Tuesday 28 February 2017

वृक्षप्रकल्पातील पहिला हिरवा सोबती : कदंब

The best time to plant a tree? 
Twenty years ago.
The second best time? 
Today.
                                              - Chinese proverb


आमच्या गावच्या घराच्या आसपास बरीचशी जमीन आहे. या शेतजमिनीत पूर्वी भात पिकत असे. आता तिथे शेती करायला कुणी नाही. अशा या पडीक जमिनीला सोबत मिळावी आणि तिच्यात हिरवे सोबती उभे राहावेत, ज्यांच्या अंगाखांद्यावर पशू-पक्षी बागडावेत म्हणून हा एक छोटासा वृक्षाप्रकल्प हाती घेण्याचे योजले आहे. मूळ कल्पना माझा भाऊ विवेकानंद याची. जे वृक्ष लावण्याचे ठरवले आहे त्या वृक्षांची ओळख आणि त्यांच्याविषयी, त्यांच्यानिमित्ताने लिहिले गेलेले हे छोटेसे डायरीवजा लेखन. 
यातला पहिला वृक्ष आहे  'कदंब'.

 
कदंब वृक्षाविषयी पहिल्यांदा ओळख करून दिली दुर्गा भागवत यांनी. त्यांच्या 'पैस' पुस्तकामध्ये  त्या लिहितात
'कृष्ण आला आणि यमुनेच्या तीरावरचे कदंबही वेगळेच झाले. यमुनेच्या सुखाभावनेचे साक्षी हे हर्षोत्फुल कदंब झाले. कृष्ण  यमुना यांचे समान प्रतीक कदंबाचे झाड झाले. आता कदंब फारसे कुठे दिसत नाहीत, पण यमुनातीरी मात्र कदंबाची झाडे अजून तशीच इमानाने फुलताफळताहेत. मी मथुरेला गेले ते कदंब पाहण्यासाठीच. कृष्णाची कुंडले कदंबाचीच. याच झाडावर चढून त्याने कालिया डोहात उडी घेतली. कदंबावरच त्याने गोपींची वस्त्रे टांगून ठेवली. चीरहरणाचा तो कदंब अद्याप वृंदावनात आहे. पण आता यमुना त्याच्यापासून दूर सरली आहे. ते झाड रोडावत तसेच तग धरून उभे आहे. कदंबाची केशरीपिवळी फुले म्हणजे कृष्णाच्या आवडत्या पितांबराच्या रंगाची, त्याची नि राधेची आवडती. कदंबाची सावली गाईगुरांना प्रिय. तिथेच कृष्णाची बासरी निनादायची. '  

कदंब वृक्ष म्हणजे कृष्णाचा वृक्ष. कृष्णाचे बालपण यमुनातीरी याच वृक्षाच्या विशाल छायेत गेले. पोपटी-हिरवी मोठी पाने आणि गोल चेंडूसारखी बारीक पिवळसर-लाल, पांढऱ्या केसरांनी बनलेली फुले हे कदंबाचे वैशिष्ट्य.


वृक्षाच्या शाखाही आढव्यातिढव्या कश्याही वाढणाऱ्या नाहीत, तर सरळ बुंध्यावर एकाला एक समोरासमोर रचनाबद्ध शैलीत असतात. पानेही समोरासमोर दोन दोन असतात.कदंबाला 'नीव' असेही म्हणतात. या वृक्षाचे आणखी दोन प्रकार डॉ. म. वि. आपटे यांच्या 'वनश्रीसृष्टी' या ग्रंथात दिले आहेत. ते आहेत 'हेदकदंब' आणि 'लघुकदंब'. लघुकदंब हा कदंब वृक्षापेक्षा थोडा लहान असतो. वि. म. आपटे यांनी लिहिले आहे की 'लघुकदंब' या वृक्षाला पावसाळ्यात फुले येतात. त्यामुळे मेघदूतात ज्या कदंब वृक्षाचा उल्लेख केला आहे तो लघुकदंब असावा. 
त्यांनी मेघदूतातील कदंब वृक्षावरच्या ओळीही आपल्या पुस्तकात दिल्या आहेत. 

नीचैराख्यं गिमधिवसेस्तत्रविश्रामहेतोः ।     
त्वत्संपर्कात् पुलकितमिव प्रौढपुष्पै कदंबैः।   मेघदूत १.२५ 

याचा अर्थ आहे, '(हे मेघा,) नीचैर्गिरीवर जरा थांब. तुझ्या येण्याने त्याला कदंबरूपी रोमांच येतील. 
कदंब वृक्षाला नक्की फुले केव्हा येतात हे एक मोठे गूढच आहे. माझ्या भावाच्या पुण्यातील घराच्या खाली तीन कदंबाची तरुण झाडे आहेत. त्यांना फेब्रुवारीच्या महिन्यात फुले आलेली मी पहिली आहेत. श्री. द. महाजन यांनी त्यांच्या 'आपले वृक्ष' पुस्तकात कदंब फुलण्याचा काळ 'जुलै-ऑगस्ट' दिला आहे. मग कदंबाची झाडं फुलतात तरी कधी?
  
