Monday 7 January 2019

भयानक तोंड

त्या भयानक तोंडाने आ वासला आणि मला गिळले.  मी सध्या त्या तोंडात बंद आहे. मला विरघळून टाकण्यासाठी त्यात पाचक रस सध्या पाझरत आहे. पण मी तसा विरघळणार नाही. हा माझा एक हात आणि दोन्ही पाय पाचक रसाने झडून बाजूला पडले आहेत. माझ्या शरीराला मोठी भगदाडे  पाचक रस पाडीत आहे. चेहरा विद्रुप झाला आहे पण मी तसा विरघळणार नाही. कारण माझ्या नजरेतील उष्णता अजून अबाधित आहे. तिने मी तो पाचक रस शोषत आहे. जितका मी शोषत आहे आहे तितक्या दुप्पट वेगाने तो निर्माण होत आहे. त्यामुळे इथून बाहेर पडताना फक्त डोके जरी शाबूत राहिले तरी मला त्याची तमा नाही.  फक्त दुसरा हात गमावला तर मात्र हे भयानक तोंड मला उघडता येणार नाही. आणि मरेपर्यंत मला या तोंडात बंदिस्त राहावे  लागेल. तसे  जर मला बंदिस्त राहावे  लागले  तर मी पुढचे  आयुष्य कसे घालावेन याबद्दल मी विचार करू इच्छित नाही. कारण तसे झालेच तर मला विचार करायला मरेपर्यंत वेळ आहे. वेळ कसा घालवायचा याचा विचार करतच आयुष्याचा बराच वेळ जाऊ शकतो. आणि जेव्हा वेळ कसा घालवायचा हे मला समजले तर त्या मार्गाचा अवलंब करून मी उर्वरित आयुष्य घालवू शकतो.

या तोंडात बसून मी फार सुखी नाही. कसा असेन? अत्यंत चिकट, उग्र, दुर्गंधी असलेलं हे तोंड आहे. याने आधी कितीजणांचा घास घेतला असेल. त्यातली काही माणसे नक्कीच अत्यंत कुजक्या अंतरंगाची असू शकतात. त्यांचीच दुर्गंधी या तोंडात पसरली असावी. मला दिसत असणाऱ्या काही पडलेल्या गोष्टींत या माणसांपैकीच काहींचे एक,दोन दात, हाडं असावीत. हि माणसे  खरोखरच महामूर्ख म्हटली पाहिजेत. या तोंडाला चावून, दात लावून, हाडांच्या शरीरी सामर्थ्याने नाही तर नजरेच्या उष्णतेनेच फक्त मारता येऊ शकते हे या मूढांना ठाऊक नाही. आयुष्यभर इतरांच्या जीवाचे लचके यांनी दातांनी तोडले, तर इथेही त्यांचा उपाय यशस्वी होईल असे या मूढांना वाटले असावे.

मी इथे बसून आहे, तेव्हा इतर कुणी इथे येऊ नये, कारण त्यांना माझ्याशी बोलण्याचा मोह होईल. पण बोलणे  म्हणजे शुद्रच. बोलून स्वतःचा वेळच फक्त काय तो जाऊ शकेल. हा पाचक द्रव अत्यंत चिकट असल्याने मला या माझ्या उरलेल्या हाताची हालचालही करता येत नाही आहे, त्यामुळे मी तो अगदी उंच उगारून हवेत ठेवला आहे. जेणेकरून त्याला पाचक द्रवाचा स्पर्श होऊ नये. तसे  आता माझ्या नजरेच्या उष्णतेपुढे पाचक द्रव थोडा मागे हटला आहे. माझ्यासाठी हे फार उत्साहाचे नाही. कारण जर मी असेच माझ्या डोळ्यांच्या प्रखर उष्णतेने पाचक रस शोषू लागलो आणि तो संपला नाही तर माझ्या नाकातून तो रक्त बनून स्त्रवू लागेल. रक्त फुकट जाणे आता माझ्यासाठी योग्य नाही. कारण इथून उठण्यासाठी लागणारी ऊर्जा मला रक्तच पुरवणार आहे.  अत्यंत परिश्रमाने मी स्वतःचे शरीर घडवले होते. त्या रक्तामासांच्या ऊर्जेचाच हे भयानक तोंड वापर करून आणि त्यामुळेच अधिक पाचक रस बनवून तो माझ्यावरच सोडत आहे. म्हणजे माझ्या मजबूत शरीरामुळेच अधिक पाचक रस बनायला मदतच होत आहे. म्हणजे मीच मला मारत आहे का? माझ्या सर्वनाशाला मीच कारणीभूत झालो आहे.

