Friday 30 September 2016

जगद्व्यापी वटवृक्ष

कोकणातील, मालवण तालुक्यातील, कुसरवे या माझ्या मावशीच्या गावी घराच्या जवळच  दोन जूनी आणि भव्य अशी वडाची झाडं आहेत. दोन्ही झाडे साधारण शंभर वर्षे तरी जूनी असावीत. मावशीच्या घरातल्या दोन पिढ्यांनी तरी ती झाडं बघितलेली आहेत. एका पावसाळी संध्याकाळी मी ही झाडं बघायला गेले होते. कोकणातला पाऊस म्हणजे मुसळधार आणि काळोखी. संध्याकाळच्या वेळी नुकताच पाऊस थांबला होता आणि सर्वत्र निथळून गेलेले, काळवंडलेले, धीरगंभीर वातावरण होते. घरापासून या झाडांकडे जाणाऱ्या पायवाटेला दोन फाटे फुटतात. एक जातो तळीच्या वडाकडे. आणि दुसरा फाटा एका पाणंदीतुन 'वडाची गाळी' इथल्या वडाकडे जातो.

तळीचा वड
इतक्या वर्षात ही झाडं मी कधीच पहिली नव्हती, ना कुणी मला त्यांच्याविषयी सांगितले होते. पण कुठूनतरी विषय निघाला आणि त्यावेळी आईने मला या झाडांविषयी सांगितले , म्हणून यावेळी त्यांच्या घरी गेले असता ती झाडे बघायचीच असे ठरवले. पावसाच्या चिखलात जाऊन मला झाडं दाखवायला आई थोडीशी नाखुषच होती पण शेवटी ती तयार झाली. आणि कुणीही न बोलावता, तयार होता मावशीच्या घरचा 'टाग्या' कुत्रा. आम्ही त्या पायवाटेला लागतातच तो आमच्यापुढे धावू लागला. या कुत्र्याचे पाय एवढे लांब आहेत की 'टाग्या' ऐवजी त्याचे नाव 'टांग्या' च असायला हवे होते. पहिल्या फाट्याने आम्ही तळीच्या वडाकडे गेलो. इथे पूर्वी एक पाण्याचे मोठे डबके होते, तिलाच तळी म्हणत. आईच्या लहानपणापासून ही तळी आणि बाजूचा हा वड तिने पहिला आहे. माझी मावशी सर्वात मोठी, तिचे लग्न झाले तेव्हा आई आठ-दहा वर्षांची असेल, त्यामुळे ती इथे तिच्या लहानपणी येत असे. त्या काळी या तळीवरूनच पाणी भरून घरी न्यावे लागे. आता या तळीवर विहीर बांधलेली आहे. हि विहीर साधारण तीस-पस्तीस फूट व्यासाची असेल. आता पावसाच्या पाण्याने ती तुडुंब भरलेली होती. तिच्यावरच झाडाच्या फांद्या लोंबकळत होत्या. या तळीच्या बाजूला तेवढ्याच किंवा त्यापेक्षा थोड्या जास्त विस्ताराने हे वडाचे झाड पसरलेले आहे. वडाच्या झाडाचे वैशिष्ट्य म्हणजे त्याचा बुंधा मोठा नसला तरी पारंब्या पुन्हा जमिनीत घुसून त्यापासून झाडाचा विस्तार होतच राहतो. जर जागा मिळाली तर आसपासचा परिसर व्यापून ते कित्येक किलोमीटर विस्तारू शकते.
पूर्वीची 'तळी' आणि आताची 'विहीर'

कलकत्ता येथील ग्रेट बनियान ट्री

अशी अवाढव्य विस्ताराची वडाची झाडे भारतात अस्तित्वात आहेत. त्यापैकी एक आहे कलकत्त्याच्या जगदीशचंद्र बोस बोटॅनिकल गार्डन मधील वडाचे झाड, हे झाड अडीजशे वर्षांहून अधिक जुने आहे. हे झाड जगातील सर्वात मोठे (विस्तार असलेले) झाड आहे. याचा विस्तार एवढा मोठा आहे की पाच हजार माणसं त्याच्या छायेखाली विश्रांती घेऊ शकतात. एकदा एक ब्रिटिश लेखक Brian Aldiss फेरीबोटने हुगळी नदीतून बोटॅनिकल गार्डन बघायला गेले होते, तेव्हा हे प्रचंड विस्ताराचे झाड त्यांच्या दृष्टीस पडले. थॉमस हक्सले या ब्रिटिश बायोलॉजिस्टने या झाडाबद्धल एका लेखात लिहून ठेवले आहे की हे झाड जग व्यापू शकतं. Brian Aldiss यांनीही हा लेख वाचला होता. या वटवृक्षाने आणि त्याच्या जग व्यापून टाकण्याविषयीच्या कल्पनेने ते एवढे प्रेरित झाले की त्यातून त्यांनी Hothouse नावाची वैज्ञानिक कादंबरी लिहिली.

तळीचा वड
तळीजवळचे हे झाड सुद्धा आपल्या फांद्यांचा अमाप विस्तार घेऊन उभे आहे, बहुतेक जग व्यापण्याची इच्छा घेऊनच. संस्कृतमध्ये वडाच्या झाडाला 'बहुपदा' म्हणतात. वडाच्या झाडाला भ्रमंतीत रस असावा. म्हणूनच आपले पारंब्यांसारखे पाय पुढे पुढे रोवून ते पुढे सरकत असते. थॉमस हक्सले यांची त्याची जग व्यापण्याची कल्पना खरंच विलक्षण आहे. जर त्याला असेच अडथळ्याविना पुढे पुढे जायला दिले तर हे झाड जग फिरायला निघाल्याप्रमाणे पावले पुढे टाकीत चालेल बहुतेक. तळीजवळचे हे झाड वर्षनुवर्षे धीरगंभीरपणे याच प्रतिक्षेत असावे. माणसाने उभारलेली शिल्पं, मंदिरे आजवर अनेक बघितली, पण हे निसर्गाने उभारलेले अवाढव्य जिवंत शिल्पच. त्यापुढे आपण खुजे होऊन उभे राहतो. पावसाळ्याच्या पाण्याने अधिकच गडद झालेल्या काळ्या फांद्या. काळोख पडत असल्याने या झाडाजवळ अधिक थांबून त्याला निवांतपणे  निरखता आले नाही. वड, पिंपळ ही भारतीय परंपरेतील धार्मिकतेशी जोडलेली झाडं. काहीशी गूढाने भारलेलीही. अश्या या भव्य झाडांची स्थानं लोकांच्या श्रद्धेची स्थानं आपोआप बनत जातात. हा तळीचा वडही त्याला अपवाद नाही.

