विष्णू/कृष्ण यांच्या अभिव्यक्तीच्या चार वृत्ती लिहिलेल्या आहेत. त्या वृत्तिंचे दर्शन जागर मध्ये होत असे.
गोमंतकाच्या याच early folk theatre मध्ये दशावताराचे बीज आहे. त्या दशावतार चे 'दशावतार काला' , 'गोपाळकाला' आणि 'गौळणकाला' असे भाग होते . काला म्हणजे प्रसाद. गोपगोपी श्रीकृष्णाला म्हणतात 'अमुच्या शिदोऱ्या एकत्र करोनी , काला वाटसी तू चक्रपाणी'
दशावतार नाटक पण एकप्रकारचा कालाच असते. नाट्य, अभिनय, संगीत, गायन यांचा एकत्रित मिलाप त्यात होतो. 


नाटक घडते कसे?
[दशावतारी नाटकाचा देवळाच्या समोरचा रंगमंच, वर कलाकार , खाली बसलेले प्रेक्षक, बाजूला दिसणारे वडाचे झाड आणि त्याखाली डाराडूर झोपलेल्या आजी ]
दशवतारी नाटक म्हणजे नुसते 'आख्यान' नव्हे तर देवतेच्या उत्सवाशी ते घट्ट बांधलेले आहे. दशावतारी नाटक सुरु होण्यापूर्वी ग्रामदेवतेची पूजा, गाऱ्हाणी, नवस, पालखी संपन्न होते. त्यानंतर नांदी/धुमाळी गणेशपूजन, शारदास्तवन. आडदशावतारातील संकासुराची कथा , दशवतारांचे दर्शन, आख्यान , दहीकाला, समराधना. असा संपूर्ण कार्यक्रम म्हणजे दशावतार नाटक. कालांतराने यातले  दशवतारांचे दर्शन, समराधना हे भाग गाळले गेले. 'दहीकाला' म्हणजे खरा दही हंडी फोडण्याचा कार्यक्रम, हा पहाटे नाटकाच्या उत्तरंगात होतो. पण गावातले बहुतेक दहीकाल्याला कुणी थांबत नाहीत. दहीकाला कृष्ण, गौळण इ. करतात, हंडी मानकरी कलाकाराकडून फोडली जाते. पण बहुतांशी लोकांना दशावतारी नाटक म्हणजे फक्त आख्यान एवढेच माहित असते. बहुदा बरेचजण नाटक पाहता पाहता झोपेने गारद होतात. 

देवळाच्या आवारातच चार कोपऱ्यात चार मेढी उभारतात. त्यावर ताडपत्रीचे छप्पर. प्रकाशासाठी पूर्वी खांबाच्या आडोशाला दोन दिवे, कंदील, पेट्रोमॅक्स बत्ती वापरायचे , आता विजेचे दिवे लावतात.


सुरवात  
दशावतारी नाटकात जे कलाकार असतात, ते जिथे उत्सवाचे निमंत्रण असेल तिथे आपला दशावताराचा पेटारा घेऊन दाखल होतात. त्याच्या या पेटाऱ्यात रंगभूषा, वेशभूषा यांचे सामान असते. तसेच गणपती, रावण, यक्ष, संकासूर यांचे मुखवटे देखील असतात. या पेटाऱ्याचे महत्व दशावतारी नाटकात अनन्यसाधारण आहे. नाटक सुरु होण्याआधी त्याच्या पुढे समई पेटवून ठेवली जाते. मुखवटे वापरण्यापूर्वी त्यांची पूजा केली जाते. नाटक कंपनी उत्सवाच्या वेळी गावोगावी पेटारा घेऊन देवस्थानात नाटक सादर करते. त्याची वार्षिक बिदागी त्यांना देवस्थानतर्फे/गावकऱ्यांकडून दिली जाते.

स्वतःची वेशभूषा ते स्वतःच करतात आणि तेही अगदी फटाफट १५ मिनिटात. कलाकारात सहसा स्त्रिया नसतात. पुरुषच स्त्री भूमिका करतात. पण त्यांच्याकडे स्त्रीसुलभ हावभाव करण्याची कोणती नजाकत असते कोण जाणे. ते अतिशय ग्रेसफुल वाटतात. स्टेजवर मधोमध रिकामे बाकडे आणि एका कोपऱ्यात तबला / पखवाज , पायपेटी , झांज घेऊन २-३ माणसे. पायपेटी वाजवणारा बहुतेक चांगला गाणं म्हणू शकणारा असतो. तो सूत्रधारही असतो. कलाकार रंगून तयार असतात. 
[रमा आणि वैष्णव यांच्यामधला संवाद, यातली रमा एकदम स्लीम-ट्रिम आहे आणि तिच्यात स्त्रीसुलभ ग्रेसहि आहे. कमाल त्या कुठचेही प्रशिक्षण न घेता फक्त निरीक्षण आणि अनुभवातून  शिकणाऱ्या , स्त्री भूमिका करणाऱ्या पुरुषाची, फक्त आवाज सोडला तर तो साधारणपणे स्त्रीच वाटत होता] 

