Wednesday, 7 June 2017

विंसन्ट व्हॅन गॉग


(विंसन्ट व्हॅन गॉग हा अठराव्या शतकात होऊन गेलेला एक डच चित्रकार होता. जगातील सर्वात नावाजलेला चित्रकार. त्याची चित्र म्हणजेच 'तो स्वतः' इतके त्याने स्वतःला चित्रात ओतले आहे. चित्र आणि तो एकच  झाला. पण त्याच्या आयुष्यात त्याच्याइतके क्वचितच कुणी भोगले असावे. प्रेम, आपुलकी, यश, पैसा यापैकी त्याला काहीच मिळाले नाही. कुठचेही भौतिक सुख त्याला मिळाले नाही. सतत तडफडत, धगधगत राहिला. त्याच्या मृत्यूनंतर आता तो सर्वाधिक लोकप्रिय आणि सर्वाधिक हवासा कलावंत मानला जातो पण त्याच्या जिवंतपणी तो प्रेम, आपुलकी, स्वीकार यासाठी आयुष्यभर तळमळला. लोकांनी त्याला नाकारले. त्याला वेडा ठरवले. तसा तो विलक्षण वेडा होताच पण म्हणतात ना 'There is a very thin line between genius and insanity.' शेवटी स्वतःच्या डोक्यात पिस्तूल झाडून त्याने आपले आयुष्य संपवले. त्याचे जीवन चटका लावणारे आहे. ही कविता त्याच्यावर लिहिली आहे. पण त्याच्या चित्रातले चैतन्य या कवितेत नाही. कारण त्याच्या चित्रात त्याने आपले सर्वस्व ओतले होते. तरीही एक प्रयत्न... )



एक क्षण होता येईल का
विंसन्ट व्हॅन गॉग
डोक्यावर सूर्याच्या ज्वाळा
मनात वैराण माळरान
घेऊन वाट तुडवता येईल का

होता येईल का ती सूर्यफुले
विंसन्टच्या चित्रातली
तो मरून गेला तरी
ती अजून टवटवीत आहेत

विंसन्टचा एकटेपणा
अनुभवता येईल का?
पण त्यासाठी
जवळ पिस्तूल हवं

-१८-मे -२०१७






निष्क्रिय

मला काहीच करायचे नाही
काहीच नाही
क्षण क्षण काहीतरी करून
त्यांना घालवायचे  नाही
तसे ते जाणारच आहेत
(मी काही नाही केले तरी)

झाडे नाही लावायची
त्यांना पाणी नाही घालायचे
ती वाढतील जिथे वाढायची तिथे
त्यांना या जमिनीतून उपटून
त्या जमिनीत लावणारी
मी-मी म्हणणारी फुटकळ 'मी' कोण ?

मला फक्त असायचंय
राहायचंय (निष्क्रिय)
पण असू देणार नाही कुणी
किंवा असू देणार नाही माझीच मी

डोळे  सताड उघडे टाकून
पाडायचंय त्यांच्यात
सूर्याचं प्रतिबिंब
ज्याने जळून राख होईन

कान देऊन ऐकायचंय
कारुण्यमय गीत त्या पक्ष्याचं
ज्यामुळे तो पक्षी
बनून उडून जाईन

त्वचेची रंध्र रंध्र
खुली करायचीत
वारा अंगावर घेण्यासाठी
ज्यामुळे वारा होईन 
त्याच्याबरोबर तरंगत राहीन

पाणी रंध्रा-रंध्रात झिरपू दे
म्हणजे विरघळून जाईन
वाहत जाईन
मातीत मुरुन राहीन

हि विलक्षण आर्तता
'विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकाशले'
म्हणणाऱ्या ज्ञानेश्वरांना  शब्दांत गवसली
मी कुठून आणू ती शब्दात !
या  कपाळी करवंटी करंटी
आणि दातखिळी तोंडी




