Tuesday 23 February 2016

भयाच्या मॅनिफेस्टेशन्सचा अजगर: १

 चिं. त्र्यं. खानोलकरांची 'अजगर' ही कादंबरी म्हणजे प्रत्यक्ष अजगरच. मी अजगर प्रत्यक्षात एकदाच बघितला होता, पाचवीत असताना एका प्राणीसंग्रहलयात. लहानपणी घराच्या आसपासच्या आवारात, छप्पराच्या कौलांत साप खुप बघितले पण अजगर तसा दुर्मिळच. माझ्या आजीने आमच्या गावच्या घराच्या गोठयात आलेले दोन अजगर पाहिले होते. ते जनावरांच्या वासाने मागच्या डोंगरातून गोठयात शिरले होते आणि ते शीळ घालित, शेवटी गावकऱ्यानी त्याना मारले. त्याच्याबद्धल तिने सांगितले तेव्हा अंगावर काटा आला होता.
जी. ए. कुलकर्णी यांच्या 'लक्ष्मी' या कथेतील अजगरच्या वर्णनाने देखील तोच अनुभव आला होता. आता  भर घालयला खानोलकर 'अजगर' घेऊन आले आणि लहानपणीच्या आठवणीतला सुप्त भयाचा अजगर जिवंत होऊन आ वासून उभा राहिला.

तसं खानोलकरांचं हे पुस्तक मी दहा वर्षांपूर्वी वाचलं होतं, तेव्हा मला ते त्यातल्या अत्यंत वेगळ्या लेखनासाठी आवडलं होतं पण त्यातल्या विशिष्ट भागातील वर्णनामुळे मला काही दिवस जेवण धड गेलं नव्हतं . साहजिकच तेव्हा माझं वाचन तेवढं प्रगल्भ नव्हतं. कदाचित वाचनासाठी लागणारी परिपक्व जाणीवही  नव्हती, त्यामागची नेणीव तर सोडाच. पण त्यावेळीही हे पुस्तक वेगळं वाटलं होतं.

आज हे पुस्तक माझ्या संग्रही आहे, आणि अनेकदा मी ते वाचलं आहे. त्यातल्या अनुभवाच्या आविष्काराने मला दरवेळी स्तिमित केलं आहे.
या कादंबरीतील प्रत्येक ओळीत गुदमरलेपणा भरून राहिला आहे. एखादा अदृश्य, प्रचंड अजगर सतत आपला विळखा यातल्या पात्रांच्या भोवती घालत आहे आणि ते बघत असताना आपल्याही मनातल्या भयाचा अदृश्य अजगर आपल्याभोवती देखील वेटोळी घालायला सुरवात करतो.
  
मनातल्या गोष्टी जेव्हा व्यक्त होऊ शकत नाहीत, दबून जातात किंवा दाबून टाकल्या जातात तेव्हा त्या मनातल्या मनात अक्राळ विक्राळ रूप धारण करतात. मनच अजगर बनू पाहते. हा अजगर जबडा वासतो फक्त गिळण्यासाठी.


अतृप्त इच्छा-वासना ,  अनाकलानीय भीती, ठार एकटेपणा आणि त्याची असणारी जाणीव , जीवनाबद्धाल वाटणारी विफलता, नियती, नीती अनीती आणि मन यांचा चालेलेला अहर्निश संघर्ष,  यांच्यापासून बनलेल्या या  अजगराच्या विळख्यापासून  सुटका करून घेण्याचा केविलावणा प्रयत्न करणारे या कादंबरीतील सगळे कुठच्यातरी फुटकळ आशेने जगत आहेत पण अजगरचा विळखा असा आहे की त्यांचे हाड न हाड काड काड मोडत आहे. बरगडयात श्वास गुदमरला आहे. मणक्याचे तुकडे तडातड मोडून पडत आहेत.  त्यातही तिरमिरीत उठून उरलेले तुकडे सांभाळत ही माणसं जगण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहेत.

