काही दिवसांपासून मला सारखं असं वाटत होतं की झाडांचा अभ्यास करून आपण काय करत आहोत? कशासाठी करायचा हा अभ्यास? याने काय मिळणार? कुठच्याही रूढार्थाने मी वनस्पती संशोधक नाही, botanist नाही की त्या विषयाची पदवी माझ्याकडे नाही. मग हा अभ्यास कशासाठी करायचा? असा प्रश्न मला पडला होता. मनाला एकप्रकारची खिन्नता आली होती.
काल रविवारी सकाळी मी दत्ताजी साळवी उद्यानात गेले होते, झाडांची, निसर्गाची मनापासून आवड असलेल्या माझ्या एका मैत्रिणीबरोबर.
दत्ताजी साळवी उद्यान अतिशय सुंदर आहे, छोटेसेच आहे पण ही नेहमीची बाग नाही , खूप लोकं
आली आहेत, मुलं खेळताहेत, आवाज, वर्दळ सुरु आहे असे तिथे काही नाही, कारण तिथे लोकांसाठी, तशी जागाच नाही. जी जागा आहे ती फक्त
आणि फक्त झाडांसाठी आहे. या उद्यानाचा जो कॉन्ट्रॅक्टर आहे तो स्वतः एक झाडांचा दर्दी चाहता आहे. त्याने कुठून कुठून ही झाडं तिथे आणली आहेत. त्यामुळे या उद्यानाचे रूप इतर उद्यानांसारखे नाही. खूप वेगेळे आहे. दाटीवाटीने इतक्या दुनियाभरच्या जातींची झाडं तिथे
गुण्यागोविंदाने एकत्र नांदताहेत. आणि त्यांच्या गर्द झाडीत छोटे मुनिया, दयाळ , नाचणसारखे पक्षी निर्भयपणे बागडत असतात. 'नाचण' या पक्ष्याचे तर तिथे घरच आहे. ती छान झाडं आणि त्यात आनंदाने बागडणारे समाधानी पक्षी पाहून खूप आनंद झाला.
या आनंदांत भर घालायला आणखी एक कायम लक्षात राहील अशा व्यक्तीची गाठ तिथे पडली.
तिथे एक गृहस्थ बराच वेळ झाडांना न्याहाळताना दिसत होते. बराच वेळ ते तिथे होते. आमचे आणखी एक वनस्पती सहाध्यायीही तिथे आले होते. ते ठाण्याचे असल्याने बऱ्याचदा या उद्यानात येतात त्यामुळे ते त्या गृहस्थांना ओळखत होते. हळूहळू आमच्याशीही ते गृहस्थ बोलू लागले. आणि खरंच काय वनस्पतीचं ज्ञान होतं त्यांना. प्रत्येक झाडाची फुल, पाकळी, त्याच्या पानांपासून ते खोडांपर्यंत सगळं इतक्या बारकाईने त्यांना माहित होतं की आश्चर्य वाटलं. यांचे नाव होते श्री. रानडे, जवळपासच ते कुठेतरी राहतात. रोज इथे येतात आणि तासनतास त्या फुलापानांमध्ये हरवून गेलेले असतात. त्यांना निसर्गाची मनापासून असलेली आवड त्यांच्या बोलण्यातून दिसत होती, म्हणाले 'आता माझं वय शहात्तर आहे, त्यामुळे मी आता 'येऊर' वगैरेच्या जंगलात भटकायला जात नाही, दूर भटकायला आता जमत नाही, म्हणून मी इथे येतो.
आणि खरंच इथे येऊन त्यांनी रोज निरक्षण करून झाडांबद्दलचे जे ज्ञान संपादन केले आहे त्याला तोड नाही. त्यांना त्या गार्डनमधील जवळपास सगळीच झाडे माहित होती. कुठच्या झाडाला कधी फुल येणार तेही माहित होते. 'तुम्ही इतक्या दुरून आलात तर आता हे फुल बघूनच जा कारण ते परत दिसेल की नाही कोण जाणे' असे आम्हाला सांगून त्यांनी जी झाडं दाखवायला सुरवात केली ती जवळपास अर्धा-पाऊण तास झाला तरी संपेना. खरंतर त्यांना घरी जायचे होते, पण त्यांचा उत्साह एवढा होता आणि आपल्याला स्वतःला फुलं बघून जितका आनंद झाला तो दुसऱ्यालाही द्यावा अशी त्यांची एवढी प्रबळ इच्छा होती, की एकामागोमाग एक त्यांनी अशी फुलं, पानं दाखवली की आम्ही थक्कच झालो. बरं त्यांना झाडांविषयी जी माहिती होती ती नुसती वरवरची माहिती नव्हती. अगदी त्या फुलाचा विशिष्ट गंध, त्याचा आकार, अर्धवट उमललेल्या फुलातील न दिसणारा भाग, पानांचे निरनिराळे पृष्ठभाग आणि त्यांचे जाणवणारे स्पर्श, पानं चुरडल्यावर येणारे विशिष्ट गंध यांचे त्यांना अपरिमित ज्ञान होते, प्रत्येक झाडाचे नाव त्यांना माहित होते. ते प्रत्येक झाडाला नावानेच नव्हे ते अंतरंगांने ओळखत होते. या सर्वामुळे फुलापानांइतकेच टवटवीत आणि प्रफुल्लित होते हे रानडेकाका.
त्यांच्यामुळे मलाही एकदम छान वाटू लागले, त्यांची ऊर्जा त्यांनी नकळत आम्हाला दिली होती.
तेव्हा मला जाणवले की आपण जो झाडांचा अभ्यास करत आहोत, तो निरपेक्ष मनाने केला तर कधीतरी अनेक वर्षांनी आपणही कुठल्यातरी बागेत, जंगलात फिरत असू, तेव्हा असेच कुणीतरी झाडांची आवड असणारे तिथे येतील, तेव्हा आपणही याच रानडेकाकांच्या उत्साहाने त्यांना चार निसर्गाचे सुंदर विभ्रम दाखवू शकू आणि आपली ऊर्जा तिथे असलेल्या एखाद्या खिन्न झालेल्या , 'आपण हे का करत आहोत? याचा काय उपयोग?' असा प्रश्न मनोमन विचारणाऱ्या एखाद्या व्यक्तीला देऊ शकू. हेच त्या वनस्पतींच्या, झाडांच्या अभ्यासाचे सार्थक असेल.
'काय करतो? का करतो? त्याने काय मिळेल?' याचा विचार न करता, ध्यासाने झपाटून एखादं कार्य करत राहिलं की भले त्यातून काही व्यावहारिक लाभ होईल न होईल, पण मनापासून जेव्हा ते काम केले जाईल तेव्हा आपल्याकडे निर्माण होणारी सकारात्मक ऊर्जा नक्कीच आपण इतरांना देऊ शकू, किंबहुना आपण न देताच ती इतरांपर्यंत पोहोचू शकेल.
इतके दिवस पडणारा प्रश्न 'काय या अभ्यास करण्याचा उपयोग?' या छोट्याशा अनुभवाने एकदम नाहीसा झाला. एखाद्या माणसालादेखील जे कार्य आपण करतो, जसे आपण आहोत त्यातून छोटीशी का होईना प्रेरणा मिळाली तरी खूप झाले असे मला वाटले. रानडेकाकांना माहितही नाही की त्यांच्यामूळे मला खूप प्रेरणाही मिळाली आणि खूप छानही वाटले.