-७-जून -२०१७ 











जंगलाची वाट, मालवणी मॉन्क आणि चमत्कार क्षणभरचा


अरे मालवणी मॉन्क! त्या जवळच्या जंगलात मी थोडं थोडं पुढे जायचा प्रयत्न केला.
तिथे काय नाही. निसर्ग साक्षात, वृक्ष, वेली पक्षी, माती, दगड, धोंडे यातून येऊन बसला आहे. ती एक वाट आहे जंगलाची. छोटासा डोंगरच आहे तो. खूप झाडांनी आच्छादलेला. त्याच्या अंतिम टोकावर कधीतरी जाण्याची माझी इच्छा आहे. तर ही एक वाट सुरु होते ती त्या अंतिम टोकावर संपते. पण वाट अतिशय मजेशीर आहे. किती काय आहे त्यावर. मालवणी मॉन्क म्हणतो 'प्रत्येक क्षण म्हणजे चमत्कार आहे, फक्त मला नमस्कार करू नका म्हणजे झालं!' कोण हा मालवणी मॉन्क? असाच कुणीतरी साधासाच, न दिसणारा, कधीकधी ओल्ड मॉन्कघेणारा (त्याच्या फार नादाला लागू नका)
तर मालवणी मॉन्कचं म्हणणं, चमत्कार प्रत्येक क्षणाला दिसू शकतो. खरं आहे !

तर या जंगलाच्या वाटेवर एका ठिकाणी एका झुडुपावर चक्क लाईट्स पेटले होते. छोट्या देव्हाऱ्यात कायम मिणमिणत असतो ना एखादा छोटा बल्ब, तसे असंख्य बल्ब्स त्या झाडावर ! आणि पिवळ्या प्रकाशाने पेटले होते ते सूर्याच्या. हे झुडूप होतं डिकेमाली नावाच्या झाडाचं आणि हे पेटलेले बल्ब्स म्हणजे त्यांचा डिंक, पण खरोखरीचा चमत्कार हा की त्या क्षणाला चमत्कारच वाटावा असे झाडावर दिवे पेटलेले दिसत होते ते !
प्रत्येक क्षणातला एक क्षण चमत्कार दाखवतो तो असा! 
मग आपलं फुटकळ अ....  ज्ञान वर येतं 'डोळे माणसात येतात, अरे हा तर झाडाचा डिंक, झाड डिकेमालीचं बरं  का!'  झालं ! चमत्कार संपला!

आणि मालवणी मॉन्क, या वाटेवर एक टेरर जागा आहे ! मालवणी मॉन्क म्हणतो 'अरे टेरर बाहेर नाही, आत असतं!'
पण तुला सांगू, या वाटेवर तिथे टेरर वाटलं एक क्षण ! परत एक क्षणभरच वाटलं... 
तिथे कौशीचं झाड आहे. सुंदर... आता नव्याने पालवी फुटली आहे, आणि ती सुंदर तांबूस-लाल पोपटी कोवळी पालवी न्याहाळताना खाली बुंध्याशी नजर गेली आणि मन चरकलं, तिथे एक काळपट बावली होती, ती प्लास्टिकची डोळे उघडझाप करणारी, तिचा एकच डोळा होता, तिच्याकडून झर्रकन नजर उचलली, बघवलंच नाही तिला पुढे. आताही हे लिहीताना, तो क्षण का आठवावा. 
मालवणी मॉन्कच्या मते तो क्षणही एक चमत्कारच! अरे जंगलात बावली कोण आणून ठेवेल? ती आली असेल कंटाळून, कुणी व्रात्य मुलामुलीने तिला एवढी विद्रुप केली असेल की जीव घेऊन पळाली असेल आणि जंगलात या झाडाच्या आश्रयाला आली असेल आणि कोण जाणे 'कौशीच ती!' 
कौशीचं झाड पाहिलं आहे कधी? एप्रिलमध्ये नुसतं शेंदरी-तांबूस सुंदर फुलांनी झळाळून उठतं. मग फळं येतात-तीही चमत्कारिक पद्धतीने , फुलांच्यावरच टोकाला फळं येतात. ती गर्द कुसुंबी रंगाची. त्यानंतर फुलपाखरांच्या पंखासारख्या दोन गुलाबी पाकळ्या उकलतात  आणि आतून त्याला चिकटलेल्या बिया!
हे या फळांनी लगडलेलं झाड म्हणजे गुलसर रंगाचा सोहळा... मग हे गुलाबी पंख हळूहळू सोनेरी-चंदेरी होत जातात आणि वाऱ्याबरोबर भिरभिरत झाली पडतात. त्यांचे हे पडणे जो बघेल त्याला वाटेल छोटा पक्षी किंवा फुलपाखरूच आहे. आणि नंतर तांबूस-पोपटी पानं येतात. अशी ही कौशी वेगवेगळा मेकअप करतच असते. 
ती  भय जागृत करणारी डोळेफुटकी बावली म्हणजे 'कौशी' असू शकते? कौशी तर वेगवेगळा मेकअप करणारी, वेगवेगळी आभूषणं परिधान करणारी एक राजकुमारी आहे! ती म्हणजे ही काळपट बावली?

