Tuesday 9 February 2016

अरविंद देसाई की अजीब दास्तान

'अरविंद देसाई की अजीब दास्तान' हा सईद अख्तर मिर्झा यांचा ऐंशी दशकातील चित्रपट आहे. त्याचं नाव जसं विक्षिप्त वाटतं  तसा चित्रपट देखील नावाला अनुरूपच आहे. प्रत्येक माणसाची दास्तान  तशी जगवेगळीच असते. फक्त तिच्यातले वेगळेपण शोधण्याची दृष्टी असावी लागते. तशीच काहीशी ही अरविंद देसाईची कथा. सामान्य आणि  असामान्य. सामान्य यासाठी की वरवर हा देखील आपल्यासारखाच जीवन जगण्याच्या नावाने पाट्या टाकणारा आहे.त्याचे आयुष्य चारचौघांसारखेच, चारचौघांसारखे घर, पालक, प्रेयसि, कामकाज, मित्र, एकंदरित जीवन चाकोरीबद्ध. आणि असामान्य यासाठी की या वरवर चालणाऱ्या जीवनाच्या प्रवाहामागे  एक अंर्तप्रवाह आहे जो त्याला आरशासारखा प्रतिबिंब दाखवतो. आता हे प्रतिबिंब कसले हे ज्याचे त्याने बघायचे, कुणाचे हे ज्याचे त्याने ओळखायचे आणि त्याबाबतीत काय करायचे हे देखील ज्याचे त्याने ठरवायचे. 'रीड इन बीटवीन द  लाइन्स' असा हा मामला आहे ज्याची अरविंदला जाणीव आहे  म्हणून त्याची कथा असामान्यही आहे . 

खरंतर चित्रपटात सांगण्यासारखी अशी कथा नाहीच. त्यामुळेच की काय, रोजच्या जीवनाच्या अतिशय जवळ जाणारी अशी त्यातली दृश्य आहेत. नेहमीचा 'सुरुवात', 'मध्य', 'अंत' आणि  अंताबरोबर काहीतरी निष्कर्ष असा जो सरधोपट मार्ग असतो तो या चित्रपटाने स्वीकारला नाहिये. सुरुवात एका ठिकाणापासून, मध्य असे काही नाही, आणि अंत म्हणजे नक्की हा अंत आहे का? इतपत वाटायला लावणारा चित्रपटाचा पट. शेवटी 'निष्कर्ष' म्हणून हाथी काही लागत नसले तरी कुठेतरी खोलवर कुठलातारी मंद झीरोचो बल्ब ऑन झालाय असे मात्र वाटते.

