Saturday 15 December 2018

हत्ती आणि डास

एक होता हत्ती जो चाले अपनी चाल
आणि एका होता डास
जो फक्त आणि फक्त प्यायचा रक्त

हत्ती बुद्धीवादी, प्रथेनुसार शाळेत गेला
मास्तर म्हणाले, अरे गज्या SSS!!!
बुद्धी तुझे वज्र, सोंड नाही

पसार सोंड, घे केळं, दे मालकाला
तो नको म्हणालाच तर तू खा
पसर सोंड, घे रुपया, दे मालकाला
तो मालकालाच खाऊ दे, तुला नाही पचणार
वजन उचल, ठोक सलाम
राग आलाच तर, सोंडेने गार फवारा उडव
स्वतःच्या डोक्यावर आणि  शांती कर

डासाला शाळा नाही, शिक्षण नाही
जे काय शिकायचं ते आईच्या पोटातच शिकून बाहेर पडला,
अभिमन्यूसारखा. (मग करायचंय काय शिक्षण!)

अपनी चाल चालता चालता
सुशिक्षित हत्तीची प्रशिक्षित सोंड
सलाम, केळं, वजन, रुपया
आणि क्वचित पाण्याचा फवारा
असे नियम पाळून होती

डास अशिक्षित, सोंड अशिक्षित
तिला काय ठाऊक, मध निराळा, मद्य निराळे
ती घुसत होती फक्त आणि शोषित होती रक्त

पुढे काहीच कसे होत नाही?
अशी चिंता वाहणाऱ्या सज्जनांनी
हत्ती आणि डास यांची ठरवली कुस्ती
हेतू पवित्र, थोडीशी गंमत आणि
झालाच तर नफा

प्रसार माध्यमे प्रचाराला लागली
सट्टे लागले, मुलाखती रंगल्या
कुस्तीचा दिवस उजाडला

हत्तीकडे बुद्धी आणि शक्ती दोन्ही प्रचंड
वरून सट्टा तेजीत
डासाकडे फक्त सोंड, बाकी शून्य

डास शूद्र,  त्याला मारणे म्हणजे मरणं
त्याच्याकडून हरणे तर मरणाहून मरणं
मास्तरांकडे छडी
मालकाकडे अंकुश
आपल्याकडे काय? केळं !
हत्तीची सोंड गळून पडली

डास व्रतस्थ, त्याची सोंड म्हणजे
तपश्चर्या, संयम आणि संधी यांचे प्रतीक
जणू एक कोणी साधूच

बिनसोंडेचा हत्ती आणि डासाची सोंड रिंगणात
डास हत्तीच्या कानात घुसला
हत्तीने कान फडफडवला
तेवढाही मारा पुरेसा ठरला
डास खलास

झाला टाळ्यांचा गजर
हत्तीने ठोकला सलाम
मालकाने खाल्ला रुपया

पुढे हत्ती पण कणाकणाने मेला, रोज
कारण एक,
डास त्याच्या कानात
कसलेसे रक्तरंजित क्रांतीचे गीत (कसले गीत? कोणी लिहिले? कोणासाठी?)
गुणगुणला होता, का? कशासाठी?
त्याचा अर्थ काय? उपयोग काय?

कारण दोन,
डास चावला की काय
अशी भीती!

-विवेकानंद सामंत,
पूणे , २०१८