कदंब वृक्षाचं शास्त्रीय नाव Neolamarckia Cadamba
Syn : Anthocephalus chinensis; Anthocephalms Cadamba म्हणजेच ऍन्थोफॅलस कदंबा किंवा ऍन्थोफॅलस चायनेन्सिस
कदंब वृक्षाचा भाऊ लघुकदंब म्हणजेच 'कळम' याचे शास्त्रीय नाव आहे 'मित्रागायना पार्व्हीफोलीया'.

दुर्गाबाईंनी कदंब वृक्षाची ओळख  तर करून दिली पण त्यांनी या झाडावर लिहिलेले 'कदंब' हे दुर्मिळ पुस्तक मात्र अजून वाचायला मिळाले नाही. या पुस्तकाच्या मी काही वर्षांपासून शोधात आहे. पहिला कदंब वृक्ष बघितला तो खजुराहोला. खजुराहोच्या मातंगेश्वर मंदिराजवळ उघड्यावरच एक मारुतीची मूर्ती आहे, त्याच्याबाजूला हा कदंब वृक्ष आहे. 

अज्ञेय (सच्चिदानंद हीरानंद वात्स्यायन) या हिंदी कवीने कदंब वृक्षावर अतिशय सुंदर कविता केल्या आहेत. 

टेर वंशी की
यमुना के पार
अपने-आप झुक आई
कदम की डार।
द्वार पर भर, गहर,
ठिठकी राधिका के नैन
झरे कँप कर
दो चमकते फूल।
फिर वही सूना अंधेरा
कदम सहमा
घुप कलिन्दी कूल!

अलस कालिंदी

अलस कालिन्दी--
कि काँपी
टेर वंशी की
नदी के पार।
कौन दूभर भार
अपने-आप
झुक आई कदम की डार
धरा पर बरबस झरे दो फूल।
द्वार थोड़ा हिले--
झरे, झपके राधिका के नैन
अलक्षित टूट कर
दो गिरे तारक बूँद।
फिर-- उसी बहती नदी का
वही सूना कूल!--
पार-- धीरज-भरी
फिर वह रही वंशी टेर!

भक्त कवी रसखान यांनी लिहिलं आहे 'जो खग हौं तौ बसेरौ करौं मिलि
                                                                कालिन्दी कूल कदंब की डारन।'


कदंब वृक्षाला अनेक नावं आहेत. त्यापैकी एक 'शिशुपालक' असे आहे. या वृक्षाचा वैद्यकीयरित्या  लहान मुलांच्या व्याधींवर उपयोग होतो. शततारका या नक्षत्राचा आराध्य वृक्ष कदंब आहे. 

कदंबावरचं पोस्टाचं तिकीट

Sunday 26 February 2017

तांबट पक्षी

अतिशय सुंदर दिसणारा छोटासा हिरवागार तांबट पक्षी. मिश्या असलेली जाड चोच, पिवळसर गळा, छातीवर लाल पट्टा, डोक्यावर लाल टिळा, टपोरे, उदासीने भरलेले डोळे आणि टोक-टोक-टोक-टोक (पुक-पुक-पुक-पुक) असा मंद सूर आळवणारा. त्याच्या या आवाजावरून त्याला 'तांबट' असे  नाव पडले आहे. तसेच इंग्रजीमधील सामान्य नावही 'कॉपरस्मिथ बार्बेट' आहे. 'कॉपरस्मिथ' म्हणजे तांब्याची भांडी घडवणारा म्हणजेच मराठीत 'तांबट'.  हा तांबट हातोड्याने तांब्याच्या भांड्यावर घाव घालताना होणारा आवाज आणि या पक्ष्याचा टोक-टोक असा एकाच लयीतला आवाज सारखाच आहे. आता हे लेखन करतानाही मला दूरवर तांबटाचा आवाज ऐकू येत आहे. खरंतर या आवाजाचा उल्लेख काही जण टोक-टोक, तर काही टुक-टुक, काही पुक-पुक असा करतात. मला तो आवाज 'पुक-पुक-पुक' असा वाटतो म्हणून त्याच्या आवाजाचे वर्णन मी तरी इथे तसेच करणार आहे. 