'वडाची गाळी' इथला वड
या झाडाचा निरोप घेऊन आम्ही दुसऱ्या 'वडाच्या गाळी' कडे निघालो. 'गाळी/गाळवी' किंवा 'गाळू' म्हणजे शेत, या वडाच्या समोर पुढे दूरवर पसरलेले शेत आहे. म्हणूनच या जागेला 'वडाची गाळी' म्हणतात. तिथे जाताना मध्ये एक छोटीशी पाणंद लागते. या पाणंदीच्या रस्त्याला झाडीझुडपात पेंडकुळ, नांगरखडी यांची तांबडीलाल फुलं डोकावत होती. मधेच काही जंगली सातभाई पक्षी झाडीत कलकलाट करत होते. शेवटी आम्ही वडाच्या झाडापाशी आलो. हे वडाचे झाड मात्र दोन्ही बाजूने बघता आले. तळीचा वड फक्त एकाच बाजूने बघता येतो. कारण दुसऱ्या बाजूला दाट शेत, आणि चिखल होता. त्यामानाने 'वडाच्या गाळी' चा वड आणि त्याच्या आसपासचा परिसर, दोन्ही बाजूने झाडी किंवा शेत नसल्याने चांगला नजरेखालून घालता येतो. पण माणसाचे धार्मिक आक्रमण या झाडालाही चुकलेले नाही. या वडाच्या एका बाजूला तुळशी वृंदावन बांधलेले आहे आणि दुसऱ्या बाजूला एक व्यवस्थित बांधून काढलेली  छोटेशी पाण्याची डोणी आहे. या डोणीत गणपती विसर्जन करतात. पण एक खरंच चांगलं आहे की या झाडांना माणसांच्या धार्मिक भावभावनांत स्थान मिळाल्याने ही झाडे नष्ट होण्यापासून तरी वाचली आहेत.

'वडाची गाळी' येथील तुळशी वृंदावन 
संध्याकाळच्या वेळी, आणि पावसाच्या वातावरणाने या दोन्ही झाडाभोवतालचा अवकाश खूपच गहन वाटत होता. पारंब्यांचे  जडजंजाळ घेऊन बसलेले आहेत म्हणून या वृक्षांना  ध्यानस्थ बसलेले दाढीवाले ऋषी म्हणावे की त्यांच्या पारंब्या रोवून चाललेल्या फिरस्तीमुळे त्यांना भ्रमण करणारे संन्यासी म्हणावे कोण जाणे. त्यांच्या विस्तीर्ण पारंब्यामध्ये शांतता गोठून राहिल्यासारखी वाटत होती. दुर्दैवाने पावसामूळे एकही पक्षी मात्र मला या झाडांवर दिसला नाही. खरे तर वडाची भव्य झाडे म्हणजे पक्षांचे हक्काचे घर. पुन्हा केव्हातरी चकचकीत सकाळी, या झाडांचे काळोखी, शांत रूप पालटले दिसेल, तेव्हा अनेक पक्षी यांच्यावर बागडतही असतील.

कलकत्त्याचा 'ग्रेट बनियान ट्री' अजून बघितला नाही. पण तूर्तास या भव्य, धीरगंभीर झाडातला सर्वव्यापी अवकाश मात्र अनुभवता आला. एव्हाना खूपच अंधार झाला होता. त्यामुळे 'टाग्या' च्या मागून आम्ही घरची वाट धरली.  

Wednesday 28 September 2016

पेंडकुळ, नांगरखडी आणि पेवा

गणपतीनिमित्त  कोकणात गेले असताना अनेक वनस्पती वारंवार समोर येत राहिल्या म्हणून त्यांच्यासंबंधी लिहावेसे वाटले. कोकणामध्ये  पावसाळ्यात जिकडेतिकडे विपुल प्रमाणात दिसणाऱ्या वनस्पती म्हणजे  हरणं(पिवळ्या रंगाची नाजूक फुले असलेली वनस्पती), तेरडा, पेवा, नांगरखडी. त्याचबरोबर पेंडकुळ हे तर बारमाही फुलणारे कोकणातले झुडूप. 
त्यापैकी सर्वात आधी पेंडकुळ, नांगरखडी आणि पेवा यांच्याविषयी.

पेंडकुळ

कोकणात ज्याला पेंडकुळ म्हणतात ते आहे  Ixora coccinea. मराठी नाव आहे बकोरा, ही वनस्पती shrub (झुडूप) या प्रकारात मोडते.अगदी लहानखुरे. कोकणात रानावनात इतर झाडझाडोऱ्यात छोटे झुडूप बनून ते वाढते. लांबट गर्द हिरवी चमकदार पाने असतात. या छोट्याश्या  झाडाचे वैशिष्ट्य म्हणजे त्याची चांदणीसारखी नाजूक तांबडी फुले, आणि चमकदार लालभडक फळे. या लाल फुलांफळांमुळेच ते गच्च झाडीत देखील ते चटकन ओळखता येते. लालभडक रंगामुळेच याला इंग्रजीत 'फ्लेम ऑफ द वूड्स', 'जंगल फ्लेम' म्हणत असावेत. इंग्रजीत 'जंगल जिरॅनियम' असेही याचे नाव आहे. या झाडाची पाने पेरावर समोरासमोर दोन असून  त्यांना सामायिक उपपर्णे असतात. झाडाला बारमहा फुले येतात.
पेंडकुळाचे फुल अतिशय सुंदर. फांदीच्या टोकाशी फुलांचा गुच्छ असतो. लांबसडक दांडीला चार निमुळत्या टोकाच्या नाजूक पाकळ्या असतात. पेंडकुळाचे पाच पाकळ्यांचे फुल सुद्धा असते म्हणे पण ते अतिशय दुर्मिळ असते अशी  गावातल्या लोकांची समजूत आहे. असे फुल मिळणे अत्यंत भाग्याचे समजले जाते. बहुतेक या या फुलविषयीच्या मिथचा प्रकार आहे. लहानपणी, मे महिन्याच्या सुट्टीत गावी गेल्यावर आम्ही कधीकधी शेजारच्या गुरे चारणाऱ्या मुलांबरोबर फिरायला जाऊ तेव्हा ती मुले या फुलांचे गुच्छ दिसले की हमखास पाच पाकळ्यावाले फुल शोधत, आणि आम्हालाही शोधायला लावत.