असू शकते ! मालवणी मॉन्क म्हणतो ... एका  क्षणाला मेकअप करणारी राजकुमारी दुसऱ्या क्षणी डोळेफुटकी करपलेल्या चेहऱ्याची बावली होऊ शकते! कुणाचं काही खरं नाही. राजकुमारींच्या कथेत असं होतं बहुतेक वेळा. कुणाचा शाप भोवतो! कुणाची नजर लागते! राक्षसाची नजर पडते! काहीही होऊ शकतं. तुला ऐकायची आहे का ती गोष्ट ? 
नको नको! आठवून बघ! अशा कौशी खूप दिसतील तुला! नको नको ! नको मला तुझी गोष्ट !  

बरं, मालवणी मॉन्क ! ऐक, वाटेवरून थोडं पुढे जाऊ, त्या भयावह जागेपासून थोडं दूर होऊ. पुढे आहे एक छोटंसं झाड. जे कधी दिसलंच नाही. उभं होतं इतके दिवस, गपचूप, पण त्याने आपलं अस्तित्व दाखवलंच नाही. तिथे  आजूबाजूला रांजण, बकुळी , वावळ अशी झाडं  आहेत. रांजण या झाडाला काय गोड,पिठूळ,  फळं येतात! मी खाल्ली, बरी लागली. बकुळीची फुलं वेचण्याचा नादात आणि वावळाच्या बिया वाचण्यात हे छोटं खुरटलेलं झाड कधी दिसलंच नाही. तसं ते वाटेवरच डोकावून बघत असल्यासारखं उभं आहे, येणाऱ्या जाणाऱ्याच्या अगदी दृष्टीस पडेल असं त्यांच्याकडे बघतच आहे पण तरीही ते दिसलंच नाही इतके दिवस! कमाल आहे ! मी आपली रांजणाची फळं, बकुळीची फुलं आणि वावळाच्या सुकलेल्या बिया वेचण्यात मग्न !
बाय द वे ... वावळ म्हणजे पैश्याचं झाड ! त्याच्या बिया पैशासारख्या असतात म्हणून पैश्याचं झाड असं नाव आहे त्याला. तर इतके दिवस फळं , बकुळी, वावळ अशी वळवळ करत असताना हे छोटं झाड मात्र मला गप्पपणे पाहत होतं. शेवटी एकदा थकून  त्याच्या जवळ बसले तेव्हा वर पाहिलं, अरे ! हे झाड कुठलं? म्हणून उठून त्याला हात लावला, बघतच राहिले, त्याच्या नाजूक छोट्याशा बुंध्याकडून वर आकाशात गेलेल्या फांद्या फार देखण्या दिसत होत्या, आजपर्यंत हे झाड नजरेसच पडले नाही कसे ?
झाडाच्या फांद्यांवर अतिशय सुंदर, छोटी, शुभ्र फुलेही होती, फार नाही एखाददोन डहाळ्यांनाच झुबके होते. अगदी विरक्ती आल्यासारखे, फळेही फक्त एका छोट्याशा डहाळीला. 
मग त्याचे नाव शोधले तेव्हा कळले ! अरे हा अजानवृक्ष 'अज्ञानवृक्ष' !
मालवणी मॉन्क ओरडून म्हणतो, मूढा ! तरीच तुला तो दिसला नाही... हा खरा ज्ञानवृक्ष!  तो ज्ञानवृक्ष हे कुणाला सांगू नको! तुझी वाट अडवायला त्या वाटेच्या बाजूने कुंपणं केलेले मालक तुझी वाट अडवतील. 'ज्ञानवृक्ष' ओळखलस तेव्हापासून तिथे जायला मिळालं का?
नाही... एकटं-दुकटे त्या वाटेवरून मी जात नाही.. 
का ?
भीती वाटते! 
कोण खाणार आहे तुला ? 
ती डोळेफुकटी बावली मध्ये आहे ना! 
डोळे नाही तिचं नशीबच फुटकं आहे, ती काय करणार तुझं ?
नाही मला भीती वाटते!