'तांबट' या पक्ष्याची पहिली ओळख करून दिली मानववंशशास्त्रज्ञ आणि लेखिका दुर्गा भागवत यांनी. त्यांच्या 'भावमुद्रा' या पुस्तकात ह्या पक्ष्याला त्यांच्या ओजस्वी शब्दांतून अवतरण्याचा मान मिळाला आहे. या पुस्तकातील त्यांच्या 'टोक...टोक...टोक' या लेखाची सुरवातच 'तांबट पक्ष्याने झाली आहे. लेखाचे नावच आहे 'टोक..टोक...टोक'.

त्या लिहितात

'आज हवा किती सुंदर झाली आहे.  वेडापिसा गार वारा उफाळून वाहतो आहे. ..... आधीच्या पावसाच्या सरीने टवटवी आलेली झाडे पिसें भरल्यासारखा पिंगा घालताहेत. आणि तांबट पक्ष्याचा 'टोक.. टोक... टोक' हा एकाच एक हट्टी आवाज खोलीभर घुमतो आहे. 'टोक..टोक..टोक' हा एकच अर्थ नसलेला ध्वनी साऱ्या अक्षरांबरोबर पिसाटासारखा घुमतो आहे. 'टोक टोक टोक' हा अमानवी दूरचा आवाज, पण तो आता तांबट पक्ष्याचाही राहिला नाही. खास तो तुझाच आवाज.'

हा लेख खरंतर तांबट पक्ष्यावर लिहिलेला नाही, ए. एम. टी. जॅक्सन या लेखकावर आहे. आपल्या 'बीस्टस अँड मेन इन इंडिया' या पुस्तकात त्याने तांबट पक्ष्याची  करून दिली आहे. तांबटाचा  टोक.. टोक..टोक.. आवाज बाहेर ऐकू येत असताना या पुस्तकाशी दुर्गाबाईंची गाठ पडली होती.

तांबटाचे शास्त्रीय नाव 'मेगालायमा हिमॅकेफाला' आहे. हा पक्षी साधारण सतरा सेमी लांबीचा,चिमणीपेक्षा थोडासा मोठा असतो. त्याच्या रंगामुळे हा झाडांच्या हिरव्यागार पानांतून सहसा दिसत नाही.
दुर्गाबाईंनी या पक्ष्याची ओळख करून दिली तरी तो प्रत्यक्षात पाहता आला नव्हता. आंतरजालावर त्याचे अनेक फोटो पाहिले. पण प्रत्यक्षात तो दिसला गेल्या डिसेम्बर महिन्याच्या शेवटी  मुंबईतल्या घराच्या अगदी जवळच्या झाडावर. दोन एकसारखे दिसणारे तांबट आसपास फिरत होते. थोडे निरखून बघितले असता कळले झाडाच्या खूप वरच्या बुंध्याना एक-दोन  नाण्याच्या आकाराएवढी भोकं पाडलेली होती, आणि त्यात तो निरखून पाहणी करत होता. तांबटाची ही घरटी, बहुदा त्याने स्वतः तयार केली होती किंवा पूर्वी कुठल्यातरी तांबटाने बनवली असावीत. तांबटाचा वावर असलेल्या झाडावर, बुंध्यांना अनेक भोके पाडलेली दिसतात. कुणाच्या नजरेस पडू नये म्हणून तांबट आपले घरटे अनेक ठिकाणी पोखरून ठेवतो. तसेच घरट्याच्या लहान आकारामुळे सहजासहजी शत्रू पिल्लांपर्यंत पोहोचू शकत नाही.

डिसेंबर   अखेरीस या पक्ष्याची हालचाल जोरात सुरु होती. सतत 'पुक-पुक-पुक'चा एकसुरी आवाज सकाळ, दुपार चालू असे. या पक्ष्यात नर, मादी सारखेच दिसतात. पण सतत 'पुक-पुक-पुक' चा नाद करणारा झाडावर बसलेला तांबट दिसतो तेव्हा तो बहुदा नरच असतो. आपली त्या झाडावरची, त्या आसपासची जागा काबीज केल्याचे तो जणू या सततच्या आवाजाने बाकीच्या तांबट नरांना सांगत असतो. एकदा झाडावर असाच एक तांबट 'पुक-पुक-पुक' करत बसला होता. त्याने केलेल्या प्रत्येक नादात त्याचे पूर्ण शरीर कंप पावत होते. त्याचे पूर्ण शरीरच तो आवाज बनले होते. मधेमधे आपला आवाज थोडा संथ लयीत आणून तो इकडे तिकडे मान वळवून पाहत होता. बहुदा मादी दृष्टीपथात आहे का हे तो पडताळून पाहत होता. तेवढ्यात दुसऱ्या झाडावरून एक दुसरा तांबट या झाडावर आला. क्षणार्धात आधीच्या नराने आलेल्या तांबटावर हल्ला चढवला आणि त्याला पळवून लावले. त्यावरून समजले की तो त्याचा प्रतिस्पर्धी नर होता. 