पेंडकुळाचे फळ (फोटो सौजन्य :विकिपीडिया)
फळे देखील दिसायला अतिशय सुंदर. खायला करवंदांइतकी मजेदार, रसाळ नसली तरी  खाण्यालायक असतात. ही फळे कुठले वन्य प्राणी, पक्षी खातात त्याचे मात्र निरीक्षण करता आले नाही. 

कोकणात फक्त लाल रंगाच्या फुलांचे झाड आढळते. आणि विशेषतः रानझाड म्हणूनच ते ओळखले जाते, पण याच्या पानांच्या, फुलांच्या आणि फळाच्या सौन्दर्यामुळे ते शहराल्या उद्यानात, (आणि  परदेशातही) बागेत शोभेचे झाड म्हणून लावतात. या बागेतील जातींच्या फुलांचा रंग पिवळा, नारिंगी, गुलाबी देखील असतो. कोकणात मात्र ते रानातच उपेक्षितपणे वाढते. गावाकडे पेंडकुळाचे मूळ औषधात वापरतात. मला आठवते , लहान असताना आमच्या या गावातील घराशेजारी दाजी तोंडवळकर म्हणून एक वृद्ध गृहस्थ राहत होते, त्यांना वाडीतील सगळे 'डाक्टर' म्हणत. खरोखरीच त्यांना जंगलातील औषधी वनस्पतींचे सूक्ष्म ज्ञान होते. ते या पेंडकुळाची, सातविणीची, कुड्याची पाळंमूळं शोधून आणीत असत. माणसांच्या साध्या आजारांबरोबरच गाईगुरांच्या आजारावर देखील उपकारक ठरणाऱ्या वनस्पतींची त्यांना माहिती होती. त्यांच्याकडून ती माहिती कुणीच घेऊन जतन केली नाही याची आता खंत वाटते. आज ते असते तर या  पेंडकुळाच्या औषधी गुणांबद्धल त्यांनी नक्कीच सांगितले असते. 

पेंडकुळ बहुदा आशिया खंडात, भारत, श्रीलंका आणि प्रशांत महासागरातील Pohnpei, Kosrae या काही बेटांवर आढळते. इथल्या लोकांचे या वनस्पतीविषयी काही समज आहेत. Pohnpei मध्ये या वनस्पतीच्या काठ्या पारंपरिक  नृत्यात वापरल्या जातात. Kosrae मध्ये या वनस्पतीवर  एखादा  पक्षी बसला असेल तर त्याची शिकार करणे निषध्द मानतात. 
नांगरखडी
'नांगरखडी' ही पावसाळ्यामध्ये रानातील  झाडाझुडपांवर वाढणारी वेल.  पोपटी रंगाची पाने आणि  जर्द पिवळ्या,  नारिंगी आणि लाल रंगात विभागलेली फुले. फुलांच्या पाकळ्या झळाळत्या ज्वाळांच्या आकाराच्या. त्यामुळे ही फुले वैचित्र्यपूर्ण असूनही अतिशय आकर्षक दिसतात. हिच्या सौन्दर्यावर भाळून काही लोकांनी,विशेषतः परदेशात आपल्या बागबगिच्यात हिला स्थान दिले आहे. कोकणात हिला 'नांगरखडी' म्हणतात. का हे सांगणे  तसे कठीणच आहे. बहुदा नौकेच्या नांगरासारखी तिची फुले असल्याने तिला 'नांगरखडी' हे नाव पडले असावे. तिची इतर भारतीय नावं देखील मजेशीर आहेत. मराठीत तिला 'कळलावी' असे म्हणतात. यामागचे कारण तिच्यातला औषधी गुण हे आहे. हिच्या कांद्यात गर्भाशयास वेणा  आणणारे द्रव्य असते त्यामुळे तिला 'कळलावी' असे नाव मिळाले आहे. हिंदीमध्ये तिला 'करीहारी' म्हणतात. 
या वेलीचा कांदा भुईत शिल्लक राहतो. पावसाळ्यातच फक्त त्याला खोडे, पालवी , फुले येतात. नंतर हा विस्तार झडून जातो. पुन्हा पावसाळ्यात सगळा विस्तार उत्पन्न होतो. सहा पाकळ्यांचे फुल आपले तोंड खाली वळवून फुलते. या सुंदर फुलावरून आणि खाली तोंड करून राहण्यावरून या वेलीला 'विलोमकल्लारी' असेही नाव पडले आहे. 'कल्लार' म्हणजे तांबडे कमळ आणि 'विलोम' म्हणजे उलटे. फुलाची टोके तांबडी- नारिंगी, मध्ये पिवळी आणि तळाला हिरवी. असे झळाळते आकर्षक रंग या फुलाला लाभले आहेत. हि फुले चार दिवस टिकतात. 
परदेशात हिची लागवड बागेत करतात, हिला Gloriosa Lily, Fire lily, Flame lily अशी इंग्रजी नावे आहेत. हिच्यावर भारतात सत्तरच्या दशकात पोस्टाचे तिकीटही निघाले होते. 


'पेव' किंवा कोकणातला 'पेवा' हे आणखी एक पावसाळ्यात सर्वत्र भरघोस उगवणारे छोटेसे झाड. शास्त्रीय नाव 'Cheilocostus speciosus' आणि इंग्रजीत त्याला 'Crepe Ginger' असे म्हणतात. पण आल्याच्या झाडांपेक्षा याच्या पानांची रचना वेगळी असते.