यामामोटो येतो ना तुझ्याबरोबर?
यामामोटो एक कुत्रा आहे, प्राणी आहे तो?
म्हणजे विश्वास नाही?
कसा ठेवू ?
मग तुझं काही खरं नाही. त्या वृक्षापर्यंत पोचायला, काळ्या डोळेफुटक्या  बावलीची भीती सोडून द्यायला हवी आणि यामामोटोवर विश्वास टाकायला हवा, तो सोबत करतो ना तुला? तिथे जाशील तिथे बाजूला येऊन बसतो.. या वाटेवर तो कायम साथ करतो, पण तो मनुष्य नाही म्हणून तुझा विश्वास नाही?
मग तुझं काही खरं नाही. 

मालवणी मॉन्क! तुला यामामोटो कसा ठाऊक? 
मला सगळं माहित आहे!
बरं, यामामोटो खरंच अतिशय गुणी कुत्रा आहे. त्याला काहीच नको. फक्त तो त्या वाटेवर येतो माझ्याबरोबर. मी  जिथे थांबेन तिथे थांबतो. जिथे तासंतास मी बसेन तिथे माझ्याबरोबर बाजूला कुठेतरी बसून राहतो. मी पक्षी बघते, पानं, फुलं, झाडं, वेली बघते, बराच वेळ माझं लक्षही नसतं, की यामामोटो कुठे आहे? पण यामामोटो कायम आजूबाजूला कुठेतरी बसून असतो. मी उठले की थोड्यावेळाने तोही उठून माझ्यामागून चालू लागतो. मला त्या वाटेवरून जाऊन परत येईपर्यँत तो माझ्याबरोबर असतो. एका विशिष्ट ठिकाणी त्याची हद्द संपते, तिथून पुढे तो येत नाही. त्याला काही नको असते. पण तो येतोच त्या वाटेवरून. 
मला काही सांगू नकोस! यामामोटोवर तुझा विश्वास नाही, तू त्याच्याबरोबर एकट्याने त्या अजानवृक्षापर्यंत जाऊ शकत  नाहीस यातच सगळं आलं. 
मला भीती वाटते ती झाडापेडांची नाही, त्या कौशी -काळ्या डोळेफुटक्या बावलीचीही नाही! मला भीती वाटते माणसांची, कुठेतरी झाडाझुडपात कुणी माणूस लपून बसला असेल तर! त्याने माझ्यावर हल्ला केला तर! मी स्त्री आहे! स्त्री आणि भीती यांचा एकसाथच जन्म होतो!
मालवणी मॉन्क म्हणतो : अच्छा ! म्हणजे स्त्री आहेस तर ! मग या जन्मी 'अजानवृक्षाची भेट नाही' 

ते जाऊ दे मालवणी मॉन्क! अरे पुढे वाटेवर आणखी काही आहे ते ऐक !
मालवणी मॉन्क म्हणतो : हा आता हे मनोरंजनासाठीच ऐकतो मी !

