Thursday 6 April 2017

जातककथांतील पक्षी


'जातकट्ठवण्णना' असे सुंदर नाव असलेल्या या जातककथा. या बुद्धाच्या निर्वाणानंतरच अस्तित्वात आल्या आणि त्या इसवी सन पूर्व चौथ्या शतकापासून नोंदल्या गेल्या. बुद्ध जन्म : इ. स. पूर्व ५६३-४८० आणि ते मृत्यू:४८०-४०० ) काही विद्वानांनी असा तर्क केला आहे की बुद्धच शिकवणी देत असताना यातील काही उदाहरणे कथेमध्ये बांधून सांगत असे. अनुयायांनी त्यातील अनेक कथा मुखोद्गत/लिखित स्वरूपात जतन केल्या आणि बुद्धाच्या मृत्यूनंतर ह्या शिकवणूक पद्धतीने कथांच्या स्वरूपात संग्रहित होऊन त्यांचे ग्रंथ बनले. कुठचाही धर्म घडवणारे लोक वेगळेच(मूळ निर्मात्यापासून) असतात. त्यांचे उद्देश मूळ संकल्पनांपेक्षा वेगेळे असतात आणि त्यामुळेच धर्माला जे स्वरूप प्राप्त होते ते मूळ संकल्पनेपासून वेगळे असण्याची शक्यता असते. याची सत्यता पडताळून पाहण्याचे पुरावे अनेक आहेत. अनेकांनी त्यांचा पाठपुरावा केला आहे. अनेकांनी अभ्यासपूर्ण मार्गाने हेही दाखवून दिले आहे की जातक कथांतल्या अनेक कथा संस्कृत साहित्यातुनही प्रेरणा घेऊन लिहिल्या गेल्या आहेत. धर्म प्रचारासाठी शिकवण , लिखित ग्रंथ स्वरूपात असणे हे त्या धर्माच्या वृद्धीसाठी गरजेचे असते. त्या प्रेरणेतून बुद्धाच्या निर्वाणानंतर हे विपुल साहित्य निर्माण केले गेले. तत्कालिक इतर धर्मांच्या मूल्यांचा उपयोगही केला गेला (महायान पंथात हिंदू धर्म आणि तांत्रिक पंथ यांच्या अनेक संकल्पना अवलंबल्या गेल्या आहेत) जातक कथा नक्की कधी लिहिल्या गेल्या आणि त्या कुणी लिहिल्या याचा अभ्यास खूप मोठा आहे.  त्यावर माझे वाचन चालू आहे. आणि बुद्धाच्या निर्वाणानंतरचा सगळा सावळा-गोंधळ त्यासाठी नजरेखालून घालावा लागेल (सावळा गोंधळच तो ! कारण बुद्धाला यातले  नव्हते. असो. )

तर याविषयी मलाही खूप उत्सुकता आहे. मी थोडंफार माझ्या कुवतीने ते वाचत आहे, पण ते इतकं अफाट आहे की माहित नाही माझ्या कुवतीत ते आहे का! to the point लिहिण्यासाठी जो अभ्यास लागतो तो माझा आता नाही, त्यामुळेच वरचा सर्व फाफटपसारा लिहिला आहे.

मी जेव्हा जातककथांचे खंड आणले तेव्हा त्यामागची भावना एवढीच होती की दुर्गा भागवत(ज्यांना मी गुरु मानते) यांनी जे ग्रेट काम केले आहे ते थोडेफार तरी बघावे, आणि बुद्ध या विषयबद्धल मला इंटरेस्ट आहे (असे किती अगणित इंटरेस्ट आहेत त्यातला एक :) ) अजिंठा आणि सांची इथलं काम पाहिल्यावर मला वाटलं होतं की हे आपल्या आवाक्याबाहेरचं काहीतरी आपण बघत आहोत. कसं समजायचं हे? जातक कथा हा सोपा मार्ग वाटला( नंतर कळलं की तोही खडतरच आहे : तशी कुठंही कसंही वाहवत, भरकटत जाण्याचीच माझी वृत्ती आहे, एक -एकातून दुसरं --तिथून तिसरं असा माग काढत मी कुठच्या कुठे पोचते. आणि येताना मला सगळ्याच्या खोलीत पोचायचीदेखील इच्छा असते. त्यामुळे जातक कथा मला सध्यातरी अफाट अरण्यासारखा वाटत आहेत.

तूर्तास मी 'जातक कथांमधील पक्षी' हा एवढाच एक धागा निवडून जो काही अभ्यास केला २-३ दिवसांत तो तुम्हाला पाठवत आहे. अनेक कथांमध्ये पक्ष्यांचे अनेक संदर्भ सापडले. ते संक्षिप्त असले तरी हे विसरता येत नाही कि लिहिणाऱ्याला डॉ. सालीम अलींएवढी नसेल पण काही कमी माहिती नव्हती. पक्ष्याचे स्वभाव, राहण्याची ठिकाणे, खाद्य, वागणूक, बाह्य - रूप , आवाज  हे सर्व त्यांना एखाद्या ornithologist सारखं त्या काळात ठाऊक होतं. एवढंच नव्हे तर पक्ष्यांची जी नावं आहेत, तीही इतकी अचूक त्यांच्या रुपाला-वागणुकीला साजेशी (उदा. वट्टक जातक (Quail ) नंतर वाचा, आणि मी खाली दिलेले थोडंफार त्या 'वट्टक' शब्दाचं विश्लेषण बघा.) आतापर्यंत ज्या कथांचा थोडाफार अभ्यास केला त्यातून किती वेगवेगळे पक्षी सापडले. सुतार, हंस, कावळा, नीलकंठ, लावा, तित्तर, रानकोंबडा, कोकीळ, घुबड, बगळा, पाणकावळा , पोपट, मोर असे आणखीही असतील.

जे थोडंफार मी या पक्ष्यांबद्धल शोधू शकले ते इथे दिलं आहे. ते वाचून कदाचित जातक कथांमध्ये एक वेगळा पैलू सापडू शकेल. निसर्गवाचनाचा. या कथांत अनेक वृक्षांचेही उल्लेख आहेत. मला अनेक प्रश्नाची उत्तरं अजून मिळाली नाहीत या पक्ष्यांबद्धलची. मी काही चुकीचंही समजलं/लिहिलं असेल.(शुद्धलेखनाच्या पुष्कळ चुका आहेत) पुन्हा ते मी अधिक विस्तृत/अचूक  करण्याचा प्रयत्न करेन.

याने जातककथा फार रंजक होतील अश्यातला भाग नाही, किंवा जातक कथांचे मर्म कळेल अश्यातलाही भाग नाही , पण एक वेगळ्या अंगाने या कथा वाचता येतील आणि काहीतरी इंटरेस्टिंग मिळेल.
दुर्गाबाईंचे भाषांतर अतिशय चांगले आहे. पण तरीही हे खंड बऱ्यापैकी academic आहेत. मूळ  पालीत त्या फार सरस आणि सुरस असतील बहुतेक. आणि  काही ठिकाणी कथाच खूप रिपीटेटिव्ह आहेत. काही (Content wise ) फार सुरसही नाहीत. पण तरीही काही कथा मात्र खूप चांगल्या आहेत. पण एखादं छान फुललेलं झाड पाहण्यासाठी जसा अख्खा  डोंगर पालथा घालावा लागतो तसा एखाद्या उत्कृष्ट कथेसाठी काही रिपीटेटिव्ह कथांना वाचावं लागेल. 

मी या कथांचे  अजिंठा, भारहूत, सांची, अमरावती येथील शिल्पातील संदर्भ शोधायचा प्रयत्न केला आहे. एका साईट वर मला काही organized संदर्भ सापडले.
http://ignca.nic.in/jatak021.htm
पण मी त्याचा खोलात अभ्यास केलेला नाही.
सांची स्तूप बघताना(२०१५ साली ) मी तिथल्या शिल्पांचा आणि त्याच्या संदर्भातील जातककथांचा अभ्यास केला होता. पण ते कुठे लिहून ठेवले नाही. तसेच सांची स्तूपाच्या पिलर्स वर काही अतिशय सुंदर जातकं कोरली आहेत. पक्ष्यांच्या पुढील जातकातील मात्र एकही कोरलेलं नाही.

खंड १

३२.  नच्च जातक
हि सुवर्णहंस आणि मोराची कथा आहे. सुवर्णहंस आपल्या मुलीचे लग्न ठरवण्यासाठी हिमालयातील हंस, मोर आणि अनेक पक्षीजातींना आमंत्रण देतो. पण सुवर्णहंसाची मुलगी मोराला निवडते, त्यामुळे मोर आपल्या महानतेच्या अधिकच बढाया मारू लागतो. मोराला आपल्या सौन्दर्याचा गर्व असतो, आपले नृत्य दाखवून त्याला इतरांना चकित करायचे असते. रुपगर्वानें उन्मत्त मोर नृत्य करताना आपली पिसारा वर करतो. त्याच्या अशा वागण्याला सुवर्णहंस निर्लज्ज मानतो. आधीच उद्धट, गर्विष्ठ मोराला कसलीच भीडभाड नाही, लाजलज्जा नाही असे ठरवून आपली मुलगी मोराला वधू म्हणून द्यायला तो नकार देतो. 

या कथेतील 'सुवर्णहंस' हा पक्षी खरा होता का हे जाणणे कठीण आहे. दुर्गा भागवतांनी यावर एक तळटीप (१३६.सुवर्णहंस जातक) या कथेशेवटी दिली आहे. त्यात म्हटल्या प्रमाणे 'सुवर्णहंस' ('सोन्याचे हंस') ही प्रतिमा ऋग्वेदात आढळते. सुपर्ण अथवा हंस हे पवित्र, देखणे आणि सोन्याच्या वर्णाचे पक्षी आहेत. ही संकल्पना बौद्ध वाङ्मयात रूढ झालेली आढळते. '
परंतु या सुवर्णहंसाचे कुठल्याही हंसाशी नाते जोडता आलेले नाही. के. एन दवे यांच्या 'Birds in Sanskrit Literature' या पुस्तकात 'सुवर्णहंस' या संकल्पनेचा उल्लेख आणि त्याचा संबंध कुठल्याही हंस जातींशी लावलेला आढळत नाही. त्यामुळे हे हंस खरे होते की तो फक्त एक कल्पनेचा भाग होता हे सांगणे कठीण आहे. 

मोराचे वर्णन मात्र बरेच योग्य आहे. मोर नाचताना त्याचा पृष्ठभाग उघडा पडतो. सौदंर्यपूर्ण पिसारा पण पुष्ठ उघडे टाकणारे वर्तन अशा दोन्हीचे निरीक्षण आणि आकलन लेखकाला होते. हा विरोधाभास त्याला जाणवला. मोर नाचणे लेखकाला सौदंर्यपूर्णन वाटता निर्लज्जपणाचे वाटण्याचे कारण हेही असेल की त्याने मोराला लांडोरीला आकर्षित करण्यासाठी नृत्य करताना पाहिले असेल. कविकल्पनांना इथे वाव नाही. hard hitting fact (बुद्धधर्मात खरं तर सौन्दर्याला स्थान कमीच आहे. खुद्द बुद्ध कलेच्या/सौन्दर्याच्या विरोधात होता कारण कला /सौन्दर्य = वासना. दुर्दैव असे की बुद्धानंतर त्यांच्यासंबंधी सगळे मानवनिर्मित artifacts सौन्दर्याने ओतप्रोत भरलेले आहेत  )बघून लेखकाने गर्विष्ठ आणि निर्ल्लज म्हणून मोरासारख्या सुंदर पक्ष्याची निवड केली असेल का? 