पूर्वरंग
 
दशावतारी नाटकाची सुरवात धुमाळीने होते. पखवाज वाजवणारा जोरजोरात वाजवतो. त्यानंतर मंगलाचरण सुरु होते आणि पूर्वरंग सुरु होतो. 
पूर्वरंग: यात सगळे कलाकार येऊन उभे राहतात. मध्ये सूत्रधार.  मग गणपती येतो, रीध्धी सिद्धी त्याच्या दोन्ही बाजूला असतात. कधी कधी कलाकार माणसं कमी असली तर गणपती एकटाच येतो. गणपती नमन झाल्यावर सरस्वती स्तवन होते. त्यानंतर प्रवेशाचा इशारा देणारा लंगार सुरु होतो. (frantic music: प्रवेश सूचक संगीत). 
सूत्रधार एकेकाचे नाव पुकारतो त्याप्रमाणे कलाकार रंगमंचावर येतात. एक एक जण  येतो. त्याचे येणे म्हणजे जबरदस्त. येताना १५-२० फुटावरूनच तो आवेश घेऊन येतो आणि हे बघायला मिळते कारण रंगमंच तसा उघडाच. लोकांतूनच आवेशाने धावत कलाकार रंगमंचावर येतो. आपला पात्रपरिचय स्वतः स्वगतातून करतो.
प्रसंग सादर करताना नसलेल्या गोष्टी कलाकारांना फक्त अभिनयातून दाखवायच्या असतात. उदा. आग/लागलेला वणवा , नदी, घनदाट जंगल , राजमहाल, युद्ध भूमी , आकाश असे बरेच काही. 
एक मात्र आहे. दशावतार हा प्रकार कोकणातला असला आणि तिथली बोलीभाषा मालवणी असली तरी नाटकातील संवादांची भाषा शुद्ध मराठी असते. पण मधुन मधून वेगळा बाज आणण्यासाठी एखादा प्रसंग (बहुतेकदा भक्त/सर्वसामन्य माणूस असलेला) मालवणीतून सादर केला जातो. लोकांना हे खूप आवडते. या अस्सल मालवणी प्रसंगांना लोक भरभरून दाद देतात, शिट्ट्याबिट्ट्या मारतात. कधीकधी एखाद्या कलाकाराला कोणी गावकरी बक्षीस देतो ते मधेच प्रसंग चालू असतानाच थांबवून सूत्रधार जाहीर करतो. हे फारच मजेशीर आहे.  

आडदशावतार : पूर्वरंगातील संकासुराची गोष्ट आणि त्यानंतरचे दशावतारांचे दर्शन म्हणजे आडदशावतार.

संकासुर
आडदशावताराची सुरवात मत्स्यावतार या  गोष्टीने होते. यात संकासूर नावाचा राक्षस ब्रम्हदेवाकडून वेदांची चोरी करतो आणि विष्णू त्याचा संहार करतो. संकासूर काळे कपडे घालतो. आणि लाल जीभ लावतो. तो सुत्राधाराबरोबर मजेशीर संवाद पण करतो कारण तो दैत्य पण आहे आणि विदुषक पण. बाकीचे  सगळे अवतार सूत्रधाराच्या गाण्यातून सांगितले जातात. कूर्म, वराह यांची सोंगे कधीकधी दाखवली जातात. त्यानंतरचा नरसिंह अवतार दाखवतात. कारण तो लोकप्रिय आहे. वामन, परशुराम यांचे उल्लेख करतात. राम/ कृष्ण यांचे अवतार दाखवतात. आणि उत्तररंगात त्यावर आधारलेली एखादी  कथा दाखवली जाते. कधीकधी हि कथा विष्णूपुराणातीलही असू शकते. 

उत्तररंग/आख्यान

हे एखाद्या पौराणीक कथेचे आख्यान असते. उदा. मी पहिलेल्या नाटकात 'वैष्णव या विष्णूभक्ताच्या भक्तीची कथा सांगितली होती. या भागात युद्धे होतात. पखवाज, पेटी, झांज यांचा कल्लोळ होतो. शेवटी जो दानव असतो त्याचा संहार होतो आणि सुखांत होतो.

नाटकाच्या शेवटी हंडी फोडून दहीकाला (प्रसाद )वाटला जातो
राक्षस विशेष असतात. त्यांच्या रौद्र, भयानक वेशभूषा, अक्राळ-विक्राळ हसणे आणि आवेशात धावत येणेही  बघण्यासारखे.
युद्ध हा प्रकारहि बघण्यासारखा असतो. ते एक प्रकारचे नृत्यच असते त्याला लंगार नृत्य म्हणतात. त्यात प्रतीद्वंद्वी एकमेकांकडे आवेशाने पाहत, फेर धरून गोल गोल  फिरत राहतात. दैत्याच्या पायात घुंघरू बांधलेले असतात. त्यामुळे त्यांच्या या युद्धनृत्याला एक प्रकारचा ठेका मिळतो. युद्धाच्या वेळी सूत्रधार धुमाळी किंवा केरवा ठेक्यामध्ये गाणी, पारंपरिक गीतरचना घेऊन, त्यावर त्या तालाचा साज चढवतो. युद्धासाठी खोट्या बनवलेल्या गदा, तलवारी यांचा वापर करतात. शेवटी दैत्य धारतीर्थी पडला कि नाट्याचा शेवट होतो. 