मी काही एवढी पुस्तकं वाचली नाहीयेत आणि  मला त्याबद्धल बोलण्याचा अधिकार आहे असेही मी समजत नाहीये, पण मला वाटतं खानोलकारांसारखं  सगळ्या प्रकारच्या भयाच्या (मॅनिफेस्टेशन्स) रूपांनी  साकारलेलं  जीवनाचं हे विश्वरूपी दर्शन दाखवण्याचं धाडस मराठीत तरी कुणी केलं नसावं. 

हरिपंत, इंदू, पावसकर, पावसाकारीण , धारप, पांगळा, वेश्या, बाप , मोरे, भोळे आणि त्यांची बायको ही सर्व भयाची वेगवेगळी मॅनिफेस्टेशन्स घेऊन जगत आहेत, अतृप्त इच्छानी पोखरून निघत आहेत. जीवनावरचा ताबा सुटत जाणे, नॉस्टाल्जिया, जुन्या गेलेल्या दिवसांची सुखद आणि त्रस्त करणारी आठवण
पुढचा काळ अंताकडे अधिक प्रकर्षाने घेऊन जाणारा, त्याचे वाटणारे अनाकालनीय भय अशा अनेक रूपांनी जीवनाचा हा अवाढव्य अजगर त्यांना कवळू पाहतोय. यातून सुटका नाही याची जाणीवही त्यांना आहे, आणि भिरकावून देण्यासाठीही त्यांच्याकडे काहीही उरलेले नाही.

हि कादंबरी फक्त नव्वद पानांची आहे, पण तिच्यात एवढा ऐवज भरला आहे कि त्याचे आकलन करणे आणि त्याबद्धल काही लिहिणे शेकडो पानांनीही पुरे व्हायचे नाही. त्यामुळे मी आधी त्याच्या पात्रांचे आकलन करणार आहे. खरंतर हि पात्रं सुटी नाहीत, एकमेकात गुंतलेली आहेत. परंतु त्यांच्याशी एकेकट्याने बोलून काही हाती लागते का ते मला बघायचे आहे.

सर्वात मोठा आवाका असलेले पात्रं म्हणजे हरिपंत चौघुले. जे सुरवातीपासून शेवटपर्यंत अनामिक भीतीने पछाडलेले आहेत. इतके कि त्यांचे त्यांनाच ठावूक नाही.

भय हे मानवी मनाचे मुख्य टेक्शर (पोत) आहे.मुलभूत भावना आणि प्रेरणा (त्या नक्की कोणत्या हाही खरं तर माझ्या दृष्टीने अभ्यासाचा भाग आहे, मला त्याचे पूर्ण आकलन झालेलं नाही.) यांच्यावर जेव्हा भयाचे, अतृप्तीचे आवरण चढते तेव्हा त्या विचित्र आणि अनाकलनीय रुप धारण करतात. त्यांचे मूळ स्वरूप पार बदलून जाते. इतके कि ते कित्येकदा माणसाला विचित्र, विक्षिप्त वागायला भाग पाडते. या कादंबरीतील हरिपंत चौगुले हे असेच एक. त्यांच्यासाठी भयाचे कारण बनले आहे त्यांना वाटणारं त्याचं शेणामेणाचं आयुष्य, इतकं कि जरासा धक्का लागून ते कोसळेल.