३५. वट्टक जातक 
या जातक कथेत बोधिसत्व 'लावा' पक्ष्याचा जन्म घेतो. पिल्लू असताना वनात आग लागते आणि त्याचे आईवडील पळून जातात. पिल्लू बोधिसत्व मात्र आपल्या पूर्वजन्मांच्या मिळवलेल्या गुणांवर विश्वास ठेऊन तिथेच राहतो. तो ठरवतो की मला 'सत्यक्रिया' करून अग्नीला मागे हटवून माझं आणि दुसऱ्या पक्ष्यांचं संरक्षण केलं पाहिजे. बोधीसत्व मग त्या परिनिर्वाण पावलेल्या बुद्धाचे गुण मनात आणून आपल्यात असलेल्या सत्यभावाला आवाहन करून सत्यक्रिया करत एक गाथा म्हणतो
पंख माझे न उडती, पायही नच चालती 
दूर गेले मायबाप, अग्नी तू वळ मागुती 
अश्याप्रकारे 'सत्यक्रिया' करत असताना अग्नी सोळा वाव मागे हटला. परत फिरताना तो वणवा  दिसेल त्याचा फडशा पाडत फिरला नाही, पाण्यात चूड विझावी त्याप्रमाणे तिथल्या तिथे तो विझून गेला. अशी ही कथा. 

पाली शब्द 'वट्टक' म्हणजे Quail. संस्कृतमध्ये 'वर्तका:' म्हणजे Quail. (वर्तका: हा संस्कृत शब्द 'वृत' या धातूपासून तयार झाला आहे, 'वृत' याचा संस्कृतमधील अर्थ 'वाटोळा'(Round Ball) असा होतो. K. N. Dave यांनी आपल्या पुस्तकात म्हटले आहे :All the names seem to be derived from root 'वृत' and probably refer to the quick running movement of these plump little and almost tailless birds on the ground like a rolling ball )

पालीमध्ये 'वर्तका:' ऐवजी   'वट्टक' असा शब्द आहे. या जातक कथेतला पक्षी 'लावा पक्षी' आहे. लावा म्हणजेच Quail या पक्ष्याचे अनेक प्रकार आहेत. त्यापैकी झाडाझुडपांत राहणं पसंत करणारे  Jungle Bush Quail आणि Painted Bush Quail आहेत. त्यामुळे या कथेतील लावा Jungle Bush Quail किंवा Painted Bush Quail असावा. पण अग्नीला मागे परतवण्यासाठी लेखकाने लावा या पक्ष्यालाच का निवडलं असावं. खरंतर लावा पक्षी हा 'कमकुवतता' दाखवण्यासाठी संस्कृत साहित्यात वापरला गेला आहे. हा पक्षी वेदिक काळापासून ज्ञात आहे. त्याचे मांस त्या काळात चवीने खाल्ले जात असे. हा पक्षी यजुर्वेदाच्या 'अंधकवर्तक ज्ञाय' या भागात कमकुवत जातीचे प्रतीक म्हणून दर्शविला गेला आहे. बलाढ्य जातीचे प्रतीक म्हणून श्येन (ससाणा) या पक्ष्याला दर्शविले गेले आहे. 
आपल्या पुण्यकर्माने, चांगले गुण कमावून त्याच्या बळावर कमकुवत जातीचे प्रतीक असलेला लावा पक्षी बलाढ्य होतो, आपले आणि इतर पक्ष्यांचे प्राण वाचवतो. त्याचप्रमाणे मागच्या जन्मीच्या चांगल्या कर्मामुळे गुणवान असलेला कोणताही कमकुवत मनुष्यप्राणी बलाढ्य, प्रभावशाली  होऊ शकतो हा बोध प्राप्त व्हावा म्हणूनच अश्या जातक कथांमध्ये तितर, लावा यासारखे सामान्य पक्षीही बोधिसत्वाच्या विविध जन्मांतील रूपे झाले आहेत.

K. N. Dave यानी लिहिले आहे की ही जातककथा महाभारतातील मन्दपाल आणि शार्ङिनका(हा शब्द चुकीचा लिहिला गेला आहे) यांच्यावरच्या कथेची प्रत आहे. या कथेतही लावा पक्षी महत्वाची भूमिका बजावतात. (हि गोष्ट नक्की कुठे आहे हे मात्र त्यांनी दिले नसल्याने त्यासाठी संपूर्ण महाभारत वाचावे लागेल. )

३६. सकुण जातक 
पूर्वी वाराणशीत ब्रह्मदत्त राजा राज्य करीत असताना बोधिसत्व पक्षी रूपाने पक्ष्यांच्या समुदायाबरोबर एका मोठ्या फांद्या असलेल्या वृक्षावर राहत असे. एक दिवस त्या वृक्षाच्या फांद्या एकमेकांवर घासल्या गेल्या आणि त्यांच्यातून धुर निघू लागला. ते पाहून बोधिसत्वाच्या मनात आले की या दोन फांद्या घासल्याने वाळलेली पाने पेट घेतील आणि मग सारा वृक्षच पेटून निघेल, तेव्हा आपण इथे राहता योग्य नाही
पक्ष्यानो आसरा केला तो वृक्ष आग टाकीत ।
उडा माना मुडपुनी आसरा हो भयप्रद ।
बोधिसत्वाचे हे बोलणे ऐकून शहाणे पक्षी उडाले. जे मूर्ख होते ते मात्र 'याला एका थेंबात घडा भरलेला दिसतो' असे म्हणत तिथेच राहिले आणि आगीत पडले.

या कथेत बोध असा आहे की जर एखादी परिस्थिती बदलता येणारी नसेल तर त्यापासून सुटका करण्यासाठी , तिला डावलण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. तिथेच राहून काही बदलणार नाही.

'सकुण' म्हणजे 'मोठा शिकारी पक्षी'. ऋग्वेदात 'सकुण' या शब्दाचे अनेक उल्लेख आहेत आणि हा पक्षी चांगल्या-वाईट गोष्टींचा कौल देणारा(शकुन देणारा)  अशा अर्थाचे ते उल्लेख आहेत. ढोबळ मानाने 'सकुण' म्हणजे पक्षी एवढाच अर्थ निघतो. संस्कृतमध्ये 'शाकुनिक' म्हणजे व्याध (पक्ष्यांचा शिकारी). ऱ्हिस डेव्हिड यांच्या पाली इंग्लिश कोशात 'सकुण' म्हणजे Bird of Prey किंवा Vulture असा दिला आहे. Bird of Prey मध्ये मोठ्या समुदायाने राहणारा पक्षी म्हणजे vulture (गिधाड)च असला पाहिजे.  इतर शिकारी पक्षी एकेकटेच राहतात.

३७. तित्तर जातक 
पूर्वी हिमालयाच्याजवळ एका विशाल वडाच्या आश्रयाने तीन सोबती राहत होते. तित्तर, हत्ती आणि माकड. कालांतराने  ते एकमेकांशी नीट वागेनात, एकमेकाला मान देईनात. मग त्यांच्या मनात विचार आला की असे वागणे बरे नव्हे, आपल्यापैकी जो वृद्ध असेल त्याला अभिवादन करून, त्याचा सन्मान करून राहवं.
म्हणून ते एकमेकाला विचारू लागले. तित्तर आणि  माकड हत्तीला म्हणाले 'मित्रा, तू या वडाच्या झाडाला केव्हापासून ओळखतॊस?
हत्ती म्हणाला 'जेव्हा हे झाड अगदी एवढंसं होतं तेव्हा ते ओलांडून मी सहज जात असे, त्यावेळेला त्याची सर्वात वरची डहाळी माझ्या पोटाला लागत असे, तेव्हापासून हे झाड मला माहित आहे.'
माकडाला विचारताच माकड म्हणालं 'अगदी लहान रोपटं होतं तेव्हापासून मी या वडाला ओळखतो. याची कोवळी लुसलुशीत पानं मी जमिनीवर बसल्याबसल्या खात असे.
तित्तर सर्वात शेवटी म्हणाला 'पूर्वी दुसरीकडे एक वडाचं झाड होतं, मी त्याची फळं खायचा आणि या ठिकाणी शीट टाकायचा, त्या शीटेतून जे बीज पडलं त्याचाच हा वृक्ष झाला आहे. तेव्हा मीच सर्वात वडीलधारी आहे.
मग तित्तराने त्यांना धर्मोपदेश केला. पंचशीले पाळायला लावली. स्वतःही त्याचे आचरण केले. या तिघांनी मिळून जे उपदेशांचे पालन केले, आचरण केले त्याला 'तैत्तरीय ब्रम्हाचरीय' (तैत्तरीय ब्रम्हचर्य) असे म्हणतात.

या कथेतील तित्तर म्हणजे Grey Francolin किंवा Grey  Partridge जो हिमालयाच्या पायथ्यापासून भारतमध्ये बहुतांश सर्वत्र आढळतो. अत्यंत  आकर्षक पद्धतीने हा पक्षी धावतो. दुर्दैवाने त्यांच्या धावण्याच्या कलेमुळे त्यांच्या शर्यतीचा खेळ करण्यासाठी, झुंजीचा खेळ करण्यासाठी त्यांना पकडले जाते.


३८. बक जातक 
पूर्वी बोधिसत्व एका अरण्यातल्या एका मोठ्या कमळ तळ्याला लागून असलेल्या वरुणवृक्षावर वृक्षदेवता होऊन राहत असे. त्यावेळी जवळच असलेल्या लहान तळ्यातले पाणी उन्हाळ्यात आटू लागले. तळ्यात पुष्कळ मासे होते. एक बगळा धूर्तपणे मासे खाण्याच्या विचाराने तिथे गेला आणि माश्यांना म्हणाला 'मी तुम्हाला एकेकाला चोचीत धरून पंचरंगी कमळांनी दाटलेल्या महासरोवरात नेऊन सोडीन. माश्यांना त्याच्या धूर्त डावाची कल्पना आली, ते काही तयार होईनात. शेवटी त्यांनी एका थोरल्या काण्या माश्याला पाठवायचे ठरवले. बगळ्याने त्याला सरोवर दाखवून आणताच काण्या माश्याची खात्री पटली आणि त्या मूर्ख माश्याने इतरांना बगळ्याच्या चोचीतून जाण्याबद्धल संमती दर्शविली. एक एक करून बगळ्याने चोचीत धरून माश्यांना उचलले आणि कमळ सरोवरापाशी नेताच खाऊन टाकले. शेवटी उरलेला खेकडा मात्र बगळ्यावर अविश्वास ठेवूनच होता, तो बगळ्याला म्हणाला 'तू तुझी मान मला माझ्या आकड्यानी नीट पकडू दिलीस तर तुझ्या मानेला धरून मी तुझ्याबरोबर येईन. बगळ्याने संमती दर्शवली आणि खेकडा त्याच्या मानेला पकडून सरोवरापाशी गेला. तळे दाखवले आणि वरुणवृक्षाकडे घेऊन गेला. परंतु खेकडा सतर्क होता. त्याने बगळ्याला म्हटले 'मासे मूर्ख होते म्हणून तू त्यांना कपटाने खाल्लंस, पण तुही मूर्ख निघालास, तुला माझी लबाडी लक्षात आली नाही. आता तुझं मुंडकं कापून मी जमिनीवर टाकीन' असं म्हणून खेकड्याने बगळ्याची मान आवळली. बगळा टिपे गाळू लागला. 'मी तुला खाणार नाही, मला जीवनदान दे' असे खेकड्याला विनवू लागला. खेकडा म्हणाला 'मग मला तळ्यात नेऊन सोड' त्याप्रमाणे बगळ्याने त्याला तळ्यात नेऊन सोडलं, त्याक्षणी खेकड्याने कात्रीने कापावा तसा त्याचा गळा कापला. हे आश्चर्य पाहून वरुणवृक्षावर बसलेल्या देवतेने 'छान छान' असे धन्योद्गार काढले आणि वनाला निनादून सोडीत मधुर स्वराने ही गाथा म्हटली.