पेवा
भारत आणि दक्षिण आशिया खंडातील  देशात हे झाड आढळते. कोकणात त्याच्या विपुलतेमूळे त्याचे सौन्दर्यदेखील बरेचसे दुर्लक्षिले गेले आहे. विशेषतः पावसाच्या पाण्याने निथळून गेल्यानंतर जेव्हा या झाडाच्या लांबलचक पानांवर सूर्यप्रकाश पडतो तेव्हा त्याचे चमकणारे सौन्दर्य विलोभनीय असते. पाने जाडसर आणि लांब असतात, एकेकट्याच फांद्या असतात आणि फांद्यांचा रंग लाल-तपकिरी असतो. फांद्याच्या टोकाला गडद-लाल-तपकिरी  अश्या एकमेकांना जोडलेल्या अनेक देठातून पांढऱ्या तलम रंगाची मोठी फुले येतात. ही फुलेही अतिशय सुंदर दिसतात. छोटा शिंजीर (Crimson Backed Sunbird) या फुलांच्या  देठातील मध खाण्यासाठी येतो. इतरही प्रकारचे सनबर्ड्स या झाडाच्या फुलांवर आपली हजेरी लावतात. आमच्या घरच्या पाठीमागेच भरपूर पेवा उगवल्याने मला खिडकीतूनच अनेक पक्ष्यांचे या फुलावर येणे बघता आले. हे सूर्यपक्षी फुलांच्या आत चोच खुपसताना दिसले नाहीत तर ते लाल-तपकिरी देठातच आपली सुईसारखी चोच खुपसून मध चाखतात. हे छोटेसे झाड देखील औषधी असून त्याचा ताप, पोटातील कृमी, अस्थमा, ब्रॉन्कायटिस इ. आजारांच्या औषधात प्राचीन आयुर्वेदात वापर केला गेला आहे. 

Tuesday 27 September 2016

निसर्गोत्सव

'निसर्गोत्सव' हे दुर्गा भागवतांचे अतिशय छोटे आणि छान पुस्तक वाचनात आले. हे पुस्तक ९६ सालातील आहे. यातील काही लेख नंतर 'भावमुद्रा' या पुस्तकात समाविष्ट केले गेलेले आहेत. दुर्गा भागवत म्हणजे अशा लेखिका ज्यांच्या लेखणीतून सरस्वतीने साक्षात स्वतःच शाई बनून शब्दरुपी पाझरावे. इतकं सहज, सोपं आणि सुंदर ललित लेखन मराठीत क्वचितच कुठे आढळेल. म्हणून त्यांची पुस्तकं वाचणं म्हणजे शब्दानंद अनुभवणं. हे पुस्तकही तसंच आहे. याच्या प्रस्तावनेत त्या म्हणतात कि 'या पुस्तकाचे नाव मी दिलेले नाही. माझ्या संपादकांनीच ते मुक्रर केले आहे. संपादक माझे वाचक आहेत आणि साहित्य निर्मितीत वाचकाचाही सहभाग असतो असे मानणारी मी आहे.'

दुर्गा भागवतांच्या बहुतेक लेखांत निसर्ग असतोच, किंबहुना निसर्गाला साथीला घेऊनच त्या लेखन करतात. प्रत्येक गोष्ट इतक्या रसिकतेने अनुभवणे आणि त्याचबरोबर अनेक ठिकाणचे संदर्भ देऊन वेगवेगळ्या गोष्टींशी त्याचा संबंध दाखवणे ही  त्यांच्या लेखनाची खासियत आहे. त्यामुळे त्यांचे लेखन ललित असूनही अनेक स्तरांना स्पर्शून जाते. त्यांचे अभ्यासपूर्ण लेखन तर समृद्ध आहेच पण त्या स्वतःच्या अनुभवांविषयी देखील तितक्याच समर्थपणे लिहितात. 'वाळूतील पाउले' या लेखाबद्धल आपला सानेगुरुजींबद्धलचा अनुभव त्या प्रस्तावनेत लिहितात. साने गुरुजींनी त्यांना त्यांच्या 'साधना' अंकासाठी लेख लिहिण्यावर वारंवार सुचवले होते. पण तसा लेख त्या काही लिहू शकल्या नव्हत्या. मग एके दिवशी मात्र त्यांना असा भास होऊ लागला की साने गुरुजी लेखासाठी धरणे धरून बसले आहेत आणि त्यामुळे  त्या लिहू लागल्या. लेख रात्रंदिवस बसून लिहीत होत्या. लेख साने गुरुजींना पाठवूनच त्या स्वस्थ बसल्या. गुरुजींचे लेख  पोचल्याचे पत्रही आले. त्यात गुरुजींनी 'वाळूतील पाउले' ऐवजी 'काळाची पाउले' असे लिहिले होते. ते पत्र ज्या दिवशी दुर्गाबाईंकडे पोचले त्याच्या  दुसऱ्या दिवशीच साने गुरुजींनी आत्महत्या केली. असा विलक्षण योगायोग असलेला अनुभव त्या सांगतात. तसेच आणखी एका 'वात्सल्याचा अविष्कार' या लेखाबद्धलही त्या लिहितात. हा लेख प्रस्तुत पुस्तकात नाही. स्वतःचे पिल्लू गमावलेले एक माकडाचे जोडपे पोर मिळवण्यासाठी (मग ते कुठल्याही प्राण्याचे असो) कसे धडपड करते, या स्वतः बघितलेल्या अनुभवावर त्यांनी हा लेख लिहिला आहे. लेखातले माकडाचे जोडपे मांजराचे पिल्लू घेऊन त्याला वाढवू लागले. ते पिल्लूही जेव्हा मरून गेले तेव्हा दुर्गाबाईंच्या घरातीलच त्यांच्या आत्याची तान्ही मुलगी पळवण्याचाही त्या जोडप्याचा बेत होता. पण घरातल्या खंड्या कुत्र्यामुळे तो बेत सफल झाला नाही. 'श्रावणातल्या दुपारी' या लेखाविषयी त्या लिहितात की अळंबी(भूछत्र) त्यांनी लेख लिहिताना खाल्ली नव्हती, पण लेख जेव्हा या पुस्तकातून प्रकाशित होत आहे तेव्हा मात्र त्यांनी अळंबीची चव चाखली होती. ज्या काश्मीरच्या हॉटेलमध्ये त्यांनी अळंबीचा आस्वाद घेतला त्याबद्धल त्या आपला अनुभव सांगतात. 