आधीच पत्नीच्या मृत्युनंतर, त्यांना जाणवणारं त्याचं 'अकारण' (ऐमलेस) आयुष्य आता 'पेन्शनीत निघाल्यामुळे' (म्हणजेच ते निवृत्त झाल्याने) अधिकच काळवंडून गेले आहे. ऑफिसमधली त्यांची खुर्ची ही आयुष्यातल्या स्वतःच्या ओळखीची (सिग्निफ़िकन्सची ) त्यांची महत्वाची खुण, तीही आता जाणार, या भावानेने दडपून जावून ते मोरेला त्यावर जबरदस्तीने बसायला लावतात. त्या खुर्चीचे मोल त्यांना एवढे  असते कि आपल्यानंतर कुणी दुसरे त्यात बसण्यापूर्वी त्या खुर्चीची पत घालवून टाकावी असा ते विचार करतात. नाहीतरी माणसाची 'ओळख'(आयडेंटीटी) काय असते जीवनात? तर तो कुणाचातरी बॉस असणे, नोकर असणे, पती असणे, पत्नी असणे, आई, वडील , मुलगी, मुलगा, भाऊ , काका , मामा, इंजिनीअर, डॉक्टर, शिक्षक, बेकार, वेठ्बिगार, चोर, साधू असलंच काहीतरी असणे, हे लेबल स्वतःला लावून घ्यावं लागतंच. कुणीही त्यापासून सुटलं नाहिये. तर अश्या एका 'ओळखी'तून हरीपंत मुक्त झालेत पण त्यांना त्याबाबत विषण्णता आहे. खुर्ची म्हणजे अधिकार, ओळख , राज्यपद, त्यांच्या भाषेत कुणालाही 'डिसमिस' करण्याची ताकद. ती गमावून बसल्याने ते सैरभैर होतात. त्या अधिकार गमावलेल्या भावनेची बसणारी झळ कमी करण्यासाठी म्हणूनच कि काय ते मोरेला त्या खुर्चीवर बसायला जबरदस्ती करतात. पण मोरेही त्यांच्यासारखाच दुसरा 'शेणामेणाचा' माणूस. तोही त्याच मनातल्या भीतींनी दडपलेला. त्याच्या या आंतरिक भयाच्या रूपांतून त्या खुर्चीवर निर्माण होतं भयाचं केसाळ काळं  श्वापद. हरिपंतानाही ते दिसतं आणी मोरेलाही. ते मोरेचा ताबा घेतं. आणि मोरेच्या वागण्यातून हरिपंतांच्या मनाचाही ताबा घेतं. त्या पातळीवर दोघेही अतिवास्तवाच्या (सरेलिस्टीक) विळख्यात आवळले जातात. किंबहुना ते दोघे नव्हेत तर आपण त्या अतिवास्तवाच्या पातळीवर त्यांची भीती अनुभवतो. ते भयाचे श्वापद आपलीही पकड घेते.

हरीपंतांना नक्की कसली भीती वाटते ते सांगणे फार कठिण आहे पण अनुभवणे सोपे आहे. आपल्यालाही अश्याप्रकारची भीती अनेकदा जाणवली आहे, तिला नाव नाही देता येणार पण तिचे अस्तित्व जाणवत राहते.








Tuesday 9 February 2016

अरविंद देसाई की अजीब दास्तान

'अरविंद देसाई की अजीब दास्तान' हा सईद अख्तर मिर्झा यांचा ऐंशी दशकातील चित्रपट आहे. त्याचं नाव जसं विक्षिप्त वाटतं  तसा चित्रपट देखील नावाला अनुरूपच आहे. प्रत्येक माणसाची दास्तान  तशी जगवेगळीच असते. फक्त तिच्यातले वेगळेपण शोधण्याची दृष्टी असावी लागते. तशीच काहीशी ही अरविंद देसाईची कथा. सामान्य आणि  असामान्य. सामान्य यासाठी की वरवर हा देखील आपल्यासारखाच जीवन जगण्याच्या नावाने पाट्या टाकणारा आहे.त्याचे आयुष्य चारचौघांसारखेच, चारचौघांसारखे घर, पालक, प्रेयसि, कामकाज, मित्र, एकंदरित जीवन चाकोरीबद्ध. आणि असामान्य यासाठी की या वरवर चालणाऱ्या जीवनाच्या प्रवाहामागे  एक अंर्तप्रवाह आहे जो त्याला आरशासारखा प्रतिबिंब दाखवतो. आता हे प्रतिबिंब कसले हे ज्याचे त्याने बघायचे, कुणाचे हे ज्याचे त्याने ओळखायचे आणि त्याबाबतीत काय करायचे हे देखील ज्याचे त्याने ठरवायचे. 'रीड इन बीटवीन द  लाइन्स' असा हा मामला आहे ज्याची अरविंदला जाणीव आहे  म्हणून त्याची कथा असामान्यही आहे . 