धूर्तासही लबाडीने सुख नित्य न लाभते ।
धूर्त बका खेकड्याला विनवावेच लागते ।

'बक' म्हणजे Stork. भारतामध्ये आठ प्रकारचे storks आढळतात.  मराठीत stork म्हणजे करकोचा आणि Egrets/heron म्हणजे बक (बगळा ) असा अर्थ असला तरी K.N. Dave यांच्या 'Birds in Sanskrit Literature' मध्ये 'बक' चा Stork शी आणि Heron शी संबंध जोडला आहे आणि . ज्याला 'बकध्यान' (ढोंगी बगळ्याचे ध्यान) म्हणतात ते करणारे  पक्षी आहे White Necked Stork आणि Grey Herons. Grey Heron नेहमी एकटा असतो तर White Necked Stork एकटा किंवा जोडीने असतो. K.N.Dave यांनी आपल्या पुस्तकात Storksच्या प्रकरणात लिहिले आहे 'बक' of the बकजातक, ready to attack lamb or kid , if near enough is Adjutant.( कुठल्या नंबरच्या  बकजातकाचा संदर्भ मात्र त्यांनी दिला नाहीये. ) त्यामुळे बकजातकातला 'बक' , Stork, Heron किंवा adjutant असू शकतो.

वरुण वृक्ष म्हणजे 'वायवर्ण' (Crataeva Nurvala), श्री. द. महाजन यांच्या 'आपले वृक्ष' पुस्तकात या वृक्षाबद्धल उल्लेख आहे की भारतात सर्वत्र आढळणारा हा वृक्ष उत्तर पूर्वेकडील राज्यात बौद्ध मठांच्या परिसरात आढळून येतो'. म्हणजे बौद्ध धर्मात या वृक्षाला स्थान असले पाहिजे. वरील जातक कथेत त्याच्या उल्लेखाने ते स्पष्ट होते.

४२. कपोत जातक
या कथेत बोधिसत्व एक पारवा असतो. वाराणशीतील नागरिक पुण्य जोडण्यासाठी पक्ष्यांना सुखाने राहता यावे म्हणून ठिकठिकाणी तुसाच्या पिशव्या टांगत असत. वाराणशीतल्या एक व्यापाऱ्याच्या आचाऱ्याने अशीच एक पिशवी स्वयंपाकपाकघरात टांगून ठेवली होती. बोधिसत्व त्या पिशवीच्या घरट्यात राहत असे. एका कावळ्याने विचार केला की आपण जर बोधिसत्वाची संगत धरली तर भरपूर मांस/मासे खायला मिळतील. कावळा बोधिसत्व पारव्याला म्हणाला ' तुझं वागणं मला आवडतं, आजपासून मी तुझ्यासोबत राहणार.' बोधिसत्व गवताची बीजे खाई, कावळा किडे खाई. कावळ्याला पाहून आचाऱ्याने  आणखी  एक पिशवी बोधिसत्वाच्या पिशवीशेजारी टांगली. त्याप्रमाणे कावळा  बोधिसत्व-पारव्याशेजारीच राहू लागला.एक दिवस स्वयंपाकघरात पुष्कळ मासळी टांगून ठेवलेली कावळ्याला दिसली. तो बोधिसत्व पारव्याला म्हणाला 'आज माझ्या पोटात दुखत आहे', बोधिसत्व म्हणाला 'लोभाने वेडा झालास तू, असं करू नको', आजपर्यंत कावळ्याचे पोट दुखलेलं कुणी ऐकलं नाही आणि किती खाल्लं तरी कावळ्याची तृप्ती होत नाही.' कावळ्याने काही त्याचं  ऐकलं  नाही. त्याने स्वयंपाकघरातून एक मोठा तुकडा पळवला,वर कापड घातलेले एक भांडे पाडले. त्याचा मोठा आवाज झाला. आचाऱ्याने कावळ्याला पकडून टोचून टोचून त्याची पिसं उपटली, आणि मीठ जिरे वाटून आंबट ताकात कालवून त्याचा लेप कावळ्याच्या अंगाला दिला आणि दूर फेकून दिले.
कावळ्याच्या प्रतापाने वैतागून बोधिसत्व त्याला म्हणाला 'डांबरट, कावळ्या, माझं सांगणं तू ऐकलं नाहीस आता, तुज्यामुळे मलाही इथं राहता यायचं नाही.'

'कपोत' म्हणजे कबुतर. पारवा म्हणजे Blue Rock Pigeon.
'किती खाल्लं तरी कावळ्यांची तृप्ती होत नाही !' हे वर्णन किती अचूक आहे. काहीही खाण्यासारखं दिसो, कावळा ते खायला येतोच. मग ते अन्न असो नाहीतर कुणा पक्ष्याचं असहाय पिल्लू असो. मी स्वतः कावळ्यांना मैना/चिमणी यांच्या पिलांवर झडप घातलेली दोनदा पाहिली आहे. माणसाच्या जवळ राहून कावळ्यात तल्लख मेंदू तर आहेच पण माणसाची cruelty पण थोडीफार दिसते. (कोण जाणे! तसे नसेलही- कारण कावळा शेवटी 'बर्ड ऑफ प्रे'च आहे ) पण एवढे माणसांनी टाकलेले खाऊन सुद्धा दुसऱ्यांची पिल्ले खाण्याएवढी अतृप्तता नक्कीच असते असे म्हणायला हवे)

७३. सच्चंकिर जातक 
हि फारच लांबलचक कथा आहे. देवदत्त या बुद्धाच्या कपटी भावाचे कारनामे बुद्ध आपल्या  अनुयायांना सांगत असता, उदाहरण म्हणून ही कथा रचली गेली आहे. कथेत एक सर्प, उंदीर , पोपट आणि कपटी राजपुत्र(म्हणजेच देवदत्त) याना बोधिसत्व नदीतून जाताना वाचवतो. याची परतफेड म्हणून प्रत्येकजण बोधिसत्वाच्या कामी येण्याचे आश्वासन त्याला देतात. परंतु प्रत्यक्षात जेव्हा तशीच वेळ येते तेव्हा कपटी राजपुत्र बोधिसत्वाला मारहाण करतो. अश्याप्रकारची ही कथा आहे. बुद्धाला या कथेतून अनुयायांना हेच सांगायचे होते की देवदत्ताची कपटी वृत्ती आताचीच नाही तर पूर्वीपासूनची आहे.
या कथेत महत्वाचे म्हणजे पोपट बोधिसत्वाला हिमालयातील 'तांबडा भात'(तामसाळ) आणून देण्याचे वचन देतो. हा कुठचा पोपट आणि हा कुठला हिमालयातील तामसाळ भात आहे, त्याचे काही स्पष्टीकरण दुर्गा भागवतांनी तरी दिलेले नाही.  पण हे शोधले पाहिजे.


११७. तित्तर जातक
बोधिसत्वाच्या आश्रमापासून जवळच एका वारुळाच्या पायथ्याशी एक तित्तर राहत असे. तो सकाळी आणि संध्याकाळी वारुळाच्या माथ्यावर उभा राहून जोराने ओरडत असे. बोधिसत्वाला हे ठाऊक होते. एकदा त्याचा असा जोराचा आवाज ऐकून एका पारध्याने बरोबर ओळखले की जवळपास तित्तर आहे. तित्तराला पकडून, मारून तो घेऊन गेला. बोधिसत्वाला जेव्हा त्याचा नेहमीच आवाज ऐकू गेला नाही तेव्हा त्याने तापसांना विचारले 'इथे जवळच एक तित्तर राहत होता, त्याचा आवाज का ऐकू येत नाही?' त्यांनी हकीगत सांगितली. बोधिसत्वाने ते ऐकून ही गाथा म्हटली.
अत्युग्र फार जोराचे, बोलणे फार वेळ ते ।
तित्तराचे ओरडणे, तसे मूर्खास मारते ।

तित्तर म्हणजेच Grey Francolin. पण तित्तर या प्रकारात कुठचा तित्तर वारुळापाशी राहणं पसंत करतो का? ते शोधायला हवे.

११८. वट्टक जातक
या कथेत बोधिसत्व 'लावा' पक्षी आहे. पारधी लावा पक्ष्याना पकडून आणून, भरपूर खायला घालून गुबगुबीत करे आणि मग त्यांना विके. पारध्याने बोधिसत्वाला पकडले तेव्हा बोधिसत्वाने ठरवले की आपण जर याने दिलेला आहार घेतला तर आपण पुष्ट होऊ. खाणं सोडलं तर आपण अगदी रोड होऊ, मग हा आपला सौदा पटवू शकणार नाही. त्याप्रमाणे बोधिसत्व काहीही खात नाही. सगळे तित्तर विकले जातात आणि हा एकटाच उरतो. याला नक्की काय झालं आहे हे बघण्यासाठी पारधी त्याला पिंजऱ्यातून बाहेर काढतो आणि तळहातावर घेऊन निरखू लागतो. त्याक्षणी लावा बोधिसत्व पंख पसरवून उडून जातो.
ही गाथा लावा बोधिसत्व म्हणतो.
अविवेकी मनुष्याला लाभ उत्तम कोठून।
विवेकाचे फळ पहा,  मुक्त हो मी वधातून ।

'वट्टक' म्हणजे Quail. हा लावा पक्षी म्हणजे Quail आहे. Common Quail , Jungle Bush Quail, Rock Bush Quail, Himalayan Quail यापैकी उत्तरेत आढळणारी Quail ची जाती या कथेतील लावा पक्षी असू शकते.
लावा पक्षी संस्कृत साहित्यात वैदिक काळापासून, तसेच महाभारत, हितोपदेश इ. ग्रंथातही उल्लेखिला गेला आहे. याचे कारण काय असावे? हा पक्षी पुरातन काळापासून खाण्यासाठी तसेच मनोरंजनासाठी वापरला गेला असावा. म्हणूनच त्याच्याबद्धल, त्याच्या वागणुकीबद्धल अनेक कथा रचल्या गेल्या.


sakunagdi jatak (सकुणग्धि जातक ) या आणखी एका जातक कथेत Bustard Quail or Barred Button Quail (Turnix suscitator) आहे.



१२७. कलण्डुक जातक 
या जातक कथेमध्ये बोधिसत्व बनारसचा एक खजिनदार(सावकार) असतो आणि एकदा त्याचा कलण्डुक नावाचा सेवक पळून जातो. पळून गेलेल्या सेवकाचा शोध घेण्यासाठी बोधिसत्व एका पोपटाला पाठवतो. पोपट त्याला एका शहरात नौकाविहार करताना पाहतो आणि त्याला ओळखतो. त्याला परतण्याविषयी आव्हान करतो. कलण्डुक पोपटाला प्रेमाने जवळ बोलावतो. पण त्याचा कावा पोपटाच्या लक्षात येतो. जवळ बोलावून आपली मन मुरगळण्याचा कलण्डुकचा विचार तो हाणून पाडतो आणि उडून बोधिसत्वाकडे परत जातो. बोधिसत्वाला कळवताच तो सेवकाला पकडण्याची आज्ञा करतो.
गोड बोलणाऱ्या एका कपटी, कावेबाज बंधू देवदत्तविषयी गोष्ट सांगताना शास्त्याने ही कथा सांगितली आहे.
यातील पोपट कुठल्या जातीचा असावा हे सांगणे कठीण आहे.