मी पाहिलेल्या नाटकात विष्णूच्या भक्ताची वैष्णवाची गोष्ट होती. त्या कथेत यक्ष, विष्णू, वैष्णव, रमा, जटायू, यम,रमाचे आईवडील आणी नारद अशी पात्रं होती. 
नाटकात रमेच्या पतीचा प्राण , वैष्णवाला नारदाच्या सांगण्यावरून यम घेऊन जातो. रमा दुखःविव्हल होते. पुढे नारद विष्णूकडे वैष्णवाच्या प्राणासाठी गाऱ्हाणे घालतो आणि जटायूकरवी विष्णू त्याचे प्राण परत मिळवतो अशी ढोबळमानाने कथा आहे.
अनेकदा नाटकादरम्यान मजेशीर प्रसंग पाहायला मिळतात. त्यातले जर रंगमंचावर घडणारे असतील तर ते खरं आहे कि नाटकात चालू आहे याचा सुगावा चतुर कलाकार तुम्हाला लागू देणार नाहीत. मी बघितलेल्या नाटकादरम्यान एक मजेशीर दृश्य पाहायला मिळाले. रंगमंचावर विष्णू आणि जटायू हे दोघे, वैष्णवाच्या मृत्यूमुळे दुखःविव्हल झालेल्या रमाबद्धल बोलत होते आणि  दुखःविव्हल झालेली रमा (म्हणजे तिचे काम करणारा पुरुष)  यमाबरोबर दूरच्या टपरीत चहा घेत होता.
ह्या नाट्यप्रकरात असलेला रांगडेपणा, ungroomed , unsophisticated , rawness अन्य कुठेही सापडणार नाही. 
असा हा भन्नाट नाट्यप्रकार एकदातरी नक्कीच पहावा तो या unsophisticated, थेट, आणि raw अनुभवासाठी. ४-५ तास न पेंगता बघण्याची तयारी मात्र पाहिजे!
[डावीकडे यक्ष जो रमावर भाळून तिला पळवण्यास आला आहे. छोटा वैष्णव (मध्ये) तिला वाचवण्यासाठी आला आहे. उजवीकडे रमा]
 नेटके दशावतारी,
तेथे येती सुंदर नारी
नेत्र मोडिती कलाकुसरी,
परी ते अवघे धटिंगण’
(दासबोध ६-८-११) - See more at: http://www.loksatta.com/lokprabha/travel-special-33-1073239/#vuukle_div
राजापूर तालुक्यातील आडिवरे येथील शामजी नाईक काळे व शिवराम नाईक गोडबोले या दोन कीर्तनकारांनी कर्नाटकातून जो लोककला प्रकार महाराष्ट्रात आणला, त्याचे दोन भाग होऊन एक दशावतार म्हणून दक्षिण रत्नागिरी जिल्ह्यात (सिंधुदूर्ग) प्रसिद्धी पावला व नमन-खेळे उत्तर रत्नागिरी जिल्ह्यात होऊ लागले. - See more at: http://www.pudhari.com/news/kokan/16784.html#sthash.QV86UvAS.dpuf
[यमाला विष्णूविरुद्ध भडकावणारा नारद आणि यम (बाकड्यावर बसलेला)]
[विष्णू आणि जटायू , डावीकडे बसलेले सूत्रधार आणि पखवाजवाला]
[विष्णू आणि जटायू यांच्यातील संभाषण, हा जटायू प्रवेश करताना १५-२० फुटांवरून धावतच आला होता ]

राजापूर तालुक्यातील आडिवरे येथील शामजी नाईक काळे व शिवराम नाईक गोडबोले या दोन कीर्तनकारांनी कर्नाटकातून जो लोककला प्रकार महाराष्ट्रात आणला, त्याचे दोन भाग होऊन एक दशावतार म्हणून दक्षिण रत्नागिरी जिल्ह्यात (सिंधुदूर्ग) प्रसिद्धी पावला व नमन-खेळे उत्तर रत्नागिरी जिल्ह्यात होऊ लागले. - See more at: http://www.pudhari.com/news/kokan/16784.html#sthash.QV86UvAS.dpuf



संदर्भसूची :
१. मराठी विश्वकोश: यावर दशावतारी नाटकाचे फार सुंदर जुने फोटोज बघायला मिळतील.
https://marathivishwakosh.maharashtra.gov.in/khandas/khand7/index.php/23-2015-01-14-05-21-30/13138-2016-01-27-06-17-44?showall=&limitstart=

२. 'लोकगंगा' : सदानंद राणे
३. History of Indian Theatre, Volume 2 By Manohar Laxman Varapande