Tuesday 6 December 2016

काळी मखमल

काल दार उघडताच
एक काळी मखमल आत आली
जुनी ओळख असल्यासारखी
बेधडक किचनपर्यंत गेली

काळी मखमल भिरभिरती
काल बागडत होती
या भिंतीवरून त्या कोनात
अज्ञात अवकाश शोधत होती

आज मात्र होती निपचित
किचनच्या ओट्यावर
मुंग्यांची रांग अविरत
होती पोखरत

काल  जीच्या असण्याने घर उजळलं
फक्त एका दिवसाची ओळख
हे काळं फुलपाखरू
होतं कुणाला शोधत 

त्याचा सांगाडा माझ्यासमोर होता पडून
मी तो काड्यापेटीत ठेवला ,
वाचवला पोखरणाऱ्या मुंग्यांपासून
पण भिरभिरणारं चैतन्य त्यात आणू कुठून

काळी मखमल त्यानंतर अनेक दिवस मनावर दाटून राहिली 
अनेक दिवस, अनेक महिने
पण शेवटी आणखी अनेक दिवसांनी, अनेक महिन्यांनी
ड्रॉवर उघडून तीच काडेपेटी झाडाच्या कुंडीत उपडी केली



-मुंबई, २६-१०-२०१५

Friday 2 December 2016

अनटायटल्ड पोएम पाच

हे करावं ते करावं
सोडावं, धरावं, निर्माण करावं, मिटवावं
व्हॅन गॉग, वडापाव, पुस्तकं घ्यावी अंगावर
समुद्र, मांजर, पक्षी, घरं, दारं चढवावी डोक्यावर
राहिलं असेल तर हे ही घ्यावं अन ते ही उचलावं
आयुष्य, पाणी , आकाश, चपला, टेबलं, खुर्च्या, उद्योग
नाजूक रूप, साजूक तूप, तिकिटं, बिलं, अल्बम्स, टेलीस्कोप 
मस्त चहा, गर्दी, सूर्य , झाडं-बीडं, गाड्यांचे लाईट्स, किंगफिशर
शोकेस मधल्या वस्तू, किशोर कुमार ,लहानपणीचा जुना स्वेटर
शेवटी घोंगडं घेऊन लपून बसावं भीती वाटून
की आपण कुणाच्या नजरेस पडू नये
कानोसा घेत घेत  की कुणी आपल्याला धरू नये
अस्वस्थ, अशांत होऊन वेताळासारख्या
कर्र कर्र चपला वाजवत चालू पडावं
जखमेवर चोळायला तेल शोधत फिरत राहावं
पळत राहावं की कुणाच्या नजरेस आपण पडू नये
कानोसा घेत घेत की कुणी आपल्याला धरू नये
या चिमण्या बिनबोभाट नुसत्या
हल्ला करून सगळी बिस्किटं फस्त करतात
ठेवलेल्या खाण्या,पाण्यावर टणाटण उड्या मारीत येतात,जातात
यांना धरायला कुणी कसं येत नाही. 

-कांदिवली, मुंबई, २० नोव्हेंबर २०१६

Thursday 1 December 2016

अनटायटल्ड पोएम चार

मी आज हास्यास्पद झालो, असं ऐकलं आणि धावलो
तसा मी अनाकलनीय वाटतो
पण मी तसा नाही, खूप साधासुधा आहे हो मी !
पटत नसेल तर चिमणीला विचारा

तुम्हाला मी आकळत नाही
म्हणून मला किती विशेषणं पडतात
शॉकिंग, अकाली, करूण, चटका लावणारा
विदारक.

पण आज मी हास्यास्पद झालो
म्हणून गपचूप तिथे गेलो
कानोसा घेतला तर
आजूबाजूचे चुकचुकत होते

काही कुजबुजत होते
काही तर मला
आतूनच हसत होते
उगाच नसती थेरं, म्हणत होते

सुखासुखी असलेलं आयुष्य
लोकांना,
घास मिळवण्याची धडपड
आणि याना हे सुचतं

नीट मन लावून जगता येत नाही?
जीवनाचा साधा व्यवहारसुद्धा कळत कसा नाही?