१३३. घतासन जातक
या जातककथेत बोधिसत्व पक्ष्यांचा राजा होता. अरण्यातील तळ्याकाठी एका खूप मोठ्या वृक्षावर तो राहत होता. वृक्षाला अगणित फांद्या होत्या आणि त्या फांद्यांवर राहणारे पक्षी तळ्यात शीट टाकीत. यामुळे तळ्यात राहणाऱ्या 'चंद' या नागराजाला अतिशय त्रास होत असे. एकदा क्रोधायमान होऊन त्याने पाण्यात आगीचे फुत्कार टाकले आणि धूरही उत्पन्न केला. वृक्षाच्या उंचीपर्यंत ज्वाळा पोचू लागल्या. ते पाहून बोधिसत्वाने पक्ष्यांना तिथून निघून जाण्याविषयी आवाहन केले. ज्यांनी बोधिसत्वाचे ऐकले ते या संकटातून वाचले.

बऱ्याचदा अश्या जातककथांचा उद्देश अनुयायांनी बुद्धाच्या शिकवणुकीचे आचरण, पालन करावे असा आहे. जर ते पालन केले नाही तर कसा नाश ओढवतो हे दाखवून देण्यासाठी या कथा अश्याप्रकारे रचल्या गेल्या आहेत.
या कथेतील बोधिसत्व 'पक्ष्यांचा राजा' आहे. पण कुठल्याही पक्ष्याचे नाव यातून स्पष्ट होत नाही. तसेच 'घतासन' ghatāsana या पाली शब्दाचा अर्थ सापडत नाही.

१३६. सुवर्णहंस जातक
लोभ कसा वाईट हे दर्शविण्यासाठी ही जातककथा रचली गेली आहे. या कथेत बोधीसत्व एक ब्राह्मण म्हणून जन्माला येतो. ब्राह्मण स्त्रीशी लग्न होऊन त्याला तीन मुलीही होतात, परंतु मुलींच्या लग्नाआधीच तो मरण पावतो. एक सुवर्णहंस म्हणून तो पुनर्जन्म घेतो, त्याला मागच्या जन्माची आठवण असल्याने तो आपल्या पत्नी-मुलींना शोधून काढतो. त्यांची दयनीय अवस्था पाहून तो त्यांना आपणच मुलींचा पिता असल्याचे सांगतो. त्याचबरोबर स्वतःचे एक एक सोन्याचे पिस  विकून गुजराण केली जाऊ शकते असेही त्यांना सुचवतो. त्याप्रमाणे पत्नी-मुली त्याचे एक एक पिस दररोज काढून विकून गुजराण करू लागतात. परंतु पत्नी लोभी असते. तिला वाटते हा सुवर्णहंस जर कुठे पसार झाला तर आपल्याला पुन्हा गरिबीत दिवस काढावे लागतील त्यापेक्षा याची सगळीच पिसे एकदमच काढून घ्यावीत. त्याप्रमाणे ती मुलींचे न ऐकता त्याची सगळी पिसे काढून घेते. सुवर्णहंसाला पुन्हा आलेली पिसे पांढरी असतात. या लोभी वागणुकीमुळे , तो तिथून कायमचा निघून जातो.

१४०. काक जातक
या कथेत 'अविचाराने निर्णय न घेता खोल विचार करून कृती करावी' या  शिकवणुकीचे उदाहरण दिले गेले आहे. बोधिसत्वाने यात कावळ्याचा जन्म घेतला आहे आणि तो आपल्या परिवारासह महास्मशानात राहत असतो. एका कावळ्याने डोक्यावर शीट टाकल्याने गावच्या  पुरोहिताला समस्त कावळ्याविषयी घृणा उत्पन्न होते. तो सर्व कावळ्यांशी  धरतो. एकदा एक दासी भाताच्या साळी वळवण्यासाठी पहारा करीत बसली, पण त्या साळी मेंढ्याने खाल्ल्या, त्यामुळे रागाने तिने त्या मेंढ्याला हाकलावण्यासाठी जळके कोलीत मेंढ्याला मारले. मेंढ्याच्या लोकरीने पेट घेतला. हत्तीशाळेत हत्ती गवताच्या गंजीवर अंग घासू लागला. गंजीने पेट घेतला आणि त्यामुळे हत्तींच्या पाठी पोळल्या. या जखमांवर औषध सुचविण्यासाठी पुरोहिताला बोलवण्यात आले. त्याने कावळ्यांची चरबी हाच यावरील उपाय आहे असे सुचविले. खरंतर पुरोहिताला  कावळ्यांवर   होता. कावळ्यांवर संकट ओढवले. बोधिसत्वाला जेव्हा या संकटाची वार्ता कळली तेव्हा त्याने विचार केला की कावळ्यांच्या जातीवर ओढवलेले हे संकट दूर करण्याचे सामर्थ्य आपल्या अंगी नाही. यावेळी मैत्रीचा आश्रय घेतला पाहिजे. तो राजाकडे जाऊन त्याने राजाला या संकटनिवारणाविषयी विनवणी करू लागतो. राजाला तो पटवून देतो कि कावळ्यांना चरबी नसते. त्यासाठी तो पुढील गाथा म्हणतो.
नित्य उद्विग्न हृदय , सर्व लोकांस गांजती ।
अमुच्या काक जातीला वसा नाही म्हणून ती ।
राजाला पटते. बोधिसत्व राजाला सांगतो की पूर्णपणे एखाद्या गोष्टीचा पाठपुरावा न करता त्यावरून निर्णय घेणे योग्य नाही.

कावळा जिथेतिथे शीट टाकत असतो ही त्याची सवय या कथेत वापरली आहे. (हे वर्णन अचूक आहे. ) कावळे स्मशानात राहतात. त्यांना चरबी नसते हे का म्हणून लिहिले आहे याचा पुरेसा संदर्भ लागत नाही. तरीही मृत व्यक्ती संबंधित पक्षी म्हणून कावळा हाच पक्षी त्या काळात मानला जात होता, आणि म्हणूनच प्रेत आणि कावळ्यांना चरबी नसणे याचा काहीतरी संबंध त्याकाळात असावा.

१४६. काक जातक
तात्पुरत्या गोष्टींचा शोक करणे वृथा आहे असा बोध या कथेत आहे. या कथेचे संक्षिप्त रूप असे आहे. पूर्वी वाराणशीत ब्रह्मदत्त राजा राज्य करीत असता, बोधिसत्व समुद्रदेवता होऊन राहत होता. एकदा एक कावळा आपल्या पत्नीला घेऊन समुद्राच्या तीरी भक्ष्य शोधण्यासाठी आला. समुद्रतीरी पूजा करण्यासाठी माणसं खिरी, मांस, मासे इ. अर्पण करत होती. त्यामुळे या कावळे जोडप्याची चंगळ झाली. त्यांनी खूप खाल्ले आणि मद्यही प्याले. मद्याची नाश चढली. समुद्रात क्रीडा करायचे त्यांच्या मनात आले. काठावर अंघोळ करताना लाटेबरोबर कावळी पाण्यात खेचली गेली. माश्याने तिला गिळून टाकले. कावळा शोक करू लागला. तेव्हा पुष्कळ कावळे येऊन त्यांच्यासमवेत शोक करू लागले. त्यांनी ठरवले, की पाणी उपसून समुद्र कोरडा करू आणि तिला बाहेर काढू. प्रयत्न करू लागले पण शक्य होईना. समुद्रातल्या देवतेने शेवटी भयंकर रूप धारण करून त्यांना पळवून लावले. ही समुद्रदेवता म्हणजे बोधिसत्वच होता, त्याने कावळ्यांना पळवून लावून त्यांचे प्राण वाचवले.

अति खाणे आणि सगळेच मिळेल त्यावर तुटून पडणे या कार्यासाठी कावळा हाच पक्षी लेखकाला योग्य वाटला.

खंड २

१५४. उरग जातक
ह्या कथेतून दोन वैऱ्यांत बुद्धाने कसा समेट घडवून आणला त्यबद्धलचे दहन दिले आहे. या कथेत एक सुपर्ण (गरुड) आणि नाग यांच्या वैराचा नाश बोधिसत्व कसा करतो ते दिले आहे.
सुपर्ण म्हणजे गरुड. गरुडाचे (सर्वच गरुडांचे वैर नसावे) सर्पाशी वाकडे असते, याचे  लेखकाने निरीक्षण केले असेल. Crested Serpent Eagle. इ. 

१५९. मोर जातक
या जातककथेत सोने, दागदागिने यांचा मोह झालेल्या एका अनुयायाला बुद्ध अश्याच मोहाने अंध झालेल्या राजा, राणीची सुवर्णमोराचे मांस खाऊन  अमरत्व प्राप्त करण्याबाबतची कथा सांगतो. या कथेत सुवर्णमोर बोधिसत्व असतो. या सुवर्णमोरचे वर्णन असे केले आहे. 'ज्या वेळी तो अंड्यात होता तेव्हा अंड्याचा रंग पिवळ्या कण्हेरीच्या कळासारखा होता. अंडे फोडून बाहेर आल्यावर तो मोर सोनेरी रंगाचा होता, पाहणाऱ्याचे मन प्रसन्न करणारा, त्याच्या पंखातून लाल रंगाच्या रेषा उमटल्या होत्या'
हा कुणी काल्पनिक मोर असावा किंवा हिमालयात आढळणारा मोरासमान दिसणारा पक्षी असावा.

१६०. विनीलक जातक 
देवदत्त नेहमी शास्त्याच्या विरुद्ध वागत असे, त्याचा द्वेष करीत असे, नक्कल करीत असे. तो अनेक जन्मांपासून माझ्याशी असे वागत आहे याचे उदाहरण म्हणून शास्त्याने आपल्या अनुयायाला ही कथा सांगितली आहे. विदेह राष्ट्रात, मिथिलेत विदेह राजा राज्य करीत असताना एक सुवर्ण राजहंसाचा  एका कावळीशी संबंध आला. त्यातून झालेला हंसाचा पुत्र ना हंस होता ना कावळा. तो गर्द निळ्या रंगाचा असल्याने त्याला 'विनीलक' असे नाव पडले. पिता सुवर्ण राजहंस त्याला भेटायला जाई. त्याच्या इतर हंस जातीच्या पुत्रांनी हे पाहिले आणि विनीलकाला घेऊन येण्याचे आश्वासन पित्याला दिले. त्याप्रमाणे त्याला एका काठीवर बसवून काठी उचलून सर्व सुवर्णराजहंस पुत्र त्याला घेऊन येत असता, विदेह राजा आपल्या पांढऱ्या सैंधव घोड्यांच्या रथात बसून जाताना विनीलकाला दिसला. त्यालाही आपण राजाच आहोत असे वाटले. तो म्हणू लागला, जसे राजाला अश्व वाहती तसे मला हंस वाहती. त्याच्या या बढाईखोर वागण्याचा हंसाना राग आला आणि त्यांनी ती सर्व हकीगत आपल्या पित्याला सांगितली. पित्याने विनीलकाला तिथून निघून जाण्याचा सल्ला दिला. यातील विनीलक हा देवदत्ताचे प्रतिनिधित्व करणारा आहे.

या कथेतील पक्षी सुवर्ण राजहंस म्हणजे Bar Headed Goose चा प्रकार असावेत का? Golden Goose तर फक्त संकल्पनाच आहे.