शेवटी त्या म्हणतात 'इतक्या वर्षांपूर्वीचे हे लेख आहेत. त्यात निसर्गाला धरून  येणाऱ्या सांस्कृतिक जीवनाचेही दर्शन आहे. निसर्ग म्हणजे प्रकृती. जे असते ते. किंवा मूळ स्वरूप आणि संस्कृती म्हणजे उपयोगाच्या दृष्टीने घडवलेली कर्मसृष्टी. त्यामुळे हे लेख वाचल्यावर संपादकांनी केलेली निवड मला स्वीकारार्ह वाटते.'

'वाळूतील पाउले' या लेखात संध्याकाळच्या वेळी समुद्र किनाऱ्यावर भेटलेल्या तांदूळमणी वेचणाऱ्या एका गरीब लहान मुलीवर त्या लिहितात. तिच्या विषयी, तांदुळमण्याविषयी लिहितानाही सभोवतालचा निसर्ग त्यांच्या नजरेतून सुटत नाही. थंडीच्या मोसमातील संध्याकाळच्या वेळचा समुद्रकिनारा त्यांना आल्हाददायक वाटत नाही. त्या लिहितात 'संध्याकाळच्या वेळी विशेषतः कृष्णपक्षात पाण्याचा शेजार नेहमीच भयाण वाटतो, मग आता तर क्षितिजाच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत भरलेला समुद्र पातळ काळोखातून जसा काही हिसकाळून निघत होता. लाटांचा तोच आवाज रात्रीच्या हुंकाराप्रमाणे वाटत होता. सारी पंचमहाभूते जणू काही सृष्टीपासून अलग होऊन दूर दूर आपल्या स्वतःच्या प्रेरणेने वावरत होती. स्वतःची भाषा बोलत होती. मानवाविरुद्ध कट करत होती. नेहमीच्या परिचयाचे ते स्थळ, पण किती वेगळे, अनोळखी वाटत होते.' निसर्गाच्या या अवस्थेत त्यांना खूप उदास वाटतं त्यातूनच त्या वाळू तुडवत चालल्या होत्या. चालत चालत त्या अश्या ठिकाणी आल्या जिथे मुलं खेळत होती. तिथे शंख, शिंपले आणि तांदुळमण्यांची पखरण पडली होती. तांदूळमणी म्हणजे नक्की काय हे मला माहित नाही. कदाचित ते मी बघितले आहेत पण यांनाच तांदुळमणी म्हणतात हे मला माहित नाही. या तांदुळमण्यांविषयी त्या लिहितात 'लहानपणी कितीतरी तास तांदुळमणी वेचण्यात आम्ही घालवत असू, बाहुलीचे दागिने करायला तांदुळमण्यांसारखे मणी नाहीत. किती नाजूक, किती पांढरे!  वाळूत बसले की नकळत माझे हात तांदुळमणी टिपू लागतात आणि आजूबाजूचा विसर पडतो.' तिथे वाळूत बसून लहान मूल होऊन त्या तांदुळमणी वेचू लागल्या, तेव्हा त्यांच्याजवळ एक सावळी, किडकिडीत, आठनऊ वर्षांची मुलगी येऊन त्यांच्याशी जुनी ओळख असल्यासारखी बोलू लागली. आपली कहाणी त्यांना सांगू लागली. लहानपणी आईवडिलांचं छत्र हरवल्याने तिच्या बोलण्यात प्रौढपणाची झाक होती. चुलत्यांच्या घरी त्यांचा मुलगा सांभाळत ती राहत होती. शाळा नाही. अपुरं अन्न. गाल बसलेले. ओठ सुकलेले. वेणीफणी कित्येक दिवसात न झालेल्या अश्या त्या मुलीचे डोळे मात्र चमकदार होते. खूप दुःखे पचवून समंजस झालेले होते. तांदुळमण्यांचीच काय ती दौलत तिच्यापाशी होती. ती तिने लेखिकेला देऊ केली. तिने आपली गोष्ट लेखिकेला सांगितली. तिला आणि त्या छोट्या मुलाला पुरीभाजी, गंडेरी , पेपरमिंट असं बरंच काही लेखिकेने खाऊ घातलं. 'उद्या तुमच्या भाचीला पण आणा, पुष्कळ तांदुळमणी देईन तुम्हाला' असं सांगून ती मुलगी कडेवरच्या मुलाला घेऊन निघून गेली. त्यानंतर मात्र अनेकदा संध्याकाळी चौपाटीवर शोधून सुद्धा ती मुलं कधीही सापडली नाहीत. जास्त खाल्लं म्हणून त्यांचं काही बरंवाईट तर झालं असावं की लोकांकडून घेऊन खाल्लं म्हणून शिक्षा झाली असावी अशी विचित्र हुरहूर दुर्गा भागवतांच्या मनाला मात्र कायमची लागून राहिली.