खरंतर चित्रपटात सांगण्यासारखी अशी कथा नाहीच. त्यामुळेच की काय, रोजच्या जीवनाच्या अतिशय जवळ जाणारी अशी त्यातली दृश्य आहेत. नेहमीचा 'सुरुवात', 'मध्य', 'अंत' आणि  अंताबरोबर काहीतरी निष्कर्ष असा जो सरधोपट मार्ग असतो तो या चित्रपटाने स्वीकारला नाहिये. सुरुवात एका ठिकाणापासून, मध्य असे काही नाही, आणि अंत म्हणजे नक्की हा अंत आहे का? इतपत वाटायला लावणारा चित्रपटाचा पट. शेवटी 'निष्कर्ष' म्हणून हाथी काही लागत नसले तरी कुठेतरी खोलवर कुठलातारी मंद झीरोचो बल्ब ऑन झालाय असे मात्र वाटते.

अरविंद  देसाई हेच चित्रपटाचे मुख्य पात्र. मुख्य पात्र असूनसुद्धा  त्याच्या जीवनात काहीच चलबिचल व्हावी असे स्क्रीनवर घडत नाही. इतर चित्रपटात मुख्य पात्राच्या बाबतीत काहीतरी घडते, घडत राहते , किंवा तो तरी काहीतरी घडवतो. पण अरविन्द देसाई च्या बाबतीत काहीच घडत नाही. तोही काहीच घडवत नाही. का हे असे  निष्क्रीयतेचे  दर्शन? तर तीच खरी वस्तुस्थिती  आहे.  कुणी  सर्वसामान्य असो किंवा अगदी आइन्स्टाइन  असो.  एका विशिष्ट कालावधीत प्रचंड उलथापालथ होण्यासारखे माणसाच्या जीवनात क्वचितच काही घडते(मृत्यु, अपघात वगळता). रोजचा दिवस येतो अन जातो, त्यात आपण छोटे छोटे प्रयत्न करतो अगर पाट्या टाकतो पण  अतिशय गहन असे काही घडत नाही हे खरे. पण आपल्या आयुष्याच्या स्क्रीनवर जे घडत नाही ते कुठेतरी अदृश्य, अप्रत्यक्षपणे मानवी मनाच्या पडद्यावर घडत असते. घडत राहते. ते काय याचा शोध हेच या चित्रपटाचे टेक्शर आहे. आणि हेच याचं अतिशय वेगळं असं वैशिष्ट्य.बहुतेक चित्रपटात काहीतरी समस्या/घटना घडते. त्याचे निवारण, त्याच्यावरची प्रतिक्रिया ई. ई. यातच चित्रपटाचा जीव असतो, निवारण झाले, प्रतिक्रिया बनली, कुणीतरी जिंकलं, कुणीतरी हरलं की संपलं. पण या दृश्य समस्या, दृश्य घटनांच्या पलीकडे अप्रकट स्वरुपात जीवनविषयक जे मुलभूत प्रश्न आहेत, ज्याच्याशी प्रत्येक माणूस (मग तो पाच च्या लोकल ने प्रवास करणारा असो की आइन्स्टाइन असो) आपापल्या परीने झुंजत असतो. त्या प्रश्नाना सामोर्ं  जाण्याची आपली कुवत नाही अशी त्यातल्या बहुतांशी प्रत्येकचीच समज असते. मग त्यापासून  पळण्यासाठी तो अनेक उद्योग मागे लावून घेतो. ज्यात फ़क्त प्रत्यक्ष जीवनाचे दर्शन असते, त्या वरच्या जीवनाच्या रूपाने प्रश्नाच्या मुळावर पांघरूण घालतो . ते पांघरूण फाटले तरी तेच ओढून तो जन्मभर चालत राहतो. तसाच हा 'अरविंद देसाई'. सुशिक्षित(असे म्हणतात तसा), म्हटलं तर कुठचीही समस्या नसलेला, कसली भ्रांत नसलेला. त्याच्या वडिलांच्या व्यवसायाची देखरेख करतो. पण तीही एका तिह्राईताप्रमाणे. तिथल्या कामात त्याचे फारसे लक्ष नसते. त्याच्या सेक्रेटरीशी त्याचे प्रेमसंबंध (?) असतात. पण खरंतर तो त्यातही फारसा गुंतलेला नसतो. तिच्याशी त्याची कसलीच भावनिक जवळीक नसते. तो एकदा तिला  विचारतो : 'तुम मेरे बारेमें  क्या सोचती हो?' ती  म्हणते : 'तुम मुझे अच्छे लगते हो' त्यावर तो म्हणतो : 'इतनाही ? और कुछ भी नहीं?'  त्यावर ती  म्हणते 'इतना काफी नहीं है?'  मग तो विचारतो : 'मुझे बताओ आखीर तुम्हे मुझसे मिलता क्या है?'  ती म्हणते 'बहोत कुछ'.  तो त्यावर म्हणतो 'बहोत कुछ. पैसेवाली नौकरी, कुछ सुविधाये, अच्छा होटल....' त्यावर ती वैतागते, त्याला थांबवते 'प्लीज डोंट से दॅट '    तो तिला विचारतो: 'मान लो कल कोई तुम्हे मुझसे ज्यादा पैसे देगा तो क्या तुम उसके साथ भी ऐसा रिश्ता शुरू कर दोगी? क्या तुम एक आम लड़की की तरह एक पैसेवाला पति ढूंडने की कोशिश कर रही हो?'