नंतर अनेक दिवस तांबटाचे निरीक्षण करता आले. तो जानेवारी महिन्यातील काळ होता. आता काहीवेळेला चार-चार तांबट इकडून तिकडे झाडावर फिरताना दिसू लागले होते. जानेवारी ते जून हा तांबटाच्या विणीचा काळ आहे. जानेवारी दरम्यान तांबटाने आपला जोडीदार शोधलेला असतो. त्यामुळे त्यांच्या जोड्या झाडावर दिसू लागतात. बऱ्याचदा आपल्या जोडीदाराला नर तांबट फळाचा घास भरवतो. छोटी फळं, किंवा छोटे कीटक हे तांबटाचे मुख्य खाद्य आहे. काहीवेळेला तांबट तोंडात एखादे फळ घेऊन त्या फळासकटच अंगातून 'पुक-पुक-पुक'चा एकसुरी नाद काढत असे. शेवटी जोडीदार आला नाही तर ते फळ स्वतःच खात असे. तांबट घरटे खोदण्यासाठी आपल्या टणक चोचीचा वापर करतो. साधारण मऊ लाकडाच्या झाडावर तो आपले घरटे बनवतो. लाकूड पोखरून आत एक लांब नळी सारखा प्रवेशमार्ग तयार केला जातो, त्याच्या शेवटी थोडा मोठा भाग अंड्यांसाठी आणि नंतरच्या काळात पिल्लांना राहण्यासाठी तयार केला जातो. नर आणि मादी दोघेही पिल्लांचे संगोपन करतात. तांबटाच्या मिश्यांचा उपयोग पिल्लांना स्पर्श करण्यासाठी होतो. जशी पिल्ले मोठी होतात तशी ती घरट्याच्या तोंडाशी येऊन खाणे मागू लागतात. त्यांना फळांचा भरपूर आहार घेऊन नर आणि मादी दोघेही आपलटुनपालटुन घरट्याच्या तोंडाशी येतात आणि पिल्लांना घास भरवतात. कधीकधी घरट्यात प्रवेश करून तिथे साठलेला कचरा चोचीत धरून ते बाहेर येतात. तांबट पक्ष्यांच्या 'मोनोगॅमी' (एकपत्नीव्रत किंवा एकपतीव्रत) संबधी फारशी माहिती मला अजून तरी मिळाली नाही. पण निदान एका विणीच्या काळात तरी तांबट पक्षी एकाच जोडीदाराबरोबर राहतो.

या पक्ष्याच्या विविध जाती आहेत. त्यापैकी कॉपरस्मिथ बार्बेट मुंबईत सापडतो. या पक्ष्याला अनुसरून संस्कृत साहित्यात अनेक उल्लेख आहेत. त्यापैकी कॉपरस्मिथ बार्बेटच्या संदर्भात खालील ओळी आहेत.
मनुस्मुतीमधील उल्लेख
मणिमुक्ताप्रवालानि हृत्वा लोभेन मानवः |
विविधानि च रत्नानि जायते हेमकर्तृषु || १२.६||
हेमक (हैरण्यक: सोनार)

जीवंजीवकनादैश्र्व हेमकानां च नादितै: । वायुपुराण , ३६.४
यातील दोन्ही नावं हिंदी तंबायत (कॉपरस्मिथ) शी निगडित आहेत.  


प्रल्हाद जाधव यांनी तांबट या पक्ष्याचा केलेला आत्मशोध त्यांच्या 'तांबट' या पुस्तकात वाचला. अशी पुस्तकं मराठीत इतकी कमी का लिहिली जातात याचा खेद वाटला.त्यांच्या या पुस्तकात त्यांनी तांबट पक्ष्याचे दीर्घकाळ निरीक्षण केले आणि त्यांचे त्याच्याशी एक नातेच तयार झाले. पहिल्या पानावरच त्यांनी एक वाक्य लिहिलं आहे,

'खरं तर तांबटाचं आणि माझं नातं शब्दांपलीकडचं आहे'.

हे किती खरं आहे! एखाद्या पक्ष्याचं तुम्ही जितकं अधिक निरीक्षण कराल तेवढं तुमचं त्याच्याशी  अधिक गहिरं नातं बनत जातं.