१६४. गिज्झ जातक 
आईबापांना पोसणाऱ्या गिधाडाची आणि इतर जनांवरही उपकार करणाऱ्या एक पंडिताची ही कथा शास्ता अनुयायांना उदाहरण म्हणून सांगतो. यातील पंडित श्रेष्टी गिधाडांना थंडीपासून वाचवतो. त्यामुळे गिधाडे परोपकाराने  कपडे, दागिने इतर ठिकाणाहून उचलून त्याच्या घरी टाकू लागतात. त्यांच्या या उचलेगिरीमूळे त्यांना पकडण्यासाठी लावलेल्या सापळ्यात गिधाड असलेला बोधिसत्व सापडतो. तो आपल्या गिधाड आईबापांना पोसत असतो. श्रेष्टी त्याला पकडून  जाताना बघतो आणि त्याला सोडवण्यासाठी राजाच्या दरबारात जातो. सर्व कहाणी ऐकताच राजा गिधाडाला सोडून देतो.
या कथेतील गिधाडावरची गाथा गिधाडांच्या वर्तनाचे अचूक वर्णन करते.

योजने शत प्रेतास गिधाड बघते खरे ।
फासा जाळे जवळचे कसे तू नच जाणिले ।
शंभर योजनांच्या (फार अंतर) अंतरावरून प्रेत पाहून ते घेऊन जातात असे गिधाडांबद्धलचे निरीक्षण यात नोंदवले गेले आहे.
 

१६८. सकुणग्धि जातक 
आपल्या अनुयायांना भिक्षेसाठी योग्य ठिकाणी फिरण्यासंबंधी शिकवण देताना शास्त्याने ही कथा सांगितली. या कथेत बोधिसत्व एक लावा म्हणून जन्माला आला होता आणि एका शेतात नांगरलेल्या ओळींच्या ढेकळांत तो राहत होता. एक दिवस त्याला आपले नेहमीचे ठिकाण सोडून दुसऱ्या शेतात जायची इच्छा झाली, जिथले फारसे काही त्याला माहित नव्हते. तिथे हिंडत असताना एका ससाण्याने त्याच्यावर झडप घालून त्याला पकडले. तेव्हा बोधीसत्व विलाप करू लागला की आम्ही जर आमच्या शेतात हिंडत असतो  तर ससाणा पकडू शकला नसता. ससाण्याने हे ऐकून त्याला सोडले आणि सांगितले तू स्वतःच्या ओळखीच्या शेतात जा, मी तुला तिथेही पकडेन. त्याप्रमाणे बोधिसत्व लावा आपल्या शेतात गेला. ससाण्याने आपले बळ कमी केले आणि दोन्ही पंख पसरून लावल्यावर झडप घातली. पण बोधिसत्व लाव्याला ते समजले आणि तो चटकन ढेकळात शिरला. वरून वेगाने येणाऱ्या ससाण्याला वेग आवरता न आल्याने तो ढेकळावर आपटून मेला.

ससाण्याच्या शिकारीच्या पद्धतीचे हे अतिशय अचूक वर्णन आहे. अनेकदा हे ससाणे अश्याप्रकारे प्रचंड वेगाने भक्ष्यांवर आधळण्याचा प्रयत्न करतात. या हेतूने की त्यानेच भक्ष्य मारून जाईल. पण असे आधळणे अनेकदा त्यांच्या जीवावर बेतते.

 १८७. चतुमट्ट जातक 
या जातक कथेत सारीपुत्त आणि मोग्गलान या बुद्धाच्या शिष्यांबद्धल आणि एका म्हाताऱ्या भिक्षुबद्धल घडलेल्या हकीगतीवरून हीच हकीगत पूर्वी कशी घडली होती हे शास्ता अनुयायांना सांगतो. या कथेत सारीपुत्त आणि मोग्गलान हे हंसाची पिल्ले होते. म्हातारा भिक्षु एक कोल्हा होता आणि बोधिसत्व अरण्यातील वृक्षदेवता होता. या कथेत तोच प्रसंग हंस, कोल्हा आणि वृक्षदेवता त्यांच्याबाबतीत कसा घडला एवढेच आहे.

२०४ वीरक जातक 

देवदत्ताचे दुर्गुण त्याच्या नाशाचे पूर्वजन्मी देखील कसे कारण झाले होते याचे उदाहरण म्हणून शास्त्याने ही कथा सांगितली आहे. या कथेत बोधीसत्व पाणकावळ्याच्या जन्माला आला होता आणि तळ्याकाठी राहू लागला. त्याचे नाव वीरक असे होते. त्या काळात त्या प्रदेशात दुष्काळ पडला आणि कावळ्यांची मोठी दयनीय अवस्था झाली. वाराणशीत राहणारा सविट्टक(सविष्टक) त्याला मासे पकडताना बघून विचार करू लागला की याच्याशी दोस्ती केली तर भरपूर मासे खाता येतील. त्याप्रमाणे बोधिसत्व पाणकावळा वीरक याच्याशी त्याने दोस्ती केली. बोधिसत्व त्याला आपल्या वाट्यातले मासे देऊ लागला, ते मासे सविट्टक आपल्या पत्नी कावळीला देऊ लागला. यातूनच त्याच्या मनात गर्व उत्पन्न झाला. त्याला वाटले, आपणही या वीरक सारखे मासे स्वतः पकडू शकू. बोधिसत्वाने त्याची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. पण सविट्टक ने ऐकले नाही. पाण्यात, शेवाळाच्या गुंत्यात पाय अडकून तो बुडून गेला. तो साविट्टक म्हणजे देवदत्तच होता असे शास्त्याने शेवटी स्पष्ट केले आहे. यातील पाणकावळ्याचे वर्णन देखील अचूक केले आहे.
बोधिसत्व कावळ्याची समजूत घालताना म्हणतो 'तू पाण्यात उतरून मासे पडणाऱ्या कावळ्याच्या जातीत जन्माला नाहीयेस'.
जलस्थलचरक पाखराला । सदा मत्स्यमांस भक्षकाला ।

या कथेतील पाणकावळा हा Little Cormorant असावा. कारण तो कावळ्याच्या जवळपास उंचीचा असून कावळ्याशी दिसण्यात बरेच साम्य असते. पाणकावळा याला 'उदककाक' असाही एक शब्द आहे.

२०६. कुरन्ङमिग जातक 
हि जातक कथा बारहूत शिल्पांमध्ये चित्रित केली आहे असे Cunningham याने लिहिले आहे. ( )
देवदत्ताच्या कुकर्माबद्धल शास्त्याने ही कथा सांगितली आहे. या कथेत बोधिसत्व कुरन्ङमृग म्हणजे (Antelope )काळवीटाच्या जन्माला आला. रानात एकदा एका शिकाऱ्याने जाळे लावून त्याला पकडले. कुरन्ङमृगशोक करु लागला. त्याचा शोक ऐकून त्याचा मित्र 'सतपत्त' म्हणजे सुतार पक्षी आणि कासव त्याला सोडवण्यासाठी आले. ते त्याची सुटका कशी करतात, सुतारपक्षी कसे शिकाऱ्याच्या घराच्या पुढच्या आणि मागच्या बाजूला जाऊन त्याला घाबरावतो आणि जाळ्याकडे येण्यापासून परावृत्त करतो. आणि कासव जाळे कुरतडून कसे काळविटाला मोकळे करते ते या कथेत दिले आहे.
यातील सुतारपक्षी जेव्हा शिकाऱ्याला जोरात आवाज करून, पंख फडफडवून शिकाऱ्यावर आघात करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा शिकारी त्याला 'हा कसला वाईट शकुनाचा पक्षी आला आहे असे त्याला संबोधतो.'

या कथेसाठी सुतार पक्ष्याचीच निवड केली असण्यामागे काहीतरी कारण असावे. त्या काळात सुतार पक्षी शकुनासाठी वापरला जात होता का? काही ठिकाणी Hooppoe हा पक्षी शकुन/जादूटोणा यासाठी वापरला जायचा. या संदर्भात थोडा अभ्यास करावा लागेल.

२०९. कक्कर जातक 
शरीराची अत्यंत निगा राखणाऱ्या एक भिक्षुबद्धल शास्त्याने हि कथा सांगितली आहे. या कथेत फारसे काही नाही. एक पारधी रानात कृत्रिम लावा (Quail) घेऊन इतर पक्ष्याना पकडायला येतो. तेव्हा काही केल्या त्याला एका लाव्याला (जो स्वतःची उत्तम निगा राखत असे) पकडता येईना. अखेर झाडांच्या पानांत स्वतःला  गुंडाळून तो त्याला पकडायला पाहू लागला. हे बघून रानकोंबडा त्याची चेष्टा करू लागला. रानकोंबडाही हाती आला नाही म्हणून पारध्याने गाथा म्हटली

कोंबडा पोक्त फासा हा मोडून चालला पहा ।
चर्मपाशात कुशल उडुनी चाललाच हा ।

या कथेतील लावा म्हणजे Quail आणि रानकोंबडा म्हणजे Jungle Fowl.

या कथेत आलेल्या दुसऱ्या एका गाथेत काही वृक्षांची पालीतील नावे आपल्याला समजतात.
जसे बेहडा म्हणजे विभितक (Terminalia Belerica )
आणि साग म्हणजे अस्सकण्ण (Vatika Robusta )(अश्वकर्ण : सागाची पाने आकाराने फार मोठी असतात, पण घोड्याच्या कानापेक्षा हत्तीच्या कानाशी जास्त संलग्न वाटतात)

२१०. कन्दगळक जातक 
देवदत्ताच्या दुर्गुणांचे/कुकर्माचे उदाहरण म्हणून शास्त्याने ही कथा सांगितली आहे. या कथेत बोधिसत्व एका सुतारपक्ष्याच्या जन्माला आला होता. सुतारपक्ष्याला पालीमध्ये 'सक्खवकोट्टेसकुण' असे म्हणतात. संस्कृतमध्ये 'काष्टकूट' म्हणतात. तो खैराच्या(खदिर)वनात राहायचा म्हणून त्याचे 'खदिरवनीय' असे नाव पडले. त्याचा मित्र पळसाच्या वनात (फाळीभद्दवन) राहायचा, त्याचे नाव कन्दगळक(कंद खाणारा) असे होते.
बोधिसत्व आपल्या मित्राला खैर वृक्षावरचे किडे कन्दगळकला खाऊ घालू लागला. त्यावर उन्मत्त होऊन कन्दगळकाने विचार केला की मी स्वतःच माझे अन्न खाऊ शकतो, कुणाकडून ते कशाला घेऊ ? आणि तो कठीण अश्या खैराच्या झाडावर प्रहार करू लागला. बोधिसत्वाने समजावले, की तू पळसाच्या रानात राहून ठिसूळ लाकडात भक्ष्य शोधणारा झाला आहेस, हे तुला जमणार नाही. पण कन्दगळक काही ऐकत नाही, प्रहार करून शेवटी त्याचा जीव जातो.
खैराच्या झाडाचे वर्णन असे केले आहे :
अहो पातळ पानांचा काटेरी वृक्ष कोण हा।
एक घाव घालताच डोके हे फुटले पहा ।

वनी  वृक्ष अंगे जयाची असार
तये फोडली हो करुनी  प्रहार
ससत्व खैरास गरुड हाणतो
कपाळ  फोडून स्वतःचे घेतो


'फाळीभद्द' म्हणजे पळस (Butea Frondosa), गरुड खैरासारखे कठीण झाड फोडू शकतो , मऊ लाकूड कोरणारा  सुतार नाही. मऊ लाकूड तोडणारे/कोरणारे बार्बेट सारखे पक्षी त्या काळात या लेखकाने पाहिले असतीलच, त्यावरून त्याला ही दोन सुतारपक्ष्याची विचित्र गोष्ट सुचली असावी. नाहीतर मऊ लाकूड फोडून सुतारपक्ष्याची चोचीची कणखरता कमी होऊ शकते का. (माझा सुतार पक्ष्याचा काहीही अभ्यास नाहीये)

२१४. पुण्ण नाडी जातक 
या जातककथेमध्ये पूर्ण(भरलेल्या) नदीला  'काकपेय्य' शब्द दिला आहे. काकपेय्य :नदी भरली म्हणजे कावळे सुखाने तिचे पाणी पितात. जवाचे शेत उभे राहिले की कावळे तिथे लपून राहतात. आणि कावळा लपेल इतके पीक वाढले म्हणजे त्याला 'काकगुह्य'असं म्हणतात. काकगुह्य म्हणजे 'गुप्त वचन'. कावळा ओरडला की माणूस येणार आहे असे म्हणतात. या सर्वावर असेलली एक गाथा या कथेत आहे.