कसलं टेन्शन, कसली भ्रांत
काल हसतखिदळत होती ही व्यक्ती
ना जबाबदारी,
ना कसली खंत

रात्री फोनवरही बोलली तासभर
म्हणाली दूध नासलं
आता दूध नासलं
हे काय कारण झालं?

कानोसा देऊन मी हे ऐकलं आणि संतापलो
धडधडत गेलो आणि मेलेल्या व्यक्तीच्या
बकोटीला धरून सणसणीत कानाखाली लावली
ती खाली पडली, उठून तिने तरीही मला गच्च मिठी मारली

भांबावून गेलो, क्षणभर थांबलो
कारण विचारलं तिला
म्हणाली, जबाबदारी पेलवत नाही
विचारलं कसली ? तर म्हणाली जगत राहण्याची

मी वैतागलो, का असं केलंस?
मला उगाच हास्यास्पद ठरवलंस
म्हणाली, लोकंच ती,
त्यांचं काय मनावर घ्यायचं

कुणी चुकचुकणार, कुणी हळहळणार, कुणी हसणार
त्यांच्या बोलण्यावरून का आपण ठरवणार

चाल जाऊ आता बरोबरच
जेव्हा तेही तुझं बोट धरून येतील 
तेव्हा मलाच काय
ते तुलाही विसरतील

मी म्हणालो, पण तुला काय घाई मला भेटण्याची?
म्हणाली एकटं वाटत होतं मला
वैतागलो, म्हणालो, तुला एकटेपणा वाटत असला तरी 
मला नको कुणाची सोबत

नाही लागत कुणाची साथ, मी एकटाच बरा
चिमणी कशी सुईसायडल जम्प मारते ,पण मला न भेटता, ती भुर्रकन वर जाते
अलगद, तिला ओळख आहे माझी, तिला तरी विचारायचंस
आज तुझ्या मुर्खपणामुळे मी हास्यास्पद ठरलो खरा

-कांदिवली, मुंबई, १-डिसेंबर २०१६  

अनटायटल्ड पोएम तीन

इथून व्ही. टी. स्टेशन
तिथून ट्रेनचा प्लॅटफॉर्म
तिथून ट्रेनची बर्थ,
तू असलेल्या शहरापर्यंत

मग, त्या शहराचे स्टेशन
तिथून पायीच मैलोन् मैल 
मग गाठीन तुझा घाट
बसून राहीन निर्मनुष्य
होण्याची बघीन वाट

चालत राहीन तीरावरून
चांदण्या घेत अंगावर
आळवत राहीन तुला
तुझी शक्ती दे ओंजळभर

खडक असून मन
तडकत कसं नाही
कोण जाणे कोण
त्याच्या भेगा भरतच राही

तू असशील कुणी,
असह्य ओढ मला लावून 
पण इतरही अनेक तीरावर आहेत
डोळयात माती फेकत आहेत

तीरावरची वेली,फुलं खूप चिवट
पायात अडकलीत,ती आधी खणते
तुझ्याच कातळावर
माझा खडक फोडून टाकीन म्हणते

मग उडी थेट
त्यानंतर तुला मी अन मला तू
याच ठिकाणी ठरवली आहे
घ्यायची तुझी भेट

-कांदिवली, मुंबई, १-डिसेंबर-२०१६









अनटायटल्ड पोएम दोन

काळोख किती रोमँटिक असतो
ते खिडकी सांगते, दिवा ऐकतो
आणि तो स्वतः विझून जातो

परतणाऱ्या सूर्यासाठी
मग शेवटी काळोखही विझतो
स्वतःच्या परतीची वाट बघत बसतो

सूर्य बुडतो, पुन्हा काळोख खिडकीपाशी येतो
भेटणे, विझणे, परतणे, बुडणे
सातत्याने चालूच

आज पण सूर्य पुन्हा बुडून गेला
आणि होडी एकटी पडली
नेहमीसारखीच

ती दूरवर दिसणारी
एकच दिवा असलेली
अधांतरी सरकणारी 

काळ्याशार काळोखातील 
माझी सखी
जिवाभावाची

तिची गती
माझी गती
एकसारखी



-कांदिवली, मुंबई , २२ नोव्हेंबर २०१६