ऐक तर खरं!
अरे पुढे एक जागा आहे या वाटेवर तिथून भरतीच्या लाटा येताना दिसतात. आजूबाजूला खारफुटीची झाडं आहेत. या झाडांमधूनच एका ठिकाणी एक व्यवस्थित बांधलेला होड्यांना पार्क करायचा धक्का आहे. पण तिथे आता कुणीच होडी लावत नाहीत. मधेच एखादा पांथस्थ होडीवाला कडेने जातो, थांबतो थोडावेळ तेवढंच. पण हि जागा तशी निर्मनुष्य आहे. तिथून ओहोटीच्या वेळी खोल गेलेले पाणी दिसते, कुठे उघडे खडक दिसतात.
या जागेवरून समोरचा पॅगोडा दिसतो. हा पॅगोडा बुद्धाचा. त्या धक्क्याच्या जमिनीवर बसून एकटक पाण्याकडे आणि पाण्यात पडलेल्या पॅगोडाच्या सोनेरी मुलाम्याकडे बघत राहावे. पण खरी मजा भरतीच्या लाटांची.  माझ्या मनात विचार येतो की मी आणि यामामोटो एक चटई  घेऊन त्या धक्क्याच्या जमिनीवर बसावं. लाटा पाहात. नाहीतरी यामामोटो कायम थकलेला असतो. जाईल तिथे येतो पण एक अंतरावर फतकल मारून बसतो आणि सताड पडून झोपतो. कायम त्याला बस सताड पडून राहायचे असते, इतका काय दमून येतो कोण जाणे, जणू जगाचा भार आणि मानेवर जू ठेवल्यासारखा ठेवल्यासारखा दमलेला दिसतो. त्याचे डोळे थकलेले दिसतात. यामामोटो मिक्स ब्रीड आहे असे वाटते, इतर कुत्र्यांपेक्षा तो मोठ्या अंगकाठीचा आणि उंच देखणा दिसतो पण त्यामुळेच की काय कुठच्यातरी उच्च कुळाचा नाजूकपणा त्याच्यात उतरला आहे. अतिशय शांत आणि दमलेला कायम पडून असतो. पण येणार मात्र. कितीही थकायला होत असेल तरी येणार सोबत करायला. 
तर यामामोटो आणि मी 
या चटईवर बसावं. 
लाटा बघत  
आणि झोपून जावं 
झोप आली तर 
शांत वाऱ्याच्या झुळुकीने 
लाटांच्या नादाने 
आणि भरतीच्या लाटा 
याव्यात 
आणि त्यांच्याबरोबर 
त्यांनी चटईसकट 
आम्हाला वाहून न्यावं 

तर अशी मेस्मेरायझिंग जागा आहे ही. 
पुढेही वाटेवर बकुळीची पाच सहा झाडं आहेत, त्यांच्या फुलांचा सडा उन्हाळ्यात खचून पडलेला. वेचून किती वेचणार? तिथेच तो कारुण्य कोकीळही आर्त ओरडत असतो. 
जवळच शंकराची एक पिंडी असलेला आणि छोटोशी गणपतीची मूर्ती असलेला वड आहे. 

या वाटेवर मी एवढेच मार्गक्रमण केले आहे. पुढे मार्गक्रमण करायची इच्छा आहे पण ते का करू शकत नाही मी? 
सोबत कुणी नसले तर जाऊ शकेन का मी?