त्याची कसल्या उत्तराची अपेक्षा असते तिच्याकडून? आणि ते त्याला हवं असलेलं, तो शोधत असलेलं उत्तर तिच्यापाशी नसतं. ती जे सांगते त्यानेही त्याचे समाधान होत नाही. त्याला वाटतं की कुणाला आपण आवडावे असे आपल्यात ख़ास काहीच नाही. स्वतःच्या अस्तित्वात त्याला फ़क्त पैसा, उंची हॉटेलात जेवणे, चैन करणे यापलीकडे काहीच  दिसत नाही. त्या बाबत त्याला खंत अाहे असेही नाही कारण त्या सगळ्याचा उबग येऊन तो वेगळे काही करण्याचे  धाडस तो करत नाही, किंबहुना त्याला तसे धाडस करवेसेही वाटत नाही. माणसाने मनात आणले तर तो आपल्या जीवनात बदल घडवून आणू शकतो असे म्हणायला ठीक असेल पण प्रत्यक्षात ते स्वातंत्र्य त्याला असते का? कारण बदल करण्यासाठी मुळात आपल्याला काय हवे हे माहित पाहिजे, ज्याला तेच माहित नाही तो काय करू शेकेल? अरविंद देसाई ला आपल्या असण्याबद्धल प्रश्न आहेत. त्याची उत्तरं  तो त्याच्या बाह्य स्वरुपात शोधायला जातो. प्रेयसीबरोबर फिरतो. तिच्या घरी जातो, तिच्या घरच्याना तो ढिसाळच वाटत असतो. व्यंग असलेल्या वश्येकडे जातो, तिच्याशी संबंध ठेवतो. आपल्या डाव्या विचारसरणीच्या मित्राशी भेटून कहिबाही चर्चा करायचा प्रयत्न करतो, त्याला त्यात काहीच रस नसतो तरीही. आपल्या बहिणीच्या आयुष्यात घडणाऱ्या सुक्ष्म पण प्रभावी घटनांची त्याला जाणीव असते. तिच्याशी बोलताना देखील तो आपल्याबाबतीतच काहीतरी शोधत राहतो. पण त्याला काहीच सापडत नाही. कारण त्याच्या स्वतःशिवाय या प्रश्नांची उत्तरे कोण देणार?
त्याचे वाहून जाणे ('ड्रिफ्टिंग') चालूच राहते. तो एका पुस्तकाच्या दुकानात शिरतो, पिकासोचे पुस्तक बघतो, रशियन लेखकांची पुस्तके त्याला दिसतात. पण शेवटी काहीच न घेता बाहेर पडतो. एका रस्त्यावरच्या मुलाशी बोलतो, त्याला आपल्या गाडीवर लक्ष ठेवायाला सांगतो, म्हणुनच की काय त्याचा आवाज एकदम मृदु , आपुलकीचा होतो. मुलगा  त्याच्या पाठिमागे त्याला बघून जी प्रतिक्रिया तोंडावर आणतो तोच खरा जीवनाचा अर्थ. पण अरविंद  देसाईला तो कसा कळेल? तो तर जीवनाच्या अर्थाला केव्हाच पाठमोरा झाला आहे. जो अर्थ, जे सत्य ते आपण त्याला पाठमोरे असतानाच दिसतं बहुतेक.