'श्रावणातल्या दुपारी' हाही एक सुंदर लेख. निसर्गाचे, निसर्गात घडणाऱ्या प्रत्येक साध्या साध्या गोष्टीचे तरल पण निर्विकार वर्णन करणारा रिपोर्ताज. या लेखातला प्रत्येक शब्द निसर्ग साक्षात समोर मांडणारा. ध्वनी, प्रकाश यांची बदलते रुपे. पावसामुळे, वाऱ्यामुळे, उन्हामुळे निसर्गात होणारे सूक्ष्म बदल. झाडे, पाखरे यांच्या हालचाली यांचे अतिशय सुंदर अवलोकन या लेखात आहे. 'केळीच्या मधल्या कोंबाची सुरळी सोडली तर बाकीची पाने वाऱ्यापावसाने फाटून फाटून त्यांच्या चिरफळ्या उडाल्या होत्या.' 'केळीच्या बुंध्याशी असणाऱ्या गुलबक्षीच्या झाडावरच्या कळ्याही हा उन्मत्त नाच आ वासून पाहू लागल्या होत्या.' माका, राजहंसाचा वाटोळ्या सॅटिनसारख्या रेशमी पानांचा आंबट पाला, ओव्याची पाने, टाकळा अश्या खेड्यातील भाज्यांवर देखील लिहिले आहे. पावसाळ्यात उड्या मारणाऱ्या बेडक्या त्यांना त्रास देऊन जीव रमवणारी उनाड पोरे यावरही लिहिले आहे. तसेच भूछत्रांवरदेखील अतिशय छान लिहिले आहे. 'मुचकुंद (कनकचंपा) या झाडाच्या उथळ ढोलीत केव्हातरी त्यांचे बी पडून ती उगवली होती. शेवंतीसारख्या पिवळ्या रंगाची.' पण त्या उनाड पोरांनी ती सुंदर भूछत्र भराभर तोडली, हुंगली, आणि शेवटी कोळपून गेलेली ती छत्रे फेकून दिली. कर्नाटकात भूछत्रांना 'अणिबे' आणि कोकणात 'अळमी' असे म्हणतात.
कावळ्यांची घरटी पावसाळ्यातच बनतात. मग त्यातल्या पिलांच्या जगण्याची धडपड पावसाळ्यात पाहायला मिळते त्याचेही अतिशय निर्विकार वर्णन केले आहे. 'सुरुपापेक्षा कुरुपाचे मरण पाहणे अति दुःसह असते' 'पावसाळ्यात विशेषतः श्रावणात, अशी दुबळी पोरे कितीतरी मरतात. लायक असेल त्यालाच जगू देण्याचा पाखरांचा कायदा मोठा कडक असतो. अश्या श्रावणातल्या दुपारी कटू प्रसंगही दिसतात, आणि मधेच आपले शंखाचे भस्मी रंगाचे घरकुल पाठीवर घेऊन, शिंगे रोखून संथ गतीने सरकत चाललेली अळूच्या पानावरची गोगलगाय देखील दिसते. तिच्या अंगातून निघणारा चिकट द्रव सरपटत गेलेल्या मार्गावर सांडलेला असतो आणि त्या तेलाच्या तवंगाप्रमाणे दिसणाऱ्या पट्ट्यात सूर्यकिरणांमुळे इंद्रधनुष्याचे रुंग उमटलेलेही दिसतात.


'ऊन-पाऊस' ही एका चिमणीच्या केलेल्या अवलोकनाची दर्दभरी कहाणी. दुर्गा भागवतांनी त्यांच्या खास मोजक्या पण चटका लावणाऱ्या शब्दात सांगावी अशी. चिमणी या पक्ष्याशी अतिशय सख्य असल्याने मला एकदा वाचल्यानंतर हा लेख पुन्हा वाचावासा वाटेना. हा लेख 'भावमुद्रा' मधेही समाविष्ट आहे, आणि तो पूर्वी वाचला होता. क्षणात ऊन आणि क्षणात पाऊस, तसे क्षणात आनंद आणि क्षणात दुःख असे त्या चिमणीचे जगणे. कोकणातला पावसाळा असा असतो, क्षणात सोनेरी ऊन आणि क्षणात काळवंडून टाकणारे आभाळ.

'मुंबईत वसंतागम' हा लेख म्हणजे दुर्गा भागवतांची खासियत. इतकी सौन्दर्यदृष्टी त्यांना लाभली होती की मुंबईसारख्या बकाल शहरातील वसंत ऋतूचे आगमन त्या टिपतात. लेखाची सुरवातच अतिशय सुंदर आहे. त्या लिहितात, 'मुंबईतील झाडे, काय आहे त्याबद्धल लिहिण्यासारखे असे पुष्कळ जण म्हणतील. पण याच मुंबईत माझ्या डोळ्यांनी झाडांची सुंदर चित्रे बघितली आहेत.' 'ऋतूंमधला बदल म्हणजे निसर्गातील क्रांती व उत्क्रांती, एक ऋतू पालटून जेव्हा दुसरा येतो तेव्हा वरचे आकाश, खालची जमीन, अवतीभवतीचे वातावरण नित्य नवा रंग धारण करते. या नव्या रंगातच आमच्या शहरी झाडापानांचा कायापालट होतो.'
किती झाडांवर आणि त्यावर येणाऱ्या पक्षण्यावर त्यांनी लिहिले आहे.
आंबा : आंब्याचे मोहोर आणि त्यावर घोंगावणाऱ्या केंबरी (केंबरी हा एक अतिशय सूक्ष्म कीटक असतो, मालवणीत त्याला किमरु म्हणतात) आणि लांब सुईसारख्या चोचीने मोहोर टिपणाऱ्या मिराळ्या चिमण्या (मिराळ्या चिमण्या म्हणजे फ्लॉवरपेकेर्स की सनबर्ड?)
बदामाचे झाड: पळसासारखी मोठी लांबट पाने, पिकून गाळताहेत, पण रंग किती सुंदर लाल! त्याचा कोवळ्या पानांनी सुद्धा हेवा करावा. ठिकठिकाणी गळत्या पानांच्या जागी नव्या पानांचे पोपटी लालसर, निरांजनाच्या ज्योतीप्रमाणे दिसणारे मोठेमोठे कळे जोरात वर येत आहेत.
शेवगा पांढऱ्या फुलांनी भरून गेलेला, आंबा, फणस, शेवगा यांच्या मागचे गुलमोहराचे झाड त्यामानाने कितीतरी साधे दिसत आहे.
'शिरीष या झाडाची पाने सपासप गळून पडताहेत. आणि लालसर रंगाची सुंदर कोवळी पालवी त्या झाडाच्या अंगाअंगावर फुलत आहे. एप्रिल महिन्यात हि झाडे जांभळट, गुलाबी, नाजूक फुलांनी बाहेरून जातील.;'   शिरीषच्या झाडाच्या ढोलीत राहणाऱ्या पोपटांबद्धल त्या लिहितात 'आजूबाजूला एकवेळेला निदान पन्नास-साठ तरी पोपट दिसतात. प्राणाला पोपटाची उपमा का देतात, 'मायेचा हिरवा रावा' का म्हणतात हे मला या झाडावरचे पोपट पाहिले तेव्हा चांगले कळून आले'. पाखरांमुळे झाड जिवंत वाटते असेही त्या लिहितात. पोपटांच्या पिलांना बोक्यापासून वाचवण्यासाठी कावळे गोंगाट करून मदत करतात पण हेच कावळे पोपटाची पिले जरा घरट्यातून बाहेर आली कि केव्हा मारू केव्हा नको असे करतात. या कावळ्यांच्या विचित्र मैत्री/शत्रूत्वाच्या विसंगत वागण्याबद्धलही त्यांनी लिहिले आहे.
मार्चच्या अखेरीस फुलणारा पळस, पांगारा या झाडांचे, त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण फुलांचे त्या वर्णन करतात. ''पीलक' (म्हणजेच 'हळद्या' (Black headed Oriole)) ह्या पक्ष्याने पळसाच्या झाडावर घरटे बांधलेले आहे. चिनी जास्वंदीची अर्धोन्मीलित असणारी फुले आणि त्यावर येणारा काळसर लहान पक्षी म्हणजे फुलचूखी (हनीसकर). त्याचे केलेले निरीक्षण त्यांनी शब्दात असे मांडले आहे. ' बसला तो जास्वंदीच्या झाडावर! फुलाचे नळकांड्यासारखे खालच्या बाजूस असणारे तोंड. त्या तोंडात खालच्या बाजूने मान उंचावून आपली लांब टाचणीसारखी बारीक चोच या पक्ष्याने खुपसली आणि तो मध पिऊ लागला. फुलपाखरे मध चाखतात. पण फूलचूखीने घेतलेला हा मधाचा आस्वाद मी कधीच विसरणे शक्य नाही. 'मध चाखावा फुलपाखरांनीच, पक्ष्याला त्याचे काय होय?' असे कविवचन आहे. पण फुलचूखी मधाचा घास कसा घेते हे एकदा तरी ज्याने पहिले आहे तो ते दृश्य विसरणे शक्य नाही.' 'एप्रिलच्या भरात गोविंद पक्षी(थ्रश ? हा कुठला पक्षी? ) , तांबट, गावठी बुलबुल या सगळ्यांची संगीतशाळा भरते. प्रत्येकजण आपले आकर्षण वाढवतो आहे, गातो आहे, आपली जात वाढवण्याची धडपड करतो आहे. '


