खोलीला खिडकी आहे. खोलीत बरंच काही आहे. बेड, टेबल, त्यावर उघडून ठेवलेलं पुस्तक, पाण्याची बाटली, चहाचा रिकामा कप, वीजेचा बल्ब, भिंतीवरचे चित्र, बकुळीच्या सुकलेल्या फुलांच्या टांगलेल्या माळा, चार भिंती. खोलीच्या बाहेरही बरंच काही आहे. जे खिडकीतून दिसतं. चिमण्या, सूर्याचा प्रकाश, दूरवर पसरलेली खाडी आणि तिचं पाणी, आकाश, गुलमोहोर, लांबलचक पसरलेली टेकडी आणि तिच्यावरची गच्च उभी असलेली झाडं. मी या खिडकीत उभी राहून त्यांना बघते, तसे तेही मला याच खिडकीच्या बाहेरून एखाद्या पिंजऱ्यात उभ्या असलेल्या चिंपांझीला बघतात तसे बघत असतील का?