तोंड मी बंद ठेवले आहे पण विचार चालू आहेत. इथे आयुष्याच्या अंतापर्यंत मी बसू इच्छित नाही. कारण इथे काहीच नाही. काहीच नाही म्हणजे माझ्यासाठी काहीच नाही. पण म्हणजे माझ्यासाठी काय असायला हवे आहे असे माझे म्हणणे आहे तेही मला ठाऊक नाही. असे म्हणणे प्रत्यकाचे असतेच. तसे म्हटल्याप्रमाणे काही असतेच असेही नाही. तरीही इथून बाहेर पडायलाच मला आवडेल.

पण एक आहे. इथे माझा कुणाशी संबंध येत नसल्याने माझ्या अस्तित्वाला इतरांपासून धोका नाही. इथे मी कुणीच नसलो तरीही चालेल. उद्या या पाचक रसाशी झटता, झटता माझे शरीर नष्ट झाले तरीही चालेल. इथे मला कुणाची हाक ऐकू येत नाही. कुणाची शिवी ऐकू येत नाही. इथे बरे  आहे असेही  मला क्षणभर वाटून गेले होते. पण फक्त क्षणभरच. एकच क्षण आपल्याला एक वाटते. मग दुसऱ्या क्षणी जे वाटते ते पहिल्या गोष्टीसारखे नसतेच. त्यामुळे वाटते इथे काय वाईट आहे? पण हि दृष्टी जशी आता मला या पाचक रसाशी लढण्यास मदत करत आहे तशी ती माझी शत्रूही झाली आहे. तिच्यामुळेच माझी परिस्थिती किती वाईट झाली आहे हे मला दिसत आहे. दोन्ही पाय आणि एक हात नाही. शरीरावर विवरं बनली आहेत. हे सर्व पाहून भयभीत होण्याऐवजी मी सुटण्यासाठी धडपड करत आहे.