अरविंद  देसाई हेच चित्रपटाचे मुख्य पात्र. मुख्य पात्र असूनसुद्धा  त्याच्या जीवनात काहीच चलबिचल व्हावी असे स्क्रीनवर घडत नाही. इतर चित्रपटात मुख्य पात्राच्या बाबतीत काहीतरी घडते, घडत राहते , किंवा तो तरी काहीतरी घडवतो. पण अरविन्द देसाई च्या बाबतीत काहीच घडत नाही. तोही काहीच घडवत नाही. का हे असे  निष्क्रीयतेचे  दर्शन? तर तीच खरी वस्तुस्थिती  आहे.  कुणी  सर्वसामान्य असो किंवा अगदी आइन्स्टाइन  असो.  एका विशिष्ट कालावधीत प्रचंड उलथापालथ होण्यासारखे माणसाच्या जीवनात क्वचितच काही घडते(मृत्यु, अपघात वगळता). रोजचा दिवस येतो अन जातो, त्यात आपण छोटे छोटे प्रयत्न करतो अगर पाट्या टाकतो पण  अतिशय गहन असे काही घडत नाही हे खरे. पण आपल्या आयुष्याच्या स्क्रीनवर जे घडत नाही ते कुठेतरी अदृश्य, अप्रत्यक्षपणे मानवी मनाच्या पडद्यावर घडत असते. घडत राहते. ते काय याचा शोध हेच या चित्रपटाचे टेक्शर आहे. आणि हेच याचं अतिशय वेगळं असं वैशिष्ट्य.बहुतेक चित्रपटात काहीतरी समस्या/घटना घडते. त्याचे निवारण, त्याच्यावरची प्रतिक्रिया ई. ई. यातच चित्रपटाचा जीव असतो, निवारण झाले, प्रतिक्रिया बनली, कुणीतरी जिंकलं, कुणीतरी हरलं की संपलं. पण या दृश्य समस्या, दृश्य घटनांच्या पलीकडे अप्रकट स्वरुपात जीवनविषयक जे मुलभूत प्रश्न आहेत, ज्याच्याशी प्रत्येक माणूस (मग तो पाच च्या लोकल ने प्रवास करणारा असो की आइन्स्टाइन असो) आपापल्या परीने झुंजत असतो. त्या प्रश्नाना सामोर्ं  जाण्याची आपली कुवत नाही अशी त्यातल्या बहुतांशी प्रत्येकचीच समज असते. मग त्यापासून  पळण्यासाठी तो अनेक उद्योग मागे लावून घेतो. ज्यात फ़क्त प्रत्यक्ष जीवनाचे दर्शन असते, त्या वरच्या जीवनाच्या रूपाने प्रश्नाच्या मुळावर पांघरूण घालतो . ते पांघरूण फाटले तरी तेच ओढून तो जन्मभर चालत राहतो. तसाच हा 'अरविंद देसाई'. सुशिक्षित(असे म्हणतात तसा), म्हटलं तर कुठचीही समस्या नसलेला, कसली भ्रांत नसलेला. त्याच्या वडिलांच्या व्यवसायाची देखरेख करतो. पण तीही एका तिह्राईताप्रमाणे. तिथल्या कामात त्याचे फारसे लक्ष नसते. त्याच्या सेक्रेटरीशी त्याचे प्रेमसंबंध (?) असतात. पण खरंतर तो त्यातही फारसा गुंतलेला नसतो. तिच्याशी त्याची कसलीच भावनिक जवळीक नसते. तो एकदा तिला  विचारतो : 'तुम मेरे बारेमें  क्या सोचती हो?' ती  म्हणते : 'तुम मुझे अच्छे लगते हो' त्यावर तो म्हणतो : 'इतनाही ? और कुछ भी नहीं?'  त्यावर ती  म्हणते 'इतना काफी नहीं है?'  मग तो विचारतो : 'मुझे बताओ आखीर तुम्हे मुझसे मिलता क्या है?'  ती म्हणते 'बहोत कुछ'.  तो त्यावर म्हणतो 'बहोत कुछ. पैसेवाली नौकरी, कुछ सुविधाये, अच्छा होटल....' त्यावर ती वैतागते, त्याला थांबवते 'प्लीज डोंट से दॅट '    तो तिला विचारतो: 'मान लो कल कोई तुम्हे मुझसे ज्यादा पैसे देगा तो क्या तुम उसके साथ भी ऐसा रिश्ता शुरू कर दोगी? क्या तुम एक आम लड़की की तरह एक पैसेवाला पति ढूंडने की कोशिश कर रही हो?'


त्याची कसल्या उत्तराची अपेक्षा असते तिच्याकडून? आणि ते त्याला हवं असलेलं, तो शोधत असलेलं उत्तर तिच्यापाशी नसतं. ती जे सांगते त्यानेही त्याचे समाधान होत नाही. त्याला वाटतं की कुणाला आपण आवडावे असे आपल्यात ख़ास काहीच नाही. स्वतःच्या अस्तित्वात त्याला फ़क्त पैसा, उंची हॉटेलात जेवणे, चैन करणे यापलीकडे काहीच  दिसत नाही. त्या बाबत त्याला खंत अाहे असेही नाही कारण त्या सगळ्याचा उबग येऊन तो वेगळे काही करण्याचे  धाडस तो करत नाही, किंबहुना त्याला तसे धाडस करवेसेही वाटत नाही. माणसाने मनात आणले तर तो आपल्या जीवनात बदल घडवून आणू शकतो असे म्हणायला ठीक असेल पण प्रत्यक्षात ते स्वातंत्र्य त्याला असते का? कारण बदल करण्यासाठी मुळात आपल्याला काय हवे हे माहित पाहिजे, ज्याला तेच माहित नाही तो काय करू शेकेल? अरविंद देसाई ला आपल्या असण्याबद्धल प्रश्न आहेत. त्याची उत्तरं  तो त्याच्या बाह्य स्वरुपात शोधायला जातो. प्रेयसीबरोबर फिरतो. तिच्या घरी जातो, तिच्या घरच्याना तो ढिसाळच वाटत असतो. व्यंग असलेल्या वश्येकडे जातो, तिच्याशी संबंध ठेवतो. आपल्या डाव्या विचारसरणीच्या मित्राशी भेटून कहिबाही चर्चा करायचा प्रयत्न करतो, त्याला त्यात काहीच रस नसतो तरीही. आपल्या बहिणीच्या आयुष्यात घडणाऱ्या सुक्ष्म पण प्रभावी घटनांची त्याला जाणीव असते. तिच्याशी बोलताना देखील तो आपल्याबाबतीतच काहीतरी शोधत राहतो. पण त्याला काहीच सापडत नाही. कारण त्याच्या स्वतःशिवाय या प्रश्नांची उत्तरे कोण देणार?
त्याचे वाहून जाणे ('ड्रिफ्टिंग') चालूच राहते. तो एका पुस्तकाच्या दुकानात शिरतो, पिकासोचे पुस्तक बघतो, रशियन लेखकांची पुस्तके त्याला दिसतात. पण शेवटी काहीच न घेता बाहेर पडतो. एका रस्त्यावरच्या मुलाशी बोलतो, त्याला आपल्या गाडीवर लक्ष ठेवायाला सांगतो, म्हणुनच की काय त्याचा आवाज एकदम मृदु , आपुलकीचा होतो. मुलगा  त्याच्या पाठिमागे त्याला बघून जी प्रतिक्रिया तोंडावर आणतो तोच खरा जीवनाचा अर्थ. पण अरविंद  देसाईला तो कसा कळेल? तो तर जीवनाच्या अर्थाला केव्हाच पाठमोरा झाला आहे. जो अर्थ, जे सत्य ते आपण त्याला पाठमोरे असतानाच दिसतं बहुतेक.