आज एकटीच त्या वाटेवरून फक्त माणसांचा  वावर दृष्टीक्षेपात असतो तिथपर्यंत गेले. पुढे चालायला पाय होते, पायाखाली जमीन होती पण का गेले नाही? वाट फुटेल तिकडे?

एकदा बकुळीच्या झाडांजवळ सोबत कुणीतरी असताना एक असा विलक्षण विचित्र माणूस त्या वाटेवरून गेला. हे ESP(Extra Sensory Perception ) नव्हे. कारण माझ्या सोबतच्या व्यक्तीलाही तो माणूस दिसला. 
त्या माणसाने अतिशय फाटके, मळके , पण पायघोळ कपडे घातले होते. बारीक केस होते, मागे बारीक शेंडी होती(?) असे मला वाटले. त्याच्या पाठीवर मोठे गोणपाट होते आणि ते भरलेले होते. मला तो बैरागी , अज्ञातवासी वाटला. माझ्या सोबती व्यक्तीला तो वेडा, भिकारी वाटला. तो माणूस यापूर्वी कधीही कुठंही दिसला नव्हता. नंतरही परत कधीही दिसला नाही.  
 यामामोटो सोडून इतर सगळे कुत्रे भुंकत त्याच्या मागे धावले आणि लांबपर्यंत जंगलाच्या वाटेवर त्याच्या मागून गेले आणि परतही आले, मला वाटलं चला मी नाही तर एक माणूस तरी या जंगलाच्या वाटेवरून त्या टोकापर्यंत पोचेल, काय करेल तो तिथे? समाधी की  तपश्चर्या?
पण काही वेळाने तोच माणूस त्याच जंगलात गेल्या वाटेने परत आला त्या वाटेवरून. कुत्र्यांनी परत भुंकत त्याच्या मागे लागून त्याला परतीच्या वाटेवर कुठेतरीपर्यंत सोबत केली. तो आला , जंगलाच्या वाटेवर शिरून जसा नाहीसा झाला तसा परत आला आणि जायच्या वाटेवरून दिसेनासा झाला. जणू काही तो नव्हताच कधी. परत कधीही दिसला नाही. आणि महत्वाचे म्हणजे आमच्याकडे त्याने ढुंकूनही पाहिले नाही.

मालवणी मॉन्क म्हणतो : तो Serial Killer ही असू शकेल. आणि गोणपाटात कुणाचंतरी गाठोडं !

मला तर गाठोडं घेऊन एका सेकंदात वाटेवर जाताना आणि येताना दिसला. वाट तीच फक्त..तेव्हा काहीतरी फिलॉसॉफिकल वाटलं. 

मालवणी मॉन्क म्हणतो : ते तुझ्याकडेच ठेव. 

मालवणी मॉन्क! ऐक आता, 
वाटतं टेन्ट घालावा. राहावं खुशाल. पण .... 
पण तिथे ती असतेच. 
डाकीण नाही,  मुंजा नाही, समंध नाही. जखीण नाही ,शाकिण  नाही, ती असते भीती. 

मालवणी मॉन्क म्हणतो : तू मूर्ख आहेस. तू कुठेही टेन्ट घालू शकणार नाहीस. 

पण निसर्ग मला आवडतो. तो कोण आहे मला ठाऊक नाही. जो काही आहे तो सुंदर आहे आणि भयावहही. 
मालवणी मॉन्क म्हणतो : तू निसर्गातमी जंगलात जाऊ पाहतेस, एक माकड हल्ली तुमच्या इलेक्ट्रिक टॉवर वर सतत येऊन बसत होता. तो बहुदा जंगलाला कंटाळला असावा. 
छे ! जंगलाला कंटाळला नसेल, त्याच्या सोबत्यांना कंटाळला असेल. कोण जाणे त्यालाही पॅगोडा बघायचा असेल. 