पण हि फक्त  मनाची धडपड आहे शरीराची नाही. शरीराची धडपड केव्हाच थांबली आहे. ते एका अर्थाने बरेच आहे. कारण या जागेची एक युक्ती मला माझ्या गुरूने सांगितली होती. त्याने सांगितले होते की शरीर जेवढे अचल तेवढी इथून सुटका चटकन होऊ शकते. इथे आल्यापासून शरीराची जराही हालचाल मी केलेली नाही. तशी हालचाल केली तर या तोंडाच्या जबड्यात जेवढी हालचाल होईल तेवढ्या भिंती निर्माण होतात. या निर्माण होणाऱ्या असंख्य छोट्या भिंतींनी मला अजून वेढा घातलेला नाही.  या शरीराने स्वतःपासून एक हात आणि दोन्ही पाय झडून टाकून मग मला एका प्रकारे साथच दिली आहे.फक्त आता काहीच काळ राहिला असेल.  आणि तो किती काळ आहे याचे   मोजमाप करण्याचे काहीच  साधन नसल्याने मी काळाबाबतीत निश्चिन्त आहे. पण मनातील विचारांनी मात्र त्रस्त आहे. मी एक मूर्तीकार आहे. चांगल्या मूर्ती घडवल्या. त्यामुळे सुंदर शरीराची मला चांगली जाण आहे. आजवर ज्या मूर्ती मी घडवल्या त्या सगळ्याच अपूर्ण होत्या असे मला वाटते. त्या पूर्ण वाटल्या तरी त्या अपूर्णच राहिल्या. मग काही मी मुद्दामच अपूर्ण सोडून देऊ लागलो. एवढ्या मुर्त्या घडवल्या पण मला त्यांना बोलते करता आले नाही. मी त्यांच्याशी खूप बोललो पण त्या माझ्याशी एकदाही बोलल्या नाहीत. त्यातल्या एकीशी मी लग्नही केले. सतत संवाद साधण्यासाठी तिची आराधनाही केली, पण तिने तोंड कधीही उघडले नाही.
आता मात्र हे तोंड ज्यात मी बंद आहे ते तोंड तिचे असेल का असा मला संशय येतो. आणि म्हणूनच मी संभ्रमात आहे. कारण मी या तोंडातून बाहेर गेलो तर या तोंडाचा नाश करूनच ते मला करावे लागेल. म्हणजे माझ्या मला प्रिय असलेल्या आणि अत्यंत जपलेल्या मूर्तिचाच नाश मी कसा होऊ देऊ?. तिचे अस्तित्व नष्ट होणे म्हणजे माझे अस्तित्व नष्ट होणेच नाही का? तसे या तोंडाचे एक तंत्र आहे, इथे तुम्हाला भ्रम होतात. तसा भ्रम मलाही झाला आहे की हे माझ्या प्रिय व्यक्तीचे तोंड आहे आणि तिनेच गिळून माझा सर्वनाश केला आहे. पण तरीही मी आता विचार करतो की नाहीतरी ती माझी प्रिय मूर्ती माझ्याशी कधीही बोललीच नाही. तिचे प्रदर्शन मी कधी मांडले नाही. भलेभले मूर्त्यांचे चाहते तिला विकत घेऊन फुटकळ पैसे मला देऊ करून तिला माझ्यापासून हिरावून घेऊ शकले असते, पण मी तसे होऊ दिले नाही. तर आता ती मूर्ती जी माझ्यापासूनच बनली आहे, जीचे  अस्तित्व कुणालाच ठाऊक नाही तिचे अस्तित्व मी नष्ट केले तर कुणाला त्याचे काय असेल? मी तशी मूर्ती पुन्हा घडवू शकेन किंवा घडवू शकणारही नाही. पण मी तरी जिवंत राहीन. आणि अशीही शक्यता आहे की हे कुणा दुसऱ्याचेच तोंड असेल. मग ती मूर्तीही अबाधित राहील आणि मीही जगेन. पण यात एक गूढ आहे. जर मला इथून बाहेर पडता आलं नाही तर माझ्या मूर्तीशास्त्राच्या अभ्यासाचा , त्या शक्तीचा शोध माझ्याबरोबरच संपून जाईल. आजवरचे माझे चिंतन माझ्या मृत शरीराबरोबरच मृत होऊन विरघळून जाईल. ते कुणाला देऊन मी  माझा शोध अनंत काळापर्यंत चालू ठेऊ शकेन, आणि त्यासाठीच मला कसंही करून इथून बाहेर पडलंच पाहिजे. 