ज्याच्या पिण्याने नदी पूर्ण होते ।
जव-शेत ज्याला लपवून ठेवते ।
बोलावती दूरगतास ज्यामुळे ।
खा ब्राह्मणां तो बघ ये तुज्यापुढे ।

कावळ्यांविषयी बरेच वर्णन, आणि त्या काळातले कावळ्यांविषयीचे संदर्भ/समज इथे आढळतात.

२२६. कोसिय जातक 
ही एक बुद्धाच्या पूर्वीच्या जन्माची कथा आहे. एका अवेळी बाहेर पडलेल्या घुबडाला कावळ्यांनी घेरून कसे मारले अशी ही कथा आहे. अकाली, नको त्या वेळी काही करायला गेलं की असंच संकट ओढवतं असा या कथेचा अर्थ आहे. यातील गाथा घुबड आणि कावळे यांच्या वर्तनाशी चपखल बसते. कावळे घुबडांना बराच त्रास देतात. घोळका करून एखाद्याला घेऊन त्याच्यावर तुटून पडायचं ही कावळ्याची पद्धत सर्वश्रुतच आहे.
काळी पडावे बाहेर, अकाळी नच चांगले ।
अकाळी निघता एका बहू ते मारती बरे ।
काकांनी मारिले घुबडा काहीही नच साधले ।।
धीर, विधिज्ञ लोकांचे अंतरंगही पारखी ।
वश करी सर्व शत्रुंना घुबडासम तो सुखी ।।

घुबड आणि कावळा यांचे वागण्याचे अचूक वर्णन. 

२३६. बक जातक 
बगळ्याचा ढोंगीपणा एका लबाडाला अनुलक्षून ही कथा शास्त्याने सांगितली आहे. यातील बगळा (बक) Heron किंवा Stork जातीचा कुठलाही बगळा असू शकतो. पण   रंग पांढरा असल्याने Egret, White Stork यापैकी कुणी असू शकतो. Egret असण्याची शक्यता जास्त कारण तो पूर्णपणे पांढरा असतो.

पक्षी   द्विज भला रंग पांढरा कुमुदोज्ज्वल ।
ध्यान मंद मंद करी पंख शांत सुनिश्चल ।।
जाणता शील याचे ना, अज्ञाने स्तविता बरे ।
पाळी न द्विज हा आम्हा , म्हणुनी पंख संथ रे ।। 

२५५. सक जातक 
खाण्याचा अतिरेक करूननाश ओढवून घेणाऱ्या भिक्षुला अनुलक्षून शास्त्याने सांगितली. हिमालयात राहणारा एक पोपट खाण्याच्या अतिरेकाने स्वतःचा सर्वनाश ओढून घेतो. हा हिमालयातील पोपट म्हणजे Slaty headed parakeet असावा का? 
या कथेचे  एक विशेष म्हणजे 'समुद्रालगतच्या हिमालयाच्या रांगा' असे जे लिहिलेले आहे त्याचा खुलासा दुर्गा भागवतांनी केला आहे. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे हिमालयाच्या पूर्वेला आणि पश्चिमेला समुद्र होता ही प्राचीन भौगोलिक कल्पना आहे. कालिदासाच्या कुमारसंभवातही ती आढळते.
२६९. सुजाता जातक 
ही कथा फार मोठी आहे पण यातील दोन पक्ष्यांचे दिलेले संदर्भ अतिशय अचूक आहेत. जो बाह्यांगी सुंदर असतो तो गुणांनी सुंदर असेल असेच नाही, याचे उदाहरण म्हणून नीलकंठ (Indian Roller ) आणि कोकीळ हे पक्षी दिले आहेत. दिसायला मोहक  असला तरी नीळकंठाचा आवाज कावळ्यासारखा कर्कश असतो. तेच कोकीळ पक्षी काळा असला तरी आवाज मधुर असतो. 

कोकिळा ठिपकेवाली काळी कुरूप देख ना 
स्निग्ध वाणी तिची फार मोहवी प्रिय ती जनां 
वाणी कोमल नम्र अशी अर्थपूर्णच बोलणे 
धर्म अर्थ प्रकाशी तो त्याचे मधुर बोलणे 
फक्त यामध्ये कोकीळ पक्षी(जो गातो) संपूर्ण काळा असून ठिपके नसतात. ठिपकेवाली कोकिळा गात नाही. 'ठिपकेवाली आणि काळी ' असे दोन्ही गुणधर्म असणारी ही कोकीळ पक्ष्याची (तेही गाणारी)कुठली जात असेल? हे काही कळले नाही.


२७०. उलूक जातक 
 कावळ्यांशी घुबडांचे वैर कसे झाले हे सांगणारी ही कथा आहे. पहिल्या कल्पात (युगात) सर्व जातींनी आपापले राजा निवडले. पक्ष्यांनी घुबडाची निवड केली, परंतु हे कावळ्याला पसंत नव्हते. त्याने घुबडाच्या वटारलेल्या डोळ्यांवरून ठरवले की हा आत्ताच असा दिसतो तर रागावल्यावर कसा दिसेल. आणि गाथेत घुबडाचे दिसणे स्पष्ट केले. 
न रुचे अभिसिंचन या घुबचे मुळी मज ।
अकृद्धाचे जर असे , राग येता कसे मुख ।।
तेव्हापासुन घुबड आणि कावळ्याचे वैर आहे. पक्ष्यानी सुवर्णहंसाला राजा केले. (जो बोधिसत्व होता)
उलूक जातक मथुरेतील शिल्पात कोरले आहे. 
http://ignca.nic.in/jatak021.htm
२४८. किंसुकोपम जातक 
या कथेत पळस वृक्षासंबंधी बरेच लिहिले गेले आहे.

२७४ लोल जातक २७५ रुचिर जातक आणि ४२ कपोत जातक सारखेच आहे 
'लोल' म्हणजे पालीमध्ये लोभी/लोलुप. पण context नुसार अर्थ बदलू शकतो. उदा. २७८ महिस जातक यात  माकडाच्या खोडकर स्वभावाला 'लोलमक्कट' शब्द वापरला आहे.



२७७. रोमक जातक
या कथेतही देवदत्ताचा पशुपक्ष्यांविषयीचा कपटीपणा दर्शविण्यासाठी शास्त्याने ही कथा सांगितली आहे. या कथेत बोधिसत्व पारव्याच्या जन्माला आलेला असतो आणि इतर पारव्यांबरोबर राहत असतो. एक तापस (  देवदत्त) याला पारव्याचे मांस खायला मिळतात(दान करणारे त्याला ते मांस देतात) तो विचार करतो की आश्रमात मुक्त फिरणाऱ्या पारव्यांना मारून त्यांचे मांस खाल्ले पाहिजे. त्याप्रमाणे तो एक सोटा कापडात लपवून पारव्यांना मारायला बसला. बोधिसत्व इतर पारव्यांसमवेत तिथे खाद्य टिपायला आला तेव्हा तपासाचे ढोंगीपणाने तिथे जवळच बसणे त्याच्या लक्षात आले. त्याने दुरूनच वाऱ्यावरून येणारा तपासाच्या अंगाचा वास घेतला, त्यावरून त्याने ताडले की याने पारव्याचे मांस खाल्ले असावे. तो इतर पारव्यांना घेऊन दूर जाऊ लागला. तापसाने त्यांना गोड बोलून जवळ बोलावण्याचा प्रयत्न केला, गोड गाथा म्हटल्या. पण बोधिसत्व पारव्याला त्याचा कपटी कावा लक्षात आला होता. त्याने तपासाला त्याचेच ढोंग सुनवले. रागाने तापसाने सोटा बोधिसत्वाच्या, पारव्यांच्या  दिशेने फेकला. तो चुकला. 'आता तू सुटलास ' तेव्हा बोधिसत्व म्हणाला 'तू माझ्या हातून सुटलास, पण चारी नरकातून तू काही सुटायचा नाहीस'

या कथेत पारवा (Blue Rock Pigeon) आहे. आणि पक्षी या अर्थाने 'रोमक' हा पाली शब्द आहे. 'रोमक' म्हणजे पिसे असलेला.

काही गोष्टींचे संदर्भ वेगळे वाटले त्यांच्याबद्धल अधिक वाचले पाहिजे. पारवा Blue Rock Pigeon याला स्मेल सेन्स असतो का? सगळ्याच पक्ष्यांना गंधज्ञान असते का?
https://www.allaboutbirds.org/guide/Rock_Pigeon/lifehistory
http://www.birdsandblooms.com/birding/birding-basics/can-birds-smell-taste/ 

पारव्याच्या गंधज्ञानाविषयी लेखकाला कसे समजले? अत्यंत गहन/क्लिष्ट असे हे निरीक्षण लेखकाने केले होते की त्याने हे  काल्पनिकरित्या रचलेले आहे. 'पारवा' या पक्ष्याला गंधज्ञान असते हे कॉर्नेलच्या ऑर्निथोलॉजि लॅब ने मान्य केले आहे.
कदाचित लेखकाला तसे शास्त्रीय ज्ञान नसेलही. काही पक्ष्यांना धोक्याचे ज्ञान होते. त्या अर्थानेही लेखकाला 'धोक्याचा वास म्हणजेच पारव्याच्या मांसाचा/मरणगंध' असेही सुचवायचे असेल.

'चार नरक' आणि मुळात 'नरक' ही कल्पना बौद्ध धर्मात आहे का?
https://en.wikipedia.org/wiki/Naraka_(Buddhism). हे मी आता वाचले नाही. कारण मूळ विषयापासून ते फारकत घेणारे ठरेल. पण हे कधीतरी वाचावे लागेल. विकिपीडिया येथे 'चार' नरक नाही तर आठ नरक आणि त्यांची नावेही दिली आहेत.
बुद्धाने 'आत्मा' मानला नाही. मृत्यूनंतरचे जीवन हा त्याचा विषयच नव्हता कधी. स्वर्ग/नरक मूळ संकल्पना होत्या का बुद्धाच्या हे कसे समजायचे? कठीण आहे. या संकल्पना हिंदू धर्माच्या संकल्पनावर (आणि इतरही धर्मांच्या) बेतलेल्या वाटतात. आणि नक्कीच त्या बुद्धाच्या नसाव्यात. बुद्ध मृत्यूनंतर काय ? त्याबद्धल काहीच बोलला नाहीये. तो फक्त दुःख आणि त्याचे निवारण या विषयीच बोलतो. स्वर्ग/नरक हे सर्व नंतर समाविष्ट केलेले वाटते. माझे बुद्धाचे/ त्याच्या आयुष्याचे/ त्याच्या शिकवणुकीचे आणि त्याच्या स्वतःच्या मृत्यूनंतर लोकांनी घातलेल्या धर्माच्या गोंधळाचे ज्ञान फारच कमी आहे. अधिक वाचायला पाहिजे.