या चित्रपटात काहीही अधोरेखित न करता देखील बरेचसे शब्द आणि त्यांचे अर्थ अधोरेखित झाले आहेत. कसलंही ठाम भाष्य करायचे टाळल्यानेच की काय, या कलाकृतीला एक अदृश्य उंची प्राप्त झाली आहे. चित्रपटाच्या लेखकांने लिहिलेली ही दास्तान बहुदा उसनं आणलेली नाही, कुठेतरी खोलवर जाणवलेलं काहीतरी मांडण्याचा (थोडासा अयशस्वी असला तरी) प्रयत्न केला आहे. अयशस्वी  मला  यासाठी वाटला कारण शेवट तितकासा पटला नाही. तो स्वतःला गोळी  मारून घेतो हे कथेला बाधक वाटते. अश्यासाठी नव्हे की ते असंभाव्य आहे, किंबहुना ते संभाव्यच  आहे पण एवढं सुश्पष्ट (एक्सप्लिसिट) दाखवण्याची काही गरज नव्हती, थोडासा अब्सर्डिझम कडे जाण्याच्या हा अट्टहास कश्यासाठी?  अंत काय फक्त फिजिकल अस्तित्व मिटवण्यानेच होऊ शकतो का? चित्रपटाचा अंत म्हणजे त्यातल्या पत्राविषयी काहीतरी निर्णायकच घडले पाहिजे का? असे निर्णायक घडणे (घडवणे) ही एक ट्रिक वाटते.कथेचा पोत त्यामुळे बिघडला असे मला तरी निदान वाटले.तरीही शेवट बाजूला केला तर कथा खुप काही सांगणारी आहे. मुख्य पात्राभोवती दुय्यम पात्रं असतात आणि त्यांच्याही समांतर जाणारया रेघाही  पुसट असल्या तरी लक्षात राहतात. अशी अनेक पात्रं आहेत. ऍलिसचे(प्रेयसि) रस्त्यावरून फिरणे, रस्त्यावरच्या दुकानांच्या काचेतले ड्रेस बघत. अरविंदचा मित्र, त्याच्या घरातले चित्रं आणि त्यावरचे त्यांचे सम्भाषण, अरविंदची सतत पूजापाठ करणारी, एकहि शब्द न बोलणारी आणि फ़क्त धार्मिक दान मागणारी आई आणि अशी अनेक पात्रं,  हे सर्व अरविंदचीच मनिफेस्टेशन्स (रुपं ) वाटतात. 

अस्तित्ववाद,बौद्धिक असल्या व्याख्यात या चित्रपटातल्या कथेला न बांधता पारदर्शी नजरेने बघितलं तर अनेक सुक्ष्म प्रदर या कथेत आहेत. अशी ही अरविंद देसाई ची 'अजीब दास्तान', अजरामर कलाकृती  नसेल ,पण हे वाऱ्याच्या झोताने चटकन ने हलणारे पान आहे.

चित्रपट संपला तरी चित्रपटातील काही वाक्य मनात रेंगाळत राहतात.
'रातको कैसा लगता है? रातको जब एक तरह का अकेलापन अंदरसे पकड़ लेता है, नोचने लगता है।'
'कैसा अकेलापन ? '

'तुम मेरी प्रोब्लेम जानते हो? एक ऎसी दुनियामे रहना, जहां मेरे सोचने और करने में बहोत फर्क है।'