पण आता मला एका व्यक्तीच्या येण्याची आशा आहे. मी वाट बघत आहे. वाट बघून बराच काळ झाला आहे. वाट बघणं मी इथे आलो तेव्हापासून सुरु केलं होतं आणि अजूनही वाट बघतच आहे. त्या व्यक्तीने मला सांगितलं होतं कि अशा एका वेळी जेव्हा तू संकटात असशील तेव्हा माझे स्मरण कर, तेव्हा मी तुला जी अट घातली होती ती जर तुला मान्य असेल तरच मी येईन. त्या व्यक्तीची अट अशी होती की जर तू तुझी मूर्तिविद्या सोडायला तयार असशील तरच मी तुला संकटातून सोडवीन. माझी मूर्तीविद्या पूर्णपणे नष्ट होईल. आता मूर्तिविद्या हेच माझे मानसिक अस्तित्व नव्हे का? मग ते नष्ट झाले तर हे शरीर घेऊन एखाद्या कस्पटासारखा वाऱ्याच्या दिशेने भरकटकत मी जगू तरी कसा? पण मीच राहिलो नाही तर ही विद्या तरी काय कामाची आहे? आता या वर्षांनुवर्षे खपून कमावलेल्या विद्येला गमावणे अत्यंत दुःखदायक असले तरी मी ती पुन्हा मिळवू शकेन. पण मी आयुष्याच्या अशा टप्प्यावर आहे की कुठचीही विद्या पुन्हा मुळापासून शिकून, तीत पारंगत होऊन, तिचे उपयुक्तेत रूपांतर करण्याएवढे आयुष्यच मला आता उरलेलेच नाही. तर मग मी ते उरलेले आयुष्य या शरीराबरोबर विद्याहीनतेत कसे काढू? हि विद्या मला कुणालातरी बहाल करता आली  असती तर आणि पूर्वीही मी याचा विचार येऊनही अवलंब केला नव्हता. कारण विद्या हि इतरांसाठी केवळ मान मिळवण्याचे साधन आहे, तो मान म्हणजेच विद्या असे इतरांचे म्हणणे आहे जे मला पसंत नाही. म्हणून माझे मूर्तिशास्त्र आणि माझी विद्या मी कुणासमोर मांडलीच नाही. मी एक स्वयंपाकी म्हणून काम करीत होतो. कुणाला संशयही येऊ नये इतकी खबरदारी घेतल्यावर ते सहज शक्य होते. पण आता माझी सर्व आयुधे नष्ट होताना बघून मनाच्या ठिकऱ्या होत आहेत. हि विद्या नष्ट होऊ नये यासाठीच मला आता इथून बाहेर पडले पाहिजे. 

माझ्या शरीराची जेवढी झीज होत आहे, तेवढीच नजरेतील प्रकाशाची उष्णता वाढत आहे. त्या वाढत्या उष्णतेबरोबर माझ्या आजूबाजूचा तो कंटाळवाणा पाचक द्रवही हळूहळू कमी होत आहे. पण त्याचा ओढा आता माझ्या हाताकडे लागला आहे. त्यामुळे नाईलाजाने मला माझा हात हलवून हालचाल करायला लागली. हाताला वाचवण्यासाठी तसे करणे भाग पडले. त्यामुळे माझ्यापुढे आता एक भिंत निर्माण होऊन उभी राहिली आहे. ती एकच असली तरी तिला ओलांडायचे म्हणजे आता हालचाल अधिक होईल आणि त्या जितक्या हालचाली तितक्या अधिक भिंती माझ्यापुढे निर्माण होतील.  एक करू शकतो असे माझ्या गुरूने सुचवले होते. हा मार्ग त्याने स्वतः एकदाच आणि फक्त एकदाच अवलंबला होता. तो म्हणजे उलट्या बाजूने तोंडाच्या आत, घसा, अन्ननलिका, जठर, आतडी आणि गुदद्वार असा प्रवास करायचा. तो प्रवास महाकर्मकठीण आहे आणि त्यासाठी माझ्याकडे आहे त्यापेक्षा अधिक तीक्ष्ण ऊर्जा डोळ्यांत पाहिजे. पण या मार्गाने सुटका मिळाली नाही तर अंत निश्चित आहे. किंबहुना अंतच ठरवतो की सुटका मिळाली की नाही. कारण अंत होणार की नाही ते आधी कळते आणि सुटका नंतर. हा प्रवास जेवढा लांब आहे तेवढा बिकटही कारण तुम्ही आता स्वीकार केला आहे की शरणागती give up केला आहे काहीही असो पण तुम्ही तोंडाच्या बाहेर जाण्याऐवजी त्याच्या आत आत घुसत आहात या नियमावरून पाचकरसाचे लोटच्या लोट आता तुम्हाला घशातून अन्ननलिकेत घेऊन जातात. आणि जठरात तर लाव्हारसारखा अग्निमय रस तुम्हाला स्वतःत बुडवून टाकायला उसळत असतो. त्यातून जर बाहेर पडलात तर आतड्याच्या नागासारख्या विळख्यांतून अंधाऱ्या वाटेने जाताना डोळ्यातला सारा प्रकाश, सारी ऊर्जा विझून जाईल. तुम्ही पूर्ण आंधळेही होऊ शकता. आणि जेव्हा गुदद्वारातून बाहेर पडण्याचा क्षण येईल तेव्हा तुमची जगण्याची इच्छा ठार मेलेली असेल. आणि तुम्ही पुन्हा त्याच मार्गाने आत जाण्यासाठी धडपडू लागाल. पण तो मार्गही बंद झालेला असेल. एखाद्या तपस्व्यालाही पार करायला अशक्यप्राय वाटावा असा हा मार्ग आहे.