'गुलमोहराच्या आठवणी' या लेखात त्या आपल्या स्मृतीतील गुलमोहराच्या झाडांविषयी लिहितात. ऐन वसंतात जेव्हा इतर झाडे कोवळी पालवी घेऊन नटलेली असतात तेव्हा हे झाड काट्याकुटक्यांचा आपला देह घेऊन उभे असते. त्यातही असलेल्या सौदर्यांविषयी त्या लिहितात. 'त्याच्या त्या काळ्या कबऱ्या फांद्या,  निळसर भुरक्या आकाशाच्या पार्श्वभूमीवर किती खुलून दिसतात! सूक्ष्मतेने पाहणाऱ्या खेरीज कुणाला कळणार नाही. चिनी चित्रकारांनी निष्पर्ण वृक्षांचे कलात्मक चित्रण करण्यात सिद्धी मिळवली आहे. गुलमोहराच्या उन्हाळी रूपाचे हे उघडे-नागडे चित्र पाहिल्यानंतर मला त्या चित्रातले माधुर्य थोडेसे समजू लागले.
उन्हाळयाच्या अखेरीस आणि पावसाळ्याच्या सुरवातीला पूर्ण फुललेला बहारदार लालभडक, ऐन पावसाळ्यात आणि अखेरीस पूर्ण हिरवागार आणि ऐन वसंतात निष्पर्ण अशी रूपे घेणारा गुलमोहर मलाही आगळावेगळाच वाटतो. त्याच्याविषयीच्या अनेक आठवणी दुर्गाबाईंनी सांगितल्या आहेत. त्यातल्या काही म्हणजे , गुलमोहराच्या शेंगाना तरवारी समजून खेळले जाणारे पोरांचे खेळ, गुलमोहराच्या टपोऱ्या कळ्या बाहुलीच्या लग्नात नारळ म्हणून वापरल्या जायच्या, पाकळ्यांचे ठसे हातावर काढून गोंदण्याचे, मेंदीचे सुख अनुभवले जायचे, कळीच्या आतले पराग म्हणजे लहान मुलांच्या दुकानातील स्वस्त केशर, सर्वात मोठे विलोभन म्हणजे लाल पराग आणि त्याच्या माथ्यावरचा बडीशेपेच्या आकाराचा पिवळा पागडीसारखा तुकडा लहान मुलांना लढाऊ शिपायांसारखा वाटतो , या परागांची झुंज लावून कुठल्या शिपायाची पगडी उडते ते बघणे असा लहान मुलांचा खेळ, अश्या अनेक आठवणी. या सर्वच आठवणी सुखद नाहीत काही दुःखद पण आहेत. जशी गुलमोहराच्या झाडाखाली राहणारी वेश्या आणि एक दिवस वाधळात उन्मळून पडलेले ते झाड, त्यानंतर वेश्येची आणि तिने आश्रय दिलेल्या कुत्र्यांची झालेली वाताहतही आहे. अत्यंत गलिच्छ अशा शौचकूपांच्या गर्दीत वाढलेले आणि दार मोसमाच्या वेळी जे काही आहे त्यावर सृष्टिनियमाला मानून पुष्पवृष्टी करणारे करूण झाडही दुर्गाबाईंना दिसते. आणि त्या म्हणतात 'अशा कर्मयोगाचा मला धाक वाटतो, त्या झाडामुळे त्या गलिच्छ ठिकाणालाही शोभा आली आहे याचा विसर पडतो आणि मन उदास होते' अशा या झाडाखाली एक भिकारीही मेला तेव्हा त्याच्यावरही गुलमोहोर आपल्या शिळ्या पाकळ्या टाकीत होता.