पण खरंच जंगलाची वाट आहे चमत्कारिक. आता या चार भिंतीत मी त्याचा विचार करते. समोर आभाळात काळे ढग साचलेत. सगळीकडे म्लान ग्रे, की सुंदर राखी? राखी पाखरू चि.  त्र्यं. खानोलकरांना सापडलं तो रंग का हा?

या निशब्द , स्तब्ध वातावरणात 
मरून जावं जंगलाच्या कुशीत 
झडून जावं पानासारखं
खुडून टाकावं स्वतःला स्वतःपासून 
ढग आणि सूर्य जीवघेणा खेळ खेळताहेत माझ्याशी 
वेड लागेल मला वेड !
या लाटांपासून डोळे दूर होतच नाहीत 
क्षणात रूप पालटलं लाटांचं, आभाळाचं , ढगांचं 
हा चमत्कारच नाही का?
ही सळसळ पानांची, हे चैतन्य कुठून आलं एका क्षणात !
त्या क्षणी बस संपून जावे , यापेक्षा आणखी काही नको . 
कारण कितीही अनुभवले तरीही 
अनुभवाने थिटेच 
खुजे , उणे , अर्धवट , अपूर्ण , सुन्न 
आणि जाणीवशून्य 
हे सर्व अंगावर येतंय 
सावल्या ढगांच्या , अंगावर येताहेत 
लाटा काळ्या, कबऱ्या पुढे पुढे सरकताहेत 
आणि चटईवरून मी आणि यामामोटो थेट समुद्रात 
यामामोटो थकून , आणि मीही 
वाघाने जंगलात खावे खुशाल 
पण या जंगलात वाघ नाही 
असली तर माणसे 
तरीही हे जंगल मला आवडतं  , आणि त्याहीपेक्षा आवडते ती ही जंगलाची चमत्कारिक वाट.
 



 
 


 
  









 

Tuesday, 6 June 2017

पाकोळी

निळी ज्योत
घेऊन भिजकी वात
तरल पिवळी
हलती पाकळी 

दाटे अथांग पोकळी
वाटे काळोखी काजळी
तरी भिरभिरे पाकोळी
कातरवेळी

शोधे प्रकाश तोवर
जोवर
तेवे डोळ्यात
अखंड दीपज्योत



- २५- मार्च -२०१७

Monday, 5 June 2017

वृक्षप्रकल्पातील हिरवा सोबती १५:अजानवृक्ष


मी राहते त्या परिसरात अनेक झाडे आहेत. रोज सकाळी फिरायला जाताना या झाडांचे निरीक्षण करण्याचा एक छंदच मला लागला. पण रोजच्या त्या रस्त्यावर एक असे छोटेसे झाड आहे की त्या झाडाजवळून मी कित्येक वेळेला जाऊनही त्याच्याकडे दुर्लक्ष झाले. पण कालच मी या झाडाकडे का कोण जाणे बघितले आणि ते मला खूप वेगळे वाटले. अरे अजूनपर्यंत अदृश्य होऊन आपले अस्तित्व लपवून हे कुठले झाड इथे उभे आहे. इतके रस्त्याला लागून असूनही या छोट्याशा झाडाकडे आपले दुर्लक्ष कसे झाले असा विचार मनात आला. बारकाईने बघितल्यावर दिसले की या छोट्याशा वृक्षाला अतिशय नाजूक, सुंदर पांढरी फुले फुलली आहेत.  तसेच एका डहाळीवर तर फळे सुद्धा होती. या झाडाचे नाव तज्ञांना विचारले तेव्हा कळले की हा 'अजानवृक्ष' आहे. मराठीत दातरंग(दत्रंग) असेही म्हणतात.