२९२. सुपत्त जातक

या कथेत बोधिसत्व कावळ्यांचा राजा (सुपत्त) झाला आहे. त्याची पत्नी सुफस्सा हिला वाराणशीच्या राजाच्या घरचे अन्न खाण्याचे डोहाळे लागतात. बोधिसत्व सुपत्त याचा सेनापती(सारीपुत्त) राजाच्या अन्न घेऊन जाणाऱ्या सेवकाला जखमी करतो, अन्न आपल्या कावळे समुदायाला बोधिसत्वाकडे घेऊन जायला सांगतो पण स्वतः पकडला जातो. वाराणशीच्या राजाला कळून चुकते की आपल्या राजासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालणारा हा कावळा कोणी सर्वसामान्य नव्हे, तो त्याचा आणि बोधिसत्व काकराजाचाही सत्कार करतो. आणि त्यांच्यासाठी अन्नाची कायमची तरतूदही करतो. बोधिसत्वाने केलेल्या उपदेशांचे  तो पालनही करतो.
ही बोधिसत्व , सारीपुत्त, राहुलची माता, आणि शिष्य आनंद(वाराणशीचा राजा) याच्या मागच्या जन्मांची गोष्ट आहे.

२९४. जंबू खडक जातक आणि २९५ अन्त जातक
या जातककथेत कावळा आणि कोल्हा यांचे उल्लेख आहेत. वृक्षदेवता(बोधिसत्व) त्यांना जांभळाच्या झाडावरची जांभळे मिळवण्यासाठी एकमेकांची खोटी स्तुती करताना बघतो आणि घालवून देतो. कावळा हा कोकीलक आणि कोल्हा हा देवदत्त यांचे प्रतिनिधित्व करतात. यातील बोधिसत्वाने म्हटलेल्या गाथेत कावळ्याच्या सडलेले मांस खाण्याच्या आणि कोल्ह्याच्या प्रेताचे लचके तोडण्याच्या अंगभूत गुणधर्मावर वाच्यता केली आहे.
अन्त जातक सुद्धा कोल्हा (देवदत्त) आणि कावळा(कोकीलक) यांची हीच कथा वेगळ्या प्रकारे सांगते. बोधिसत्व वृक्षदेवतेने म्हटलेल्या गाथा मात्र कावळ्याचे अचूक वर्णन करतात.

पशूंच्या शेवटी कोल्हा, खगांच्या काक ज्ञात हे ।
वृक्षांचा अंत एरंड, एकत्र तीन अंत हे ।

ही गाथा अतिशय सुंदर आहे आणि कावळा आणि एरंड कसे 'अंताचे' प्रतिनिधी आहेत ते दर्शविते. जगातील सर्वात विषारी(जीवघेणी) वनस्पती म्हणजे एरंड, म्हणजे अंतच. आणि कावळा म्हणजे अंतसमयी दिसणारा, असणारा, अंताची चाहूलच देणारा. मृत्यूचे आणि त्याचे समीकरण पूर्वपार चालत आलेले. या अनुषंगाने ही गाथा अचूक वाटते. त्यात कावळा पुन्हा लबाडही असतो असेही दर्शविले आहे कथेत. कितीतरी शिकारी पक्ष्यांमध्ये ते कितीही भयंकर शिकारी असले तरी एकप्रकारचा 'राजस'(royal sense) असतो. ते  धूर्त/बेरकी/कावेबाज वाटत नाहीत. पण कावळा तसा वाटतो. तो धूर्त/बेरकी/चलाख/लबाड/संधीसाधू असतो असे त्याचे वर्णन या कथांत आढळून येते. पण पक्षी म्हणून काही तो अगदी वाईट नसावा, त्याचे हे गुण देवदत्त, कोकीलक पेक्षा कमीच कपटी असावेत.

२९६. समुद्द जातक
उपनंद या भिक्षूच्या हव्यासीपणावर उदाहरण म्हणून शास्त्याने ही गोष्ट सांगितली आहे. या कथेत एक पाणकावळा (उदककाक) समुद्रावरून जात असताना 'समुद्राचे पाणी कमी प्या' म्हणून इतर पशुपक्ष्यांना अडवू लागतो. पाणी इतर कुणी पिऊन संपेल, आणि ते फक्त मलाच सगळे प्यायचे आहे अशीच त्याची आशा असते.
अनंततृष्ण मी पक्षी जागी साऱ्या ठाऊक असे।
नदीपती सागराला मी समग्र पिण्या बघे ।

त्यावर समुद्रदेवता(बोधिसत्व) त्याला तिथून पळवून लावते. Cormorant किंवा पाणकावळ्याचे 'समुद्रकावळा' असेही भाषांतर दुर्गा भागवत यांनी केले आहे.

२९७. कामविलाप जातकात आपल्या भार्येला संदेश देण्यासाठी देहदंड झालेल्या व्याकुळ माणसाने  कावळा हाच पक्षी निवडला आहे.


खंड ३

३५७.  लटूकिक जातक 
देवदत्ताचा पशुपक्ष्याविषयी दुष्टपणा दर्शविण्यासाठी शास्त्याने ही कथा सांगितली. ता कथेत एक स्त्री लावा पक्षी आपल्या पिल्लं तुडवू नयेत म्हणून बोधिसत्व हत्तीला याचना करतो. बोधिसत्व त्यांचे रक्षण करतो, पण तेच देवदत्त ज्या हत्तीच्या जन्मी असतो तो हत्ती लावीणीच्या पिल्लाना तुडवतो. लावीण एक  निळी माशी, एक कावळा आणि एका बेडूक यांच्याद्वारे देवदत्त हत्तीचा सूड घेते. 
लावा जरी छोटा असहाय पक्षी असला तरी तो बुद्धिवान आहे हे या कथेत दाखवले आहे.

३६०. सुस्सोंदि जातक
'स्त्रीला सुरक्षित ठेवता येत नाही.'  हे  दर्शविण्यासाठी म्हणे शास्त्याने ही कथा सांगितली (?? हे कसले ब्रह्मज्ञान ? 'हे' बुद्धाने सांगितले? छे ! हे काही पटत नाही. हे पाखंडी धर्मवेड्यानी बुद्धाच्या नावावर घुसडले. ) मी अनेकवेळेला वाचले आहे की बुद्ध स्त्रियांना अनुयायी करून घेण्यात उदासीन होता. (महावीर तसा नव्हता म्हणे). दुर्गा भागवतांनी देखील हे लिहिले आहे. बुद्ध स्त्री विरोधी होता ते अशासाठी की की स्त्री म्हणजे वासनेचे उगमस्थान. पण पुरुष हेही वासनेचे उगमस्थान नाही का? (पुरुषाला बघून स्त्रीच्या मनात इच्छा/वासना उत्पन्न होऊ शकत नाही का? मग स्त्रीवरच हा ठपका का? दोष तिला  एकटीलाच का? जे निसर्ग सत्य आहे. जीवशास्त्र आहे (procreation: उत्पत्ती  (उत्पत्ती, स्थिती, लय) चक्रातली) त्यात मानवी मेंदूने ढवळाढवळ करून 'वासना' उत्पन्न केली आहे. कुठले पक्षी/प्राणी  वासना अवलंबतात? ते निसर्गाचे जीवशास्त्राचे नियम पाळतात. जवळ येतात आणि दूर होतात. (किंवा एकपतिव्रत पाळतात त्याहीमागे वासना कमी आणि नैसर्गिक प्रेरणा अधिक असावी, दुर्बल पोरांना स्वतःच मारतात, किंवा सबळ पोरांना दूर हाकलून देतात )
इच्छा/वासना  करणे हा नैसर्गिक नियम नाही. इच्छा/वासना माणसाच्या मेंदूच्या ढवळाढवळीने निर्माण झालेल्या 'स्व' /मी भावनेने तयार झालेली  आहे. ती  काही फक्त पुरुषाच्या मनात उत्पन्न होते  असे नाही. स्त्रीला ती भावना उत्पन्न होऊ शकते. मग फक्त स्त्रीलाच का दोष?
बुद्धाने हे discrimination इतक्या बोडक्या सरधोपट पद्धतीने केले? कमाल आहे. त्याला कसली बोधी प्राप्त झाली असे म्हणायचे मग? जर तो बुद्ध बनूनही स्त्री-पुरुष असा भेदभाव करत होता? स्त्रीला त्याला दीक्षा द्यायची नव्हती म्हणे (आता याला exceptions आहेत पण एकंदरीत बुद्ध स्त्री विरोधी असा नूर का दिसतो? )
स्त्रीला सुरक्षित ठेवता येत नाही? ही काय शिकवण झाली?
बरं, दुःख आणि दुःखाचे निवारण बुद्धाने शोधले.  दुःखापासून मुक्त होण्याचे मार्ग सुचवले. दुःख काय फक्त पुरुष जमातीलाच होते का?   कधी कधी मला वाटते खरा बुद्ध काहीही न सांगता मरून गेला असेल. पण त्याच्या सानिध्याचा नुसता स्पर्श झालेल्यानी हे धर्म/शिकवणुकीचं अवडंबर माजवलं असेल. मी जातककथा फक्त मनोरंजक (पक्षी/ झाडे/ संकल्पना/ जुन्या काळातील आख्यायिका /मिथ्स / इमॅजिनेटिव्ह creativity ) म्हणून वाचते. यातले जे बोध आणि उपदेश आहेत ते तद्दन भिकार आहेत. ते कपाळकरंट्या लोकांनी आत घुसडलेले आहेत. त्यात खरंच काही तथ्य असते तर आजवर दुःखाला समजण्यात/त्याला स्वीकारून शांत राहण्यात जग (आणि मीही ) यशस्वी झाले असते. कुठच्याही कथा घ्या, इसापनीती, पंचतंत्र, कथासरित्सागर, अरेबियन नाईट्स, याना मनोरंजकता यासाठीच वाचले पाहिजे आणि ती मात्र अगदी ओतप्रोत आहे यात. पण कुणी शिकवण म्हणून याला बघत असेल तर मात्र कठीणच आहे.
'तुम्ही स्वतःच स्वतःचे दिवे व्हा, कुणाला गुरु/ मानू नका, फॉलो करू नका' म्हणणारा बुद्ध आज त्याच्या अगणित रूपांनी किती केविलवाणा वाटतो. लोकांनी (फॉलो करू नका म्हणणाऱ्या) त्यालाच फॉलो केले. म्हणजे लोक किती हुशार नाही? खरा बुद्ध 'गपचूप बसला असेल. त्याने कुणाला काही सांगितलेच नसेल/उपदेश केलाच नसेल' :-)
मी स्त्रीवादी अजिबात नाही. मी कसलीच 'वादी' नाही. कसल्याही 'वादाच्या'  जवळ देखील मला फिरकायचे नाही. मला एवढेच म्हणायचे आहे की जीवन म्हणून जे काही जगायचे आहे त्यात basic existence लिंगभेद मानत नाही, basic existential problems (जन्म, मृत्यू, शरीराच्या सगळ्या involuntary processes आणि जिवंत असतानाचा एकटेपणा('वृद्धाश्रमातला/अविवाहित/विधवा/विधुर' वैगेरेंचा तसला हा एकटेपणा नव्हे, हा वेगळाच 'एकटेपणा: जो सांगता यायचा नाही, जो न संपणारा , insolvable आहे तो ' ) सुद्धा लिंगभेद मनात नाही, तर मग इथे कशाला ते discrimination. तेच भेदभाव, तेच उच-नीच, तेच हे वाईट-ते चांगलं. या पलीकडे काही नाहीच आहे का?  so superficial शिकवणी आहेत  या. anyways. जाऊदे.

मी शेवटी असेच म्हणून माझे समाधान करून घेईन की 'वासना ही कशी impermanent आहे' हेच बुद्धाला या जातक कथेतून सांगायचे असेल. स्त्री आणि एकंदरीतच कुठचीही गोष्ट (सिम्बॉलिक ऑफ वासना/मालमत्ता/desire to possess) ही कशी बाळगण्यासाठी/possession म्हणून राखता येत नाही. ती नश्वरच आहे.