या चित्रपटात काहीही अधोरेखित न करता देखील बरेचसे शब्द आणि त्यांचे अर्थ अधोरेखित झाले आहेत. कसलंही ठाम भाष्य करायचे टाळल्यानेच की काय, या कलाकृतीला एक अदृश्य उंची प्राप्त झाली आहे. चित्रपटाच्या लेखकांने लिहिलेली ही दास्तान बहुदा उसनं आणलेली नाही, कुठेतरी खोलवर जाणवलेलं काहीतरी मांडण्याचा (थोडासा अयशस्वी असला तरी) प्रयत्न केला आहे. अयशस्वी  मला  यासाठी वाटला कारण शेवट तितकासा पटला नाही. तो स्वतःला गोळी  मारून घेतो हे कथेला बाधक वाटते. अश्यासाठी नव्हे की ते असंभाव्य आहे, किंबहुना ते संभाव्यच  आहे पण एवढं सुश्पष्ट (एक्सप्लिसिट) दाखवण्याची काही गरज नव्हती, थोडासा अब्सर्डिझम कडे जाण्याच्या हा अट्टहास कश्यासाठी?  अंत काय फक्त फिजिकल अस्तित्व मिटवण्यानेच होऊ शकतो का? चित्रपटाचा अंत म्हणजे त्यातल्या पत्राविषयी काहीतरी निर्णायकच घडले पाहिजे का? असे निर्णायक घडणे (घडवणे) ही एक ट्रिक वाटते.कथेचा पोत त्यामुळे बिघडला असे मला तरी निदान वाटले.तरीही शेवट बाजूला केला तर कथा खुप काही सांगणारी आहे. मुख्य पात्राभोवती दुय्यम पात्रं असतात आणि त्यांच्याही समांतर जाणारया रेघाही  पुसट असल्या तरी लक्षात राहतात. अशी अनेक पात्रं आहेत. ऍलिसचे(प्रेयसि) रस्त्यावरून फिरणे, रस्त्यावरच्या दुकानांच्या काचेतले ड्रेस बघत. अरविंदचा मित्र, त्याच्या घरातले चित्रं आणि त्यावरचे त्यांचे सम्भाषण, अरविंदची सतत पूजापाठ करणारी, एकहि शब्द न बोलणारी आणि फ़क्त धार्मिक दान मागणारी आई आणि अशी अनेक पात्रं,  हे सर्व अरविंदचीच मनिफेस्टेशन्स (रुपं ) वाटतात. 

अस्तित्ववाद,बौद्धिक असल्या व्याख्यात या चित्रपटातल्या कथेला न बांधता पारदर्शी नजरेने बघितलं तर अनेक सुक्ष्म प्रदर या कथेत आहेत. अशी ही अरविंद देसाई ची 'अजीब दास्तान', अजरामर कलाकृती  नसेल ,पण हे वाऱ्याच्या झोताने चटकन ने हलणारे पान आहे.

चित्रपट संपला तरी चित्रपटातील काही वाक्य मनात रेंगाळत राहतात.
'रातको कैसा लगता है? रातको जब एक तरह का अकेलापन अंदरसे पकड़ लेता है, नोचने लगता है।'
'कैसा अकेलापन ? '

'तुम मेरी प्रोब्लेम जानते हो? एक ऎसी दुनियामे रहना, जहां मेरे सोचने और करने में बहोत फर्क है।'







No comments:

Post a Comment