मला असे वाटते की सुटका होण्याची आशा का बाळगावी. नाहीतरी मी या तोंडात विरघळून गेलो तर माझ्या  मृत्यूने एका अर्थाने मी या तोंडाचाच एक भाग बनणार आहे. त्याच्या पाचकरसात विरघळून त्याचाच एक अंश बनून माझे अस्तित्व माझे राहिल का? आणि असे माझे अस्तित्व तरी किती काळ अबाधित राहणार आहे. एकदिवस मृत्यू येईलच. मग मृत्यूने जसे आपले अस्तित्व हिरावून घेतले ते आपल्याला मंजूर आहे तसे या तोंडाने आपले अस्तित्व हिरावून घेतले तर काय झाले? मृत्यू आणि या भयानक तोंडात असा कोणता फरक आहे?

ती व्यक्ती जर आली तर तिला आपण हा प्रश्न विचारू शकू. पण विद्या गमावून त्या व्यक्तीला बोलावणं मला फार कष्टाचं झालं आहे. त्यापेक्षा स्वतःच प्रयत्न करून इथून निघून जाणे, मग ते कुठच्याही मार्गाने का होईना मला केलेच पाहिजे. 

आता पुन्हा मला या पाचकरसावर थोडा का होईना विजय मिळवता आला आहे. आणि अजूनतरी माझा हात शाबूत आहे. माझी नजर अधिक प्रखर आणि तीव्र झाली आहे. असे मला वाटते. पण तोही माझा एक भ्रम असावा कारण इथे भ्रम होणे क्रमप्राप्तच आहे. माझी विद्या मला इतकी प्रिय असण्यामागे एक कारण आहे ते म्हणजे हि विद्या आजवर मला आणि फक्त मलाच प्राप्त होऊ शकली आहे. हाही भ्रम असावा असे वाटण्याचे काही कारण नाही कारण ती अशी एकमेव शक्ती आहे जी फक्त अशा गोष्टीनेच प्राप्त होऊ शकते जी मी केली आहे. 

या इथे खूप थंड पोकळी आहे. पण या थंडीचा अर्थ असाही होऊ शकतो की आता पाचकरसाचे स्रवणे आता कमी होत आहे. असंही असेल की माझ्या नजरेतील उष्णता आता कमी झाली आहे त्यामुळे थंड वाटत आहे. असेही असेल की हा पाचकरस आता बंद होत असेल कारण त्याचे माझ्याशी असलेले काम संपले आहे आणि म्हणजेच दुसरं कुणी इथे येणार असावे. 

सध्याच्या या थंडीने मला कुडकुडा येत आहे आणि या थंडीत माझ्याही डोळ्याची उर्जा, प्रखरता शिथिल होत आहे. बहुतेक या जागेची ही आणखी एक युक्ती असावी. माझ्याकडे जोपर्यंत विचार करण्याची शक्ती आहे तोपर्यंत मी माझ्या डोळ्याची प्रखरता जराही कमी होऊ देणार नाही. कारण आता मला माझे डोके वाचवायचे आहे कारण हे हात आता मूर्ती घडवू शकणार नाहीत पण हे डोके विद्या नक्कीच कुणालातरी देऊ शकेल. ज्यामुळे ती विद्या जिवंत राहील आणि मग मला माझ्या जीवाची पर्वा राहणार नाही. पण तोपर्यंत मला इथून सुटण्याची माझी धडपड सुरूच ठेवली पाहिजे. अजून निराशा आलेली नाही. ती आली तर बरेच होईल. ठार निराशा कधी येत नाही कारण ठार निराशेचा क्षण म्हणजे सुटकेचा क्षण.