श्री. द. महाजन यांच्या 'देशी वृक्ष' या पुस्तकात त्यांनी अजानवृक्षाबद्धल विस्तृत माहिती दिली आहे. एकंदरीत फारसा नजरेत न येणारा हा वृक्ष जवळून  बघितला तर  एक फारच  वेगळे देखणेपण त्याच्या साध्या मूर्तीत आहे.
त्यांच्या पुस्तकात त्यांनी या वृक्षाबद्धल एक विशेष माहिती दिली आहे.  या  वृक्षाच्या काही पोटजाती आणि उपप्रकार आहेत असे मानले जाते. एकूणच झाडांचा आकार, आकृतिबंध, पानांची रचना यामध्ये अनियमितपणा असल्याने वनस्पतीचे नाव निश्चित करणे अवघड जाते. श्री. दं. नी अनेक ठिकाणी अनेक वृक्ष पाहिले आणि ते वेगवेगळे वाटण्याएवढी भिन्नता त्यांच्यात होती. हे या वृक्षाचे विशेष.
अजानवृक्षावर ज्ञानेश्वरीत, ज्ञानेश्वरांनी काय लिहिले असावे ते बघितले पाहिजे.

या वृक्षाची फांदी ज्ञानेश्वरांनी आळंदी येथे लावली होती अशी आख्यायिका आहे. तिथे असा वृक्ष आहे असे म्हणतात. तसेच मराठी विश्वकोशात त्याचा पुढील उल्लेख आढळतो. 
'श्रीज्ञानेश्वरांच्या हातातील काठी याच वृक्ष्याची असून समाधीच्या वेळी ती त्यांनी बाजूस ठेवली व त्यापासून जवळच अजान वृक्ष पुढे वाढला, अशी आख्यायिका आहे. या वनस्पतीची पाने व फळे मृत्युला जिंकण्यास समर्थ करतात, असे श्रीएकनाथांनी वर्णन केले आहे. तसेच या पवित्र वृक्षाखाली बसून वाचन केल्यास दिव्य ज्ञानाचा लाभ होतो असे समजतात. ज्ञानेश्वरी या ग्रंथात ‘अजान वृक्ष’ असा उल्लेखही सापडतो. ‘अजान वृक्ष’ याचा अजान वृक्ष असा अपभ्रंश असून सामान्य जनतेत वृक्षाप्रमाणे पसरलेल्या अज्ञानाचे रूपक त्या संज्ञेने दर्शविले असावे, असेही मत व्यक्त केले आहे. तेच वर दिलेल्या ज्ञानसंपादनाच्या कल्पनेशी जुळते.'
फळे

फुले

पाने

अजानवृक्षाच्या फांद्या
मराठी ज्ञानकोशातून पुढील माहिती मिळाली आहे :

(धत्रंग; हीं. चामरोर; क. अडक, बागरी; लॅ. एहरेशिया लेविस; कुल–बोरॅजिनेसी). सु. १२ मी. उंच व एक मी. घेर असलेला हा लहान पानझडी वृक्ष भारतात सर्वत्र व द. अंदमानात टेकड्यांवर ९३० मी. उंचीपर्यंत आढळतो. साल फिकट करडी किंवा पाढुरकी असते; पाने साधी, मोठी, मध्यम चिवट, एकांतरित (एकाआड एक) आणि अंडाकृती अथवा विविध आकृतींची असून थंडीत ती गळून पडतात. फुले लहान, पांढरी व बिनदेठाची असून पानांच्या बगलेत किंवा बाजूच्या वल्लरीवर जानेवारी–मार्च (किंवा एप्रिल) मध्ये येतात. अश्मगर्भी (आठळीयुक्त) फळ प्रथम लाल काळे, मिरीएवढे, गोलसर व सुरकुतलेले असते. लाकूड पिवळट किंवा करडे, चमकदार, मध्यम कठीण, सुबक व टिकाऊ असून कुंचल्यांच्या पाठी, आगपेट्या, आगकाड्या, बुटाचे साचे (ठोकळे), घरबांधणी, शेतकीची अवजारे इत्यादींस उपयुक्त असते. फळे व झाडांची अंतर्साल टंचाईच्या काळात खातात; पाने गुरांना खाऊ घालतात.