फक्त या कथा थोड्या gender discriminating वाटतात. म्हणून हे वरचे विषयांतर झाले. असो.   आता कथेकडे वळू. उदा. या  'दुःशील स्त्रीशी मला काय करायचं आहे ?'   'दु:शील' : फक्त स्त्री?  आणि सुपर्ण (गरुड) झालेला बोधिसत्व जो राजाच्या बायकोशी संबंध जोडतो त्याचे शील? मला 'शील' या संकल्पनेचे काही स्वारस्य नाही पण तिचे शील मानता तर त्याचे पण माना. 

काय हे? ही कथा मुळीच आवडली नाही. ही कुठल्या कपाळकरंट्या त्या काळच्या सिरीयल लिहणाऱ्या भिकार लेखकाने लिहिली आहे?  सुपर्ण गरुड आणि सर्प (गंधर्व ) हे वैर पण बरे  साधले आहे लेखकाने.

या कथेत : सुपर्ण म्हणजे गरुड. गरुड हा इतका राजेशाही पक्षी. त्याचीही असल्या फडतूस कथेसाठी निवड व्हावी हे त्याचे दुर्दैव.

या कथेत silver lining एकच. ते म्हणजे दुर्गा भागवतांची 'तिमिर फुले' या नावाची तळटीप.
किती सुंदर शब्द आहे हा ! 'तिमिर फुले' वन तिमिर फुले म्हणजे कोविदार /कांचन या वृक्षाची निळी फुले, त्यांना सुवास येतो.
निळी फुले असणारा कांचन वृक्ष असतो का? Bauhinia grandidieri हा एकच कांचन जातीतील छोटा वृक्ष निळ्या फुलांचा आहे. या लेखकाला कुठला कांचन वृक्ष अपेक्षित होता?


३६७. सालिय जातक 
या कथेत देवदत्ताने शास्त्याला दिलेला त्रास दर्शिविला आहे. बोधिसत्व एक खेड्यातला लहान मुलगा म्हणून जन्माला आला होता आणि एकदा खेळत असता एका वैद्याने 'पोराला साप चाववून-मग उपचार करून पैसे मिळवीन' याउद्देशाने बोधिसत्व मुलाला झाडाच्या बेचक्यात साळूचे पोर आहे ते घेशील का म्ह्णून विचारले. बोधिसत्वाने बेचक्यात हात घालताच साप हाताला लागला. तो त्याने भिरकावून दिला जो वैद्याच्या गळ्यात पडून त्यालाच चावला. अशी ही कथा. कथेत काही विशेष नाही. 
साळू म्हणजे 'सारिका' किंवा मैना हा पक्षी. 

३६८. तचसार जातक ही ३६७. सालिय जातक याचा उत्तरार्ध आहे. अशी ही उत्तरार्ध म्हणून लिहिली गेलेली पहिलीच कथा आहे असे दुर्गाबाई नोंदवतात. 

३७०. पलास जातक 
या कथेत 'काम (इच्छा या अर्थाने) विकाराची नेहमी शंका घ्यावी, या उपदेशाचे उदाहरण दिलेले आहे. एक सुवर्णहंस (बोधिसत्व) एका पळस वृक्षावर राहतो. तिथे एक पक्षीं शीट टाकते, ज्यातून वडाचे रोपटे रुजते. सुवर्णहंस पळसाच्या वृक्षाला सांगतो की हे वडाचे रोपटे फेकून दे, ते तुझा सर्वनाश करेल. पळस वृक्ष मात्र माझं मुलगा म्हणून वाढवीन असे म्हणून दुर्लक्ष करतो. आणि वडाचे रोपटे वाढून त्याचा वृक्ष होतो, पळस मरून  जातो. 
झाडे अशी एकमेकांवर रुजतात आणि वाढतात. वडापेक्षा ज्यास्त योग्य वृक्ष 'चंदन' झाला असता. वडही असा दुसऱ्या झाडावर वाढतो का?  तपासले पाहिजे. 

३७५ कपोत जातक 
२७४ लोल जातक २७५ रुचिर जातक आणि ४२ कपोत जातक सारखेच आहे 

३७९. नेरु जातक 
या कथेत बोधिसत्व एका सुवर्णहंसाच्या जन्माला आला होता. तो आणि त्याचा लहान भाऊ (शिष्य आनंद) चित्रकूट  पर्वतावर राहत असत. एकदा चरून येताना त्यांना 'मेरू पर्वत' दिसला आणि तिथे जाताच त्यांना सर्व पशुपक्षी सोन्याच्या रंगाचे झालेले दिसले (एरव्ही ते साधेच होते) ते पाहून बोधिसत्वाने आपल्या लहान भावाला सांगितले की इथे संत आणि शूद्र यात भेद नाही, इथे राहणे योग्य नाही. आणि तो आपल्या भावाला घेऊन तिथून निघून जातो. 
कथेत काहीच तथ्य नाही. सुवर्णहंस ही देखील एक संकल्पनाच. 

३८० असक्ङ जातक 
या कथेत तसे विशेष काही नाही. मूळ कथेत 'बगळा' या पक्ष्याचा उल्लेख केला आहे असे दुर्गा भागवतांनी तळटिपेत दिले आहे. त्याचा मागमूस कथेत आढळत नाही.  पण 'कोरांटी'चे   गाथेत वर्णन आढळते. त्याविषयी दुर्गा भागवत यांनी काही तळटीपाही दिल्या आहेत. 
देसी तू वचने तोष, पुरविसी नच कामना ।
कोरांटीची जशी माळ, सुरंगी पण गंध ना ।

कुरंडक /कुवरक म्हणजे कोरांटीचे झाड 
 
 ३८१ मिगालोप जातक 
या कथेत (उपदेश) न ऐकणाऱ्याच्या ऐकणाऱ्याचा, न जुमानणाऱ्याचा कसा नाश होतो हे सांगितले आहे. या कथेत एक अपरण्ण गिज्झ नावाचे गिधाड (बोधिसत्व)राहत होते. त्याचा मुलगा मिगालोप त्याला न जुमानता आकाशात विहार करताना उन्मत्त होऊन सीमा ओलांडून उडतो आणि आपला सर्वनाश करतो अशी कथा आहे.
गिधाडे कळपाने राहतात. त्यामुळे पिता-पुत्र आणि मोठ्यांचे/अनुभवी वृद्धांचे ऐकले पाहिजे हे उदाहरण देण्यासाठी या पक्ष्याला निवडले असावे. इतर बऱ्याच पक्ष्यांच्या जाती घोळक्याने राहत नाहीत. हा उपदेश द्यायला त्यांचा उपयोग नाही.


३८३ कुक्कुट जातक
स्त्री आणि विषयवासना कशी वाईट हे दाखवण्यासाठी हि उपदेशपर कथा. यात बोधिसत्व एक कोंबडा म्हणून जन्माला आलेला असतो आणि एका  मांजरीने त्याच्या सर्व भाऊबंदांना कावेबाजपणे खाल्लेलं असतं. याला कसे भुलवायचे म्हणून ती गोड बोलवून त्याला आपल्याला त्याची पत्नी व्हायचे आहे असे सुचवते. पण बोधिसत्व तिला तिचा खरा कावा सांगून घालवून देतो.
स्त्रियांची बरीच नालस्ती या कथेत आढळते.
कोंबडा हा पक्षी का बरे या कथेत घेतला आहे कोण जाणे? खरं तर कुक्कुट जाती बिचारी अतिशय गरीब आणि फार तल्लख नसलेलीच असते. म्हणूनच मांजरी विरुद्ध कोंबडा हा पक्षी योजला असावा.

३८४. धम्मध्वज जातक
या कथेत एक दुष्ट भिक्षुला अनुलक्षून त्याच्या कपटी कावेबाजपणाविषयी ही गोष्ट सांगितली गेली आहे. या कथेत बोधिसत्व पक्ष्याच्या कुळात जन्माला येतो. 'दिशाकाक' म्हणजेच नावेला दिशा दाखवणारा कावळा(कपटी भिक्षु), एकदा बोधिसत्व आणि इतर पक्षी राहत असेलेल्या बेटावर येतो आणि या पक्ष्यांची पिल्ले/अंडी मटकावण्याच्या विचाराने एका पायावर उभा राहतो. पक्ष्यांना सांगतो की तो एक धार्मिक आहे, वारा पिऊन राहतो. पक्षी विश्वास ठेवून आपली अंडी /पिले सोडून अन्नाच्या शोधात जातात, तेव्हा कावळा पिले/अंडी मटकावतो  आणि आपण त्या गावचेच नाही अशी बतावणी करतो. पक्षी शोक करतात पण धार्मिक कावळ्यावर कसा संशय घ्यायचा म्हणून गप्प बसतात. बोधिसत्व (याचा उल्लेख महासत्व असा केला आहे) त्याचे ढोंग उघडकीस आणतो.
कावळ्यांचा उपयोग दिशाकाक म्हणून त्या काळात केला जात असे हे हे या कथेवरून सूचित होते. त्याबद्धल वाचायला हवे.

३८९. सुवण्णकट्टक जातक
या कथेत बोधिसत्व एका शेतकरी असलेल्या ब्राह्मणाच्या जन्माला येतो. त्याची शेतावरच्या एका सुवर्णखेकड्याशी मैत्री होते. बोधिसत्व खेकड्याला मदत करण्यासाठी कायम शेतावर जायचा. तिथे राहणाऱ्या कावळ्याच्या पत्नीने बोधिसत्वाच्या डोळ्यात पाच प्रकारचे प्रसाद आणि तीन सुविशुद्ध मंडले बघितली. (डोळ्यांचे सात्विक सौन्दर्य) तिला बोधिसत्वाचे डोळे खाद्य म्हणून हवे असतात. कावळा  त्यावर एक उपाय काढतो. जवळच राहण्याऱ्या कृष्णसर्पाशी तो दोस्ती करतो, त्याची सेवा करतो. आणि त्याच्याकडून बोधिसत्वाला विषबाधा करून डोळे काढून घेण्याचा बेत रचतो. कृष्णसर्प बोधिसत्वाला दंश करतो. पण कावळा बोधिसत्वाचे डोळे काढून घेत असताना सुवर्णखेकडा त्याची मान धरतो. कृष्णसर्पाला विष काढून घेण्यास सांगतो. आणि त्यानंतर सर्प आणि कावळा या दोघांपासून बोधिसत्वाला पुन्हा त्रास होऊ नये म्हणून त्यांचा नाश करतो. कपटी देवदत्त (कावळा), कृष्णसर्प (मार) यांचे उदाहरण देण्यासाठी ही कथा शास्त्याने सांगितली आहे.
या कथेत कावळा हा कपटी वृत्तीचा दर्शक म्हणून वापरला आहे.

३९४.  वट्टक जातक
एका हावरट भिक्षुला अनुलक्षून ही कथा शास्त्याने सांगितली आहे. या कथेत बोधिसत्व एका लाव्याच्या जन्माला आला. हावरट भिक्षु कावळ्याच्या जन्माला आला होता. कावळ्याने गुबगुबीत लाव्याला बघून विचार केला की हा जरूर काहीतरी चांगले खात असणार. परंतु बोधिसत्वाने गाथा म्हणून






 




 





















































  
 









 













  















  








 



 






Saturday 1 April 2017

कृष्ण गरुड

पोकळी
सगळी
सामावून विस्तीर्ण
मोकळी
आकृती काळी
फिरे वर्तुळी
घेऊन झळाळी
वेगवान निळी
गाठे क्षणात
शून्याची पातळी
वाटे जन्म घेऊन
व्हावे यासम
यावे उंच फिरून
जावा ठिपका
विरून

३१-मार्च -२०१७