'सिध्देश्वरच्या तळ्यातील कमळे' या लेखात त्या सोलापूर येथील सिद्धेश्वराच्या देवळासमोर असलेल्या तळ्यातील मोठ्या कमळांविषयी लिहितात. मोठी फुले म्हणजे कमळ, लहान फुले म्हणजे लिली असे त्या सांगतात. हे सिद्धेश्वराचे तळे नंतर बुजवले गेले आणि कमळेही गेली, त्याबद्धल त्या हालहाल व्यक्त करतात. कमळाचे तिचे गाढले गेलेले बी शोधून कुणी ती कमळे पुन्हा जिवंत करावीत असा आग्रह त्या धरतात. 'मला वाटते, सारखे वाटते, की आजही तळ्याच्या ठिकाणी खोदाखोद केली तर काही बिया सापडतील. एक हजार वर्षांपूर्वी सुकलेल्या चीनमधल्या मांच्युरियाच्या तळ्याच्या तळाशी बिया सापडल्या, त्यातल्या काही रुजल्या. त्या कमालिनीच्या कळ्या धरल्या. त्या फुलल्या. सोळा पाकळ्यांची ती कमळे होती. जपानमध्ये टोकियोत एका इमारतीचा खोल पाया खणताना तीन हजार वर्षांपूर्वीच्या कमळांच्या बिया मिळाल्या, याच काळच्या कमळाच्या बिया पिरॅमिडातही मिळाल्या. मग सिद्धेश्वराच्या तळ्यात बुडी मारलेले मकाणे रुजून खचित मेले नसतील. कुणी त्यांना वर काढून त्या सोनदळी कमळांच्या वेलींना पुनर्जीवन देईल का?'

'तुळस' तुळशीच्या झाडाचे सौन्दर्य, त्या झाडाच्या लहानखुऱ्या रूपाबद्धल भारतीयांची जडलेली सात्विक, वत्सल भावना, सगळ्या पारंपरिक गोष्टीत तिचा होणारा उपयोग, तिचे महत्व, तिच्यावर रचलेल्या पौराणिक कथा, करुणरसाने भरलेल्या लोककथा, लोकगीते याबद्धल या लेखात लिहिले आहे. तुळस हि कुमारिकेचे प्रतीक आहे, तरीही पुराणातील नियमानुसार लग्न तिलाही चुकले नाही. तुळशीचे लग्न आणि त्यावरील कथा फारच रंजक आहेत. खुद्द दुर्गा भागवतांनी 'तुळशीचे लग्न' नावाचे एक छोटे पुस्तक लिहिले आहे ज्यात तुळशीची आणि तिच्या लग्नाची कथा आहे. या लेखात पुराणातल्या तुळशीशी निगडित अनेक कथा, संदर्भाचा परामर्श त्या घेतात.

'वनकथा' या लेखात दुर्गाबाई आपल्या मध्यप्रदेशातील भ्रमंतीतील आणि महानदीच्या तीराच्या आसपासच्या भागातील आदिवासींच्या आठवणी आणि अनुभव सांगतात. आदिवासींचे वागणे, बोलणे, त्यांच्या समजुती इत्यादिविषयी त्या लिहितात.

'रानझाडांची गोष्ट' या लेखात त्यांनी जातककथांतील एक कथा सांगितली आहे. जातककथा या गौतम बुद्धाच्या पूर्व जन्माच्या (या कथांत त्याला बोधिसत्व म्हटले जाते). शाल म्हणजेच सागाच्या झाडाशी निगडित हि कथा आहे.

'झाडांचे आक्रंदन' या अतिशय सुंदर लेखात त्यांनी झाडेही बोलतात, त्यांनाही भावना व्यक्त करता येतात, स्वतःच्या दुःखाचे आक्रंदनही करता येते त्याबद्धल कळकी, केळी यांचे काही पुरावे दिले आहेत. अँथोनी जुलिअन हक्सले या अत्यंत गुणी आणि रसिक शास्त्रज्ञाने 'प्लांट अँड दि प्लॅनेट' नावाच्या पुस्तकात कळकीच्या कोंब फुटताना होणाऱ्या आक्रन्दनाविषयी लिहिले आहे. कळकीचा कोंब म्हणे सात पदर तोडून बाहेर येतो. याविषयीच्या अनेक आख्यायिकाही आहेत. तसेच पाऊस येणार म्हणून नाचलेल्या एका झाडाविषयी एक शास्त्रज्ञांनी सांगितलेली गोष्टही त्या सांगतात.

'खडपा उसाची आठवण' या लेखात त्यांनी लहानपणीची एक रुद्द्य आठवण सांगितली आहे. त्या तेव्हा नाशिकमध्ये आत्याकडे राहत होत्या आणि गावातील बंधनांना जुगारून मोकळेपणे, मस्ती करत त्या जगत होत्या. लोक काय म्हणतील याची भीड त्यांनी बाळगली नाही. परंतु लोक बेरकी होते, त्यातीलच एक म्हणजे दुर्गाबाईंच्या मैत्रिणीच्या घरांतल्यानीच एकदा दुर्गाबाई आणि त्यांच्या बहिणीला बोलावून त्यांचा अपमान करण्याचे ठरवले आणि त्यांना कुणीही न खाऊ शकणारा खडपा ऊस खाऊ घातला. त्या लोकांना मात्र दुर्गाबाई पुरून उरल्या आणि त्यांची चांगली खोड कशी मोडली त्याबद्धल हा लेख आहे.

'गेंडा' , 'हत्तीची कथा' या लेखांत या प्राण्यांविषयी अनेक संदर्भ, त्याच्या विषयीची अतिशय छान माहिती त्यांनी दिली आहे.


'पक्ष्यांचे बोल' हा अतिशय सुंदर लेख आहे, कवडा, पावश्या , पोपट, कबुतर, भुंगा , चिमणी  यांच्या बोलांविषयी त्यांनी लिहिले आहे, त्यांच्या बोलांवरून पडलेल्या लोककथा आणि आख्यायिकांचे संदर्भही दिले आहेत. तसेच 'पिवळीच मी पाकोळी की' या लेखातही त्या पाकोळीविषयी, आणि 'वेडे झाड' या लेखात एकही पान सारखे नसलेल्या एका झाडाविषयी त्यांनी लिहिले आहे.

अतिशय सुंदर माहिती, आणि अवलोकन असलेला हा निसर्गाच्या अनंत लीलांच्या संदर्भांनी नटलेल्या  लेखांचा असा हा वाचनीय 'निसर्गोत्सव' आहे.